(Mokashi P.
A.)
B.A.PART II
SEMESTER - 4
I.D.S.(H.S.R.M.)
PAPER - 2
प्रकरण -
3 सामाजिक सुधारक: लहुजी साळवे -
विठ्ठल रामजी शिंदे
- संत गाडगे महाराज अण्णाभाऊ साठे
विठ्ठल रामजी शिंदे यांचे कार्य
डिप्रेस्ड क्लास मिशन
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
तथा अण्णासाहेब प्रार्थना समाजाच्या प्रचारा १९०५ मध्ये अहमदनगरला आले होते. दिवस उन्हाळ्याचे होते. व्याख्यान आटोपल्यानंतर रात्री १० वाजण्याच्या सुमारास ते विश्रांतीसाठी आडवे झाले. एवढ्यात खोलीच्या दरवाजावर थाप पडली. दार उघडून पाहातात तो १०-१२ माणसे दारात उभी होती.
त्यांचे चेहरे
उन्हाने करपून गेले होते. अण्णासाहेबांनी त्यांच्या
येण्याचे कारण विचारल्यावर त्यांनी जो खुलासा केला तो ऐकून अण्णासाहेब अवाक् झाले. हे
लोक शेजारच्या भिंगार गावातील अस्पृश्य समाजातील होते. त्यांच्या
वस्तीत अण्णासाहेबांनी व्याख्यान द्यावे यासाठी ते आले होते. अण्णासाहेब
म्हणाले, "अरे
आता अर्धी रात्र झाली, अरे बाबांनो, ही काय सभेची वेळ झाली काय?' त्यावर
ते लोक म्हणाले “एक तर आम्ही काबाडकष्ट करून पोट भरणारी माणसं आहोत. आम्हाला
दिवसा सभा घेणे व सभेला हजर राहणे कसे शक्य आहे ? आणि
दुसरी गोष्ट अशी आहे की, आमच्या वस्तीत आम्ही सभा घेतलेली गावातल्या मंडळींना
आवडणार नसल्याने आम्हा लोकांना अशा अर्ध्या रात्रीलाच सभा घेणे भाग आहे."
अण्णासाहेब
स्तब्ध झाले. एखाद्या झपाटलेल्या व मंत्रमुग्ध माणसाप्रमाणे
मध्यानरात्री त्या लोकांबरोबर भिंगारच्या महारवाड्यात पोहोचले. अण्णासाहेबांना
पाहण्यासाठी सारी वस्ती सचेतन झाली होती. अण्णासाहेबांच्या
मानवतावादी विचाराने ती सारी वस्ती भारावून गेली. त्या रात्री
अण्णासाहेबांना हिंदुस्थानचे आणि मानवतेचे दर्शन झाले. ते
कमालीचे अस्वस्थ झाले. रात्री उशिरा अहमदनगरला ते आपल्या मुक्कामाच्या
ठिकाणी आले. भारतीय अस्पृश्यतेच्या प्रश्नाने त्यांची झोप उडाली. अस्पृश्यता
निवारणाच्या प्रश्नासाठी आपली सारी हयात खर्ची घालण्याचा त्यांनी निश्चय केला.
