Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: Contribution of M. N. Srinivas/ एम. एन. श्रीनिवास यांचे योगदान

Monday, 10 May 2021

Contribution of M. N. Srinivas/ एम. एन. श्रीनिवास यांचे योगदान

 

एम. एन. श्रीनिवास यांचे योगदान

(Contribution of M. N. Srinivas)

श्रीनिवास यांचा जीवन परिचय :

 म्हैसूर नरसिंहाचार्य श्रीनिवास यांचा जन्म १६ नोव्हेंबर, १९१६ रोजी म्हैसूर येथे एका ब्राह्मण कुटुंबात झाला. सुरुवातीचे शिक्षण म्हैसूर येथे पूर्ण केल्यानंतर श्रीनिवास मुंबईत आले. त्यांना पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण  करण्यासाठी जी. एस. घुर्ये यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संशोधनात्मक कार्यासाठी रेडक्लिफ ब्राऊन यांचे मार्गदर्शन मिळाले. मुंबई विद्यापीठातून त्यांनी एम. ., एलएल. बी. आणि पीएच. डी. पदवी प्राप्त केली. ऑक्सफर्ड विद्यापीठातून त्यांनी डी. फिल. पदवी प्राप्त केली. श्रीनिवास हे जी. एस. घुर्ये यांचे विद्यार्थी म्हणून ओळखले जात असले तरी आपल्या स्वतंत्र संशोधनात्मक कार्यातून आपले एक वेगळे स्थान त्यांनी भारतीय समाजशास्त्रात प्रस्थापित केले.१९४८ ते १९५१ या कालावधीत श्रीनिवास यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठात भारतीय समाजशास्त्राचे अधिव्याख्याता म्हणून कार्य केले. १९५२ ते १९५९ पर्यंत महाराज सयाजीराव गायकवाड विद्यापीठ, बडोदा येथे ते प्राध्यापक राहिले. १९५९ ते १९७२ या कालावधीत दिल्ली विद्यापीठात समाजशास्त्राचे विभागप्रमुख व वरिष्ठ प्राध्यापक म्हणून त्यांनी कार्य केले. त्यांनी बेंगलोर येथे नंतर Institute of Social and Economic Change या संस्थेत संचालक म्हणून कार्य केले. तसेच National Institute of Advanced Studies, बेंगलोर येथे जे. आर. डी. टाटा व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून कार्यरत राहिले.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचे विद्वान, क्रियाशील संशोधक आणि विद्यार्थ्यांना क्षेत्रकार्य पद्धतीद्वारे संशोधनाला सतत प्रोत्साहित करणारे म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. समाजशास्त्राच्या व्यावहारिक उपयोगासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले. पण सर्वांत महत्त्वाचा म्हणजे अत्यंत प्रतिष्ठेची अशी 'होमी भाभा सिनिअर फेलोशिप' मिळविणारे ते पहिले भारतीय समाज वैज्ञानिक होते.

आपल्या स्वतंत्र संशोधनात्मक अध्ययनातून आपले एक वेगळे स्थान त्यांनी भारतीय समाजशास्त्रात प्रस्थापित केले. भारतीय समाजशास्त्राला राष्ट्रवादाकडे व आधुनिकीकरणा कडे नेण्याचा त्यांनी आटोकाट प्रयत्न केला. तसेच भारतीय समाजातील वास्तवता स्पष्ट करण्यासाठी त्यांनी भारतीय खेड्यांचा अभ्यास, जातिनिष्ठ समाजरचना, प्रभावी जात, सामाजिक व सांस्कृतिक परिवर्तन अशा अनेक गोष्टींवर संशोधन केले. आज सर्रासपणे वापरला जाणारा 'Vote Bank' हा शब्दप्रयोग सर्वप्रथम श्रीनिवास यांनीच त्यांच्या Village India या शोधनिबंधात वापरला होता.

त्यांनी लिहिलेल्या ग्रंथामध्ये Religion and society among the Coorge of south India, India's village caste Modern India and other essays, social change in Modem India, Remebered village, Marriage and family in Mysore अशा काही प्रसिद्ध ग्रंथांचा समावेश होतो.

श्रीनिवास यांनी निर्माण केलेला Brahminisation, sanskritisation, westerisation, seularisation, Dominant Caste यांची चर्चा आजही सर्वत्र होते.

अशा या वास्तववादी समाजशास्त्रज्ञाचे बेंगलोर येथे ३० नोव्हेंबर १९९९ रोजी निधन झाले.

 

1.       श्रीनिवास यांचा संरचनात्मक कार्यवाद

 

श्रीनिवास यांचा भारतातील समाजशास्त्राकडे पाहण्याचा दृष्टिकोण पूर्णपणे वेगळा होता. एक सामाजिक मानवशास्त्र या दृष्टीने त्यांनी भारतातील समाजशास्त्राच्या विकासात

आपले योगदान दिले. या दोन्ही विज्ञानात फरक आहे याची त्यांना जाणीव होती, आणि त्यांनी या संदर्भात 'क्षेत्र कार्य पद्धती' (field work method) ही महत्त्वाची आणि सर्वश्रेष्ठ असल्याचे सांगितले.

सामाजिक मानवशास्त्राच्या अध्ययनात श्रीनिवास यांनी स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. तसेच सामाजिक मानवशास्त्राच्या अध्ययनात त्यांनी मॅलिनोवस्की आणि रेडक्लिफ ब्राऊन यांनी मांडलेला संरचनात्मक कार्यवादी दृष्टिकोण स्वीकारला. श्रीनिवास यांच्या संशोधनात ब्राऊन यांच्या संरचनात्मक कार्यवादाचा अधिक प्रभाव जाणवतो. क्षेत्र कार्य पद्धतीत सहभागी निरीक्षण तंत्राचा विशेष अवलंब केला जात असल्याने सामाजिक वास्तवता जाणून घेण्यासाठी 'रामपुरा' या गावी त्यांनी जवळजवळ एक वर्षभर वास्तव्य केले.

