Friday, 11 December 2020

बी. ए. भाग २/ मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ४ /सञ ३/ पाठ्यपुस्तक - काव्यगंध/ कविता -आख्यान-वसंत आबाजी डहाके/

बी. ए. भाग २

मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ४

सञ   ३ पाठ्यपुस्तक - काव्यगंध.

कविता -आख्यान-वसंत आबाजी डहाके.

विषय प्राध्यापक -प्रा. बी. के. पाटील.

           आख्यान-जागतिकीकरणामुळे माणसाच्या आयुष्याची झालेली परवड.

              आख्यान ही दीर्घ कविता आहे.जागतिकीकरणामुळे, काॅर्पोरेट जीवनामुळे सर्वसामान्य माणसाचे जगणे हरवले आहे. त्याच्या अस्तित्वाची परवड सुरु आहे. ही परवड कवीने या कवितेत मांडली आहे. हे आख्यान पूर्वीही चालू होतं आणि आत्ताही चालूच आहे.

     हरिश्चंद्राचा मुलगा रोहित याला बळी देण्याऐवजी शनु:शेपाचा बाप फायद्यासाठी शनु:शेपाला बदली बळी देण्याचे कबूल करतो, हा उल्लेख कवी करतो व आपलाही बदली बळी दिला जातो असं म्हणतो. केवळ मूठभर धान्याच्या बदल्यात  आपला बळी दिला आहे.या राजकारणी व श्रीमंतांनी एक गुढी उभारली आहे. ते बुध्दीजीवी लोकांची बुध्दी विकत घेतात.आज लोकांची गुणवत्ता ही एक विकत घेण्याची वस्तू बनली आहे. पण कवीची मूल्यांवर निष्ठा आहे. त्यामुळे त्याला भ्रमिष्ट झाल्यासारखे वाटत आहे.

       पूर्वी भूकंप , दुष्काळ,पूर यामुळे लोक गाव सोडून जात  माञ आज विकास आला की माणसं देशोधडीला लागतात.  ज्या व्यक्तींचं जगणं हरवलं आहे त्यांनु आपल्या मुळांचा शोध घेणं हे सुध्दा या कवितेच सुञ आहे या महानगरात मनासारखे जगता येत नाही आणि मागे जायची दारे बंद झाली आहेत. गावी एक समूहभाव होता. आता शहरात काॅर्पोरेट कल्चरमुळे हा समूह भाव गाडला गेला आणि एकाकीपण उरले आहे. 

     आता बदकं आणि राजहंस यांच्यात सत्तास्पर्धा सुरु आहे. यात बदक असणं हे कमीपणाचं आहे आणि राजहंस श्रेष्ठ आहेत असं ठरवलं आहे. पण हे राजहंसानी स्व:च ठरवलं आहे. यात बदकांचा सहभागच नाही. आज शोषकच इतिहास लिहीत आहेत. खरं तर शोषितांनी इतिहास लिहायला हवा, असं कविला वाटतं

      सामान्य माणूस टिकला पाहिजे,जगला पाहिजे असं स्वप्न कवी डहाके यांची ही कविता बघते आहे. काळोखात दिवट्या घेतलेल्या माणसांचा एक जथा  पुढे सरकतो आहे. 

     हा जथा पृथ्वीला सावरुन धरेल असा आशावाद ही कविता व्यक्त करते.

बी ए भाग २ / मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ४/ सञ :३/ काव्यगंध/ वसंत आबाजी डहाके:महानगरीय कविता.

 बी ए भाग  २

मराठी अभ्यासक्रमपञिका क्रं ४

सञ  :३ काव्यगंध

विषय प्राध्यापक प्रा. बी के पाटील

वसंत आबाजी डहाके:महानगरीय कविता.

परिचय  :वसंत आबाजी डहाके यांचा जन्म ३०मार्च,१९४२ रोजी यवतमाळ जिल्हातील बेलोरा या गावी झाला.१९६० पासून ते कविता लेखन करत आहेत. १९६६साली सत्यकथा मासिकात योगभ्रष्ट कविता प्रसिद्भ झाली. चंद्रपुरमधिल २०१२च्या ८५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

    १९७२चा योगभ्रष्ट हा त्यांचा पहीला काव्यसंग्रह,त्या नंतर शनु:शेष, चिञलिपी इ. काव्यसंग्रह प्रसिद्भ झाले. 

    काव्य लेखनामागे डहाके यांच्याजाणिवांचे अंत:सूञ आहे.

त्या संध्याकाळी समूद्र या कवितेतील वसंत आबाजी डहाके  यांच्या मनाची अवस्था  :

        या कवितेत  कवी समुद्र आपल्याला रक्ताळलेल्या घोड्यासारखा दिसला असे म्हणतात. कवी मुबईभर फिरला.त्याला कुठेच करमेना.पण प्रत्येक क्षणी समुद्र आपल्या आसपास आहे असेच त्याला वाटत होते.

