(Molkashi P. A.)
B.A.II SEMESTER-4 PAPER-2 HSRM
प्रकरण - 1
ईस्ट इंडिया कंपनी सरकारने केलेल्या सामाजिक
सुधारणा
ईस्ट इंडिया कंपनीने कोणत्या सुधारणा घडवून आणल्या किंवा येथील सामाजिक
सुधारणांसाठी कोणती उपाययोजना केली याचा थोडक्यात आढावा आपण येथे घेणार आहोत. १९ व्या शतकाच्या पहिल्या दोन दशकांतच ईस्ट इंडिया कंपनीने सर्व भारतभर एकसंघ राजकीय
सत्ता प्रस्थापित केली.
यापूर्वी कधीच
संपूर्ण भारत एका सत्तेच्या आधिपत्याखाली नव्हता. सर्व भारतात प्रशासन क्षेत्र, कायदा, सुव्यवस्था व न्यायदान
क्षेत्रात एकसूत्रता निर्माण झाली. या भारतातील राजकीय
क्षेत्रातील बदलाचा भारतातील समाजसुधारणांच्या, धर्मसुधारणांच्या व शिक्षणसुधारणांच्या चळवळीसाठी मोठ्या प्रमाणात सकारात्मक
उपयोग झाला. ईस्ट इंडिया कंपनीच्या येथील
प्रशासनावर ब्रिटिश पार्लमेंटचे नियंत्रण होते. इंग्रजी राजवट स्थिर करण्यासाठी व भारताचा मागासलेपणा नष्ट करण्यासाठी येथे विविध सुधारणा घडवून
आणण्याच्या सूचनाही ब्रिटिश पार्लमेंटने कंपनी सरकारला दिल्या होत्या.
इ. स. १८१३ मध्ये
ब्रिटिश पार्लमेंटने ईस्ट इंडिया कंपनीला सनद दिली.
या १८९३ च्या सनदेत
प्रथमच ब्रिटिश पार्लमेंटने भारतीय लोकांना शिक्षण देण्याचा आग्रह धरला व शिक्षण
देण्यासाठी आर्थिक तरतूद केली.
१८ व्या शतकात युरोपमध्ये झालेल्या वैचारिक
क्रांतीचा तो परिणाम होता. या नव्या पुरोगामी
विचारांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोण व मानवतावाद होता. मानवतावादाने स्वातंत्र्य,
समता व बंधुता या
तत्त्वांना जन्म दिला. भारतात कंपनी सरकारमध्ये काम
करणारे अधिकारी मन्रो, माल्कम, एल्फिन्स्टन, लॉर्ड विल्यम बेंटिंग,
लॉर्ड मेकॉले, चार्लस् मेटकॉफ हे उदारमतवादी व मानवतावादी होते. यांना भारतीय समाज, भारतीय तत्त्वज्ञान व भारतीय संस्कृती यांच्याबद्दल आदर होता. भारताला आधुनिक जगातील वैज्ञानिक व मानवतावादी देश बनवावा असे
त्यांना वाटत होते.
या राजकर्त्या
प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांतूनच भारतात सतीबंदीचा कायदा, बालहत्याबंदीचा कायदा, पुनर्विवाहाचा कायदा, ठग व पेंढाऱ्यांचा बंदोबस्त,
धर्माच्या व
देवाच्या नावाने होणाऱ्या मनुष्यहत्या यावर बंधने घातली.
याचा आपण येथे
थोडक्यात आढावा घेऊ.
१. सतीबंदीचा कायदा: भारतात प्राचीन काळापासून सतीची
चाल रूढ असल्याचे संदर्भ मिळतात.
ऋग्वेदात सतीचा
उल्लेख आला आहे पण त्या काळात सतीची चाल रूढ नव्हती. भारतात ग्रीकांचे आक्रमण झाले त्या वेळी पंजाबमध्ये सतीची चाल काही प्रमाणात
अस्तित्वात असल्याचे उल्लेख ग्रीकांच्या लिखाणात मिळतात. ग्रीक आक्रमणापूर्वी शक,
हूण व कुशाण यांची
आक्रमणे भारतावर झाली. त्यातील शक जमातीत सतीची
प्रथा होती. तेथूनच पुढे भारतात तिची
सुरुवात झाली असावी असे मानले जाते. पुराणकाळात सतीच्या चालीचे उदात्तीकरण करण्यात आले.