श्रीनिवास यांच्या एकूणच समाजशास्त्रीय संशोधनात संरचनात्मक कार्यवादी दृष्टिकोणाचा विशेष उल्लेख केला जातो. रेडक्लिफ ब्राऊनच्या प्रभावामुळे व मार्गदर्शनामुळे श्रीनिवास यांनी खेड्यांचा व जातिव्यवस्थेचा अभ्यास करताना संरचनात्मक कार्यवादाचाच पुरस्कार केला. दक्षिण भारतातील 'कूर्ग' गावातील धर्मव्यवस्थेचा व समाजव्यवस्थेचा अभ्यास करतानाही त्यांनी संरचनात्मक कार्यवादाचाच अवलंब केला. श्रीनिवास यांच्या मते, कोणत्याही प्रादेशिक समाजाच्या रचनात्मक व्यवस्थेचा जोपर्यंत अभ्यास केला जात नाही तोपर्यंत त्या समाजाचे कार्यात्मक स्वरूपाचे संबंध अभ्यासता येणार नाहीत. म्हणून समाजरचना हा समाजशास्त्राचा मूलभूत अभ्यासविषयक आहे असे श्रीनिवास म्हणतात.

श्रीनिवास यांनी जातिव्यवस्थेचा संरचनात्मक दृष्टीने अभ्यास केला. तसेच जातिव्यवस्थेच्या अंतर्गत त्यांनी समाजातील गतिशीलतेचा अभ्यास करण्यासाठी सामाजिक परिवर्तनाच्या सिद्धांताचा आधार घेतला आणि त्याद्वारे संस्कृतीकरण आणि पाश्चात्त्यीकरण प्रक्रियेचे विश्लेषण केले.

जातिव्यवस्थेची चर्चा करताना श्रीनिवास यांनी आधुनिक भारतात जातिव्यवस्थेत होत असणारे परिवर्तन लक्षात घेण्याचा प्रयत्न केला. तसेच जातिव्यवस्था आणि तिचे भवितव्य याचाही खोलवर विचार केला.

आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेचा विचार करताना, जातिसंस्थेचे बदलते स्वरूप त्यांनी विचारात घेतलेच. शिवाय समकालीन राजकीय प्रक्रिया जातिव्यवस्थेमुळे कशी प्रभावित झाली आहे हेही निदर्शनास आणून दिले.

रामपुरा या खेड्याचा अभ्यास करताना त्यांनी व्यवसायाधारे लोकसंख्या विभाजन लक्षात घेतले. तसेच शेती व्यवसाय आणि जातींचे व्यवहार यावरही निर्देशन केले. या ठिकाणी कार्यात्मक दृष्टिकोणातून जातींची भूमिका लक्षात घेण्याचा प्रयत्न केला. जाती - जातींमध्ये असणारी लवचीकता खेड्यांच्या एकात्मतेला कशी आधारभूत ठरते हेही त्यांनी स्पष्ट केले.

जातींचे स्वरूप विशद करताना जाती-जातींतील संबंध त्यांनी प्रमाण मानून जातींची वर्गवारी लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला. तसेच खेड्यावर प्रभुत्व गाजवणारा शेतकरी ही वर्गवारी 'प्रभावी जात' (Dominant Caste) या संकल्पनेद्वारे परिचित करून देण्याचा प्रयत्न केला.

ग्रामव्यवस्था म्हणजे एक 'संरचनात्मक वस्तू' (Structural entity) अशी त्यांनी व्याख्या केली. श्रीनिवास यांच्या मते, जातींची पारंपरिक रचना ही तशी लवचीक असल्याची तिने फ्रं आर्थिक आणि राजकीय व्यवस्थेने घडवून आणलेले बदल आत्मसात केले.

श्रीनिवास यांच्या मते, खेड्यांना एक प्रकारे भौगोलिक, प्रादेशिक आणि संरचनात्मक महत्त्व आहे. ते संपूर्ण देशाचे, समाजाचे प्रतीक अथवा प्रातिनिधिक स्वरूप आहे.

याप्रकारे श्रीनिवास यांनी संरचनात्मक कार्यवादी दृष्टिकोण जातिव्यवस्था, ग्रामव्यवस्था, परिवर्तन प्रक्रिया, संस्कृतीकरण, ाश्चात्त्यीकरण, आधुनिकीकरण अशा सर्व प्रकारच्या अभ्यासासाठी महत्त्वाचा मानलेला दिसतो. संरचनात्मक कार्यवादी दृष्टिकोणाचे ते पुरस्कर्ते असले तरी प्रामुख्याने त्यांनी कार्यवादी (functional) दृष्टिकोणाला अधिक महत्त्व दिले. त्यामुळे त्यांना प्रामुख्याने 'कार्यवादी' (functionalist) म्हणूनच ओळखले जाते.

 

श्रीनिवास यांचे योगदान (Contribution of Srinivas)

संरचनात्मक कार्यवादी या सैद्धांतिक दृष्टिकोणात एम. एन. श्रीनिवास यांनी जे महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे ते मुख्यतः पुढील स्वरूपाचे आहे.

. सामाजिक परिवर्तन

. धर्म आणि समाज

. खेडेगावचा अभ्यास

. जातिव्यवस्थेविषयीचा दृष्टिकोण

. प्रभावी जात

. सामाजिक परिवर्तन (Social Change)

 

श्रीनिवास यांनी १९६६ साली 'Social Change in Modern India' हा ग्रंथ प्रकाशित केला. या ग्रंथात त्यांनी संस्कृतीकरण, पाश्चात्त्यीकरण आणि निधर्मीकरण या प्रक्रियांच्या आधारे जी भरपूर सूक्ष्म निरीक्षणे नोंदविण्यात आली होती त्यावरून त्यांचे स्थूल विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, त्यांनी पूर्वी ज्या खेड्यांचा अभ्यास केला होता त्याविषयीची सर्व सूक्ष्म व अनुभवाश्रित तथ्ये घेऊन त्याच खेड्यांत सुमारे पंचवीस वर्षांनंतर परत आले आणि दरम्यानच्या कालावधीत त्या खेड्यांमध्ये जे परिवर्तन झाले त्यांचे सर्व स्वरूप त्यांनी सविस्तरपणे उलगडून दाखविले.

