Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: BA II/HSRM/शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान

Friday 30 April 2021

BA II/HSRM/शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान

                                                        प्रा. मोकाशी पी. .

                                              राधानगरी महाविद्यालय,राधानगरी

                                                      

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान

                                                       

          

          २० या शतकात महाराष्ट्रातील काही समाजसुधारकांनी समाजसुधारणेचे महत्वाचे साधन म्हणून शिक्षणाचा उपयोग करून बहुजनात शिक्षण प्रसार केला. बहुजन समाजाच्या हालअपेष्टा थांबविण्यासाठी, शिक्षणापासून वंचित असलेल्या वर्गाची प्रगती करावयाची असेल तर शिक्षणाशिवाय गत्यंतर नाही . शैक्षणिक विकास म्हणजेच मानवाचा सर्वांगीन विकास . शिक्षणाच्या भक्कम व मजबूत पायावर मानवी जीवन आधारलेले आहे. महाराष्ट्रात प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली पाहीजे.असा विचार काही समाजसुधारकांनी केला. त्यांनी आपले जीवन शिक्षण कार्यासाठीच समर्पित केले. यामध्ये महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,महर्षी धोंडो केशव कर्वे, कर्मवीर भाऊराव पाटील तसेच आणखी एक आदर्श व्यक्तीमत्व म्हणजे शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळूंखे होय.

           दारिद्रय अज्ञान व अंधश्रध्दा यात पिचत पडलेल्या दुखी समाजाचा उच्चार करावयाचा असेल तर शिक्षणासारखे दुसरे प्रभावी साधन नाही.  हे डॉ. बापूजी साळुंके यांनी ओळखले होते. म्हणूनच त्यांनी शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी स्वतःला झोकून दिले . तन, मन व धन अर्पन केले. अशा थोर व्यक्तीचे जीवन व शैक्षणिक क्षेत्रातील कार्य अभ्यासणे महत्वाचे आहे.

डॉ.बापूजी साळुंके यांचे जीवन कार्य :-

           शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंके यांचा जन्म ९ जून १९०९ रोजी सातारा जिल्हयातील पाटण तालुक्यातील रामपूर या लहानशा खेडयात एका सुसंस्कृत कुटुंबात झाला. रामपूर हे डोंगर उतारावर बसलेले एक गाव आहे. बापूजीचे पूर्ण नाव गोविंदराव ज्ञानोजी साळुंके. त्यांना एकूण सहा भावंडे चार भाऊ व दोन बहिणी, गोविंदा एक वर्षाचे असतानाच त्यांच्या आई तानुबाई यांचे निधन झाले. लहान वयातच ते मातृसुखास पोरके झाले तरीदेखील वडील ज्ञानोजीरावाकडून त्यांच्यावर चांगले संस्कार झाले. बापूजी १२ वर्षाचे असताना त्यांच्या वडीलांचे देखील निधन झाले आणि पितृछत्रही हरपले बापूजींना खूप लहान वयातच नियतीचे आघात सहन करावे लागले तरीदेखील कुशाग्र बुध्दीमत्ता, जिज्ञासूवृत्ती, सहनशिलता, कठोर परिश्रम व चिकाटी यामुळे बापूजीचे चरित्र उत्तरोत्तर विकसीत होत गेले.