त्यांनी समाजासमोर
सतीसंबंधी आकर्षक व फलदायी पारलौकिक फळे सांगितली. उदा. स्त्रीने सती गेल्यास
स्वतःला व पतीला स्वर्गात स्थान मिळते. सतीच्या पूर्वजांचा उद्धार होतो. सतीच्या व पतीच्या पापांचे संपूर्ण क्षालन होते इत्यादी.
सती न जाणाऱ्या विधवा स्त्रीने पतीची आठवण करीतच जगावे, केशवपन करावे, दाग-दागिने अंगावर घालू नये, चांगले कपडे परिधान करू नये,
एक वेळच जेवावे, जमिनीवर झोपावे, कोणत्याही धार्मिक कार्यक्रम व समारंभ यात भाग घेऊ नये. कारण विधवेस अशुभ मानले जात असे. विधवेने संन्यासी वृत्तीने पण आपल्याच घरात राहावे. सार्वजनिक ठिकाणी वावरू नये. या विविध बंधनांमुळे व पदोपदी अपमान सोसत दररोज
मरणापेक्षा सती जाऊन एकदाच मरावे असे विधवा स्त्रियांना वाटत असे. विधवेने सती जावेच म्हणून वरील खडतर व
मानवतेला काळिमा फासणारी परिस्थिती तिच्याभोवती निर्माण केली जात असे. सती जाणे ऐच्छिक होते, पण प्रत्यक्ष व्यवहारात जबरदस्तीच केली जात असे. पतीच्या मृत्यूनंतर स्त्री दुःखात असतानाच स्वार्थी
नातेवाईक व दक्षिणेसाठी हपापलेले स्वार्थी ब्राह्मण पुरोहित त्या विधवा स्त्रीच्या
परस्परच जाण्याची तिची इच्छा जाहीर करत व सती जाण्याची तयारी करत.
खोट्या सामाजिक व घराण्याच्या प्रतिष्ठेसाठी तसेच विधवा इस्टेटीत भागीदार होऊ
नये म्हणून विधवा स्त्रियांना सती जाण्यास भाग पाडले जात असे. पतीच्या चितेवर तिला जिवंत जाळले जात असे. पतीच्या चितेवर तिला जिवंत जाळले जात असे. पतीच्या
चितेवर तिला बांधून ठेवले जाई. जळत असताना असह्य वेदनांनी तिने
फोडलेल्या आर्त किंकाळ्या ऐकू येऊ नयेत म्हणून मोठमोठ्याने ढोल वाजविले जात. नगारे
व शंख वाजविले जात. आरोळ्या देऊन मोठा आवाजाचा गोंगाट करत. विधवेने
चितेवरून बाहेर पडू नये म्हणून ओल्या बांबूने तिला दाबून धरत, आत
ढकलत. भारतातील आद्य समाजसुधारक, धर्मसुधारक
व 'आधुनिक भारताचे जनक' राजा राममोहन रॉय यांच्या
घरातच अशा प्रकारचा अघोरी प्रकार घडला होता. त्यामुळे त्यांचे मन
द्रवले. ते अत्यंत दुःखी, कष्टी झाले. त्यांनी
सतीबंदीविषयी प्रबोधन सुरू केले. त्या वेळचे भारताचे
गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिंग यांची त्यांना साथ मिळाली व सतीबंदीचा कायदा
अस्तित्वात आला.