परिवर्तनाची प्रक्रिया वेगवेगळ्या स्तरावर संथपणे पण सातत्याने चालू असते. समाजरचनेच्या अंतर्गत बहिर्गत घटकात बदल करण्याची क्षमता ही संस्कृतीत समाविष्ट झालेली असते. त्यामुळे सांस्कृतिक परिवर्तनामुळे सामाजिक परिवर्तनाला विशिष्ट गती प्राप्त होते. एवढेच नव्हे तर सांस्कृतिक परिवर्तन हे सामाजिक परिवर्तनाचे मूलभूत अंग मानले जाते. परंपरा, रीतिरिवाज, संकेत मूल्ये जीवनविषयक दृष्टिकोण हे संस्कृतीचे अविभाज्य घटक म्हणून ओळखले जात असले तरी या परंपरेत अंतर्गत बहिर्गत दृष्टीने परिवर्तन होतच असते. याच पद्धतीचा अवलंब करून श्रीनिवास यांनी संस्कृतीकरणाची पाश्चात्त्यीकरणाची संकल्पना विशद केली आहे.

प्रत्येक प्रादेशिक समाजातील परंपरेत होणारे बदल हे सुरुवातीस लघुस्तरावर (Micro level) होत असतात नंतर त्यांचा विस्तार समाजात जसजसा वाढत जातो तसतसे त्याचे स्वरूप व्यापक बनत जाते असे श्रीनिवास यांचे म्हणणे आहे. सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात श्रीनिवास यांनी ज्या प्रक्रियांचे विश्लेषण केले त्या

पुढीलप्रमाणे विचारात घेता येतात.

 

ब्राह्मणीकरण (Brahminisation) :

श्रीनिवास यांनी ब्राह्मणीकरण हा शब्दप्रयोग फक्त कूर्ग समाजातील परिवर्तनाच्या संदर्भात वापरला आहे.

संस्कृतीकरणाची संकल्पना व्यापक स्वरूपातून आज जरी वापरली जात असली तरी सुरुवातीस संस्कृतीकरणाऐवजी ब्राह्मणीकरण अशी संज्ञा श्रीनिवास यांनी वापरली. कूर्ग समाजातील ब्राह्मण वर्गातील लोकांचे आचार-विचार, पेहराव, आहाराविषयीच्या संकल्पनांचे अनुकरण कनिष्ठ जातीतील लोक आपला सामाजिक दर्जा उंचावण्यासाठी करीत असतात. हे जेव्हा श्रीनिवास यांना आढळून आले तेव्हा त्याला त्यांनी 'ब्राह्मणीकरण' ही संज्ञा वापरली.

वरिष्ठ जातींच्या परंपरांचे, रीतिरिवाजांचे अनुकरण करण्याची प्रवृत्ती कनिष्ठ जातीतील लोक प्रत्येक प्रादेशिक समाजात कमी-अधिक प्रमाणात करीत असतात. असे श्रीनिवास यांना जेव्हा आढळून आले तेव्हा त्यांनी ब्राह्मणीकरणाऐवजी 'संस्कृतीकरण' हा शब्द रा वापरण्यास सुरुवात केली. कारण प्रत्येक प्रादेशिक समाजात ब्राह्मण हाच वर्ग वरिष्ठ प्रभावी असतो असे नाही, त्यामुळे त्यांनी संस्कृतीकरण हा शब्द सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात वापरलेला आहे.

संस्कृतीकरण (Sanskritisation) :

 श्रीनिवास यांच्या मते, संस्कृतीकरणाचा अर्थ असतात. .हा फक्त रीतिरिवाजांच्या किंवा परंपरांच्या अनुकरणापुरता मर्यादित नाही तर नवीन विचार, मूल्ये जी उच्च जातींनी स्वीकारलेली आहेत त्यांच्या पुरस्काराशी निगडित आहेत असे नवविचार धार्मिक किंवा धर्मनिरपेक्ष विशाल समुदायात नेहमीच आढळून येत

संस्कृतीकरण व्याख्या : "संस्कृतीकरण ही अशी एक प्रक्रिया आहे की जिच्याद्वारे कनिष्ठ जाती अथवा आदिम जमाती, अथवा इतर समूह हे त्यांच्या चालीरीती, धार्मिक विधी, कल्पना-विचार आणि जीवनमार्ग या गोष्टीत उच्च जातीच्या, ब्राह्मणांच्या (द्विज) अनुषंगाने परिवर्तन घडवून आणतात." - एम. एन. श्रीनिवास

(Sanskritisation is a process by which a low caste or a tribe or other group changed its customs, rituals, ideology, and way of life in the direction of a high and frequently, twice-born caste - M. N. Srinivas.)

उच्च जातीच्या समुदायांनी ज्या-ज्या पारंपरिक नवीन मूल्यांचा स्वीकार केलेला आहे त्यांना एक सामाजिक मान्यता प्रतिष्ठा प्राप्त झालेली असते, अशी कनिष्ठ जातीतील लोकांची भावना असते. अशा नवीन पारंपरिक आचार-विचारांचे अनुकरण करण्यासाठी कोणत्याही आर्थिक स्तराची आवश्यकता भासत नाही. एवढेच नव्हे तर समाजव्यवस्थेतील कोणत्याही कनिष्ठातल्या कनिष्ठ स्तरातील लोकांनी, उच्च स्तरातील लोकांनी ज्या पारंपरिक नवीन मूल्यांचा स्वीकार केला त्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केल्यास कनिष्ठ स्तरातील लोकांचा दर्जा उंचावण्यास निश्चितच मदत होईल अशी अपेक्षा श्रीनिवास यांनी व्यक्त केलेली आहे.

संस्कृतीकरणाच्या प्रक्रियेत उच्च जातीसमुदायांचे आचार-विचार, परंपरा, नवीन मूल्ये, आहार, पेहराव, केशभूषा, धार्मिक रीतिरिवाज इत्यादींचे अनुकरण कनिष्ठ जातीतील लोकांनी करण्याच्या प्रक्रियेवर श्रीनिवास यांनी भर दिलेला आहे. कूर्ग समाजातील तेरा कनिष्ठ जातीसमुदायांनी संस्कृतीकरणाच्या माध्यमातून आपला सामाजिक दर्जा उंचावण्याचा प्रयत्न केलेला आहे असे श्रीनिवास म्हणतात.

