(Mokashi P. A.)
बी.ए. भाग -2
सेमिस्टर - 4 पेपर नं. 2
महाराष्ट्रातील समाजसुधारणेचा इतिहास
प्रकरण
- 2 महिला सुधारक - ताराबाई शिंदे
भारताची प्राचीन संस्कृती, हिंदू धर्म व तत्त्वज्ञानाची शिकवण, जैन व बौद्ध धर्माचा उदय, त्यातून समाजात झालेले परिवर्तन, जात, धर्म, पंथ, वंशभेदरहित जोपासलेली एकता, प्रादेशिकता, भाषा, स्वतःची भिन्न संस्कृती, आचारविचार पद्धती, चालीरीती, रूढी, परंपरा इत्यादी घटकांत भिन्नता असूनही विविधतेत
जोपासलेली एकता हे भारतीय समाजाचे अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. समृद्ध वारसा, गौरवशाली इतिहास आहे. भारताच्या या गौरवशाली इतिहासालाच एक काळी किनार
असल्याचे निदर्शनास येते. इतिहासाचे विद्यार्थी या
नात्याने त्याकडेही कानाडोळा करून चालणार नाही. कारण जे जे घडले व जसे घडले तसेच समाजासमोर मांडणे हे इतिहासाचे मुख्य प्रयोजन
ताराबाई शिंदे आहे. तेव्हा या काळ्या
किनारीवर स्पष्टपणे निदर्शनास येणारी बाब म्हणजे काही सन्माननीय अपवाद वगळता सर्वच काळात स्त्रियांची स्थिती
शोचनीय, चिंतनीय अशीच राहिलेली आहे. त्यांच्यावरती विविध मानवनिर्मित, धार्मिक बंधने लादून सर्वच क्षेत्रातील अधिकारांपासून वंचित ठेवले गेले.
इंग्रजांच्या भारत प्रवेशाने एतद्देशीय परिस्थितीत
लक्षणीय बदल घडून येऊ लागला. पाश्चिमात्य विचारप्रणाली, शिक्षणप्रसार, स्त्री-पुरुष समानतेची वागणूक याद्वारे भारतातही
आधुनिकतेचे वारे वाहू लागले. त्यातूनच भारतीयांना
विवेकवादी, मानवतावादी आणि
पुरोगामी विचारांची, मूल्यांची ओळख झाली. पुरुषांपुरतेच काहीसे बंदिस्त असलेले शिक्षणाचे क्षेत्र
स्त्रियांनाही खुले झाले. सन १९४८ मध्ये महात्मा जोतिबा फुले
यांनी पुणे येथे सुरू केलेली पहिली मुलींची शाळा ही घटना स्त्रियांच्या जीवनाला कलाटणी देणारी क्रांतिकारी घटना ठरली.
त्यामुळे बहुजन समाजातील असंख्य स्त्रिया लिहू लागल्या, वाचू लागल्या. पर्यायाने शिक्षणाचा आस्वाद घेऊ लागल्या.
आसपास थोड्याफार फरकाने अशीच परिस्थिती असताना सत्यशोधक विचारांची शिदोरी पाठीशी असणाऱ्या ताराबाई
शिंदे यांनी लिहिलेला 'स्त्री-पुरुष तुलना'
हा ग्रंथ निबंध म्हणजे स्त्रीवादी इतिहासलेखनाचा उत्कृष्ट नमुना होय. सदर ग्रंथातील त्यांच्या विचारांबद्दलच आपण या घटकात चिंतन करणार आहोत.
जीवन परिचय:-
महाराष्ट्रातील वऱ्हाड प्रांतात बुलढाणा येथे सन
१८५० मध्ये ताराबाई शिंदे यांचा जन्म झाला. प्रतिष्ठित जमीनदार बापूजी हरी शिंदे हे त्यांचे वडील. वडील बापूजी शिंदे हे सत्यशोधक समाजाच्या विचार परंपरेचे पुरस्कर्ते होते.
त्यामुळे घरात सुरुवातीपासूनच स्त्री-पुरुष समानतेचे वातावरण होते. महात्मा जोतिबांचे पाईक असलेल्या बापूजी शिंदे यांनी आपल्या अपत्यात, मुला-मुलींत कधी भेदाभेद केला नाही. अगदी मुलांप्रमाणेच ताराबाईंना घरात वागणूक मिळाली.
परिणामी, शाळेत जाण्याचे सद्भाग्य त्यांच्या वाट्यास आले. ताराबाई लहान असतानाच त्यांना आपल्या घराण्याकडून सत्यशोधक विचार, विज्ञानवाद, तर्कशास्त्रीय
दृष्टिकोण, समानता, न्यायप्रियता आदी गुणांचा वारसा मिळाला. शिक्षणामुळे वाचनाचा छंद लागलेल्या ताराबाईंचे
व्यक्तिमत्त्व अधिकच खुलत गेले, विकसित होत गेले. मराठी, इंग्रजी, उर्दू, संस्कृत अशा अनेक भाषा त्यांना अवगत होत्या, याची प्रचिती त्यांनी लिहिलेल्या निबंधांवरून येते. महात्मा जोतिबा फुले यांच्या पुरोगामी, सत्यशोधक विचारांचा स्पष्टपणे प्रभाव ताराबाईंच्या लिखाणावर
दिसून येतो. तत्कालीन समाजमान्यता
नसतानाही ताराबाईंना उत्कृष्टरित्या घोडेस्वारी अवगत होती. ताराबाईंना शेतीच्या कामात आवड होती तशी कोर्टाच्या कामातही त्या जातीनिशी
लक्ष घालत. एकोणिसाव्या शतकातील समाजमान्यतेचा विचार करता
स्त्रीने लग्नाविना जीवन व्यतीत करणे अशक्य
असल्याने, फारसे विवाहासाठी इच्छुक
नसताना वडिलांनी त्यांच्यासाठी घरजावई शोधला. मात्र अपेक्षित संसारसुख त्यांच्या वाट्याला आले नाही व उर्वरित आयुष्य
त्यांनी एकाकीपणे घालवले. सन १८८२ साली त्यांनी 'स्त्री-पुरुष तुलना' हा ग्रंथ लिहिला. पुढे सन १९१० मध्ये त्यांचा मृत्यू झाला.