अज्ञान, दास्य, लाचारी, जातिभेद, जातिद्वेष
व जातिमत्सर यामुळे निर्माण झालेली सामाजिक विषमता दूर व्हावी म्हणून
अण्णासाहेबांनी प्रयत्न केले. समाजात समभाव प्रस्थापित होण्यासाठी समाजप्रबोधन केले. अस्पृश्यांच्या
उन्नतीसाठी त्यांनी अपार हालअपेष्टा सहन केल्या. महात्मा फुल्यांनी
अस्पृश्यता निवारणाची ज्योत इ. स. १८५१
मध्ये पुण्यात
प्रज्वलित केली आणि तीच ज्योत महर्षी शिंदे यांनी प्रकाशमान केली. प्रार्थना व ब्राह्मो
समाजाचा प्रचार करण्यासाठी त्यांना हिंदुस्थानचा प्रवास करण्याची संधी मिळाली. फिरत
असताना त्यांना अस्पृश्य समाजाची दयनीयता पाहावयास मिळाली. ती
पाहून त्यांचे अंतःकरण पिळवटून निघाले. अस्पृश्य वर्गाला स्पृश्य
वर्गाकडून अत्यंत वाईट वागणूक दिली जात होती. त्यांना अपमानित जीवन
जगावे लागत होते. अस्पृश्यतेबद्दल ते लिहितात, “अस्पृश्यता ही पुरातन सामाजिक संस्था आहे. तिचा
व्याप सर्व जगात भरून राहिला आहे. मात्र भारतातील
अस्पृश्यतेचे एक खास वैशिष्ट्य आहे. जे इतरत्र कुठेही आढळणार
नाही. विवक्षित जाती वंशपरंपरेने अस्पृश्य मानणे, त्या
जाती तशा अस्पृश्य राहाव्यात म्हणून त्यांना अगदी गावाबाहेर, पण
फार दूर नाही, अशा निराळ्या वस्तीत डांबणे व जर कोणी स्पृश्यांनी किंवा
अस्पृश्यांनी हा बहिष्काराचा नियम मोडला, तर
त्या दोघांवरही प्रचलित राजकीय, धार्मिक कायद्याची अंमलबजावणी करणे
ही भारतीय अस्पृश्यतेची खास वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे
ही अस्पृश्यता केवळ स्थानिक अथवा धार्मिक नसून ती जातीय आणि नित्य स्वरूपाची आहे." हे
जर असेच चालू राहिले तर अस्पृश्य वर्ग ख्रिश्चन वा मुस्लीम धर्माकडे जातील आणि त्या
धर्मात गेल्यानंतर ते हिंदू धर्माचे कडवे शत्रू बनतील. समाजस्वास्थ्यासाठी
हे योग्य होणार नाही. वरील सर्वांमुळे त्यांनी अस्पृश्य उद्धारासाठी कार्य
करण्याचे ठरविले.
महर्षी
वि. रा. शिंदे
यांनी सन १९०१ च्या शिरगणतीच्या आधारे 'इंडियन सोशल रिफॉर्मर' या
इंग्रजी वृत्तपत्रात ‘एकषष्ठांश भारत अस्पृश्य आहे' असा
प्रक्षोभक सिद्धांत मांडला. अस्पृश्यांच्या प्रश्नांची सोडवणूक
करण्यासाठी महर्षी वि. रा. शिंदे यांनी दि. १८ ऑक्टोबर, १९०६ रोजी मुंबई येथे 'डिप्रेस्ड
क्लास मिशन सोसायटी ऑफ इंडिया' (भारतीय निराश्रित साह्यकारी मंडळी) ही
संस्था स्थापन केली. या संस्थेची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे होती.
१. अस्पृश्यांत शिक्षणाविषयी
आस्था निर्माण करणे, त्यांच्यासाठी शाळा, उद्योग- शाळा, दवाखाने व वसतिगृहे काढणे.
२. स्पृश्य समाजाचे परिवर्तन करणे, अस्पृश्यता निवारण्यासाठी
सर्व स्तरांतून पाठिंबा मिळविणे.
३. अस्पृश्यांना नोकऱ्या मिळवून
देणे.
४. सार्वजनिक धर्माची शिकवण
देणे.
५. अस्पृश्यांच्या सामाजिक
अडचणींचे निवारण करणे.
डिप्रेस्ड क्लास मिशनच्या
स्थापनेनंतर अण्णासाहेबांनी राममोहन आश्रमात असणारे आपले बिऱ्हाड परळच्या
(मुंबई) महार वस्तीत हलविले. अस्पृश्यता निवारणाचा भाग म्हणून प्रत्यक्ष महार वस्तीमध्ये
आपल्या मातापित्यासह आणि मुलाबाळांसह बिऱ्हाड करून राहावयास गेलेले ते पहिले
समाजसुधारक होत. अण्णासाहेबांची बहीण जनाक्का
त्या काळात मॅट्रिक झालेल्या होत्या.