संस्कृतीकरणाची प्रक्रिया ही जातीव्यवस्थेच्या चौकटीत राहून जशी घडत असते. त्याचप्रमाणे ती ऊर्ध्वमुखी (verticle) स्वरूपाची असते. म्हणजेच कनिष्ठ जातीकडून उच्च जातीकडे संस्कृतीकरणाची प्रक्रिया चालू राहते. श्रीनिवास यांच्या मते परंपरा, रीतिरिवाज व संस्कृती एवढ्यापुरतीच संस्कृतीकरणाची प्रक्रिया मर्यादित नसून ती राजकीय व आर्थिक सत्तेशीही निगडित असते. काळाच्या ओघात, उच्च जाती आपल्या पारंपरिक रीतिरिवाजांचा त्याग करून पाश्चात्य संस्कृतीचे जसे अनुकरण करतात, त्याचप्रमाणे कनिष्ठ जाती आपल्या परंपरांचा व रीतिरिवाजांचा त्याग करून उच्च जातीचे अनुकरण करतात.. अर्थात, संस्कृतीकरणाची प्रक्रिया सर्व प्रदेशात घडून आली असे मात्र श्रीनिवास यांना वाटत नाही.

श्रीनिवास यांच्या मते, संस्कृतीकरण ही ब्राह्मणीकरणापेक्षा व्यापक संकल्पना आहे. इथे केवळ उच्च जात म्हणून ब्राह्मणांचे अनुकरण केले जात नाही तर आपल्यापेक्षा वरिष्ठ जातींच्या समूहांचे अनुकरण कनिष्ठ जातिसमूह करता. म्हैसूरमध्ये लिंगायतांचे अनुकरणही कनिष्ठ जातीचे लोक करतात असे उदाहरण श्रीनिवास यांनी दिले आहे. कारण लिंगायत हे ब्राह्मणांच्या बरोबरीचे आपण आहोत असे समजतात. तीच गोष्ट विश्वकर्मा ब्राह्मणांची आहे, असेही श्रीनिवास नमूद करतात.

पाश्चात्त्चीकरण (Westernisation) :

संस्कृतीकरणाची प्रक्रिया ही एकांगी स्वरूपाची असत नाही, असे मत व्यक्त करून श्रीनिवास म्हणतात की, उच्च जातीतील लोक आपल्या पारंपरिक प्रथा, परंपरा, रीतिरिवाज यांचा त्याग करून पाश्चात्त्य संस्कृतीचे अनुकरण करतात त्यालाच 'पाश्चात्त्यीकरण' अशी संज्ञा वापरली जाते.

ब्रिटिशांच्या संपर्कात आल्यानंतर आणि पाश्चात्त्य जगाशी संबंध निर्माण झाल्यामुळे भारतीय समाज आणि संस्कृतीत जे परिवर्तन झाले ते स्पष्ट करण्याच्या हेतूने श्रीनिवास यांनी 'पाश्चात्यीकरण' ही संकल्पना स्पष्ट केली आहे.

व्याख्या : श्रीनिवास यांनी पाश्चात्त्यीकरणाची व्याख्या त्यांच्या Social change in Modern India या ग्रंथात पुढीलप्रमाणे केली आहे. १५० वर्षांहून अधिक काळ ब्रिटिश सत्तेमुळे आणि तंत्रशास्त्र, संस्था, विचारधारा,

मूल्य यामध्ये जे परिवर्तन होत गेले त्यातून भारतीय समाज व संस्कृती यामध्ये जे परिवर्तन घडून आले त्याला अनुसरून 'पाश्चात्यीकरण' ही संज्ञा वापरली जाते. "

("Westernisation refers to" the changes brought about, in Idian society and culture as a result of over 150 years of British rule and the term subsumes changes occuring at different levels technology, institutions, ideology, values" - Srinivas)

श्रीनिवास यांच्या मते तांत्रिक परिवर्तन, नवनवीन शैक्षणिक संस्थांची स्थापना, राष्ट्रवादाचा उदय आणि नवीन राजकीय संस्कृती या सर्व गोष्टी म्हणजे पाश्चात्यीकरण म्हणजेच दीर्घकाळ असणारी ब्रिटिशांची सत्ता यांचा परिणाम आहे. थोडक्यात, श्रीनिवास यांना असे वाटते की पाश्चात्त्यीकरण म्हणजेच ब्रिटिशांचा असणारा प्रभाव.

अर्थात, पाश्चात्यीकरणाच्या प्रक्रियेला खरा प्रारंभ ब्रिटिश काळापासूनच झालेला असला तरी त्याचा परिणाम हा फक्त सांस्कृतिक क्षेत्रापुरता मर्यादित न राहता सामाजिक, राजकीय, धार्मिक, नागरी अशा अनेक क्षेत्रावर झाल्यामुळे पाश्चात्यीकरणाचे स्वरूप तुलनेने व्यापक असल्याचे मत श्रीनिवास यांनी दिले आहे.

संस्कृतीकरण हे जातींशी निगडित आहे तर पाश्चात्त्यीकरण हे जातिव्यवस्थेच्या चौकटीबाहेर चालू असते. साहजिकच उच्च जाती पाश्चात्यीकरणाकडे आकर्षित झाल्या. युरोपीय लोकांच्या आगमनामुळे उच्चवर्णीय लोकांचा त्यांच्याशी अधिकाधिक संपर्क

 