लॉर्ड विल्यम बेंटिंग व राजा राममोहन रॉय : सतीबंदीचा कायदा अस्तित्वात आणण्यासाठी या द्वयांनी फार मोठे प्रयत्न केले. त्यांनी मोठे धैर्य व धाडस दाखविले. भारतामध्ये विशेषतः बंगाल,
राजस्थान या
प्रांतांत सतीची प्रथा मोठ्या प्रमाणात होती. इ.स. १८१५ मध्ये
फक्त बंगालमध्ये सती जाणाऱ्यांची संख्या ३७८ होती. पुढे प्रतिवर्षी ही संख्या वाढतच गेली. सतीबंदीचा कायदा अस्तित्वात येईपर्यंत ही संख्या
प्रतिवर्षी ५०० च्या वरच होती. इंग्रजांच्या आगमनापूर्वी अनेक सत्ताधीशांनी सतीची प्रथा बंद करण्याचा प्रयत्न
केला. त्यात मुघल बादशहा अकबर, जयपूरचा राजा जयसिंग यांनी प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आले नाही. पोर्तुगीज गव्हर्नर अल्बुकर्क याने पोर्तुगीज
वसाहतीत सतीबंदी केली होती.
तसाच प्रयत्न फ्रेंच वसाहतीमध्येसुद्धा झाला. लॉर्ड वेलस्लीने धर्माप्रमाणे सती जाण्यास परवानगी
दिली. पण जुलूम, जबरदस्तीने सती जाण्यास भाग पाडणाऱ्यांविरुद्ध व
अशा सतीवर बंदी घातली. तसेच १६ वर्षाच्या आतील विधवा मुलगी, गर्भवती विधवा यांना सती जाण्यास बंदी घातली. इ. स. १८२० नंतर राजा राममोहन रॉय यांनी सतीच्या प्रथेविरुद्ध मोठ्या
प्रमाणात प्रबोधनाची चळवळ सुरू केली.
हिंदू
धर्ममार्तंडांचा रॉयना तीव्र विरोध झाला. पण राजा राममोहन रॉय त्यांच्या धमक्यांना दबले नाहीत. त्यांनी मोठ्या धाडसाने व धैर्याने या वाईट पद्धतींविरुद्ध
रान उठविले. अनेक इंग्रजी शिकलेले तरुण आपल्याबरोबर घेतले. या काळात लॉर्ड विल्यम बेंटिंग भारताचे गव्हर्नर
जनरल होते. ते उदारमतवादी व मानवतावादी
होते. राजा राममोहन रॉय यांनी
लॉर्ड विल्यम बेंटिंगचे या कामी सहकार्य घेतले. राजा राममोहन रॉयनी धर्ममार्तंडांना जशास तसे उत्तर दिले.
धर्ममार्तंड व रॉय
यांच्यात लढाया झाल्या. रॉयनी त्या लढल्या व
जिंकल्यासुद्धा. शेवटी राजा राममोहन रॉय
यांना लॉर्ड विल्यम बेंटिंग व कंपनी सरकारचे सहकार्य मिळाले. लॉर्ड बेंटिंगने ४ डिसेंबर, १८२९ रोजी कायद्याने भारतातील सतीच्या प्रथेवर, सतीच्या चालीवर बंदी घातली.
विधवेचे मन वळविणारे, तिच्यावर सती जाण्यासाठी बळजबरी करणारे, तसेच सती जाण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी हजर
राहणारे सर्व खून करण्यासारख्या गुन्ह्यास पात्र ठरतील असा कायदा पास केला. भारतातील सती प्रथा कायमची बंद झाली. लॉर्ड बेंटिंग व राजा राममोहन रॉय या उभयतांच्या प्रयत्नांनी भारतीय समाजास लागलेला कलंक
कायमचा पुसला गेला.
या सतीबंदीच्या
कायद्याने धर्ममार्तंड नाराज व निराश झाले. त्यांनी धर्मसभेमार्फत प्रिव्ही कौन्सिलकडे अर्ज केला. आपली बाजू मांडण्यासाठी राजा राममोहन रॉय इंग्लंडला गेले
त्यांनी आपली बाजू मांडली.
प्रिव्ही कौन्सिलने
धर्ममार्तंडांचा अर्ज फेटाळून लावला. मानवतावादाचा पुरस्कार केला.