त्याही अस्पृश्य
वस्तीत स्त्रियांची सर्व प्रकारची सेवा-शुश्रूषा करत होत्या. एका आजारी बाईची पाठ
शेकण्यासाठी गरम पाणी हवे म्हणून त्या चूल पेटवायला लागताच दुसऱ्या बाईने ‘माझी चूल बाटवू नकोस. तू बाटलेली आहेस तेवढे पुरे झाले' अशी संभावना केली. परंतु जनाक्का संतापल्या
नाहीत. त्यांनी आपल्या घरातला
स्टोव्ह नेऊन पाणी गरम केले व आजारी बाईची पाठ शेकली. अण्णासाहेबांची धाकटी बहीण तान्याक्का क्षयाची बाधा
झालेल्या एका मुलीची सेवा करत राहिल्याने त्यांनाही क्षयरोग झाला व त्यातच तिचा
अंत झाला. अण्णासाहेबांच्या मातोश्री यमुनाताई
यांनी अस्पृश्याच्या मुलांच्या संगोपनाचे कार्य केले. जुन्या कपड्यांपासून पोलकी,
अंगडी, परकर इत्यादी बनविण्याचे कार्य केले. वडील
हिशेब लिहिण्याचे कार्य करीत. कुटुंबातील सारीच माणसं उच्च
ध्येयाने झपाटलेली होती. या सर्वांच्या कामाला त्यागाची, सेवेची, श्रद्धेची
व करुणेची बैठक लाभली होती.
डिप्रेस्ड
क्लास मिशनच्या माध्यमातून पुणे, मुंबई, सातारा, कोल्हापूर, ठाणे, हुबळी, मद्रास, अकोला, अमरावती
इत्यादी ठिकाणी शाळा काढल्या. अनेक ठिकाणी दवाखाने व वसतिगृहे
काढली. समाजप्रबोधनासाठी व्याख्यान व कीर्तने सुरू केली. अण्णासाहेबांनी
शिक्षणावर भर दिला. कारण यापूर्वीच त्यांना एक कटू अनुभव आला होता, तो
म्हणजे अण्णासाहेब बहीण जनाक्काच्या शिक्षणासाठी प्रोफेसर धोंडो केशव कर्वे
यांच्याकडे आले व तिला आश्रमात ठेवून घेण्याची विनंती केली. त्या
वेळी प्रोफेसर कर्वे म्हणाले, 'अब्राह्मण
मुलींना आमच्या आश्रमात ठेवून घेण्याचे दिवस अजून आलेले नाहीत.' प्रो. कर्वेंच्या
विधानाने अण्णासाहेबांचे अंतःकरण हेलावले. मात्र या प्रसंगानंतरही
त्यांच्या मनात प्रो. कर्वेविषयी आदराचीच भावना राहिली.
भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न या ग्रंथामध्ये अण्णासाहेब
लिहितात, “एकंदर मानवी अस्पृश्य समुदायात प्रबुद्ध भारताच्या
विचारांचा व प्रयत्नांचा सतत विषय असणे जरूर आहे. असे
नसेल तर स्वतः भारतच प्रबुद्ध नाही, म्हणून तोच समग्र नष्ट
होण्याला योग्य आहे, असेच म्हणणे क्रमप्राप्त होईल.” महर्षीना सन १९३४ मध्ये ४१
संस्थांतर्फे मानपत्र देण्यात आले. त्यास उत्तर देताना महर्षी म्हणतात, "हिंदुस्थानला
अस्पृश्यतेसारखा एक मोठा अन्याय स्वस्थ बसून चालू दिल्याबद्दल सर्व जग अपराधी आहे. म्हणून
या कामात सर्व जगाने भाग घेतला पाहिजे.
अस्पृश्यतेचा
प्रश्न राजकीय आहे का? यावर महर्षी होकारार्थी उत्तर देतात. ते
म्हणतात, "हिंदूंमधील
अस्पृश्यता ही हिंदूंच्या दूषित राजकारणाचा एक मामला आहे. अस्पृश्यतेचे
संघटित स्वरूप म्हणजे प्राचीन वर्णाभिमानी हिंदूंच्या दूषित राजकारणाचा यशस्वी
विकासच होय."