बापूजींचे प्राथमिक शिक्षण रामपूर येथेच झाले - १९३३ साली ते सातवीची परीक्षा पास झाले. लहानपणापासून वडिलांनी लिहणे व वाचणेस शिकवलेले असल्याने ते लहानपणापासूनच हुशार होते. सातवीनंतर घरची आर्थिक परिस्थिती अगदी हलाकीची बनली होती. कुटुंबात बापूजीव जास्त शिकलेले असल्याने घरात सर्वांना बापूजींनी नोकरी करावी असे वाटत होते पण कुशाग्र बुध्दीमत्ता असलेल्या बापूजींना सातवीनंतर आपण इंग्रजी शिक्षण घ्यावे असे वाटत होते पण शिक्षणाची सोय तेथे नसलेने ते गाव सोडून इस्लामपूरला आले- इस्लामपूर मध्ये त्यांचे वडीलबघु परशुराम रहात होते. तेथे त्यांच्या राहणेची सोय झाली. परंतु थोड्याच दिवसात परशुराम यांचा विवाह झाल्याने से पत्नीसह बेळगाव येथे राहणेस गेले. पुन्हा बापूजींच्या नशिबी एकटेपण आले पण त्यांनी जिद्द सोडली नाही त्याचवेळी ष्णमुख कापसे यांच्या रूपाने देव भेटला. व त्यांनी बापूजींचा शिक्षणासाठी सांभाळ केला असेच म्हणावे लागेल ,त्यानंतर इस्लामपूर येथे होतकरू मुलांच्यासाठी नव्याने सुरू झालेल्या वस्तीगृहात बापूजी राहू लागले. त्यांची वार लावून जेवणाची सोय करणेत आली. बापूजींनी ज्ञानाची खडतर उपासना करून १९४० मध्ये मॅट्रीकवी परीक्षा पास झाले. मॅट्रीकची परीक्षा पास झाल्यानंतर बेळगांव येथील राष्ट्रवीर चे संपादक शामराव देसाई गुरुजी व राजाराम महाविद्यालयाचे इतिहासाचे प्राध्यापक डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या सहकार्याने ते राजाराम महाविद्यालयात शिक्षणासाठी दाखल झाले. तसेच त्यांची राहणेची सोय शाहू महाराजांच्या प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग मध्ये करणेत आली. खरे म्हणजे बापूजींची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी पाहून राजाराम कॉलेजच्या मित्रमंडळीनी गोविंदा नावाचे बापूजी असे नामकरण केले होते. शिक्षण चालू असतानाच बेळगावचे श्री. नानासाहेब पाटील यांची कन्या सुशिला यांच्याबरोबर १५ डिसेंबर १९४० रोजी त्यांचा विवाह अत्यंत साध्या पध्दतीने झाला. विवाहानंतर बापूजी लगेच कोल्हापूरला आले. कोल्हापूरात आल्यानंतर त्यांचे गुरुवर्य इतिहास संशोधक व शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांनी बापूजींच्यातील अभ्यासूवृत्ती ओळखून म्हैसूर राज्यातील सोंडूर संस्थानात बापूजींना इतिहासाचे अध्ययन करणेसाठी पाठविले. तेथे घोरपडे घराण्यांचा इतिहास लिहिण्यासाठी व कागदपत्रे जविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली व त्यांनी ती यशस्वीरित्या पूर्ण देखील केली. कामातील त्यांची जिद्द व चिकाटी पाहून यशवंत घोरपडे यांनी राजपुत्रांना शिकविण्याची जबाबदारी त्यांच्यावर दिल्यावर ती त्यांनी स्विकारून राजपुत्रांना ज्ञानतिर्थ देऊ लागले. पुढे त्या राजपुत्रांच्या उच्चशिक्षणासाठी त्यांच्या सोबत परदेशात जाणेची संधी देखील त्यांना होती. परंतु तसे न करता ते १९४२ च्या क्रांतीपर्वात सामील झाले.

           कांतीसिंह नाना पाटील यांच्याबरोबर बापूर्जीनी १९४२ व्या स्वतंत्र संग्रामात भाग घेतला. कांतीसिंह नाना पाटील यांच्या प्रतीसरकारात सामील होऊन, भूमिगत चळवळीतही भाग घेतला .गुप्त बैठका , गुप्तदेशाची देवाण घेवाण या महत्त्वाच्या कार्यात त्यांनी हातभार लावला. या कार्याबद्दल भारत सरकारने स्वतंत्र सैनिक व महाराष्ट्र शासनाने देखिल सन्मानपत्र देऊन त्यांच्या कार्याची दखल घेतली. बापूजी साळुंके महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग मधील सहका-यांना बरोबर घेऊन श्रीराम समाजसेवा मंडळाची स्थापना इस्लामपूरात केली व त्याच्या माध्यमातून १५ प्राथमिक शाळा सुरू केल्या पुढे १९४२ च्या क्रांतीपर्वात भाग घेता यावा म्हणून या १५ शाळा कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेला जोडून दिल्या.

