Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: शिवाजी महाराजांचे किल्ले प्रशासन.(भाग ५)

Friday, 25 June 2021

शिवाजी महाराजांचे किल्ले प्रशासन.(भाग ५)

 (Dr. Dhere V. D.)

B.A.I sem II   History  Paper II किल्ले प्रशासन

B.A.I sem II   History  Paper II 

शिवाजी महाराजांचे किल्ले प्रशासन.(भाग ५)

     शिवाजीमहाराजांनी किल्ल्यांची बांधणी दुरुस्ती व संरक्षण व्यवस्था याकडे विशेष लक्ष पुरविले होते. शिवाजी महाराजांचा जन्म किल्ल्यात झाला, त्यांना वैभव किल्ल्यात मिळाले, त्यांनी स्वराज्याचे संरक्षण किल्ल्यांच्या द्वारे केले. किल्ल्यांच्या बारकाई बद्दल शिवाजी महाराजांचा अभ्यास खूप मोठा होता. उजाड माळ असेल आणि परचक्र आले तर प्रजा भग्न होते त्यामुळे किल्ल्यांच्या बांधण्याची गरज आहे किल्ल्याच्या अधारावर एक सशस्त्र सैनिक दहा शत्रूशी  तर दहा सैनिक 100 सैनिकांशी तर शंभर सैनिक हजारो शत्रू सैन्याची लढू शकतात. हे शिवरायांनी जाणले होते. त्यामुळे त्यांनी अस्तित्वात असलेल्या किल्ल्यांची डागडुजी केली अनेक ठिकाणी नवीन किल्ले बांधले तर जे किल्ले आहेत ते संरक्षण दृष्ट्या अत्यंत भक्कम बनविले. शिवाजी महाराजांच्या काळात एकही किल्ला फंद फितुरीने शत्रूच्या ताब्यात गेला नाही. याउलट शत्रूचे अनेक किल्ले जिंकून अथवा फंद फितुरीने शिवरायांनी  आपल्यात घेतले. याचे महत्वाचे कारण म्हणजे किल्ले बांधणी अथवा डागडुजी इतकेच किल्ल्यावर सैन्य व्यवस्था व इतर व्यवस्थेची कडे त्यांनी विशेष लक्ष पुरवले होते. कोणताही किल्ला जहागिरीने त्यांनी किल्लेदाराकडे सोपवला नाही. तर बाईक शिपायापासून ते किल्लेदार अथवा वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत दरमहा रोख वेतन देऊन त्यांना नोकरीत सामावून घेतले. जहागिरी पद्धतीचे दोष त्यांना पूर्ण माहिती होते. त्यामुळेच ही पद्धत न वापरता त्यांनी वेतनधारी नोकर नियुक्ती केली. राजा हाच सार्वभौम असला तरीही त्याला मदतीसाठी अष्टप्रधान मंडळ नेमले. त्यामध्ये सेनापती आणि सरलष्कर हे दोन सेनेविषयी एक अधिकारी असले तरीही राजाचा निर्णय अंतिम होता.

शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांची एकूण संख्या जरी निश्चित सांगता येत नसेल तरीही अंदाजे ३६०/३६५ किल्ले शिवाजी महाराजांकडे होते. यामध्ये डोंगरी किल्ले भुईकोट किल्ले आणि पाण्यातील जलदुर्ग असे विविध प्रकारचे किल्ले होते. जंगलाने व्यापली व्यापलेल्या डोंगरावर बांधलेले गिरीदुर्ग, ज्या किल्लेदाराच्या  पराक्रमाने कुणीही आक्रमणाचे धाडस करत नसलेले नरदुर्ग, आवश्‍यकतेनुसार जमिनीवर बांधलेले भुईकोट आणि सुरत मोहिमेनंतर समुद्रात उभा केलेली जलदुर्गांची रांग याबाबत स्वतः महाराज म्हणतात की, शेतकरी जसे आपल्या शेतात बांध कुंपण घालतो, कोळी जसे आपल्या तारवस खिळे मारून बळकटी आणतो त्याचप्रमाणे राज्यास बळकटी आणण्यासाठी किल्ल्यांची सभोवती माळ असायलाच हवी.

     असलेल्या किल्ल्यांना बळकट आणणे, नवे किल्ले बांधने, जिंकलेले किल्ले बळकट बनवणे या सगळ्या बरोबरच अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे किल्ल्याचे प्रशासन. कारण आपण अत्यंत कष्टाने किल्ला मजबूत बनविला किंवा नवा बांधला आणि शत्रूने सहजगत्या तो जिंकून घेतला तर आपले सर्व श्रम आणि परिसर शत्रूच्या ताब्यात जातो यामुळे किल्ल्याच्या प्रशासनाकडे शिवाजी महाराजांनी विशेष लक्ष पुरविले.

किल्ले प्रशासनाची शिवरायांनी दोन भाग केले.

  बाह्य प्रशासन.आणिअंतर्गत प्रशासन.

बाह्य प्रशासन

शत्रूला सहज जिंकता येणार नाही अशा अडचणीच्या जागी व आपल्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या मोक्याच्या जागी शिवरायांनी केले उभे केले. किल्ल्याच्या तटबंदी बाहेर तटसरनोबत या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्य समजल्या जाणार्‍या जातीतील सैनिकांची नेमणूक केली. ज्यांना पळवाटा अडचणीच्या वाटा माहिती आहेत अशा लोकांची नेमणूक केल्याने किल्ल्यांची बाहेरील बाजू अत्यंत सुरक्षित व भक्कम बनली.