सन १९१७ चे राष्ट्रीय काँग्रेसचे कलकत्ता अधिवेशन
महर्षी वि. रा. शिंदे
डिप्रेस्ड क्लास मिशनच्या स्थापनेपासून म्हणजेच सन १९०६ पासून
अस्पृश्यता निवारणाचा प्रश्न एक राष्ट्रीय प्रश्न म्हणून भारतीय राष्ट्रीय सभेने
आपल्या विषयपत्रिकेत घ्यावा यासाठी अण्णासाहेबांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या
या धडपडीला सन, १९१७ च्या अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या
अधिवेशनात यश मिळाले. या अधिवेशनाच्या अध्यक्षा होत्या डॉ. अॅनी
बेझंट. त्यांच्या सहकार्याने अस्पृश्यता निवारणाचा ठराव
मंजूर करण्यात आला. तो ठराव याप्रमाणे होता, “ही राष्ट्रीय सभा हिंदुस्थानातील सर्व लोकांस जाहीर
विनंती करते की, अस्पृश्य समाजावर आजपावेतो जी जुलूमजबरदस्ती करण्यात आलेली आहे, ती ताबडतोब बंद करण्यात यावी व त्यांना इतर नागरिकांना उपलब्ध असलेले सर्व
नागरी हक्क समानतेने उपभोगण्याची संधी द्यावी.” महर्षी वि. रा. शिंदे यांच्या अथक
प्रयत्नामुळे निवारणाचा कार्यक्रम अखिल भारतीय पातळीवर जाऊन पोहोचला.
अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद मुंबई- १९१८ : दि.
२३ मार्च,
१९१८ रोजी बडोद्याचे
श्रीमंत सयाजीराव महाराज यांच्या अध्यक्षतेखाली 'अखिल भारतीय अस्पृश्यता निवारण परिषद' मुंबई येथे आयोजित करण्यात आली. ही परिषद २३, २४ व २५ मार्चअखेर चालली. या परिषदेत बॅ.
जयकर यांनी
महत्त्वपूर्ण ठराव मांडला.
तो असा, “समाजातील सर्वांत खालच्या
कनिष्ठ वर्गावर लादण्यात आलेली अस्पृश्यता आजपासून ताबडतोब काढून टाकण्यात यावी व
याबाबत कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी (उदा. शाळा,
मंदिरे, पाणवठे, दवाखाने, कोर्ट कचेऱ्या इ.) त्यांना कोणत्याही प्रकारचा प्रतिबंध करण्यात येऊ नये. परिषदेने एक जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यामध्ये असे म्हटले आहे की, "मी खाली सही करणार, परिषदेच्या ठरावातील अटी स्वतः काटेकोरपणे पाळीन व
इतरांकडूनही त्या पाळल्या जाव्यात म्हणून मी माझ्या प्रयत्नांची पराकाष्ठा करीन.”
अखिल भारतीय अस्पृश्यता निर्मूलन परिषद नागपूर - १९२१ :
महर्षी वि. रा. शिंदे व महात्मा गांधी यांच्यात विचारविनिमय होऊन डिप्रेस्ड क्लास मिशनने
तूर्त असहकारितेत भाग घेऊ नये असे गांधीजींनी सांगितले. याच वेळी महर्षीची राष्ट्रीय सभेच्या विषय नियामक समितीत नियुक्ती करण्यात
आली आणि याच वेळी महात्मा गांधीजींच्या अध्यक्षतेखाली नागपूरला अखिल भारतीय
अस्पृश्यता निवारक परिषद संपन्न झाली.
या परिषदेसाठी
मोतीलाल नेहरू, बॅ. जयकर,
बॅ. तेजबहाद्दूर सप्रू, सी. राजगोपालाचारी, सरोजिनी नायडू यांसारखे राष्ट्रीय पातळीवरील नेतेमंडळी हजर होती. यावरून अण्णासाहेबांच्या कार्याचा व्याप व दबदबा
लक्षात येतो.