२. पुनर्विवाहाचा कायदा :
हिंदू धर्मशास्त्रींनी पुनर्विवाहास मान्यता दिली होती. परंतु उच्चवर्णीय हिंदू जमातीत म्हणजे ब्राह्मण व ९६ कुळी क्षत्रिय मराठा समाजात विधवांच्या पुनर्विवाहास
धर्ममार्तंडांनी काळाच्या ओघात बंदी घातली. भारतीय समाजातील रीतिरिवाज व परंपरांनुसार विधवांचा पुनर्विवाह होत नव्हता. अपवादात्मक पण विधवेचा पुनर्विवाह झाल्यास तिला
होणारी मुले ही अनौरस मानली जात.
राजा राममोहन रॉय
यांनी जो ब्राह्मो समाज स्थापन केला होता,
त्या ब्राह्मो
समाजाने विधवांच्या पुनर्विवाहाची चळवळ सुरू केली. त्या दृष्टीने समाजाचे प्रबोधन करण्यास सुरुवात केली. विधवेच्या पुनर्विवाहास कायद्याने मान्यता द्यावी अशी मागणी
केली. सनातनी धर्ममार्तंडांनी
पुनर्विवाह चळवळीस कडाडून विरोध केला. ब्राह्मो समाजाच्या
सुधारकांना खुनाच्या धमक्या दिल्या.
सुधारकांनी न घाबरता
धैर्याने व धाडसाने आपली चळवळ सुरू ठेवली. याच वेळी पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी हिंदू धर्मशास्त्रांचे आधार देऊन
या शास्त्रांनी पुनर्विवाहास बंदी केलेली नाही हे सिद्ध केले. पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी विधवांच्या पुनर्विवाहास मान्यता
द्यावी अशी कंपनी सरकारकडे अर्ज देऊन विनंती केली. आपल्या समाजातील धर्ममार्तंडांनी हजारो लोकांच्या सह्या घेऊन कंपनी सरकारकडे
अर्ज केला व पुनर्विवाहास मान्यता देऊ नये अशी मागणी केली. ब्राह्मो समाजातील समाजसुधारक व पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या अथक
प्रयत्नांमुळे कंपनी सरकारने इ.
स. १८५६ मध्ये हिंदू पुनर्विवाहाचा कायदा पास केला.
विधवा स्त्रियांना
पुनर्विवाहाचा अधिकार प्राप्त झाला.
तसेच त्यांच्या
अपत्यांनासुद्धा कायदेशीर मानले जाऊ लागले. विधवांना पुनर्विवाहाचा अधिकार कायद्याने मिळाला पण भारतीय समाजात व्यवहारात मात्र विधवांचा
पुनर्विवाह रुजला नाही.
या कायद्याचा फारसा
उपयोग झाला नाही.
३. बालहत्या बंदीचा कायदा (अ) बालकन्या हत्या : राजस्थानमध्ये बालकन्या हत्येची
प्रथा रूढ होती.
भारतातील रजपूत व
जाट इत्यादी
लोकांच्यात ही प्रथा होती.
कारण रजपूत अनेक
घराणी राज्यकर्ती होती. त्यांच्यात आपसांत सतत
युद्धे होत. शत्रूबरोबर युद्धे होत. त्यात अनेक जवान रजपूत मारले जात. परिणामी, मुलींना योग्य वर मिळत नसे.
अविवाहित कन्या घरात
ठेवणे हा कलंक मानला जाई. तसेच योग्य वर मिळाल्यावर लग्नात परंपरेनुसार फार मोठा खर्च
करावे लागे. राजस्थानमधील नापीक जमीन व
त्यातून मिळणारे उत्पन्न तुटपुंजे असे. तसेच पश्चिम व मध्य भारतात हुंड्याची पद्धतही मोठ्या प्रमाणात होती. ब्राह्मण, भट, भिक्षुक, पौरोहित्य यांच्या दक्षिणा व जेवणावळी; पाहुण्यांचा आदर-सत्कार व जेवणावळी, मेजवान्या इत्यादींमुळे कन्येचा विवाह म्हणजे मोठे
संकट वाटे. त्यामुळे कन्येचा जन्म होताच
तिला अनेक प्रकारचे उपाय योजून तिची हत्या करत. मुलीचा जन्म होताच तिचा श्वास कोंडून, तिला अफूसारखे विष देऊन,
नवजात मुलीचे दूध
बंद करून, उपासमार करून मारत. कंपनी सरकारने सन १७९५ ते १८०३ या काळात बालहत्या प्रतिबंधक कायदे करून बालकन्या
हत्याबंदी केली. पण त्यांचा फारसा उपयोग झाला
नाही. लॉर्ड बेंटिंग व लॉर्ड
हार्डिग यांनी आपल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांमार्फत बालहत्याविरोधी मोहीम जोरदारपणे
राबविली. त्यांच्या अथक प्रयत्नाने ही दुष्ट प्रथा
नष्ट झाली.