     ही कविच्या मनाची अवस्था आहे .

मुंबई हे महानगरीय कवीला समुद्रासारखे विशाल, घोड्यासारखे गतिमान वाटले. माणसे विवीध कारणांनी जीवनभर दु:खी असतात.ती आपले दु:ख विसरायला समुद्रावर जातात. या संगळ्याचे दु:ख समुद्र पोटात घेतो. या अर्थाने समुद्र, संध्याकाळ आणि समुद्राचे जखमी असणे यांचे जवळचे नाते आहे असे कविला वाटते.

       मुंबईतला अरबी समुद्र हा दृश्य आहे. तो  दिसतो. पण असाच एक अदृश्य समुद्र कवीच्या मनातही आहे, या कवितेत तो कविची साथ सोडतच नाही कविला कुठेच करमत नाही भटकंतीत सर्वच ठीकांनी हा समुद्र आहेच

    या कवीतेत ज्ञानेश्वरीत म्हटल्याप्रमाणे सुखाचे झबले घालून प्रत्यक्षात दु:खच आपल्याकडे येत असते.आपल्याला वाटते सुख आले आहे, हीच अनुभूती कवी घेतो.

Friday, 4 December 2020

बी.ए. भाग-१ मराठी • आवश्यक अनुषंगिक निवड( CGE- 1) ¤ शब्दाचे मोल ¤ चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी (1927)

(E-content created by Dr V. S. Patil)

  बी.ए. भाग-१ मराठी

• आवश्यक अनुषंगिक निवड( CGE- 1)

 ¤ शब्दाचे मोल ¤

              चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी (1927)                 

▪️शब्दाचे मोल▪️

                  मध्य प्रदेशातील रायपूर येथे जन्म. दादा धर्माधिकारी हे त्यांचे वडील . राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ ,नागपूर येथे उच्च शिक्षण . नामवंत वकील ,गांधीवादी विचारांचा प्रभाव. अंतयात्रा , काळाची पावले, भारतीय संविधानाचे अधिष्ठान, मंजिल दूरच राहिली, माणूस नामा, मानवनिष्ठ अध्यात्म, शोध गांधींचा, समाजमन , सहप्रवास,सूर्योदयाची वाट पाहूया अशा मराठी पुस्तकांचे लेखन न्यायमूर्ती का हलफनामा , लोकतंत्र एंव राहों के अन्वेषण ही हिंदी पुस्तके प्रसिद्ध इ.स.2004 साली पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित.

                त्यांच्या काळाची पावले या पुस्तकातून 'शब्दाचे मोल' हा उतारा घेतलेला आहे वडील दादा धर्माधिकारी यांच्या सहवासात झालेली घडण, वक्तृत्वाची तयारी वगैरे अनुभव लेखकाने कथन केले आहेत जो प्रयोग करतो,आव्हानांच्या परिक्षेला सामोरे जातो, तो यशस्वी होतो हा संदेश येथे मिळतो

बी.ए. भाग-१ मराठी • आवश्यक अनुषंगिक निवड( CGE- 1) ¤ पन्नासपैकी शून्य मार्क्स ¤ शांता शेळके

  बी.ए. भाग-१ मराठी

• आवश्यक अनुषंगिक निवड( CGE- 1)

 ¤ पन्नासपैकी शून्य मार्क्स ¤

              शांता शेळके (1922-2002)

                        

                   

▪️पन्नासपैकी शून्य मार्क्स ▪️

                      प्रसिद्ध मराठी लेखिका, कवयित्री,अनुवादक व गीतकार. 'नवयुग ' या साप्ताहिकात नोकरी.नागपूर,मुंबई येथे मराठीचे अध्यापन. कविता,कथा,कादंबरी,व्यक्तिचित्रे,बालसाहित्य,चित्रपटगीते,समीक्षा,आत्मकथन,अनुवाद अशा विविध साहित्य प्रकारावर लेखन.वर्षा,रूपशी,तोच चंद्रमा....,गोंदण,ओळख,जन्मजान्हवी,पूर्वसंध्या,इत्यर्थ इ.काव्यसंग्रह व गीतसंग्रह प्रकाशित. मुक्ता आणि इतर गोष्टी हा कथासंग्रह व स्वप्नतरंग ही कादंबरी प्रकाशित. शब्दांच्या दुनियेत हा ललितलेखसंग्रह. कालिदासाच्या मेघदूताचा अनुवाद. धुळपाटी हे आत्मकथन. हायकू या जपानी काव्यप्रकारात लेखन. पश्चिमरंग,वडीलधारी माणसे ही व्यक्तिचित्रणात्मक पुस्तके.आळंदी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा. अनेक ग्रंथांना महाराष्ट्र शासनाचे वाड़मयीन पुरस्कार. 