वायकोम सत्याग्रह - १९२४ :
वायकोम हे गाव त्रावणकोर संस्थानात होते. त्या ठिकाणी असणाऱ्या मंदिरात अस्पृश्यांना प्रवेश
नव्हता. तत्कालीन परिस्थिती पाहता यात आश्चर्य नव्हते. तथापि, तेथील स्पृश्य हिंदूंच्या आचरटपणाचा व आडमुठेपणाचा कळस म्हणजे वायकोम, येथील मंदिराच्या वाटेवरूनदेखील चालण्याची
अस्पृश्यांना परवानगी नव्हती.
अण्णासाहेबांनी हा
अन्याय मोडून काढण्यासाठी तेथे सत्याग्रह केला. गांधीजी काही अपरिहार्य कारणांमुळे या सत्याग्रहात भाग घेऊ शकले नाहीत.
अण्णासाहेबांनी
जमीनदारांच्या मनमानी व हीन प्रवृत्तीविरुद्ध सत्याग्रह केला. अस्पृश्यांना न्याय मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या सत्याग्रहानंतर अण्णासाहेबांनी गांधीजींच्या असे
निदर्शनास आणून दिले
की, “आपल्या अंतःकरणात खादीला
पहिला क्रम, हिंदू-मुस्लीम ऐक्याला दुसरा व अस्पृश्यता निवारणाच्या
प्रश्नाला तिसरा क्रमांक आहे."
यावर गांधीजींनी १२ डिसेंबर, १९२४ रोजी
अण्णासाहेबांना जे पत्र लिहिले त्यामध्ये ते म्हणतात,
"माझ्या कार्यात खादीला पहिला क्रम, हिंदू-मुस्लीम ऐक्याला दुसरा व
अस्पृश्यता निवारणाला तिसरा क्रम आहे असे जे तुमचे मत आहे ते चुकीचे असून माझ्या
कार्यामध्ये असे क्रम नाहीत.
अस्पृश्यता
निवारणाचा प्रश्न माझ्या दृष्टीने इतर प्रश्नांच्या बरोबरीचाच आहे."
महर्षी वि. रा. शिंदे आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांना एकमेकांच्या कार्याविषयी कमालीचा आदर होता. कर्मवीर भाऊराव पाटलांनी रयत शिक्षण संस्थेमध्ये अतिशय अल्प अशा वेतनावर
तहहयात सेवा करण्यासाठी पुढे आलेल्या रयत सेवकांना आजीव सदस्यत्वाची दीक्षा
देण्यासाठी ऋषितुल्य अण्णासाहेबांना आमंत्रित केले होते. स्वतःला भिक्षू समजणाऱ्या अण्णासाहेबांनी आजीव सदस्यत्वाची दिशा दिली आणि ज्ञानाची
गंगा वाडी-वस्तीपर्यंत पोहोचविणाऱ्या
रयत शिक्षण संस्थेला त्यांनी धन्यवाद दिले.
भाई माधवराव बागल
अण्णासाहेबांविषयी म्हणतात,
“त्यांना पाहताच त्यांचे पाय धरावेसे वाटले मला. प्रथमदर्शनीच माझ्या मनावर त्यांची विलक्षण छाप पडली. मी जात्याच चित्रकार. माझ्या डोळ्यासमोर जणू पुरातन काळचा ऋषी उभा होता. चित्रात पाहिलेले आणि कल्पनेत तरंगत असलेले वसिष्ठ-वाल्मिकी ऋषी यांची ती चालती- बोलती साकार मूर्ती होती. आधुनिक काळात वावरत असलेल्या त्या मूर्तीने मला पुरातन काळात खेचून नेले. विद्वत्तेचे तेज आणि गांभीर्य त्यांच्या डोळ्यांत
चमकत होते. त्यागाच्या तपश्चर्येने
त्यांच्याभोवती सात्त्विक वलय निर्माण केले होते. एकाच वेळी आदर आणि भीती वाटे. त्यांचा भव्य केशसंभार,
डोक्यापासून
पाठीच्या भव्य पठारावर पसरलेला,
नाकावरील चष्म्याने त्यावर
नवसंस्कृतीचा रंग चढला होता.