स्त्री-पुरुष तुलना :-
महाराष्ट्रातील स्त्री समाजसुधारक ताराबाई शिंदे
यांनी स्त्रिया व पुरुष यांमध्ये साहसी कोण हे स्पष्ट करण्यासाठी 'स्त्री-पुरुष तुलना' हा ग्रंथ लिहिला. सदरचा ग्रंथ किंवा
निबंध म्हणजे बंडखोर स्त्रियांचे प्रतिनिधित्व
करणाऱ्या एका बुद्धिवादी स्त्रीने संबंध पुरुष वर्गाबरोबर केलेला संवादच होय.
या निबंधात त्यांनी शिक्षणाच्या अभावी स्त्रियांची होणारी कुचंबणा,
उच्चवर्गीयांनी विधवा पुनर्विवाहावर लादलेले
निर्बंध, परिणामी स्त्रियांच्या वाट्याला येणान्या हालअपेष्टा, स्त्रियांना मिळा रूढिगत
गौणत्व, सर्व वाईट गोष्टींचे मूळ स्त्रियांत पाहण्याची
पद्धत आणि स्त्रियांपेक्षा पुरुषांना दिलेले श्रेष्ठत्व आदी विषयांवर त्यांनी
कोरडे ओढले आहेत. यामध्ये ताराबाई
शिंदे यांनी व्यक्त केलेल्या वास्तववादी मतांमुळे स्त्री-पुरुष समानतेच्या संदर्भात संपूर्ण समाज साकल्याने विचार करू
लागला. या विचारप्रक्रियेतूनच
समाजाला एक नवी दिशा प्राप्त झाली. पुरुषप्रधान संस्कृतीच्या बुरख्याआड दडलेली विकृत पुरुष मानसिकता या
निबंधाच्या माध्यमातून त्यांनी समाजासमोर मांडली. सर्वाचन पुरुष तुलना' हा ग्रंथ म्हणजे स्त्रीवादी जाणिवेचा, स्त्रीमुक्तीचा पहिला आरि होता असे म्हटले तर फारसे वावगे ठरणार नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असतानादेखील या निबंधात व्यक्त केलेल्या
विचारांच्या माध्यमातून स्क्यिांभोवती नानाविध निर्बंधांचा आवळलेला पाश सैल
करण्यास त्यांनी हातभार लावला. स्त्रियांवरील अन्यायाच्या परिमार्जनासाठी त्यांनी उभारलेला साकारात् सामाजिक
परिवर्तनाच्या प्रक्रियेला अधिक गती देणारा ठरला.
स्त्री-पुरुष ग्रंथातील विचार :-
'स्त्री-पुरुष तुलना'
या निबंधाच्या प्रस्तावनेतच याच्या निर्मितीमागची पार्श्वभूमी स्पष्ट करताना ताराबाई शिंदे म्हणतात की, सृष्टिनिर्माता परमेश्वरानेच स्त्री व पुरुष यांची उत्पत्ती केली असताना सर्व दुर्गुण स्त्रियांच्याच ठिकाणी कसे? जे दुर्गुण, अवगुण स्त्रियांच्या ठायी वास करतात तेच दुर्गुण पुरुषांच्याही ठिकाणी असतात,
हे स्पष्ट करण्याच्या हेतूने या निबंधाची रचना केली.
हा ग्रंथ म्हणजे कोणतीही जात, कूळ यांस लक्ष्य न करता स्त्रियांप्रती असलेल्या अभिमानाने स्त्री-पुरुष यांत केलेली तुलना आहे.
पुनर्विवाह प्रथेस बंदी केवळ ब्राह्मण वर्गातच आहे
असे नाही, तर इतर सर्वच कुळात, जातीत एखाद्या रोगाप्रमाणे त्याची लागण झाली आहे.
त्यामुळे विधवा स्त्रियांच्या हालअपेष्टांची आपण
कल्पनादेखील करू शकत नाही. केवळ मनोनिग्रहाने
मनुष्यवस्तीत वास्तव्य करून स्त्री धर्मरक्षणाची अपेक्षा करता येत नाही. कारण मनाने व नेत्राने त्या दोषाला पात्र ठरतातच. स्त्रीने पतीच्या आज्ञेत राहून, पतीच्या दुष्कृत्यावर पांघरूण घालून त्याची सेवा करण्यातच स्त्रीधर्म
सामावलेला असेल तर पतीचे वर्तनही त्याला साजेसे असावे. स्त्रियांनी पतीला देव मानून त्याची भक्ती करण्याची अपेक्षा केली जाते, तसे नवऱ्यानेही पत्नीवर देवाप्रमाणे आपुलकीच्या भावनेतून त्यांची सुख-दुःखे जाणावीत, त्यांच्या दोषांकडे दुर्लक्ष करावे. अन्यथा दुर्गुणी पतीला देव समजून त्याच्याबरोबर भक्ताप्रमाणे कोण वर्तन करील.