आला. ब्रिटिशांच्या राज्यव्यवस्थेत उच्चवर्णीयांना जास्तीतजास्त संधी मिळू लागल्याने त्यांनी आपला पारंपरिक मूल्यांचा त्याग करण्यास सुरुवात केली. भौतिकवाद, व्यक्तिवाद, विज्ञाननिष्ठा, प्रगती, औद्योगिकीकरण, नागरीकरण इ. मूल्यांचा विकास अधिक झपाट्याने होऊ लागला. शिक्षणाविषयी उदारमतवादी धोरण ब्रिटिशांनी स्वीकारल्याने व पाश्चात्त्य शिक्षणाकडे उच्च जातीतील लोक अधिक आकर्षित झाल्याने साहजिकच पाश्चात्त्य संस्कृतीचा व आचारविचारांचा पुरस्कार करण्याकडे त्यांची प्रवृत्ती वाढू लागली. जातिव्यवस्थेतील उच्च दर्जाबरोबर आपला आर्थिक दर्जा आणि राजकीय, प्रशासकीय व सामाजिक प्रतिष्ठा उंचावण्याकडे ते प्रयत्न करू लागले, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, न्याय, समता अशा पाश्चात्त्य विचारसरणीकडे उच्च जाती आकर्षित होऊ लागल्याने सामाजिक परिवर्तनाला अधिक गती मिळाली. श्रीनिवास यांच्या मते, कनिष्ठ जातीतील संस्कृतीकरणाची प्रक्रिया जेव्हा पूर्ण होईल तेव्हा तो वर्ग पाश्चात्यीकरणाकडे झुकेल. कारण उच्च जातींनी पाश्चात्त्यीकरणाचा पुरस्कार केल्याने व त्यांचे अनुकरण कनिष्ठ जातीतील लोकांनी केल्याने सांस्कृतिक परिवर्तनाला अधिक वेग येईल अशी अपेक्षा श्रीनिवास यांनी व्यक्त केली..

आधुनिकीकरण (Modernisation) :

एम. एन. श्रीनिवास यांनी आधुनिकीकरणाच्या संकल्पनेवर टीका केली आहे. त्यांच्या मते, आधुनिकीकरण ही एक 'मूल्यभारित संकल्पना' (Value loaded concept) आहे. ते म्हणतात, 'आधुनिकीकरण म्हणजे चांगली गोष्ट या अर्थाने तिचा वापर सामान्यपणे होत असतो. आधुनिकीकरणाऐवजी पाश्चात्त्यीकरण ही संज्ञा वापरणे अधिक योग्य आहे की ज्यामध्ये ब्रिटिशांच्या दीडशे वर्षांच्या राजवटीमुळे 'भारतीय समाज आणि संस्कृती यामध्ये वैशिष्ट्यपूर्ण बदल घडून आले.'

श्रीनिवास असेही म्हणतात की, 'आधुनिकीकरण हा पाश्चात्यीकरणाचा परिणाम आहे. आधुनिकीकरण हे ब्रिटिशांचे अंधानुकरण नाही. तर ते स्वतःच्या विकासासाठी विकसित राष्ट्रांचे केलेले अनुकरण आहे.

Social change in Modern India Modernisation : A few Questions त्यांच्या ग्रंथातून श्रीनिवास यांनी आधुनिकीकरणासंबंधी विचार व्यक्त केले आहेत. त्यांनी आधुनिकीकरणाला 'तटस्थ शब्द' मानलेले नाही. आधुनिकीकरणाचा अर्थ चांगल्या दिशेने होणाऱ्या परिवर्तनाच्या दिशेने घेतला जातो. त्यांच्या मते, 'कोणत्याही पाश्चिमात्य देशाच्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संपर्कामुळे कोणत्याही गैर पाश्चात्त्य देशात होणाऱ्या परिवर्तनाला दर्शविण्यासाठी प्रचलित शब्द म्हणजे आधुनिकीकरण होय.' वाढते नागरीकरण, शिक्षणाचा वाढता प्रसार प्रतिव्यक्ती उत्पन्नात होणारी वाढ, प्रौढ मताधिकार, तर्कशक्तीचा विकास या गोष्टींचा निर्देश त्यांनी आधुनिकीकरण प्रक्रियेत केला आहे.

श्रीनिवास यांनी आधुनिकीकरणाची तीन प्रमुख क्षेत्रे सांगितली आहेत.

. भौतिक संस्कृतीचे क्षेत्र (अभियांत्रिकी व तंत्रज्ञानाचा समावेश

. सामाजिक संस्थांचे क्षेत्र

. ज्ञान, मूल्य आणि मानसिकता अथवा मनोवृत्तीचे क्षेत्र.

वरवर पाहता ही तिन्ही क्षेत्रे भिन्न-भिन्न दिसून येत असली तरी ती परस्पर संबंधित आहेत. एका क्षेत्रात झालेले परिवर्तन, हे दुसऱ्या क्षेत्राला प्रभावित करते.

निधर्मीकरण (Secularisation) :

सामाजिक परिवर्तनाच्या संदर्भात श्रीनिवास यांनी निधर्मीकरणाची ही संकल्पना मांडली आहे. पूर्वी ज्या गोष्टींना धार्मिक म्हणून संबोधले जात असे, त्यांना धार्मिक म्हणून संबोधणे म्हणजेच निधर्मीकरण होय असे त्यांचे मत आहे. निधर्मीकरण ही विभेदीकरणाची प्रक्रिया म्हणून त्यांनी संबोधली आहे. तिच्या आधारे वैधानिक, बौद्धिक, राजनैतिक, आर्थिक, सामाजिक क्षेत्र हे धर्मापासून पूर्णपणे वेगळे मानले जाते. अशी प्रतिक्रिया त्यांनी Social Change in Modern India या ग्रंथात व्यक्त केली आहे.

सामाजिक परिवर्तन प्रक्रियेच्या संदर्भात श्रीनिवास यांनी अशा वेगवेगळ्या पण महत्त्वपूर्ण संकल्पना विकसित केल्या आहेत.

. धर्म आणि समाज (Religion and Society)

श्रीनिवास यांनी १९५२ मध्ये Religion and Society among the coorges of south India हा ग्रंथ प्रकाशित केला. या ग्रंथातून त्यांनी 'ब्राह्मणीकरणा' ची संकल्पना विशद केल. ब्राह्मणांचे आचारविचार, जीवनशैली त्यांचे अनुकरण हिंदूधर्मातील खालच्या जातीचे लोक कसे अनुकरण करतात हे या ग्रंथातून त्यांनी स्पष्ट केले. व्यापक आणि काळजीपूर्वक केलेल्या क्षेत्रकार्य पद्धतीतून व निरीक्षणातून कूर्गमध्ये होणाऱ्या परिवर्तनाचा अन्वयार्थ लावण्याचा त्यांनी प्रयत्न केला. ब्राह्मणीकरण ही संकल्पना अर्थातच अमूर्त असून ती संस्कृतीकरणापेक्षा भिन्न आहे. परिवर्तनाच्या संदर्भात केवळ ब्राह्मणीकरणाचे प्रतिमान विचारात घेणे म्हणजे संशोधनाच्या दृष्टीने खूपच मर्यादा घालून घेणे. त्यामुळे त्यांनी नंतर ब्राह्मणीकरणाऐवजी संस्कृतीकरण ही संकल्पना वापरली.

