Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: BA II Marathi (जुगाड)

Friday, 10 April 2020

BA II Marathi (जुगाड)


(Written by Pramod Munghate)
(Uploaded by B. K. Patil)
असामाजिक जीवनव्यवहाराचा कडेलोट : ‘जुगाड’

किरण गुरव यांच्या ‘जुगाड’ या कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा कादंबरीकार ह. ना. आपटे हा मानाचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांचे मन:पूर्वक अभिनंदन करताना ‘जुगाड’ कादंबरीची ओळख करून देणारा महाराष्ट्र टाइम्सच्या संवाद पुरवणीत प्रकाशित झालेला लेख :

किरण गुरव यांची कथाकार म्हणून ओळख आहे. 'राखीव सावल्यांचा खेळ' आणि 'श्रीलिपी' या दोन कथासंग्रहांनी त्यांच्याबद्दलच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. नुकतीच त्यांची ‘जुगाड’ ही कादंबरी दर्या प्रकाशनने प्रसिद्ध केली आहे. ग्रामीण आणि निमशहरी भागातील सुशिक्षित तरुणांची बेकारी, शहरात होणारी त्यांची कोंडी आणि जागतिकीकरणातील अर्थव्यवस्थेशी जुळवून घेताना त्यांची होणारी दमछाक हा विषय तसा नवा नाही. मात्र ‘जुगाड’मध्ये येणारी कोल्हापूर-गारगोटी या विशिष्ट भूप्रदेशाच्या पार्श्वभूमीवर भ्रष्ट राजकारणी आणि त्यांचे आजारी उद्योग यात एका गरीब तरुणच्या आयुष्याची होरपळ हृदय हेलावून टाकणारी आहे.
     
कादंबरीचे कथानक आणि पात्रे यांच्याबद्दल सांगायचे तर, शश्या हा इंजिनिअर झालेला कोल्हापूरकडील एका खेड्यातील तरुण. पुण्यात कॉटबेसिसवर लॉजमध्ये अर्धपोटी राहून काही कंपन्यामध्ये टेम्पररी नोकऱ्या करून कंटाळतो. अखेर पुण्याला कायमचा राम राम ठोकून राधानगरी या गावाजवळच्या माळरानावर उभ्या होत असलेल्या एका राजकीय नेत्याच्या नवीन प्लांटवर साईट इंजिनिअर म्हणून उत्साहाने रुजू होतो. तिथल्या खडकाळ स्थितीत बरेच दिवस तग धरून राहिल्यावर फसवणूक झाल्याचे कळते, तेंव्हा कोलमडून जातो. पुण्यात त्याच्यासारखे काही कायमस्वरूपी तात्पुरत्या नोकऱ्या करणारे मित्र आणि राधानगरीच्या प्लांटवरील काही कामगार ही या कादंबरीतील मुख्य पात्रे. या अत्यंत खडबडीत पोताच्या तरटावर मध्येच एखादी नाजूक नक्षी काढली असावी, तशी सीमा नावाची सिव्हील इंजिनिअर हे एक कोरीव पात्र लक्षात राहण्यासारखे आहे.

‘जुगाड‘ ची रसरशीत ताजी शब्दकळा वाचन प्रवाहित ठेवते आणि बांधून ठेवते. पुण्यातील फ्याक्टर्या, तेथील कामाचे दैनंदिन रहाटगाडगे, कामगारातील स्पर्धा, हेवेदावे, मंदीची टांगती तलवार यांचे वर्णन स्थलकालसापेक्ष बोलीभाषेत असल्याने कथनात एकप्रकारचा वेग आलेला आहे. फ्याक्टरीमधील यंत्रे, तांत्रिक प्रक्रिया, व्यवसायाचे सूक्ष्म संदर्भ हे सामान्य वाचकाला नवीन असले तरी लेखक वाचकांना हळूहळू त्यात गुंतवत जातो. या सगळ्या अनुभवविश्वाला आयुष्य करपून टाकणाऱ्या दु:खाची किनार असली तरी किरण गुरव यांनी नर्मविनोदी शैलीतील कथनाचा एक वेगळाच प्रयोग केला आहे.

महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सुशिक्षित तरुणाई आज बेरोजगारीच्या वणव्यात कशी सैरभैर झाली आहे, नैराश्याच्या ज्वाळात होरपळली आहे, हे वास्तव ज्या उडत्या शैलीत लेखक वर्णन करतो ती या कादंबरीची एक ताकद आहे. तेव्हढीच नाही. कादंबरीतील अनेक प्रसंगात नायकाची बेफिकीर वृत्ती उघडी पडते. तो वरून वरून उसने अवसान आणत असला तरी जागतिकीकरण्याच्या रेट्यात ग्रामीण जीवनशैली आणि अर्थव्यवस्था कशी लयाला गेली याची त्याला जाणीव आहे. शिक्षण, रोजगार, उद्योग, पर्यावरण आणि अर्थकारण यांची परस्परविसंगत आणि दिशाहीन वाटचाल यांचा एक अव्यक्त अनुभव वाचकाला कादंबरीच्या अखेरीस गुदमरून टाकणारा वाटतो. 

मोठे उद्योगपती, गावातील राजकारणी आणि सरकारे जागतिक अर्थव्यवस्थेच्या बाहुल्या झाल्या आहेत, ही  रोजच्या जगण्याचा संघर्ष करणाऱ्या माणसांच्या आकलनापलीकडील गोष्ट आहे. कादंबरीतील नायक आणि इतर पात्रे या मोठ्या जगड्व्याळ यंत्रणेतील काही खिळे आहेत. त्यांना आहेत तिथे जुळवून घेणे याशिवाय दुसरे जीवन नाहीच. असा एक उदासवाणा आणि भ्रमिष्ट करणारा शेवट आहे. एका रसरशीत आणि अगदी नवीन अनुभवाने मन भरून जाते आणि त्याच वेळी कादंबरीचा नायक शश्याचे चिरंतन दुखः वाचकाचे काळीज कापत जाते. 

पुण्यातील लॉजेस, तेथील खोल्या, गावाकडील बेकार तरुणांचे जगणे, खानावळ, रोजगारासाठी वणवण भटकणे, आजार, दुखणे खुपणे यांचे तपशीलवार वर्णन वाचताना ब्ल्याक कॉमेडीचा अनुभव येतो. तरुण मनाची उभारी, त्याच्या जगण्यातील उर्जा, उत्साह आणि चपळता ही नैसर्गिक वैशिष्ट्ये जणू आता कालबाह्य झाली की काय असे वाटावे, असा हा काळाचा तुकडा किरण गुरव यांनी  आपल्या आगळ्यावेगळ्या शब्दांच्या चिमटीत पकडून आपल्या समोर आणला आहे.

राधानगरी प्लांटमध्ये नायकाचे सहकारी, यंत्रसामग्री उभारण्याचे त्यांचे कौशल्य आणि त्याचवेळी बेरकी चेअरमनचे षडयंत्र यांचे चित्रण एका ढासळत्या कालखंडाचे प्रातिनिधिक रूप वाटते.

शश्या या नायकाचे व्यक्तिचित्रण हे या कादंबरीचे खरे शक्तीस्थळ आहे. संवेदना, भावना आणि दुखऱ्या जखमा निकराने दडवत जगण्याला सामोरा जाणारा शश्या दगडावरच्या अंकुरासारखा ताठ उभे राहण्याचा प्रयत्न करतो. लहान लहान प्रसंगातून त्याचे असे जगणे किरण गुरव यांनी सहजपणे  पण मोठ्या ताकदीने चित्रित केले आहे. चित्रमयशैली मुळे कॅमेरातून आपण सगळी दृश्ये बघतो आहोत, असा अनुभव येतो. थकलेल्या शश्याला सीमा म्याडम जेवणाचा डबा आणून देणे, चांदण्या सायंकाळी त्यांचे भटकणे आणि अखेरीस मठातील मंदिरातील त्यांचा एकांत हे प्रसंग सिनेमातील दृश्यासारखे पुन्हा पुन्हा पहावे इतके उत्कट झाले आहेत.

नैराश्याने खचून गेलेला शश्या कादंबरीच्या अखेरीस उडी मारून स्वतःला जखमी करून घेतो. त्या विद्ध अवस्थेत गावाला जाणाऱ्या एसटीत बसतो, हा शेवट म्हणजे आजच्या अमानुष, असामाजिक जीवनव्यवहाराचा  कडेलोट आहे. या कडेलोलोटाचा प्रवास आजच्या बेरोजगार तरुण पिढीला कुठे घेऊन जाईल हे कुणालाच माहित नाही.

-प्रमोद मुनघाटे
‘जुगाड’
किरण गुरव, दर्या प्रकाशन, पुणे
ऑक्टोबर २०१८, पृष्ठे २४७ किमत २५०/-

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Red, Red Rose

  A Red, Red Rose BY  ROBERT BURNS O my Luve is like a red, red rose     That’s newly sprung in June;  O my Luve is like the melody     That...