ताराबाईंच्या मते, पुरुष स्वतःला धैर्यवान, महापराक्रमी, निधड्या छातीचे, अजिंक्य समजतात. अग्नी, वायू, वीज यावर विजय मिळवून या सर्वांना पुरुषाने स्वहितार्थ राबायला लावले. जर पुरुष एवढे पराक्रमी आहेत तर मग विधवांच्या लज्जारक्षणार्थ समाजाच्या
विरोधात जाऊन, त्यांच्या भाळी सौभाग्याचा टिळा लावून त्यांचे
भाग्य तुम्ही का बदलू शकत नाही. लहान मुलांच्या राजा-राणीच्या
खेळाप्रमाणे तुम्ही तुमचे शौर्य व पराक्रम फक्त घरातच
गाजवता. विधवा स्त्रियांवरील
अन्यायाच्या निवारणार्थ आपण तीस-पस्तीस वर्षांपासून मोठमोठ्या सभांतून केवळ भाषणेच देत आलात, प्रत्यक्ष कृती मात्र काही नाही. परिणामस्वरूप तुम्ही अजागल स्तनाप्रमाणे निर्जीव आहात.
परमेश्वराने आपल्या अपरंपार लीलेने,
विलक्षण, अगाध बुद्धिचातुर्याने नाना प्रकारच्या भौतिक वस्तूंची जगात भर घातली. त्यामध्ये धन व स्त्री हे सर्वांना आकर्षित करणारे दोन महत्त्वपूर्ण घटक आहेत. त्यातही स्त्री तर धनापेक्षाही प्राणाहून प्रिय असून लक्ष्मीपेक्षा सुखकारक
वाटते. एखाद्या ठिकाणी सर्व
भौतिक सुखे तुमच्या पायाशी लोळण घेत असताना, पुरुष स्त्रीशिवाय राहू शकत नाही. असे झाले तर ते ठिकाण स्मशानासारखे भासेल. पुरुष अगदी वेडा होऊन जाईल. अशा वेळी प्रत्यक्ष देव जरी आला तरी तुम्ही त्याला हाकलून लावाल यात तीळमात्र
शंका नाही. या साधर्म्याशी तुलना करता
पुरुष स्त्रीविरहित राहू शकत नाही तद्वतच स्त्रियाही पुरुषांशिवाय राहू शकत नाहीत.
जी पुरुषांची गत तीच स्त्रियांची. तेव्हा हा संसार तुम्ही एकटे चालवू शकत नाहीत.
पुरुष एखाद्या बलाढ्य शत्रूवर शस्त्राच्या
साहाय्याने विजय प्राप्त करील, त्यांना आपले गुलाम बनवील, वाघाला पकडून सापळ्यात टाकेल, सिंहावरती स्वार होईल मात्र अबला असलेल्या एका स्त्रीच्या नेत्रकटाक्षाने
त्याचे सारे शौर्य, वीरश्री गळून जाऊन
स्त्रीपुढे तो आपले सर्वस्व अर्पण करील. हातातील शस्त्राच्या साहाय्य कोणीही कोणास घायाळ करील यात आश्चर्य नाही. त्यात मोठा पुरुषार्थ नाही.
मात्र जे कोणी केवळ नेत्रकटाक्षाने दुसऱ्यास घायाळ
करील ते खरे पराक्रमी. तेव्हा तुम्हीच
विचार करा, पुरुष की स्त्री जास्त पराक्रमी ? अरे, जी तुमच्यावर अलोट, निस्सीम प्रेम करते, आपले सर्वस्व
तुम्हास अर्पण करते, तुमच्याच सुखात
स्वतःचे सुख पाहते अशा स्त्रीला तुम्ही नको नको ती दूषणे देऊन
तिचे कपट इच्छिता याची तुम्हांस लाज कशी वाटत नाही ?
जन्म-मरणाच्या फेऱ्यासंबंधी
ताराबाई शिंदे म्हणतात की, कोणी कधी मरावे हे
जगदीश्वराची मर्जी असल्याने पुरुषांनी काय देवाकडून दाखला आणला आहे की काय? किमान सावित्रीने आपल्या पतिप्रेमाखातर यमदरबारात जाऊन
पतिप्राणाची याचना तरी केली. परंतु एखाद्या पुरुषाने
आपल्या बायकोसाठी यमराजाच्या दरबारात काय त्या वाटेवरतीही गेल्याचे ऐकिवात नाही. त्या पुढे म्हणतात की, जसे पती निधनानंतर
स्त्रियांनी आपली तोंडे काळी करून एखाद्या अपराध्याप्रमाणे आपले उर्वरित आयुष्य कंठावे तसे पुरुषांनी पत्नी निधनानंतर दाढी-मिशा काढून, आपले तोंड काळे करून
जंगलात का राहू नये ? पत्नी निधनानंतर
लगेचच दुसरी बायको करण्याची मोकळीक तुम्हाला कोणत्या देवाने दिली?
सत्यवचनी ताराबाई पुरुष प्रवृत्तीवर प्रहार करताना
म्हणतात की, पतिराजाच्या निधनानंतर
बाईच्या हालास मर्यादा उरत नाही. तिच्यावर लग्नकार्यात, समारंभात जाण्यावर, सुवासिनींच्या हळदीकुंकूत सहभागी होण्यावर निर्बंध लादले जातात. का तर म्हणे ती विधवा आहे, तिचे तोंड पाहू नये, अपशकुन होतो. मात्र याचा कोणीही विचार करत नाही की, तिचा पती काय तिने मारला आहे का? की पतीला अगोदर मरण यावे असा काय तिने यमराजाकडे अर्ज केला होता का? अशा प्रश्नांची सरबत्ती करून ताराबाई सर्वांना अंतर्मुख करतात.
ताराबाई शिंदे स्त्री व पुरुष यांच्या स्वभावातील
फरक स्पष्ट करताना नमूद करतात की, जर पती, नवरा आजारी पडला तरी पत्नीच्या जीवाची घालमेल होते.
