(P. A.
Mokashi)
B.A.PART II
SEMESTER - 4
I.D.S.(H.S.R.M.)
PAPER - 2
प्रकरण -
3 सामाजिक सुधारक: लहुजी साळवे - विठ्ठल रामजी शिंदे - संत गाडगे महाराज
- अण्णाभाऊ साठे
ब -
विठ्ठल रामजी शिंदे
कर्मवीर शिंदे म्हणजे मानवी
मूल्यांची जोपासना करण्यासाठी अविरत प्रयत्न करणारे त्यागाचे व निष्ठेचे प्रतीक
होत. अज्ञानाच्या पूजेविरुद्ध
वैचारिक बंड पुकारून जुन्या धार्मिक अनिष्ट परंपरांचे जोखड फेकून देणारे ते सुधारक
होत. महर्षीनी स्वातंत्र्य, समता व बंधुत्व या तत्त्वांसाठी माणसातला माणूस जागा केला. मानवाने मानवावर समभावाने प्रेम करावे, तसा आचार सर्वत्र घडावा यासाठी आपले जीवन समर्पित
करणारे ते एक कर्मयोगी होते.
विद्वत्ता, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे संयम व सेवावृत्ती या
महान आदर्शाचे महामानव म्हणजे महर्षी शिंदे होत.
एक महान समाजसुधारक, अस्पृश्यता निवारणाचे खंदे पुरस्कर्ते, शेतकरी, बहुजन समाज यांच्या प्रति अपार कळवळा असणारे विचारवंत, निरनिराळ्या धर्मांतील तत्त्वांचे संशोधक आणि ध्येयवादी
विद्वान म्हणून महर्षीींना ओळखले जाते.
महर्षी वि. रा. शिंदे यांनी सामाजिक, राजकीय व संशोधनविषयक क्षेत्रांत अत्यंत
महत्त्वपूर्ण कामगिरी पार पाडली.
त्यांची अंगीकृत
कर्मावर अविचल श्रद्धा होती.
त्यांनी आध्यात्मिक, सामाजिक ध्येयासाठी अविरत मेहनत घेतली. मराठीतल्या उत्तम साहित्यिकांत व संशोधकांत त्यांची
गणना केली जाते. अस्पृश्यता निवारणाचे
त्यांचे कार्य व्यापक स्वरूपाचे आहे.
अस्पृश्यता
निवारण्याचा प्रश्न त्यांनी राष्ट्रीय पातळीवर नेला. एकषष्ठांश भारत हा अस्पृश्य आहे असे अभ्यासांती प्रतिपादन
करणारे ते •विचारवंत होत. सामाजिक सुधारणा आणि राष्ट्रीय चळवळ या दोन्ही
गोष्टी एकरूप असल्याचे त्यांनी
प्रतिपादन केले.
अस्पृश्य व स्पृश्य असे
दोन्ही वर्ग एकमेकांत मिसळून जावेत या विचाराने त्यांनी आयुष्यभर कार्य केले. मराठा-मराठेतर असा भेद करणाऱ्यांना त्यांनी विरोध केला. स्त्री-पुरुष समानतेचा त्यांनी
पुरस्कार केला. संस्कृती, जात, प्रांत, पंथ, भाषा यांच्यातील भेदापेक्षा त्यांच्यातील एकात्मतेवर त्यांनी भर दिला. महाराष्ट्राच्या समाजसुधारकांत महर्षी वि. रा. शिंदे यांना वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे.
महर्षीनी 'द डिप्रेस्ड क्लास मिशन सोसायटी ऑफ इंडिया'ची स्थापना केली. स्त्रीदास्यविमोचन चळवळीला व्यापक स्वरूप दिले.
मुरळी, देवदासी या रूढींविरुद्ध बंड पुकारले. मुला-मुलींच्या सक्तीच्या शिक्षणासाठी त्यांनी अनेकांचा रोष सहन केला, 'हे विश्वची माझे घर' हा संत ज्ञानेश्वरांचा विचार महर्षीींनी व्यवहारात सिद्ध
केला. त्यांनी मनोमन विश्वधर्माचा
स्वीकार केला होता. त्यांनी उदारता, प्रेमळपणा, ईश्वरावरील श्रद्धा या
मूल्यांना जपले. महर्षीनी कोणावरही राग धरला
नाही. बहीण जनाक्काच्या
शिक्षणासाठी ते महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या आश्रमात आले व त्यांनी कवेंना
विनंती केली की, जनाक्काला महिला अनाथाश्रमात
प्रवेश देऊन तिच्या शिक्षणाची सोय व्हावी.
