B.A.II
SEMESTER - 4 PAPER - 5
प्रकरण 2
कौटुंबिक हिंसाचार
हुंडाप्रथा आणि हुंडाबळी या समस्येवरील प्रतिबंधात्मक उपाययोजना
:
१) सुयोग्य स्थळाची निवड :
विवाह जमविताना वरपक्ष अत्यंत लोभीवृत्तीने व
बाजारू पद्धतीने हुंड्यासाठी वाटाघाटी करीत असेल तर वधूपक्षाने मुलगी देण्याचे
टाळावे. सुयोग्य , चांगले स्थळ म्हणजे केवळ श्रीमंत स्थळ असे न मानता कमी उत्पन्न असलेल्या पण सज्जन, सालस, कष्टाळू व होतकरू तरुणास वर म्हणून पसंती द्यावी. वधूचे शिक्षण, गुणवत्ता इत्यादींकडे दुर्लक्ष करून केवळ हुंड्यासाठी अडून बसणाऱ्या तरुणास
स्वतः वधूने व वधूपित्याने नकार द्यावा. किंबहुना हुंडा न मागणाऱ्याशीच विवाह करेन असा दृढनिश्चय करून तो अंमलात आणावा.
२) जाणीव जागृती :
अलीकडे स्वतः कष्ट न करता दुसऱ्यांच्या जीवावर
ऐषाराम करण्याची चंगळवादी वृत्ती तरुणांमध्ये वाढत चाललेली आहे. म्हणूनच ते अधिकाधिक हुंडा
मागतात. म्हणून स्वकष्टावर जगावे व हौसमौज करावी, तसेच हुंडा घेणे हा केवळ कायदेशीरच नव्हे तर नैतिक व मानवताविरोधी गुन्हा आहे
अशी जाणिव जागृती तरुणांमध्ये निर्माण केली पाहिजे. यासंदर्भात शिक्षणसंस्था, सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, पोलिसयंत्रणा, सरकार व प्रसारमाध्यमे इत्यादींनी संयुक्तपणे समाजात हुंडाविरोधी मनोवृत्ती
निर्माण करण्याची चळवळ उभारली पाहिजे.
३) सामाजिक दबाव:
हुंडा मागणाऱ्या व
हुंडा घेऊन विवाह करणाऱ्या तरुणावर व त्याच्या कुटुंबावर समाजाने बहिष्कार टाकावा, त्यांचा जाहीर निषेध करावा. अशा विवाहात सहभागी होऊ नये. शिवाय हुंडा घेणे हे अप्रतिष्ठेचे, दुर्बलतेचे व लोभीपणाचे लक्षण आहे अशा विचारांचा प्रसार व प्रचार करावा. त्यामुळे हुंडाविरोधी
वातावरण निर्मितीस चालना मिळेल. हुंडा न घेता विवाह करणाऱ्या तरुणांचा समाजाने जाहीर सत्कार करावा. त्यामुळे इतरांना तसे करण्याची प्रेरणा मिळेल.
४) आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार :
आंतरजातीय विवाहामुळे वधूवर निवडीचे क्षेत्र विस्तारून हुंड्याशिवाय अनुरूप जोडीदार मिळण्याची शक्यता वाढते.
म्हणून वधूपक्षाने जातीपातीचा विचार न करता हुंड्याशिवाय विवाह करण्यास तयार असणाऱ्या परजातीतील गुणवान व कर्तृत्ववान तरुणास पसंती द्यावी. आंतरजातीयविवाह हे बहुधा प्रेमविवाह असतात व ते हुंड्याशिवाय होतात असा अनुभव आहे.
म्हणून अशा विवाहास पालकांनी संमती द्यावी. जर पालकांची संमती मिळत नसेल
तर अशा विवाहास सेवाभावी संस्था व पोलिसयंत्रणा यांनी पाठिंबा व मदत द्यावी.
५) आर्थिक स्वावलंबन:
आर्थिकदृष्ट्या पतीवर अवलंबून राहील अशा मुलीपेक्षा अर्थार्जन करणाऱ्या नोकरीव्यवसाय) मुलींशी हुंड्याशिवाय विवाह करण्यास आजकाल प्राधान्य मिळू लागले आहे. म्हणून मुलींना शिकवून नोकरी मिळवून देऊन म्हणजे आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवून मगच त्यांचा विवाह करावा.
अशा मुलीस विवाहानंतर पतीने सोडून देण्याचा धोका फारसा नसतो आणि जरी दिले तरी अशी मुलगी पतीच्या व सासरच्या आधाराशिवाय समर्थपणे जगू शकते.
६) स्त्रीपुरुष समानता :
स्त्रियांच्या इतर समस्यांप्रमाणेच हुंड्याची समस्या देखील पुरुष श्रेष्ठ व स्त्री कनिष्ठ या लिंगभेदावर आधारलेली आहे. म्हणून हुंड्याची समस्या सोडविण्यासाठी वैवाहिक, कौटुंबिक, सामाजिक इत्यादी सर्वच क्षेत्रात स्त्रीपुरुष समानतेचे तत्त्व अंमलात आले पाहिजे.
७) छळाचा धैर्याने सामना करणे
:
हुंड्यापायी वधूचा छळ सुरू झाल्यास त्या वधूने व तिच्या मातापित्यांनी घाबरून, गोंधळून न जाता या संकटाचा धैर्याने सामना करावा.
वर व त्याच्या कुटुंबियांना छळ बंद करावा अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल याची समज द्यावी.
गरज पडल्यास पोलीसात रीतसर तक्रार नोंदवावी. पोलीस कारवाई करण्यास कुचराई करीत असतील तर स्थानिक नेते, सेवाभावी संघटना, सामाजिक कार्यकर्ते इत्यादींची मदत घ्यावी.
खोट्या प्रतिष्ठेच्या कल्पनेत न अडकता वेळ पडल्यास पतीस घटस्फोट देऊन दुसऱ्या सज्जन पुरुषाशी पुनर्विवाह करण्याची तयारी ठेवावी.
म्हणजे हुंडाबळी होण्याचा अनर्थ टळेल.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.