आजारपणात ती त्याची सर्व सुश्रूषा करते व त्याला
प्राणापेक्षाही जास्त जपते. मात्र एखाद्याची
बायको आजारी पडली तर पतिदेव तिची सुश्रूषा करणे तर राहि बाजूलाच, पण 'कधी मरेल हो ही. औषधे देऊन देऊन कंटाळा आलाय' असे म्हणून मोकळे होतात. निदान लज्जारक्षणासाठी तरी बायको अशी बोलणार नाही. ज्या मुलीला आईवडिलांनी कधी पाच बोटे लावली नाहीत तिला तुम्ही नको इतके मारता, तेव्हा तिला किती वेदना होत असतील. स्त्रिया या प्रेमाच्या, गोड शब्दांच्या भुकेलेल्या असतात. त्यांची फार काही अपेक्षा नसते.
तुम्ही तिच्याकडे पाहून एखादा प्रेमाचा नेत्रकटाक्ष
टाकला, चार प्रेमाचे शब्द बोलला तरी तिला स्वर्गसुखाचा
आनंद होतो. अधिक काम करण्यास उत्साह येतो. पै-पाहुण्यांत किंवा मित्रमंडळींत जर तुम्ही बायकोची
तारीफ केली तर जगात आपल्याइतके कोणीच भाग्यवान नाही असे तिला वाटते आणि तिचे अंतःकरण भरून येते. इतकी क्षुल्लक, फुटकळ अपेक्षा
असताना ती पूर्ण होत नसेल व तुम्ही तिला नाना प्रकारचे दोष देत असाल तर यापेक्षा
आणखी दुर्दैव कोणते असू शकते?
ताराबाई शिंदे पुढे म्हणतात की,
सर्व दुष्कृत्यांचे मूळ स्त्रियांत पाहिले जाते, मात्र जे अवगुण स्त्रियांत आहेत ते पुरुषांत नाहीत काय?
जसे स्त्रियांत अनेक दुर्गुण असतात तसे पुरुषांत
लबाडी, चोरी, व्यभिचार, खून, दरोडे, भ्रष्टाचार, दगाबाजी यांसारखे गुण नसतात काय? तुम्हीच स्त्रियांना शिक्षणाची दारे बंद केल्याने अनेक प्रकारचे संशय
त्यांच्या मनात येतात. शिक्षणाच्या अभावानेच त्यांच्याकडून अविचार, दुष्कृत्ये घडतात. मात्र तुम्ही पुरुष
ज्ञानी आहात, शहाणे, हुशार असतानाही सर्वच तुरुंगात पाय ठेवायलाही जागा नाही एवढी तर आपल्या
बांधवांची गर्दी असते. त्यातील पुरुषांच्या
सत्कृत्याचे वर्णन करावयाचे झाल्यास कोणी खोट्या नोटा छापल्या
म्हणून, कोणी लाच घेतली म्हणून, कोणी बलात्कार केला म्हणून, तर कोणी विषप्रयोग, राजद्रोह केला
म्हणून सरकारने मोठ्या इतमामाने आपली रवानगी या रंगमहाली केली आहे. असे कोणते अविचार स्त्रियांच्या हातून होतात ते दाखवा. ताराबाई शिंदे म्हणतात की, स्त्रियांच्या दुष्कृत्यांचे तुम्हीच धनी आहात. कारण धनाच्या लोभाने तुम्ही मुली सवतीवर देता, एखाद्या श्रीमंत पण वयस्कर व्यक्तीबरोबर लग्न करून देता यात दोष तो कुणाचा? आणि ऐन तारुण्यात वैधव्य आले की सती जाण्याची गळ घालता. जशी स्त्री पती निधनानंतर सती जाते तसे नवऱ्याने बायकोच्या
निधनानंतर 'सता' का जाऊ नये? सवतीवरती दिलेल्या
मुलीसंदर्भाने ताराबाई म्हणतात, जर तुमच्या पत्नीने परपुरुषाकडे पाहिले तरी तुम्हाला सहन होत नाही, मग तुम्ही तर तिच्या उरावर जिवंत शेगडी ठेवलेली तिला कशी सहन होईल. स्त्रियांना कपटी म्हणून संबोधले जाते मात्र यात
पुरुषांचा पहिला नंबर लागेल. कारण डोक्यावर जटा वाढवून, अंगाला भस्म फासून सर्वांची फसवणूक करणारे बुवा, साधू ,महंत पुरुषच असतात.
देवपणाचा आव आणणारे बुवा स्त्री व धनाचे लोभी असतात. हे महाशय काशीस जाऊन स्नान केल्याने पापांचा नाश होतो अशी भलावण करतात. मात्र त्यांच्या ठिकाणचा
अभिमान आणि पापवासना कधी कमी होत नाही.
या निबंधाच्या समारोपाकडे जाताना ताराबाई शिंदे
म्हणतात की, जशी स्त्री तुमच्यासाठी सर्व
काही सहन करून दुःख भोगते तसे तुम्ही भोगाल का? स्त्रियांसारखा परोपकार, दया पुरुषांना कधीही जमणार नाही. स्त्रियांची प्रीती जर एखाद्यावर जडली तर ती आयुष्यभर कायम राहते. पुरुष मात्र फुलपाखराप्रमाणे या फुलावरून त्या फुलावर सतत उड्या मारत फिरतात. स्त्रियांमुळे अनेक अनर्थ घडतात असा जो आरोप केला जातो त्याचे खंडन करताना
ताराबाई म्हणतात, तुम्ही पद, प्रतिष्ठा, मानमरातब याकरिता एकमेकांचे प्राण
घेता, हेदेखील स्त्रियांमुळेच होते
का ?