            बापूजींनी स्वतंत्र संग्रामात भाग घेतला ,पण ते कार्य पूर्ण झाल्यावर त्यांनी आपले लक्ष भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेकडे केंद्रित केले. बापूजी भाऊराव पाटील यांना आपले आदर्श मानत होते . भाऊरावांनी देखील त्यांना रयत शिक्षणसंस्थेच्या सातारा येथील महाराज सयाजीराव हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नेमणूक केली. या स्कूल मध्ये ते वरच्या वर्गाना इंग्रजी ,मराठी व संस्कृत हे विषय शिकवत होते. त्यांची शिकवण्याची साधी, सोपी पध्दत असल्याने विद्यार्थ्यांना ते लवकर समजत असे. विद्यार्थ्याच्या ज्या काही अडीअडचणी असतील ते समजून घेऊन त्यावर मार्ग काढत असत.ते विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. त्यांचे अनेक विद्यार्थी उच्चपदावर कार्यरत आहेत. सातारा येथील हायस्कूलमध्ये असतानाच आपल्या सहका-यांना बरोबर घेऊन रयत शिक्षणसंस्थेच्या मदतीसाठी अफाट कष्ट घेऊल एक लाख एक हजार एकशे एक (१०११११ रूपये निधी जमविला. व तो २७ नोव्हेंबर १९४८ रोजी राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्याहस्ते कर्मवीर भाऊराव पाटील यांना देणेत आला. त्यानंतर कर्मवीरांनी बापूजीची रुकडी येथील हायस्कूल मध्ये मुख्याध्यापक म्हणून नेमणूक केली. बापूजीनी रुकडी येथील हायस्कूलच्या प्रगती साठी अनेक कष्ट घेतले व रुकडी हायस्कूलमध्ये वरचे वर्ग सुरू करून नावारूपाला आणले - तेथे त्यांनी १९५०-५१ ला याच हायस्कूल मध्ये दहावी व अकरावीचा वर्ग सुरू केला. बापूजी रुकडी येथे जवळजवळ सहा वर्षे कार्यरत होते. संस्थेच्या विकासासाठी रात्रदिवस झटत होते. याची दखल घेऊन रयत शिक्षण संस्थेचे आजिव सेवक पद देखील मिळाले खरे पण त्याबरोबर या संस्थेत अनेक हितशत्रूही निर्माण झाले. बापूर्जीचा कोंडमारा होऊ लागला व त्यांनी कर्मवीरांची भेट घेऊन रयत शिक्षण संस्थेतून बाहेर पडत असल्याचा विचार सांगितला. कर्मवीर अण्णांनी देखील बापूजीना अमाप क्षेत्र पडले आहे. तेथे जाणे राहिले आहे." असे सांगून आशिर्वाद दिला. बापूजी कर्मवीर अण्णांच्या रयत शिक्षण संस्थेतून बाहेर पडले व त्यांच्या उदात्त कार्याचे एक महान पर्व सुरू झाले. १९ ऑक्टोबर १९५४ रोजी कराड येथील योगेश्वर भगवान मुरलीधराच्या मंदीरात पूज्य बापूजनी सर्व मित्राबरोबर व हितचिंतकासमोर शिक्षण कार्यासाठी एखादी संस्था स्थापन करणेचा मनोदय व्यक्त केला. आपणा सर्वाना हे कार्य करायचे झालेस अगदी प्रामाणिकपणे केले पाहीजे म्हणून सर्वानी शपथ घेतली व नवीन शिक्षण संस्थेचा जन्म झाला . १ नोव्हेंबर १९५४ रोजी परमपूज्य स्वामी रामानंद भारती यांनी या शिक्षण संस्थेस स्वामी विवेकानंदाचे नाव दिले व बापूजींनी संस्थेचे बोध वाक्य तयार केले ज्ञान विज्ञान व सुसंस्कार , यासाठी शिक्षण प्रसार हे बोधवाक्य संस्थेस आपल्या कार्याची दिशा दाखविणारे व ध्येय साध्य करणारे होते.                        स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या माध्यमातून खेडयापाडयातील, तळागाळातील बहुजन समाजातील मुला मुलींना प्राथमिक, माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण मिळावे म्हणून मराठवाडयातील उस्मानाबाद येथे २० जून १९५९ रोजी महाविद्यालय सुरू केले. संस्थेच्या या पहिल्या महाविद्यालयाला रामकृष्ण परमहंस असे नाव दिले. त्यानंतर कोल्हापूर येथे १९६४ मध्ये विवेकानंद महाविद्यालय तर १९६७ रोजी सातारा येथे लाल बहादूर शास्त्री महाविद्यालय तसेच १९७१ मध्ये तुळजापूर येथे तुळजाभवानी महाविद्यालय सुरू केले.