या परिवर्तन प्रक्रियेत श्रीनिवास ब्राह्मणीकरण, नंतर संस्कृतीकरण एवढ्यावरच थांबले नाहीत तर पुढे जाऊन त्यांनी पाश्चात्त्यीकरणाची संकल्पना मांडली. त्यांच्या मते, भारतातील परिवर्तन प्रक्रियेतील हे टप्पे आहेत. एकूणच ही एक सांस्कृतिक अनुकरणाची प्रक्रिया असून ती संरचनात्मक म्हणजेच उच्चनीचता, सत्ता आणि सवलत यातील विषमता, सामाजिक-आर्थिक दर्जात्मक भिन्नता यावर आधारलेली आहे. याप्रमाणे संस्कृतीकरण पाश्चात्त्यीकरण या परिवर्तन प्रक्रियेतील क्रमशः येणाऱ्या अवस्था कार्यात्मक भूमिकेतून कूर्ग प्रांतातही श्रीनिवास यांना कार्यान्वित असलेल्या दिसल्या.

संस्कृतीकरणाचा अंगीकार केलेला खालच्या जातीच्या लोकांच्या आर्थिक दर्जातही फरक पडलेला त्यांना आढळला. जातीनिहाय उच्चनीचतेशी दर्जात्मक परिवर्तन होताना आढळले. अर्थात, संस्कृतीकरणातून जे परिवर्तन झाले ते भारतीय परंपरांच्या अनुषंगाने, तर पाश्चात्त्यीकरण, प्रक्रियेतून जे परिवर्तन झाले ते ब्रिटिशांच्या सामाजिक-आर्थिक आणि सांस्कृतिक संबंधामुळे.

याप्रमाणेच श्रीनिवास यांनी 'निधर्मीकरण' संकल्पनेचाही विचार मांडला. तो प्रामुख्याने स्वातंत्र्यानंतर जी संस्थाकरणाची प्रक्रिया सुरू झाली त्या संदर्भात ही एक राष्ट्रीय विचारसरणी होती आणि मुख्यतः जे धार्मिक समूह आणि अल्पसंख्य समूह होते त्यांच्या संदर्भात याची मांडणी झाली.

खेडे हा भारतीय समाजाचा व सभ्यतेचा लहानात लहान घटक आहे आणि खेड्यातच भारतीय समाजाच्या परंपरांचे जतन केले जाते. कूर्गमध्येच त्यांनी संशोधन केले आणि त्यातूनच Religion and Society among the coorges of South India हा ग्रंथ त्यांनी प्रकाशित केला. भारतीय परंपरांच्या मूलभूत संरचनेचे दर्शन त्यातून होते. त्यामुळेच भारतीय समाजशास्त्रातील हे एक उत्कृष्ट पुस्तक असल्याचे ड्युमो आणि पोकॉक यांनी म्हटले आहे.

भारतीय समाजव्यवस्थेच्या संदर्भात आणि विशेष करून हिंदू समाजव्यवस्थेच्या संदर्भात श्रीनिवास यांनी कूर्गचा अभ्यास केला. तसेच 'सांस्कृतिक हिंदूवाद' आणि 'हिंदुत्व' यावरही त्यांनी कूर्गच्या संदर्भात विवेचन केले आहे. सांस्कृतीकरणाच्या प्रक्रियेत खालच्या जातीच्या लोकांनी वरिष्ठ जातीच्या मूल्यांचा स्वीकार केला तसेच समाजातील कमकुवत घटकही आपल्या दर्जात्मक उन्नतीसाठी या प्रक्रियेत मागे नव्हते हे त्यांनी स्पष्ट केले. या प्रक्रियेत ज्यांनी अनुकरणाचा अवलंब केला नाही ते तसेच मागास राहिले. म्हणूनच श्रीनिवास यांचे असे मत आहे की, संस्कृतीकरणाची प्रक्रिया ही कनिष्ठ जातींच्या उन्नतीकरणाच्या संदर्भात महत्त्वाची सामाजिक परिवतनीची प्रक्रिया ठरते. हे अनुकरण म्हणजे नवीन युगाची नांदीच आहे.

. खेडेगावचा अभ्यास (Study of village)

धर्म, जात याबरोबरच श्रीनिवास यांनी जे महत्त्वाचे योगदान दिले ते खेडेगावच्या अभ्यासामध्ये आपले मार्गदर्शक रेडक्लिफ ब्राऊन यांच्याकडून श्रीनिवास यांनी भारतातील खेड्यांच्या अभ्यासाची कल्पना घेतली. ऑक्सफर्डहून भारतात परतल्यानंतर श्रीनिवास यांना खेड्यांच्या अभ्यासासंबंधीची जाणीव झाली. त्यासाठी त्यांनी म्हैसूरजवळील 'रामपूर' या खेड्याची निवड केली. मुख्य प्रवाहापासून वेगळे आणि एकाकी असे हे खेडे होते. या खेड्यांच्या अभ्यासातूनच श्रीनिवास यांना 'प्रभावी जात' (Dominant Caste) ही कल्पना सुचली. "The remembered Village" या नावाने त्यांच'रामपूर' या खेड्याचा अभ्यास प्रसिद्ध आहे. त्यासंबंधीचे त्यांचे पुस्तक १९७६ मध्ये प्रकाशित झाले. या गावात झालेले सामाजिक-आर्थिक बदल लक्षात घेण्यासाठी सुमारे एक वर्षापर्यंत श्रीनिवास तेथे वास्तव्यास होते.

या खेडेगावच्या अभ्यासातून श्रीनिवास यांनी एक ठळक निष्कर्ष नोंदविला तो असा :

"स्वातंत्र्यानंतर लगेचच रामपूर या खेड्यातील लोकांच्या जीवनात तांत्रिक परिवर्तनामुळे आमूलाग्र बदल घडून आला. तांत्रिक परिवर्तन अर्थातच आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक परिवर्तनाच्या बरोबरीने घडून आले. "

या अभ्यासातून त्यांना याचीही जाणीव झाली की, भारतीय सामाजिक संरचना ही 'हिंदुत्वाच्या' म्हणजेच 'सांस्कृतिक राष्ट्रवादा'च्या विचारसरणीवर आधारित आहे.