(ब) नवसपूर्तीसाठी बालहत्या : मूल न होणाऱ्यांकडून नवस केले जात.
एकापेक्षा जास्त मुले झाल्यास त्यातील एक मूल गंगेस अर्पण करू. त्यामुळे अशी मुले झाली तर त्यांना नवस फेडण्यासाठी गंगेच्या पाण्यात सोडत व त्या अर्भकाचा मृत्यू होई. १८०२ मध्ये कंपनी सरकारने या संबंधी कायदा केला व ही पद्धत बंद केली.
४. धर्माच्या नावाने होणाऱ्या
बालहत्या :पवित्र गंगानदीच्या तटावर मृत्यू आल्यास आपल्या
आत्म्यास मुक्ती मिळते,
स्वर्गात स्थान
मिळते या अंधश्रद्धेतून वृद्ध लोक, असह्य आजाराने त्रासलेले व मरणोन्मुख लोक गंगातटी येत व मरून जात. तसेच डोंगराळ भागातील जागृत देवस्थानाजवळील कड्यावरून काही लोक स्वतःचा कडेलोट
करून घेत. त्यामुळे स्वर्गप्राप्ती
मिळते अशी अंधश्रद्धा होती.
त्यामुळे अनेक लोक
कडेलोट करून घेऊन आत्महत्या करत.
कंपनी सरकारने
कायद्याने या प्रथांना बंदी घातली.
५. नरबळीच्या प्रथेस बंदी:
भारतातील बिहार,
ओरिसा, गौंडवन येथील जंगली व डोंगराळ भागातील काही आदिवासी
समाजात नरबळीची प्रथा होती.
आपल्या देवास
प्रसन्न करणे, त्याची कृपा संपादन करणे, आपली जमीन सुपीक होऊन जास्त उत्पादन वाढणे यासाठी
नरबळी देत असत. हे आदिवासी इतर जातींतील व्यक्तीस पळवून आणत व
आपल्या देवतेस त्याचा बळी देत व त्याच्या शरीराचे तुकडे करून शेतात पुरले जात. कंपनी सरकारने कायद्याने नरबळी प्रथेस बंदी घातली. पण पशुहत्येस परवानगी दिली. (इ. स. १८४५.)
६. गुलामांच्या व्यापारास बंदी : काही ब्रिटिश व्यापारी, ब्रिटिश अधिकारी, भारतातील श्रीमंत लोक आपली विषयवासना भागविण्यासाठी स्त्री गुलामांना विकत घेत. मुलांना चोरून नेऊन दुसऱ्या भागात विकणाऱ्या काही
टोळ्या होत्या. उत्तर भारतात व दक्षिण भारतातील काही भागांत घरकामासाठी व वेश्या
व्यवसायासाठी स्त्री-पुरुष गुलाम ठेवत. १७८९ ते १८३३ पर्यंत गुलामांची खरेदी-विक्री करणे,
त्यांचा व्यापार
करणे, भारतातून बाहेर गुलाम
पाठविणे किंवा बाहेरून भारतात गुलाम आणणे या सर्व बाबींवर बंदी घातली. शेवटी ब्रिटिश पार्लमेंटच्या शिफारशीवरून इ. स. १८४३ मध्ये भारतात
गुलामगिरी नष्ट करणारा कायदा केला व ही पद्धत बंद केली.
७. ठगांचा बंदोबस्त :
लॉर्ड विल्यम बेंटिंगने आपल्या कारकिर्दीत सामाजिक सुरक्षितता व शांतता
प्रस्थापित करण्यास महत्त्व दिले.