            'पन्नासपैकी शून्य मार्क्स ' या पाठात शांता शेळके यांनी शालेय जीवनातील लहानसा पण महत्त्वपूर्ण अनुभव सांगितला आहे.मुलांच्या शाळेत एकटीच मुलगी,मराठी विषयात अतिशय हुशार असल्यामुळे जागृत झालेला सुक्ष्म अहंकार,शाळा तपासणीत झालेले कौतुक,पण गणितात पडलेले पन्नासपैकी शून्य मार्क्स मिळाल्यामुळे झालेले गर्वहरण,या अनुभवाच्या माध्यमातून शांता शेळके यांनी माणसाला कितीही मोठे यश मिळाले तरी माणसाने अहंकारी न होता सदैव नम्रता अंगी बाणवावी अशी शिकवण देण्याचा प्रयत्न केला आहे.नेमक्या आणि प्रासादिक शब्दकळेमुळे हा अनुभव विलक्षण प्रत्ययकारी झाला आहे.

बी.ए. भाग-१ मराठी • आवश्यक अनुषंगिक निवड( CGE- 1) ¤ वाटेवरच्या सावल्या ¤ कुसुमाग्रज तथा विष्णु वामन शिरवाडकर

 बी.ए. भाग-१ मराठी

• आवश्यक अनुषंगिक निवड( CGE- 1)

 ¤ वाटेवरच्या सावल्या ¤

       कुसुमाग्रज तथा विष्णु वामन शिरवाडकर (1912-1999)

         ▪️वाटेवरच्या सावल्या▪️

                 आधुनिक कवी,नाटककार व कादंबरीकार. 'जीवनलहरी','विशाखा','किनारा,'मराठी माती,'स्वगत',' हिमवर्षाव,'वादळवेल', महावृक्ष इ.काव्यसंग्रह प्रकाशित. 'दुसरा पेशवा',कौंतेय','आमचं नाव बाबूराव ','ययाती आणि देवयाणी','वीज म्हणाली धरतीला','नटसम्राट 'ही नाटके प्रकाशित. कालिदासाच्या 'मेघदूता'चे तसेच अन्य पाश्चात्य नाटकांचे मराठीत रूपांतर 'वैष्णव ','जान्हवी,'कल्पनेच्या तीरावर 'या कादंबऱ्याही लिहिल्या आहेत. शिवाय कथा,निबंध आणि काव्यसमीक्षात्मक लिखाणही त्यानी केलेले आहे.साहित्य अकादमी आणि ज्ञानपीठ या पुरस्कारानी ते सन्मानित आहेत.

             'वाटेवरच्या सावल्या' या पाठात कुसुमाग्रज यांनी त्याच्या बालपणातील सुंदर आठवणी ओघवत्या भाषेत कथन केल्या आहेत.कौटुंबिक वातावरण,माध्यमिक शाळेत असताना साहित्य,कला,क्रिडा,नाटक यांची लागलेली गोडी,वाचनाचे संस्कार, एका फकिराची अरेरावी वृत्ती व त्याच्याशी झालेली झटापट,शिक्षकांच्या अध्यापनातून झालेले काव्याचे संस्कार, क्रिकेट या खेळाची मनस्वी आवड आणि त्यासाठी केलेल्या खटपटी यांचे मनोरम वर्णन कुसुमाग्रजांनी केले आहे.शिवाय 'वणी' नावाचे लहानसे गाव, या गावातील ग्रंथालय,चिपळूणकरांची ग्रथमाला,गडकर्याची नाटके,कवितासंग्रह,कादंबर्‍या इ.वाचन,नाटके आणि काव्याच्या छंदापायी गणित विषयात आलेले अपयश;हे सारे काही या पाठात कुसुमाग्रजांनी आत्मियतेने कथन केलेले आहे.

                      नाशिकच्या एच.पी.टी.महाविद्यालयात शिकत असताना कुसुमाग्रज गणित विषयात नापास झाले.एक वर्ष वाया गेले.वडिलांना झालेल्या दु:खाने त्याना खुप वाईट वाटले.पुढे त्यांनी झटून अभ्यास केला.मराठी आणि इंग्रजी विषयात बी.ए. झाले या पाश्र्वभूमीवर त्यानी पुढे केलेली प्रगती थक्क करून सोडते.