'रामपूर' या खेडेगावचा अभ्यास करून समकालीन भारतीय खेड्यांबाबतचे विश्लेषण श्रीनिवास यांनी India's Villages या ग्रंथात केले आहे. या संदर्भात त्यांनी क्षेत्र कार्य पद्धतीचा केलेला पुरस्कार हे त्यांच्या संशोधन तंत्राचे वैशिष्ट्य मानले जाते.

'रामपूर' या गावातील सामाजिक संघटना, धर्मव्यवस्था, रीतिरिवाज श्रेणीबद्ध समाजरचनेचा अभ्यास करून श्रीनिवास यांनी तेथील संघर्षात्मक स्पर्धात्मक स्वरूपाच्या संबंधांचे अध्ययन केले. या अध्ययनात त्यांना असे दिसून आले की, या गावातील लोकांच्यात स्वजातीबद्दल आत्मीयता आढळून येत असली तरी एकूण समाजाच्या दृष्टीने भावनात्मक ऐक्य अधिक प्रमाणात दिसून येते. परस्पर सहकार्य, सामाजिक स्वास्थ्य,जातपंचायतीचे नियंत्रण या गोष्टी खेड्यात महत्त्वाच्या आढळल्या. पण त्याचबरोबर आपल्या जातीचे वर्चस्व खेड्यात असावे या भूमिकेतून एक 'प्रभावी जाती समुदाय' विशेष प्रयत्नशील असतो असे श्रीनिवास यांनी नमूद केले आहे. संख्यात्मक आणि आर्थिकदृष्ट्या हा जातिसमूह प्रबळ असतो असे त्यांना आढळले.

जातिनिष्ठ स्वरूपाच्या स्तररचनेत समाविष्ट झालेल्या प्रत्येक जाती समुदायाला सामाजिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी विविध प्रकारची कार्ये आपापल्या दर्जाला अनुसरून करावी लागतात. त्यामुळे श्रीनिवास यांनी या समाजव्यवस्थेचा अभ्यास कार्यात्मक दृष्टिकोणातून (Functional Approach) केलेला आहे.

श्रीनिवास यांनी भारतातील खेडेगावातून प्रचलित असलेल्या वेगवेगळ्या समस्यांचे व कलहांचे विश्लेषण केलेले आहे. त्यातील बहुतांशी समस्या शेतीव्यवसायाशी निगडित आहेत. त्या सार्वजनिक व वैयक्तिक अशा दोन प्रकारच्या आहेत. त्यांचा परिणाम सार्वजनिक, कौटुंबिक तसेच व्यक्तिगत जीवनावरही होतो असे ते म्हणतात.

खेडेगावच्या अध्ययनाचे महत्त्व विशद करताना श्रीनिवास म्हणतात की, अभ्यासकाने एकाच खेडेगावाचा सातत्याने अभ्यास करून कोणकोणत्या प्रकारची स्थित्यंतरे कोणकोणत्या काळात कसकशी घडत गेली याचे अत्यंत सूक्ष्मपणे अध्ययन केल्यास त्याबाबतचे निष्कर्ष अभ्यासकाला मांडण्यात अडचणी येत नाहीत.

'Remembered Village' संबंधीची हकिकत : 'रामपूर'मधील आपल्या अभ्यासाच्या फिल्ड नोटस्वरून तयार केलेली टिपणे आगीत जळून गेली. त्यामुळे श्रीनिवासांना हे पुस्तक लिहिणे कठीण झाले होते. पण जळालेले कागद वेगळे करून त्यातून मजकूर वेगळा करण्याचे आधुनिक तंत्र वापरायला त्यांना फोर्डने अनुदान दिले. मुळातल्या फिल्ड नोटस् त्यांच्याकडे होत्याच. पार्थसारथी या मदतनिसाच्या साहाय्याने त्यांनी नवीन मजकूर उभा केला. पुस्तकाचे लेखन नव्याने पूर्ण केले. तेच 'रामपूर' खेड्याविषयी लिहिलेले पुस्तक म्हणजेच "A Remembered Village ते १९७६ ला प्रकाशित झाले. जळालेल्या कागदावरून परत मजकूर मिळविणाऱ्या तंत्रज्ञानाला त्यांनी हे पुस्तक अर्पण केले.

. जातिव्यवस्थेविषयीचा दृष्टिकोण

भारतीय समाजाचा अभ्यास करण्यात पाश्चात्य व भारतीय समाजशास्त्रज्ञांचे लक्ष हे प्रामुख्याने जातिव्यवस्थेच्या व सामाजिक स्तररचनेच्या अध्ययनाकडे प्रामुख्याने वळलेले आहे. एम. एन. श्रीनिवास हेही त्याला अपवाद नाहीत. उलट, त्यांनी जातिव्यवस्थेचा वेगवेगळ्या दृष्टिकोणांतून अभ्यास केला आहे आणि जातिव्यवस्थेच्या अनुषंगाने नवीन संकल्पनाही मांडल्या आहेत.जातिव्यवस्थेचा सविस्तर अभ्यास घुर्ये यांनी केला आहे. त्यांनी जातिव्यवस्थेची प्रमुख सहा लक्षणेही सांगितली आहेत. त्या वैशिष्ट्यांच्या आधारावर श्रीनिवास यांनी 'रामपूर' 'कूर्ग' या गावांचा अभ्यास करून Caste in Modern India, Dominant Caste in Rampura, Mobility in Caste System, The Social Systems of Mysore Village आणि Social Change in Moderm India असे ग्रंथ व काही शोधनिबंध प्रकाशित केले.