'स्त्री-पुरुष तुलना'
या निबंधाचा शेवट करताना ताराबाई म्हणतात की, मुळातच स्त्रीजाती ही नाजूक आहे. तिच्यासाठीच अनेक भौतिक वस्तूंची निर्मिती करण्यात आली. एखाद्यास अर्धांगवायू झाला तर तो एका हाताने काही करू शकत नाही तद्वतच पुरुष स्त्रियांविना अंतिम साध्य प्राप्त करू शकत नाही. म्हणूनच असे म्हटले जाते की, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठी एका स्त्रीचा हात असतो.
या अर्थाने स्त्री ही पुरुषाची अर्धांगिनी आहे. ही सर्व सृष्ट,
हे विश्व या आदिमाया महाशक्तीपासून उत्पन्न झाले आहे. पुरुषाने फक्त संसाराचा गाडा भरावा तर स्त्रीने तो व्यवस्थित चालवावा.
म्हणून स्त्री ही प्रतिशक्तीच आहे. तिच्यावाचून पुरुषाला काहीच अर्थ उरत नाही. तिचे ज्या ज्या ठिकाणी अस्तित्व असेल तेथील साधी झोपडीही शोभिवंत मंदिरात परावर्तित होईल.
म्हणून स्त्रियांचा गौरव लक्ष्मी असा केला जातो. परमेश्वराने तुम्हालाही काही शिंगे, घोड्यासारखे चार पाय व गती दिलेली नाही.
फक्त बुद्धी देऊन इतर प्राणिमात्रांत श्रेष्ठ बनवले आहे. तेव्हा तुम्हीही या श्रेष्ठत्वाच्या पदाला शोभेल असेच वर्तन करावे. त्यासाठी प्रथम सर्वांशी सदाचरणाने वागा म्हणजे सर्व सुखाचा प्रत्यय येईल. सगळीकडे आनंदी-आनंद होईल. त्यामुळे प्रत्येक घरात निष्कलंक पातिव्रत्याचे निशाण उंचच उंच फडकत राहील. स्त्रिया जरी अशिक्षित,
अज्ञानी, निर्बल असल्या तरी आपण आपल्या दृढ निश्चयाने,
सदाचरणाने, निर्मळ मनाने स्त्रियांना अंकित करावे या विपरीत स्त्रियांच्या लक्ष्मी नावास शोभेल असे दुसरे भूषण नाही असे विचार व्यक्त करून शेवटी त्या जगनियंत्या परमेश्वराची यासाठी प्रार्थना करतात.
प्रकरण - 2 महिला सुधारक : (क)- पंडिता रमाबाई (इ.स. 1858 - 1922)
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात
स्त्रियांच्या विशेषतः परित्यक्ता, पतिता व विधवांच्या सर्वांगीण उद्धारासाठी समर्पित भावनेने कार्यरत राहिलेल्या महाराष्ट्रातील थोर विदुषी म्हणजे पंडिता रमाबाई होत. आपण स्वीकारलेल्या कार्यात अनंत अडचणी आल्या, अनेकांनी कठोर टीका केली. तरी आपल्या अंगीकृत कार्याशी त्या अविचल राहिल्या.
त्यामुळेच महाराष्ट्रा एक विद्वान व कर्तबगार समाजसुधारक म्हणून त्या ओळखल्या जातात.
पंडिता रमाबाईंचा जन्म एका विद्वान चित्पावन कुटुंबात झाला. त्यांचे वडील अनंतशास्त्री डोंगरे हे मंगळूर जिल्ह्यातील माळहेरंजी या गावचे रहिवाशी होते. त्यांनी पुणे येथील श्री. रामचंद्रपंत साठे यांच्याजवळ संस्कृतचे अध्ययन केले.
विविध शास्त्रे, तत्त्वज्ञान व संस्कृत वाङ्मय यामध्ये त्यांनी प्रावीण्य मिळविले. अनंतशास्त्री हे त्या काळी स्त्रियांच्या बाबतीत पुरोगामी विचारांचे होते. स्त्रियांना शिक्षण द्यावे असे त्यांचे मत होते. त्यांनी आपल्या पत्नीलाही संस्कृत शिकविले. त्यासाठी समाजाचा रोषही सहन
केला. त्यामुळे पत्नीसह काशी यात्रेचा त्यांनी निर्णय
घेतला. वाटेतच त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यानंतर काशी येथेच काही काळ वास्तव्य करून त्यांनी शास्त्राभ्यास पूर्ण केला. विविध शास्त्रांत प्रावीण्य मिळवून आपल्या गुरूच्या आशीर्वादानंतर ते तीर्थयात्रेसाठी पुन्हा बाहेर पडले. तीर्थयात्रा करीत ते पैठणला आले. पैठण येथे असताना वाईचे श्री. माधवराव अभ्यंकर या गृहस्थाशी त्यांची भेट झाली. परिचयानंतर अनंतशास्त्री यांची विद्वत्ता व व्यक्तिमत्त्व पाहून अभ्यंकरांनी
आपली नऊ वर्षांची कन्या अंबाबाई हिचा अनंतशास्त्री
यांच्याबरोबर विवाह करवून दिला. विवाहानंतर ते माळहेरंजीला
परत आले. तथापि, लोकटीकेमुळे त्यांनी माळहेरंजीजवळ अरण्यात असलेल्या गंगामूळ येथे वास्तव्य
केले. तेथील आश्रमात त्यांच्याकडे विद्यार्थी शिक्षण
घेण्यासाठी येत असत. येथेच पंडिता रमाबाई यांचा जन्म झाला. अनंतशास्त्री यांनी
विद्यार्थ्यांप्रमाणेच आपली पत्नी अंबाबाई व मुलगी रमा यांना संस्कृतचे शिक्षण
दिले. अंबाबाई ऊर्फ लक्ष्मीबाई यांनी विविध विषयांचे
ज्ञान आत्मसात केले. स्त्रियांना
वेदार्दीचे शिक्षण देणे व कन्या रमा नऊ वर्षांची झाली असतानाही तिचे लग्न न केल्याबद्दल ज्ञातीबांधवांनी अनंतशास्त्रींना वाळीत टाकले.