        बापूजींच्या शिक्षणक्षेत्रातील कर्तृत्वाचे व घौडदौडीचे खरे श्रेय ना. देसाई व ना. यशवंतराव चव्हाण यांनी स्विकारलेल्या महाराष्ट्रातील नवीन शैक्षणिक धोरणास जाते. या शैक्षणिक धोरणामुळे बापूजींना महाराष्ट्रातील कानाकोप-यात, खेडयापाडयात ,डोंगरद-यात सर्वदूर शिक्षणपसार घडवून आणता आला म्हणून तर सातारा, सांगली, कोल्हापूर, उस्मानाबाद, बीड, रत्नागिरी, रायगड व ठाणे या जिल्हयातून या संस्थेचा वटवृक्ष पसरलेला दिसून येतो. १९८७ पर्यंत या संस्थेचा व्याप हा १६४ हायस्कूल, १४ महाविद्यालये डी. एड कॉलेज, कन्याशाळा कन्या महाविद्यालये, २ रात्रशाळा आणि ३७ वस्तीगृहे सुरू होती.

      शिक्षण महर्षी बापूजी साळूंखे यांनी बुध्दीला सत्याकडे, भावनेला माणूसकीकडे , शरीराला श्रमाकडे घेऊन जाणारे शिक्षण देता यावे हे उद्दिष्ट मनाशी बाळगून बहुजन व आदिवासी समाजातील मुलांसाठी महाराष्ट्रातील ३८० संस्कार केंद्रातून शिक्षण प्रसाराचे बहुमोल कार्य केले आणि या बहुमोल कार्यातून अनेक विद्यार्थी व गुरुदेव यांचे जीवन सुखी व समृध्द बनविले.

      शिक्षण महर्षी बापूजी साळुंके यांचे शैक्षणिक तत्वज्ञान खूप वेगळे होते ते नेहमी असे म्हणत की, केवळ स्वराज्य नको तर सुराज्य हवे आहे, त्यासाठी देशाला मी एक चांगला नागरीक देऊ इच्छितो जे राष्ट्रहितासाठी सदैव तयार असतील." पुढे बापूजी म्हणत की " महाविद्यालयीन युवक हे फक्त सामान्य विद्यार्थी नाहीत तर ते विश्वविद्यालयाचे  विद्यार्थी आहेत व विश्वविद्यालयाप्रमाणे त्यांनी स्वप्ने विशाल व व्यापक बनली पाहीजेत." या विशाल मनाच्या विद्यार्थ्यापर्यंत विकृत गोष्ट येणार नाही , यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे व यासाठी समाजातील थोरांचे थोरपण टिकून राहीले पाहिजे आणि अशा गोष्टीचे पालन करून जो विद्यार्थी आचरण करतो तोच समाजाचा आदर्श ठरतो.

          शिक्षण महर्षी बापूजी साळुंके यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील अतुलनीय कार्याबद्दल त्यांना महाराष्ट्रातील समाजाने शिक्षणमहर्षी तर महाराष्ट्र सरकारने त्यांना दलितमित्र म्हणून सन्मान केला व स्वतंत्र सैनिक म्हणूनही मानपत्र दिले. त्याचबरोबर ११ फेब्रुवारी १९८६ रोजी शिवाजी विद्यापीठाने त्यांना डी. लिट. ही सर्वोच्च पदवी देऊन सन्मान केला. समाजात शिक्षण रूजावे शिक्षणाचे महत्व सर्वाना पटावे यासाठी रात्रदिवस चंदनासम झिजून शैक्षणिक क्षेत्रात महान कार्य करणारे व्यक्तीमत्व ८ ऑगष्ट १९८७ रोजी काळाच्या पडदयाआड गेले. आज बापूजीचे शैक्षणिक कार्य स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या रूपाने दिपस्तंभाप्रमाणे महाराष्ट्रासमोर उभे आहे.

संदर्भ :

. शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंके शोध आणि बोध

संपादक प्रा. मो. नि. ठोके पारव्य प्रकाशन, बेळगाव फडके प्रकाशन, कोल्हापूर पान नं १२३ ते १२८.

. महाराष्ट्रातील समाजसुधारणेचा इतिहास 8 कै. प्रा. जी. एल. भिडें प्रा. एन डी पाटील प्रा. डी. एस्. थोरात.

3.Shodhganga.inflibnt.ac.in. E.Book.

शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांचे शैक्षणिक कार्य प्रकरण सहावे

प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे Internet pdf

. ज्ञानसूर्य शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंके.

. वेबसाइट 8 डेली हंट प्रभात.


No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Group Discussion

 (e-content developed by Dr N A Jarandikar) GROUP DISCUSSION ·          Group Discussion: Q. 3 (A) – Marks: 08 ·          Group Discussi...