जातिव्यवस्थेच्या अभ्यासासंदर्भात श्रीनिवास यांनी कार्यवादी दृष्टिकोण स्वीकारला आहे. कारण ग्रामीण समाजात प्रत्येक जातीसमुदाय एकूण समाजाच्या स्वास्थ्यासाठी विशिष्ट प्रकारची कार्ये करीत असतो. जातिव्यवस्था हा समाजरचनेचा जसा मूलभूत घटक आहे. तसेच कार्यवादही महत्त्वाचा आहे असे श्रीनिवास यांना वाटते. कार्यात्मक बदल कितीही प्रमाणात होत असले तरी जातिनिष्ठ स्वरूपाचा ढाचा संपूर्णत: बदलू शकत नाही. जातिव्यवस्थेची चौकट कायम ठेवूनच ग्रामीण समाजाचे परिवर्तन होत आहे असे श्रीनिवास म्हणतात.

जाती म्हणजे एक खंडात्मक व्यवस्था (Segmental System) आहे असे श्रीनिवास सांगतात. त्यांच्या मते, प्रत्येक जात ही उपजातीमध्ये विभागलेली असते. हे विभाजन म्हणजे,

. एकविवाही घटक

. समान व्यवसाय

. सामाजिक आणि कर्मकांडात्मक व्यवस्था

. समान संस्कृती

. पंचायतीची नियंत्रण व्यवस्था

या व्यतिरिक्त उपजातींची आणखीही काही वैशिष्ट्ये असल्याचे श्रीनिवास सांगतात. ही वैशिष्ट्ये म्हणजे -

. उच्च-नीचता : जातिव्यवस्थेचा हा केंद्रबिंदू असतो.

. व्यावसायिक भिन्नता प्रत्येक उपजातीचा वेगळा व्यवसाय असतो.

. आचारविचारावरील निर्बंध. . अशुद्धता : प्रत्येक जात एकमेकाहून विशिष्ट अंतर राखते.

. जात पंचायत आणि जातिसभेचे नियंत्रण

ही सर्व वैशिष्ट्ये आंतरजातीय संबंधांचे स्वरूप स्पष्ट करतात. तसेच समाजातील त्या-त्या जातीचे स्थान स्पष्ट करतात.

. प्रभावी जात (Dominant Caste)

श्रीनिवास यांच्या मते, भारतीय समाजव्यवस्थेच्या चौकटीत आढळणाऱ्या सर्व जातीमध्ये त्यांची संख्या, त्यांची भूमिका, त्यांचा प्रभाव या बाबतीत समानता आढळत नाही. यातील काही जाती मोठ्या प्रमाणात संघटित तर काही जाती खूपच विस्कळीत स्वरूपात आढळतात. तसेच काही जाती, ज्या संघटित आहेत त्या इतर जातींवर आपला मोठा प्रभाव अथवा वर्चस्व दाखवत असतात. या संदर्भात, श्रीनिवास यांनी 'प्रभावी 'जात' ही संकल्पना मांडली आहे.

प्रभावी जात व्याख्या: "जेव्हा एखादी जात दुसऱ्या जातीपेक्षा संख्येने प्रबळ असते, तसेच जेव्हा ती दुसऱ्या जातीचा आर्थिक आणि राजकीय सत्तेसाठी वापर करून घेते आणि जेव्हा ती स्थानिक जातीच्या श्रेणीरचनेत धार्मिक विधीत उच्च स्थान उपभोगित असते तेव्हा तिला प्रभावी जात म्हणतात, "

(A Caste is dominant when it preponderates numerically over the other castes, when it, also wields preponderant econimic and political power and when it enjoys a high ritual status in local caste hierarchy - Srinivas)

श्रीनिवास यांनी प्रभावी जात' ही संकल्पना वेगवेगळ्या सहा निकषांवर स्पष्ट केली आहे. ते म्हणजे,

. स्थानिक पातळीवर उपलब्ध असणारी मोठ्या प्रमाणातील जमीन अथवा क्षेत्र.

. संख्यात्मक आकार

. स्थानिक उच्च-नीचतेत वरिष्ठ स्थान

. पाश्चात्त्य शिक्षण आत्मसात असणे.

. आर्थिक आणि राजकीय सत्ता मोठ्या प्रमाणात असणे.

. जातीतील लोकांचा उच्च व्यवसाय असणे.

वरील निकषांपैकी खालील तीन निकष अधिक महत्त्वाचे आहेत.

. संख्यात्मक आकार

. जमिनीच्या मालकी हक्कावर आधारित आर्थिक सत्ता

. राजकीय सत्ता

वरील तिन्ही निकष पूर्ण करणारी ती प्रभावी जात होय, असे श्रीनिवास म्हणतात.

या निकषानुसार भारतात आढळणाऱ्या प्रभावी जाती' पुढीलप्रमाणे आहेत

. कर्नाटकातील लिंगायत आणि वक्कलिंग

. आंध्र प्रदेशातील रेड्डी आणि कम्माज

. केरळमधील नायर आणि एझावाज

. तामिळनाडूतील गौंडर, पडायाशी आणि मुदलियार

. महाराष्ट्रातील मराठा आणि ब्राह्मण

. उत्तर भारतातील राजपूत, जाट, गुज्जर, बनियाज

. गुजरातमधील पटेल.

वरील सर्व जाती या प्रभावी जाती आहेत.

'आनुवंशिक, आंतरविवाह पारंपरिक मूल्यांचे जतन करणारा स्थानिक समूह म्हणजेच 'जात' अशी व्याख्या करून श्रीनिवास यांनी ग्रामीण समाजातील सामाजिक विषमतेचे वस्तुनिष्ठपणे अध्ययन केले आहे.

संस्कृतीकरण, पाश्चात्त्यीकरणातून झालेले परिवर्तन, औद्योगिक विकास, शिक्षणप्रसार, सत्तेचे विकेंद्रीकरण होऊनही जातीचे प्रभुत्व आणि प्रभावी जातीचे महत्त्व कमी होऊ शकलेले नाही. राजकीय सत्ता आर्थिक सुविधा प्राप्त करून घेणे ही त्यांची महत्त्वाकांक्षा आजही कायम आहे. 'सत्तेतून संपत्ती संपत्तीतून सत्ता' हे चक्र अव्याहतपणे चालू ठेवण्याचे प्रमुख सूत्र प्रभावी जातींचे असते असे श्रीनिवास यांना वाटते.

 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Human and animal communication

  Human and Animal communication            Language is a specific characteristic of human beings. Animals do not use language. Humans use l...