बी.ए. भाग-१ मराठी /आवश्यक अनुषंगिक निवड( CGE- 1) ¤ निवड- यशवंतराव चव्हाण ¤

  बी.ए. भाग-१ मराठी

• आवश्यक अनुषंगिक निवड( CGE- 1)

 ¤ निवड- यशवंतराव चव्हाण ¤

        

      यशवंतराव बळवंतराव चव्हाण  (1913-1984)

              महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय नेते.सविनय कायदेभंग चळवळीत सहभाग, 1942  च्या छोडो भारत आंदोलनात सहभाग,स्वतंत्र भारताचे संरक्षणमंत्री,गृहमंत्री,अर्थमंत्री,परराष्ट्रमंत्री. कार्यक्षम मंत्री,उत्तम संसदपटू,उदारमतवादी नेते,वक्ते आणि लेखक म्हणून परिचित. 'कृष्णाकाठ' हे आत्मचरित्र. 'सह्याद्रीचे वारे',युंगातर या दोन संग्रहातून विचारप्रवर्तक भाषणे प्रकाशित. 

▪️निवड▪️

           या पाठातून यशवंतराव चव्हाण यांच्या महाविद्यालयीन जडणघडणीचा प्रत्यय येतो.कोल्हापूरशी जिव्हाळ्याचे नाते, कायद्याच्या शिक्षणासाठी पुण्यातील महाविद्यालयात प्रवेश, वाचनाशी जडलेले नाते,शिक्षणाबरोबर समाजकारण, राजकारणातील सक्रियता,अभ्यासमंडळे,सभा-संमेलनातील सहभाग या सर्वांमुळे कायद्याच्या प्रथम वर्षांत आलेले अपयश,त्यावर केलेली मात,दुसरे महायुद्ध,या महायुद्धाचा भारतावर झालेला परिणाम,वेगवेगळ्या विचारसरणीशीं करावा लागलेला संघर्ष यांचे इ.बाबींचे चित्रण या लेखात केले आहे.शिक्षण घेत असताना आपल्या वर्तमान जगण्याशी असलेले नाते,त्यात सक्रिय सहभाग असूनही आपले व्यक्तीमत्व कसे संपन्न,विविधांगी आणि सुसंस्कृत करता येते याचा प्रत्यय या पाठातून येतो.

मराठी अभ्यासपत्रिका -3 / सेमिस्टर -III / बी.ए. भाग- 2/ नाटक- काय डेंजर वारा सुटलाय! लेखक-जयंत पवार

(E-content created by Dr V. S. Patil)

मराठी अभ्यासपत्रिका -3 , सेमिस्टर -III       बी.ए. भाग- 2

नाटक- काय  डेंजर वारा सुटलाय!लेखक-जयंत पवार 

नाटक:

         नाटक हा एक वाड़मय प्रकार आहे.नाटक दृकश्राव्य वाड़मय प्रकार आहे. या घटकाचा अभ्यास केल्यावर आपल्याला- 

* नाटक या वाड़मय प्रकाराची वैशिष्ट्ये स्पष्ट करता येतील. 

* नाटकाच्या दृकश्राव्य स्वरूपाचे वेगळेपण नोंदवता येतील. 

* नाटक या वाड़मय प्रकाराच्या जन्माचा इतिहास सांगता येईल. 

* नाटक या वाड़मय प्रकाराची व्याखा करता येईल. 

● नाटक व्याख्या●

1) शब्दांनी तयार झालेले संवाद साभिनय सादर करावयाची कला म्हणजे नाटक. 

2) एका मानवी समूहाने दुसर्‍या मानवी समूहासमोर सादर करावयाची कला म्हणजे नाटक.

3) नाटक म्हणजे शब्दांपासून तयार होणारी संहिता आणि या संहितेचे सादरीकरण म्हणजे नाटक. नेपथ्य, संगीत, प्रकाशयोजना, अभिनय,इ.घटकांच्या मदतीने करता येते.पण या सर्व घटकांची सुप्त शक्ती शब्दानी तयार झालेल्या संहितेत असावी लागते.

● नाटकाचे घटक ●

 ( अ) विषयसूत्र 

 ( ब)  संविधानक 

 ( क) पात्रचित्रण

 (ड)   संवाद

● नाटकाचे प्रकार ●

                  1) शोकात्मिका(Tragedy)

                   2) सुखात्मिका (Comedy)

                   3)क्षोभप्रदान नाट्य            (Melodrama)

                   4) प्रहसन ( Farce)

■ नाटकांचे उपप्रकार ■

                 1) एकांकिका

                 2) दिर्घांक 

                 3) पथनाट्य 

                 4) एकपात्री प्रयोग 

                 5) नाट्यछटा

                 6) संगीतिका 

                 7) नभोनाट्य 

   ▪️ नाटकांचे आशयानुरूप वर्गीकरण ▪️

   1) पौराणिक 

   2) ऐतिहासिक 

   3) समस्याप्रधान

    अ) सामाजिक 

    ब) राजकीय 

    क) दलित 

    ड) स्त्रीवादी 

    इ) चर्चाप्रधान

BCOM_AEC

https://drive.google.com/file/d/1F1IRMakowHOCmho9iSvSdqoPKh2SWmVe/view?usp=sharing