अंतर्गत प्रशासन.

किल्ला अभेद्य आहे सैन्य भरपूर आहे पण तरीही फंद फितुरीने अथवा एखाद्या अधिकार्‍याच्या चुकीने किल्ला शत्रूच्या ताब्यात जाऊ शकतो याची दक्षता घेऊन शिवरायांनी अत्यंत कौशल्याने व दूरदृष्टीने किल्ल्यावर विविध अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या. किल्ल्यावर समान दर्जाचे तीन अधिकारी नेमले १) हवालदार २) सबनीस ३) कारखानीस.

हवालदार.       किल्ल्याच्या संरक्षणाची संपूर्ण व्यवस्था हवालदार या अधिकाऱ्याकडे होती. हा मराठा जातीतील शूर, कर्तव्यदक्ष व स्वामीनिष्ठ अशाच व्यक्तीची नेमणूक शिवाजी महाराज करत असत. हवालदाराकडे किल्ल्याच्या चाव्या असत. किल्ल्याचे दरवाजे सूर्योदयानंतर उघडणे व सूर्यास्तापूर्वी बंद करणे. दिवसा रात्री पहारा गस्त याकडे लक्ष देणे. ही त्याची जबाबदारी होती. किल्ल्यावरील शिबंदी मेटा यांच्याकडे लक्ष पुरवणे दारुगोळा तोफा दुरुस्त आहे/ नाही ही पाहणी करणे. आवश्यकतेनुसार मागणी करणे ही त्याची कामे होती.

दर तीन वर्षांनी हवालदाराची दुसऱ्या किल्ल्यावर बदली केली जात असे.

सबनीस.           ब्राह्मण जातीतील व्यक्तीची सबनीस म्हणून निवड केली जाई. किल्ल्यावरील मुलकी जमाखर्चाचा व्यवहार पाहणे, हिशोब ठेवणे, सैनिकांची हजेरी पाहणे, आवश्यक खर्च कोणता याची माहिती देणे, आवश्यक बाबी ची मागणी करणे, आणि इतर दोन अधिकाऱ्यांच्या मागणी पत्रावर संमतीदर्शक सह्या करणे हे त्याचे काम असे.

दर चार वर्षांनी सबनीसाची दुसऱ्या किल्ल्यावर बदली केली जात असे.

कारखानीस.         प्रभू जातीतील व्यक्तीची कारखानीस म्हणून निवड केली जात असे. किल्ल्यावरील अठरा कारखाने जे आहेत त्यांचे नियंत्रण त्यांना करावे लागे. याशिवाय हवालदार व सबनीस यांच्या सोबत किल्ले प्रशासनात सहभागी व्हावे लागे. धान्यपुरवठा, दारुगोळा, किल्ल्याची डागडुजी, शस्त्रास्त्रांची साठे, निर्मिती याबाबतची संपूर्ण जबाबदारी ही कारखानिसकडे होती. युद्धात पकडली युद्धकैदी, हत्ती, घोडे, उंट हे कारखानीसाच्या ताब्यात असत.

दर पाच वर्षांनी कारखानीसांची दुसऱ्या किल्ल्यावर बदली केली जात असे

वरील तीनही अधिकारी हे समान दर्जाचे होते. प्रत्येकाने आपल्या मागणी पत्रावर व अहवाला वर दुसऱ्या दोन अधिकाऱ्यांच्या सह्या घेणे बंधनकारक होते.

किल्ले संरक्षणासाठी सैनिकांची व्यवस्था....

        किल्ल्यावरील सैनिकांची नेमणूक स्वतः शिवाजी महाराज पारखून करत असत. किल्ल्याच्या संरक्षणासाठी किल्ल्याच्या आकारमान व गरज यावरून सैनिकांची नेमणूक केली जात असे साधारणतः 400 ते 500 सैनिक ( शिबंदी) किल्ल्यावर नेमले जात. तर दोन-तीन तटसरनौबत यांची नेमणूक केली जाई. किल्ल्याच्या तटबंदीवर या सैनिकांच्या तुकड्या ठेवत त्यांना मेट असं म्हणत तर त्या सैनिकांना मेटकरी असे म्हटले जाई.

कडक नियमावली......

   किल्ल्यासाठी चे नियम अत्यंत कडक होते.१). ठराविक कालखंडानंतर अधिकाऱ्यांच्या बदल्या होत.२). एकाच कुटुंबातील कर्तृत्ववान व्यक्तींना अधिकारी म्हणून नेमले तर त्यांच्या नेमणुका दूरदूरच्या ठिकाणी केल्या जात ज्यायोगे ते आपसात मिळून फंदफितुरी करणार नाहीत.३) अधिकाऱ्यांनी आपल्या बायका-मुलांसह किल्ल्यावर राहणे बंधनकारक होते.४). सूर्योदयापूर्वी अथवा  सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे उघडले जात नसत.५). राजगृहाची स्वच्छता व संरक्षण करण्याची जबाबदारी हवालदारावर होती.६). हवालदाराने राजगृहाच्या बाहेर पायरीला उशी करून उषाखाली  गडाच्या किल्लया घेऊन झोपावे असा नियम होता.७). फंद फितुरी करून गेल्यास अशा व्यक्तीला कोणत्याही किमतीवर परत आणून त्याची हत्या करून त्याचे शीर भाल्याच्या टोकावर ठेवून सर्व किल्ल्यावरून फिरवले जाई.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...