संत नामदेव ( इ.स. 1270 - इ.स.1350)
मराठीतील पहिले भाव कवी ,पद्य चरित्रकार, आत्मचरित्रकार, आख्यान कवी, भागवत धर्माचे पहिले संघटक आणि प्रचारक, कीर्तन परंपरेचे प्रवर्तक अशा अनेक दृष्टीने नामदेवांचे व्यक्तिमत्व संपन्न आहे. त्यांची अभंगवाणी म्हणजे त्यांच्या भाव वेड्या उदात्त, प्रसन्न, सोज्वळ आणि निष्पाप अशा व्यक्तिमत्त्वाचा आविष्कार आहे. नामदेवांनी मराठी, हिंदी आणि इतर भाषांमधून रचना केल्या आहेत. त्यांच्या नावावर आज सुमारे अडीच हजार अभंग आहेत. भागवत धर्माची पताका पंजाबपर्यंत फडकवणारे हे पहिले मराठी संत होत. त्यांनी पंजाबमधील 'घुमान'येथे वास्तव्य केले. शिखांच्या 'गुरू ग्रंथ साहिब' मध्ये त्यांच्या रचनांचा समावेश आहे. आत्मचरित्र, संतचरित्र, तीर्थावळी, समाधी, बाळक्रीडा चे अभंग अशी बहुविध रचना त्यांनी केली आहे. सुंदर शब्दचित्रे, उत्तम भावकाव्य आणि उत्कट भक्ती ही त्यांच्या अभंगाची वैशिष्ट्य आहेत.
'पतितपावन आहेस म्हणून' या अभंगांमध्ये नामदेवांच्या उत्कट विठ्ठलभक्तीचा आविष्कार झाला आहे. नामदेवांची विठ्ठलावर अपार श्रद्धा आहे. त्यांची मनोभावे सेवा करावी, त्याला सगुण रूपात पाहावे ही त्यांची इच्छा आहे. मात्र कठोर, आर्त भक्ती करूनही विठ्ठल त्यांना भेटत नाही त्यावेळी नामदेव विठ्ठलाला स्पष्ट शब्दात सुनावतात हे विठ्ठला तू पतीत लोकांना पावन करून घेणारा आहेस म्हणून मी तुझ्या दारात आलो आहे, पण तू भेट देत नाहीस म्हणून मी रागावून माघारी जात आहे. तू कृतघ्न आहेस, अभिमानी आहेस त्यामुळे पतित-पावन म्हणून घेण्याचा तुला अधिकार नाही. हातात झेंगट घेऊन मी तुझा कृतघ्नपणा दवंडीच्या द्वारे साऱ्यांना सांगणार आहे. हे देवा तुझ्या कडून मला काही नको तुझ्यावर माझे प्रेम आहे म्हणून हा सारा खटाटोप सुरू आहे. या अभंगांमधून नामदेवांचे विठ्ठलावरील निस्सीम प्रेम व भक्ती व्यक्त होते.
'वैष्णवांचा धर्म' या अभंगात पंढरपूर विठ्ठलाचे महत्त्व येते. वैष्णवाणी एकदा तरी पंढरपुरात जावे व तिथल्या भक्तिमय वातावरणात स्वतःचे जीवन मुक्त करून घ्यावे. विठ्ठल हा जिवलग असून त्याला उराउरी भेटावे. त्या भेटी मधील प्रेम, सुखाचा अनुभव घ्यावा. त्याचे मुख दर्शन झाल्यानंतर स्वतःच्या जीवावरून लिंबलोन उतरू टाकावे, विठ्ठल दर्शनाने अंतर्बाह्य कैवल्याचा अनुभव येतो व ब्रम्हानंदी ची अनुभूती येते आणि यासाठीच नामदेव रात्रंदिवस विठ्ठल भक्तीत रममाण होतात.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.