तथापि, अनंतशास्त्री आपल्या ध्येयापासून दूर गेले नाहीत. समाजाच्या या जाचास कंटाळून अनंतशास्त्री आपल्या मुलांसह तीर्थयात्रेला पायी
निघाले.
या काळात अनंतशास्त्रींगी आपली कन्या रमाबाई व पुत्र श्रीनिवास यांना संस्कृत भाषा व विविध शास्त्रांचे शिक्षण दिले,
प्रदीर्घ काळ चाललेल्या या तीर्थयात्रेच्या काळात रमाबाईने आपल्या मातेकडून संस्कृत व्याकरण, रामायण,
महाभारत, पुराणग्रंथ इत्यादींचे ज्ञान आत्मसात केले.
वैदिक वाङ्मय व इतर धर्मशार साहित्य यावर या काळात रमाबाईने प्रावीण्य मिळविले.
सन १८७४-७५ च्या दरम्यान भारतातील भयंकर दुष्काळामुळे रमाबाईंचे वडील अनंतशास्त्री मरण पावले. त्या मागोमागच त्यांच्या मातोश्रींचेही निधन झाले. रमाबाई व श्रीनिवास एकाकी पडले.
विद्वत्तेला मान्यता
:
मातापित्याच्या मृत्यूमुळे रमाबाई व श्रीनिवास निराधार बनले.
तथापि, त्यांनी आपल्या पित्याने चालू केलेली तीर्थयात्रा कायम टिकविली. निरनिराळ्या गावांना भेटी द्याव्या, पुराण, कीर्तन, कथा सांगाव्यात व त्यात मिळणाऱ्या वस्तूंवर चरितार्थ चालवावा लागे. श्रीनिवास काही वेळा कामही करीत असे. सहा वर्षे त्यांनी ही तीर्थयात्रा
केली. तथापि, एका स्त्रीने मिळविलेल्या विद्वत्तेची दखल घेतली गेली नाही. तीर्थयात्रा करीत ही दोघे कलकत्त्याला पोहोचली. कलकत्त्याला मात्र रमाबाईंच्या विद्वत्तेचा, बुद्धिमत्तेचा उचित गौरव झाला. विद्वान पंडित, समाज सुधारक
इत्यादींच्या सिनेट हॉलमधील सभेत त्यांना 'पंडित व सरस्वती' या पदव्या बहाल
करण्यात आल्या. या सभेत त्यांच्या
उत्स्फूर्त संस्कृत काव्यनिर्मितीचीही श्रोत्यांना जाणीव झाली. पंडिता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील त्या एकमेव महिला होत.. कलकत्ता येथेच बंगाली स्त्रियांनीही त्यांना 'भारतवर्षीय स्त्रियांचे भूषण' म्हणून मानपत्र दिले. पंडिता रमाबाई
यांच्या विद्वत्तेची कीर्ती संपूर्ण देशभर पसरली.
कलकत्ता येथे असतानाच त्यांचा केशवचंद्र सेन यांच्याबरोबर परिचय झाला.
हिंदू धर्माविषयी त्यांच्या मनात काहूर उठण्यास सुरुवात झाली.
त्यापूर्वीही हिंदू धर्म व देवदेवतांविषयी त्या साशंक झाल्या होत्याच. कलकत्त्यात ठिकठिकाणी त्यांची व्याख्याने, सत्कार होत असतानाच त्यांचे बंधू श्रीनिवास यांचा मृत्यू झाला.
पुन्हा त्या एकाकी व निराधार बनल्या.
तथापि, कोणत्याही प्रसंगाला समर्थपणे सामोरे जाण्याचा त्यांचा धीरोदात्त स्वभाव त्यांना उपयोगी ठरला.
कलकत्त्यात असतानाच त्यांना बाबू बिपीनबिहारीदास मेघावी या शूद्र जातीतील पदवीधर व पुरोगामी विचारांच्या वकिलाने लग्नाची मागणी घातल्यावर पंडिता रमाबाईने त्यांच्याबरोबर विवाह केला.
या विवाहामुळे रमाबाईंविरुद्ध वादळ उठले. हा प्रतिलोम विवाह असल्याने समाजातील काही परंपरावादी व प्रतिगामी गटाने त्यांच्यावर बहिष्कार टाकावा असेही आवाहन केले. या विवाहातून त्यांना एक कन्या झाली. तिचे नाव मनोरमा ठेवण्यात आले. तथापि, रमाबाईला वैवाहिक जीवनाचा फार काळ उपभोग घेता आला नाही.
थोड्याच काळात सन १८८२ मध्ये अल्पशा आजारात बिपीनबिहारीदास यांचे निधन झाले. रमाबाईला पुन्हा एकाकी जीवन व्यतीत करणे भाग पडले. तथापि,
या वेळी त्यांच्याबरोबर लहानशी मनोरमाही होती.
आर्य महिला समाज :
भारतातील निरनिराळ्या प्रांतांतून तीर्थयात्रा करीत असताना रमाबाईंनी येथील स्त्रियांचे दयनीय जीवन पाहिले होते,
त्याचा अनुभव घेतला होता.
त्यामुळेच या स्त्रियांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कार्य करण्याचे त्यांनी ठरविले. मनोरमासह त्या पुण्यात आल्या.