त्यासाठी त्याने
ठगांचा बंदोबस्त करण्यासाठी खास मोहीम उघडली. ठग हे प्रवाशांना व वाटसरूंना लुटून त्यांना ठार मारत असत.
ते लुटारू व
दरोडेखोर होते. ठगांची मोठी संघटना होती. ही संघटना गुप्तपणे काम करत असे. हे सर्व ठग कालीमातेचे भक्त होते. समाजात ठग हे हिंदू व मुस्लीम धर्माचेही होते. दसऱ्याच्या मुहूर्तावर त्यांच्या टोळ्या एकत्र येत
व आपल्या उद्योगास लागत. आपले काम संपल्यावर ते
आपल्या गावी परत येत असत. सज्जन माणसासारखे समाजात
मिसळून शेती, व्यापार, कापड विक्री व इतर धंदे करत. त्यामुळे ठगांना ओळखणे अवघड होते. हे ठग वेशांतर करून गावात फिरत. प्रवासी लोकांची टेहळणी करत, गोड बोलून त्यांच्याशी प्रेमाने वागत. त्यांना भूलथापा देऊन त्यांना भुलवत.
त्या प्रवाशांचा खून
करण्याची योजना आखत. त्यांची विशिष्ट जागा आली की
ते प्रवाशांच्या गळ्यात कापडी रुमालाचा फास टाकून त्याला ठार करत. प्रवासी किंवा वाटसरू अनेक असले तरी हे लोक
सर्वांना अगदी स्त्रिया व लहान मुलांनासुद्धा ठार मारत.
ठगातील इतर साथीदार
पुढे येत. अगोदरच जंगलात खोदलेल्या
खड्यात त्या सर्वांना पुरून टाकत. प्रेते फुगून वर येऊ नयेत म्हणून त्यांच्या पोटातून जमिनीत खुंट्या ठोकत. नंतर एकमेकांना प्रसाद म्हणून गूळ वाटून सर्व
लुटीची वाटणी करत.
मध्य प्रदेशात सागर ते भोपाळ या रस्त्यावर ठग लोकांचे मोठे अड्डे होते. त्यांच्या तावडीतून सामान्य वाटसरू, सैनिक व अधिकारीसुद्धा सुटत नसत. अशा या ठगांचा बंदोबस्त करण्याचे काम कठीण होते. कारण त्यांची संघटना गुप्त होती. त्यांच्यात कमालीचे ऐक्य होते. ते खुनाचा पुरावा मागे ठेवत नसत. तसेच या ठगांना स्थानिक जमीनदार, सरदार व वतनदार यांचा पाठिंबा असे. त्यामुळे त्यांचा बंदोबस्त करणे म्हणजे कंपनी सरकारपुढे मोठे आव्हानच होते.
अशा परिस्थितीत लॉर्ड विल्यम बेंटिंगने हे आव्हान स्वीकारले. त्याने कर्नल स्लीमनच्या नेतृत्वाखाली ठगांच्या
विरुद्ध इ. स. १८३० मध्ये मोहीम सुरू केली. त्याने जवळजवळ सहा वर्षे अथक परिश्रम करून, अनेक युक्त्या, प्रयुक्त्या करून गुप्तहेरांकरवी माहिती घेऊन अनेक ठगांना ठार मारले. अनेकांना फाशी दिली. अनेकांना कैदेत टाकले. मध्य प्रदेश, माळवा व बुंदेलखंडात
ठगांच्या अनेक टोळ्या पकडून त्यांना ठार केले. इ.स. १८३६ पर्यंत
ठगांचा बंदोबस्त करण्यात त्याला चांगलेच यश आले.
कंपनीने ठगांचा
बंदोबस्त केला.
अशा प्रकारे ईस्ट इंडिया कंपनीच्या काळात भारतामध्ये सामाजिक सुधारणा घडवून
आणल्या. भारतात शांतता, सुव्यवस्था व सुरक्षितता निर्माण केली. तसेच शिक्षण, आरोग्य, कायदा व न्यायदान इत्यादी क्षेत्रांत सुधारणा घडवून
आणल्या. लोककल्याणावर भर दिला. भारतातील नव्या युगाच्या वाटचालीस गती दिली.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.