अहिंसा आणि
क्षात्रधर्म यांचा संयोग होता तो. जणू सात्त्विक संताप व भूतदया यांचा समन्वय!' विषमतेची चीड होती तशीच समतेची भूक होती. शिवछत्रपतींविषयींचा अभिमान आणि गांधीजींविषयीची
भक्ती होती."
न्या. चंदावरकर अण्णासाहेबांच्या अस्पृश्यता निर्मूलन कार्याविषयी म्हणतात, “अस्पृश्यांप्रति केवळ
सहानुभूतीचा दृष्टिकोण घेण्याची अण्णासाहेबांची भूमिका नव्हती.
त्यांच्या मते, हा प्रश्न मानवी हक्काचा व राष्ट्रीय एकात्मतेचा
होता. त्यांची भूमिका
अस्पृश्योद्धाराची नव्हती तर ती अस्पृश्यता निर्मूलनाची होती. अधिक खोलात जाऊन त्यांच्या भूमिकेचा विचार केला तर महात्मा फुले, महात्मा गांधी, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील या
समाजपुरुषांच्या विचारसरणींचा सुरेख संगम त्यांच्या अस्पृश्यता निवारणाच्या
कार्यात आढळून येतो."
प्रा. डॉ. एन. डी.
पाटील
अण्णासाहेबांबद्दल म्हणतात,
“अण्णासाहेबांसारखी माणसं पुन्हा पुन्हा जन्माला येत
नसतात. कार्लाईलच्या मते, महापुरुष जन्माला आल्यानंतर निसर्ग तो ढाचा अथवा
साचा मोडून टाकतो! अण्णासाहेबांना जन्माला
घालताना निसर्गाने जो ढाचा वापरला तो त्याने नंतर मोडून टाकला असल्याने अण्णासाहेबांसारखा महामानव पुन्हा
निर्माण होणार नाही.
महापुरुष म्हणजे 'छापाचे गणपती' नव्हेत!”
महर्षी वि. रा. शिंदे यांनी आपला जीव की प्राण असणारे डिप्रेस्ड क्लास मिशन अस्पृश्य
मंडळींच्या स्वाधीन केल्यानंतर मुंबई इलाख्यात आणि संस्थानी प्रदेशात अनेक ठिकाणी त्यांनी शेतकरी
परिषदा संघटित केल्या.
याही क्षेत्रात 'पुढारी निवडताना त्याचे गोत पाहू नका, त्याचा पोत पाहा', 'पुढाऱ्याची जात पाहू नका, त्याची रीत पाहा.' असा सूचक संदेश दिला.
दुष्काळग्रस्तांना साहाय्य
सन १९२० मध्ये अहमदनगर, पुणे जिल्ह्यात काही भागांत भयंकर दुष्काळ पडला. त्या वेळी पुणे येथील डिप्रेस्ड क्लास मिशनच्या
पटांगणावर सुमारे एक हजार कुटुंबे दाखल झाली. त्यांच्या अन्न, वस्त्र व निवाऱ्याचा प्रश्न
निर्माण झाला होता. अशा प्रसंगी महर्षी वि. रा. शिंदे यांनी 'आपत्ती निवारक सभा' स्थापन केली. शहरामधून धान्य, कपडे, पैसे जमा केले. दुष्काळग्रस्तांसाठी टेंपररी चाळ व एक विस्तीर्ण मांडव उभारला. घट्टया-कट्ट्या लोकांसाठी कामाची सोय करण्यात आली. तर लहान मुले व वृद्धांसाठी रेशनवर मोफत धान्य देण्यात येऊ लागले. पुण्याचे तत्कालीन कलेक्टर मि. जी.
टी. गॅरेट यांनी पाहणी करून मदत देऊ केली. महर्षीच्या कार्यामुळे हजारो लोकांचे प्राण वाचले.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.