पुण्यापर्यंत त्यांच्या विद्वत्तेची, धाडसाची कीर्ती पसरली होतीच. त्यांच्या विद्वत्तेनी न्या. महादेव गोविंद रानडे, डॉ. रामकृष्ण भांडारकर, वामन आबाजी मोडक
यांसारख्या महनीय व्यक्तींना प्रभावित केले होते. त्यांच्या सहकार्यानेच स्त्रियांच्या उद्धारासाठी पुणे येथे 'आर्य महिला समाजाची स्थापना केली. त्यानंतर अहमदनगर, सोलापूर, ठाणे, मुंबई, पंढरपूर, बार्शी इत्यादी ठिकाणी त्यांनी 'आर्य महिला समाजाची स्थापना केली. बालविवाह, पुनर्विवाहाला बंदी, शिक्षण घेण्यास बंदी यांसारख्या चालीरीती व अयोग्य रूढी व परंपरांमधून समाजाला
प्रामुख्याने स्त्रियांना मुक्त करण्याच्या दृष्टीने त्यांनी कार्य
सुरू केले. भारतातील स्त्रियांची स्थिती
व त्यातील बदलाच्या जाणिवेनी त्यांनी 'स्त्रीधर्मनीति' हे पुस्तक लिहिले. सन १८८३ मध्ये ब्रिटिशांनी शिक्षणविषयक धोरणाविषयी
नेमलेल्या हंटर आयोगासमोर त्यांनी साक्ष दिली. त्यांच्या विचारांनी प्रभावित झालेल्या हंटरने या साक्षीचे
इंग्रजीत भाषांतर करून घेतले.
इंग्लंड व अमेरिकेचा प्रवास:-
आपण स्वीकारलेले स्त्रीजीवन सुधारणेचे कार्य अतिशय प्रभावीपणे करता येण्यासाठी इंग्रजी व वैद्यक या विषयांचे परिपूर्ण ज्ञान असणे रमाबाईंना आवश्यक वाटू लागले.
मद्रास येथील स्त्रियांसाठी असलेल्या वैद्यक महाविद्यालयात आपली ही गरज भागणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी या शिक्षणासाठी इंग्लंडला जाण्याचा निर्णय घेतला. स्त्रीधर्मनीती या आपल्या पुस्तकाच्या विक्रीतून त्यांनी आपल्या व मनोरमाच्या प्रवासखर्चासाठी त्यांनी पैसे जमविले.
इंग्लंडमध्ये बॉटिज गावच्या सेंट मेरी या मठात त्या राहिल्या, शिक्षण घेतानाच्या काळात येशू ख्रिस्ताच्या पतित स्त्रियांविषयीच्या दृष्टिकोणामुळे व भूतदया व प्रेमाच्या शिकवणुकीमुळे त्या ख्रिश्चन धर्माकडे आकर्षित झाल्या. अखेर २९ सप्टेंबर, १८८३ रोजी बॉटिज येथील चर्चमध्ये त्यांनी ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला.
६ मार्च, १८८६ रोजी भारतातून अमेरिकेत शिक्षणासाठी गेलेल्या आनंदीबाई जोशी यांच्या पदवीदान समारंभास उपस्थित राहण्यासाठी तेथील प्राचार्य व आनंदीबाईंच्या आग्रहावरून त्या अमेरिकेला गेल्या.
अमेरिकेत असताना हिंदुस्थानातील बालविधवांना उपयुक्त ठरणारी
'बालोद्यान शिक्षणपद्धती' त्यांनी शिकून घेतली.
अमेरिकेतील आपल्या वास्तव्यात हिंदू बालविधवांच्या प्रश्नांचा ऊहापोह करणारे
'द हायकास्ट हिंदू वुमन'
हे इंग्रजी पुस्तक त्यांनी लिहिले. त्यांनी
'युनायटेड स्टेटस्ची लोकस्थिती व प्रवासवृत्त' हे पुस्तकही प्रसिद्ध केले.
भारताप्रमाणे इंग्लंड व अमेरिकेतही त्यांच्या विद्वत्तेची कीर्ती पसरली.
हिंदुस्थानात रमाबाईंच्या बालविधवांच्या कार्यात
मदत करण्यासाठी अमेरिकन समाजाने बोस्टन येथे 'रमाबाई असोसिएशन' नावाची संस्था
स्थापन करून पुढील दहा वर्षे त्यांना मदत करण्याचे आश्वासन
दिले.
शारदा सदनची स्थापना:-
अमेरिकेच्या वास्तव्यात मिळालेल्या आर्थिक साहाय्य व रमाबाई असोसिएशनचे सहकार्याचे आश्वासन या आधारावर अमेरिकेतून भारतात परत येताच ११ मार्च, १८८९ रोजी त्यांनी मुंबई येथे बालविधवांसाठी 'शारदा सदन'ची स्थापना केली.
या सदनात निराश्रित विधवा व अनाथ स्त्रिया यांच्या राहण्या-जेवण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली होती. तसेच त्यांच्या शिक्षणाचीही सोय केलेली होती. बालविवाह,
केशवपन यांसारख्या अनिष्ट रूढींविरुद्ध निराळ्या व्याख्यानांतून विचार मांडण्यास त्यांनी सुरुवात केली. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात भाग घेण्यास त्यांनी सुरुवात केली. या अधिवेशनासाठी स्त्री प्रतिनिधित्वाचा त्यांनी पुरस्कार केला.
संमतिवयाच्या चळवळीला त्यांनी पाठिंबा दिला. १८९० मध्ये 'शारदा सदन' ही संस्था पुण्यात हलविण्यात आली.
पंडिता रमाबाई यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला असला तरी, स्त्रियांविषयीच्या त्यांच्या असामान्य कार्यामुळे पुण्यात प्रारंभी अनेक हिंदू नेत्यांनी त्यांना पाठिंबा दिला. न्या.
