बी.ए. भाग -
1
समाजशास्त्र पेपर 2
उपयोजित समाजशास्त्र
प्रकरण- 3
*आधुनिक भारतातील सामाजिक परिवर्तन*
*आधुनिकीकरणाची कारणे*
आधुनिकीकरण केवळ कोणत्या एकाच कारणामुळे घडून येत नसून अनेक घटकांच्या
प्रभावातून आधुनिकीकरण उदयास येते.
मिरॉर विनर यांनी आधुनिकीकरणाच्या अशा पाच
प्रमुख घटकांचा अथवा कारणांचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये शिक्षण, जनसंज्ञापन, राष्ट्रवादी विचारसरणी, वैभूतिक नेतृत्व आणि निग्रहात्मक शासकीय सत्ता यांचा समावेश
होतो.
१.शिक्षण (Education) :
विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील
उच्च शिक्षणापर्यंत असलेल्या शिक्षणामुळे आधुनिकीकरण घडून येते. शिक्षणातून कौशल्य आणि विशिष्ट दृष्टिकोणाची
निर्मिती होते. राष्ट्रीय निष्ठा निर्माण
होते. ज्ञान समृद्धीवरच राष्ट्राचा
विकास अवलंबून असतो. लोकांचे ज्ञान, कौशल्य, त्यांचा दृष्टिकोण, त्यांच्या आशा-आकांक्षा हे सर्व शिक्षणाशी निगडित असते. त्यामुळेच एडवर्ड शिल्स यांनी आधुनिकीकरणाला शिक्षणाचा महत्त्वाचा घटक मानला
आहे.
२. जनसंज्ञापन (Mass Communication) : आधुनिकीकरणाची संकल्पना प्रामुख्याने जनसंज्ञापनावर अवलंबून असते. जनसंपर्काची माध्यमे म्हणजे वर्तमानपत्र, नियतकालिक,
रेडिओ, दूरदर्शन, चित्रपट, संगणक, इंटरनेट, टेलिफोन इत्यादींमुळे आधुनिक विचारसरणीचा वेगाने प्रसार करणे शक्य झाले आहे. जनसंज्ञापन हे एक असे माध्यम असते की, ज्यामधून आवश्यक ती माहिती किंवा ज्ञान आणि
दृष्टिकोण जलद गतीने घेऊन जाता येते. परंतु त्यामध्ये शासनाचे एकतर्फी
नियंत्रण असू नये.
कारण त्यातून
एकतर्फी संदेश जाण्याचाच
धोका असतो. त्यासाठी लोकशाही शासन व्यवस्था अधिक चांगली असू
शकते.
३. राष्ट्रवादी विचारसरणी (Ideology based on
Nationalism) :
राष्ट्रवाद आणि लोकशाही यांचा आधुनिकीकरणाशी परस्परसंबंध असतो. राष्ट्रीय जागृतता आणि राजकीय विचारातील सामंजस्य यांच्याशी राष्ट्रवादाचा संबंध असतो, जो समाज किंवा राष्ट्र विविधतेवर आधारित असते अशा
ठिकाणी राष्ट्रवादी विचारांची आवश्यकता असते. लोकशाही व्यवस्था राष्ट्रवादाची जाणीव वृद्धिंगत करण्यास उपयोगी ठरते. लोकांच्या दृष्टिकोणात परिवर्तन घडवून आणण्यास, नवीन मूल्ये रुजविण्यात लोकशाही व्यवस्था तसेच
राष्ट्रीयत्वाची विचारसरणी अधिक पूरक ठरू शकते व त्यातूनच आधुनिकीकरणाला
प्रोत्साहन मिळते.
४. वैभूतिक / दैवीगुणाधिष्ठित नेतृत्व (Charismatic
Leadership ) :
समाजातील दैवीगुणाधिष्ठित नेतृत्व
असणाऱ्या व्यक्तीच्या माध्यमातून लोकांना, आधुनिक मूल्ये, श्रद्धा आणि वर्तन पद्धतीचे
ज्ञान देता येते. परंतु अशा नेतृत्वाकडून काही
वेळा गैरवापर होण्याचा आणि लोकांची दिशाभूल होण्याची शक्यतादेखील असते. अशा प्रकारच्या एकूण प्रक्रियेत नेतृत्व करणारी व्यक्ती केवळ व्यक्तिगत
स्वार्थापोटी आणि मोठेपणासाठी आधुनिक मूल्ये, श्रद्धांचा उपयोग करू लागली तर राष्ट्राचा विकास होऊ शकणार नाही. त्यासाठी असे नेतृत्व व लोकशाही यात परस्परपूरकता
असणे गरजेचे आहे.
५. निग्रहात्मक शासकीय सत्ता (Coercive
Governmental Authority) :
लोकांनी आधुनिक मूल्ये आणि जीवनविषयक दृष्टिकोण आत्मसात करण्यासाठी स्थिर आणि
बळकट सरकार असणे आवश्यक आहे.
शासन त्या ठिकाणच्या
व्यक्तींना अशी मूल्ये स्वीकारणेबाबत आदेश देऊ शकते. केंद्रस्थानी असे सरकार असेल तर घटक सरकारवरही ते नियंत्रण
प्रस्थापित करू शकते व त्याद्वारे आधुनिक विचारसरणीचा प्रसार करणे शक्य होते.
या व्यतिरिक्त नागरीकरण, औद्योगिकीकरण, सार्वत्रिक विधी व्यवस्था (कायदे व्यवस्था) या गोष्टीदेखील आधुनिकीकरणासाठी आवश्यक आहेत. त्याचप्रमाणे तर्कसंगत विचारसरणी, सकारात्मक दृष्टिकोण, गतिशील विचारसरणी (व्यावसायिक, आर्थिक व शैक्षणिक गतिशीलता) विकसित होणारी उत्पादन व्यवस्था, साक्षरता, जीवनाकडे पाहण्याचा बदलता दृष्टिकोण (दैववादीऐवजी शास्त्रीय विचारसरणीशी निगडित) या गोष्टीही आधुनिकीकरणाला तितक्याच जबाबदार आहेत.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.