महादेव गोविंद रानडे, डॉ. भांडारकर, न्या.
तेलंग यांसारख्या व्यक्तींचा शारदा सदनाच्या सल्लागार मंडळात समावेश होता. शारदा सदनमध्ये येणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढत होती.
स्त्रियांना शिक्षण दिले जात असे. तसेच प्रत्येक मुलीला येथे धार्मिक स्वातंत्र्य होते.
तथापि, थोड्या काळात या संस्थेविषयी गैरसमज निर्माण झाले.
ही ख्रिश्चन धर्माची संस्था असून संस्थेतील मुलींना ख्रिश्चन धर्माचे शिक्षण दिले जात होते अशी प्रसिद्धी होण्यास सुरुवात झाली.
वृत्तपत्रांमधून टीका होऊ लागली.
न्या. रानडे,
डॉ. भांडारकर यांनी संस्थेबरोबरचे संबंध तोडून टाकले. पंडिता रमाबाईंनी या टीकेला समर्थपणे उत्तरे देण्याचाही प्रयत्न केला.
अखेर त्यांनी
'शारदा सदन' ही संस्था पुण्याहून केडगाव येथे हलविली.
केडगावचे मुक्तिसदन व दुष्काळातील कार्य:-
पुणे येथे गैरसमजुतीने झालेल्या टीकेला कंटाळून त्यांनी १८९८ मध्ये केडगाव (जि. पुणे) येथे मुक्तिसदनाची स्थापना केली. शारदा सदनाप्रमाणे मुक्तिसदनातही अनाथ मुली व स्त्रिया यांच्या राहण्याची,
जेवणाची व शिक्षणाची सोय केलेली होती.
सन १८९९ व १९७० मध्ये गुजरात व महाराष्ट्रात पडलेल्या भीषण दुष्काळाच्या वेळी
निरनिराळ्या ठिकाणी फिरून निराधार झालेल्या, उपासमारीने मरणासन्न झालेल्या स्त्रियांना त्यांनी आश्रय दिला.
त्यानंतर पंडिता रमाबाई पुन्हा अमेरिकेत जाऊन आल्या. भारतात परत आल्यानंतर आपल्या मुक्तिसदनाचे क्षेत्र वाढविण्यास त्यांनी सुरुवात
केली. 'मुक्तिसदनात' निराश्रित विधवा स्त्रियांसाठी 'कृपासदन', 'प्रीतीसदन', 'शारदा सदन' इत्यादी सदनांमध्ये
निरनिराळ्या गटांच्या स्त्रिया राहत असत. आश्रमात आलेल्या स्त्रियांना शारीरिक श्रमाचे महत्त्व पटावे, त्यांना स्वतःच्या पायावर उभा राहता यावे म्हणून या स्त्रियांना शेती, विणकाम, मुद्रणकाम इत्यादींचे शिक्षण दिले जात होते. मुक्तिसदनात स्त्रियांसाठी एक रुग्णालयही होते. वृद्ध व आजारी स्त्रियांची व्यवस्था 'सायं घरकुल'मध्ये केलेली होती.
अनाथ स्त्रियांचा उद्धार हेच पंडिता रमाबाई यांनी आपले जीवित कार्य मानले होते. त्यासाठी निरनिराळ्या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी कार्य केले.
त्या कार्यावर होणाऱ्या टीकेलाही समर्थपणे तोंड दिले. पंडिता रमाबाई विद्वान असून त्यांना मराठी, कन्नड,
गुजराती, बंगाली,
हिंदी, संस्कृत,
इंग्रजी, तुळू व हिब्रू एवढ्या भाषांचे ज्ञान असून त्यांनी निराधार स्त्रियांच्या जीवनावर विविध ग्रंथ लिहिले. बायबलचे मराठी भाषांतर केले. त्यांच्या विद्वत्तेची कीर्ती भारतातील सर्व प्रांतांबरोबरच इंग्लंड व अमेरिकेतही पसरली होती.
अत्यंत बुद्धिमान असलेल्या या स्त्रीचे अंतःकरण उदार व दीनदुबळ्या, निराधार स्त्रियांविषयी तळमळणारे होते. त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला पण हिंदू समाज व संस्कृती त्यांनी सोडली नाही. त्या शाकाहारी होत्या.
सदैव खादीचा वापर करीत व आश्रमवासीय स्त्रियांनाही खादी वापरावयास लावीत.
अनाथ स्त्रियांकरिता अविरत कष्ट करणाऱ्या या समाजसेविकेचे व्यक्तिगत जीवन दुःखमय होते. शेवटच्या काळात त्यांची एकुलती एक कन्या मनोरमा मिरज येथे मरण पावली व लवकरच केडगाव येथे पंडिता रमाबाईंचेही निधन झाले.
निराधार स्त्रियांची सेवा हे त्यांचे समर्पित जीवनाचे ध्येय होते. १९१९ साली त्यांच्या कार्याबद्दल त्यांना कैसर-ई हिंद' ही पदवी व सुवर्णपदक मिळाले.
पंडिता रमाबाई कार्यशील समाजसुधारक होत्या. आपल्या कार्याने समाजाचा विकास घडवून आणणाऱ्या व स्त्रियांच्या सुधारणेसाठी अवरित परिश्रम करणाऱ्या समाज सुधारकांच्या मालिकेत पंडिता रमाबाईंचे कार्य वैशिष्ट्यपूर्ण मानले जाते.
स्वाध्याय: सरावासाठी सोबत दिलेली प्रश्नपत्रिका सोडवा. त्यासाठी खाली दिलेली लिंक कॉपी करून गुगलमध्ये पेस्ट करा.
https://forms.gle/imdkKB9jTZMtqiHD6
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.