मात्र कवैनी 'अब्राह्मण मुलींना आमच्या आश्रमात ठेवून घेण्याचे
दिवस अजून आलेले नाहीत' अशा शब्दांत नकार दिला. महर्षीींना याचा विषाद वाटला, पण त्यांनी महर्षी कर्वेविषयी दुरावा निर्माण होऊ
दिला नाही.
महर्षी वि. रा. शिंदे यांच्यापुढे देवेंद्रनाथ टागोर, केशवचंद्र सेन यांचा आदर्श
होता. न्या. रानडे, न्या. भांडारकर, सर चंदावरकर हे महनीय 'प्रार्थना समाज' भागवत धर्मातूनच आला अशी परंपरा सांगतात, मानवतावाद, समर्पणशीलता, व्यावहारिकता या गोष्टींचा अंगीकार करून प्रार्थना
समाजाने आपली कार्यपद्धती व प्रचारतंत्र राबविले.
महर्षीनी 'माझ्या आठवणी आणि अनुभव' हे आत्मचरित्र तसेच रोजनिशी, अनेक लेख लिहून मोठे कार्य पार पाडले आहे.
जन्म, बालपण :-
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
यांचा जन्म कर्नाटक राज्यातील विजापूरच्या पश्चिमेस ३६ मैलांवर असणाऱ्या जमखंडी
गावी दि. २३ एप्रिल, १८७३ रोजी झाला. वडिलांचे नाव रामजी तर आईचे नाव यमुनाबाई होते. रामजीबाबा वारकरी होते. जमखंडीतील पटवर्धन संस्थानात ते कारंकुनी करत होते. शिक्षणाचे महत्त्व त्यांनी जाणले होते. घरामध्ये संत वाङ्मय व जुन्या पोथ्याचे वाचन होई. रामजीबाबा मराठी, कानडी भाषा सफाईदारपणे बोलत असत.
आई यमुनाबाई तर
सहनशीलता व आत्मसंतोषाचे मूर्तिमंद उदाहरण होते. महर्षी सांगतात, “यमुनाबाईंनी (आईने) फार सासुरवास सोसला. घरी मोठा राबता असायचा. बाळंतपण, मुलांचे आजार व मरण याने
यमुनाबाईंची शक्ती खचली तरीही निराशेचा एक उद्गारही त्या माउलीच्या तोंडातून बाहेर पडला नाही. आई हीच आम्हा लहानग्यांची खेळगडी होती. "
महर्षी वि. रा. शिंदे तथा अण्णासाहेबांचे घर सुखवस्तू होते. घरात अन्नधान्याची मुबलकता होती. भाजीपाला मुबलक होता. बाहेर गोठ्यामध्ये १५-२० जनावरे होती. घरी खाण्यापिण्याची ददात नव्हती. अनेक जण आगंतुकपणे येऊन जेवत असत. येणारी माणसं विविध जातिजमातींची असायची. स्पृश्य-अस्पृश्य, हिंदू मुसलमान असा भेदभाव नव्हता. सर्व काही आबादीआबाद होते.
अण्णासाहेब पाच-सहा वर्षांचे असताना त्यांचे आजोबा बसवंतराव (बसप्पा) वारले. यानंतरचा सन १८७९ ते १८८४ पर्यंतचा काळ अण्णासाहेबांच्या प्राथमिक शिक्षणात गेला. या काळात ते लिहिणे, वाचणे, हिशेब करणे, हस्तलिखिते वाचणे व मोडी अक्षरे शिकले. गणित व भाषा यामध्ये त्यांची प्रगती होती. कानडी भाषा तर त्यांनी आपल्या मातेकडून आत्मसात केली. मराठी चौथीनंतर हेडमास्तर विष्णु गवंडे यांनी अण्णासाहेबांस पाचव्या
इयत्तेत घातले. त्यांनी मराठी व्याकरण अवगत
केले. मोरोपंतांच्या आर्यांचा अर्थ
ते उत्कृष्ट प्रकारे सांगत असत.
यामुळे अण्णासाहेब
सर्वांचे लाडके झाले.
रामजी व यमुनाबाई या
दांपत्याला २० मुले झाली.
मात्र त्यातील पाचच
जगली. विठ्ठलाचे पाळण्यातील नाव तुकाराम होते. विठ्ठलाचे परमभक्त असणाऱ्या रामजींनी ते नाव बदलून
विठ्ठल असे ठेवले. तत्कालीन रीतिरिवाजाप्रमाणे
लहानग्या विठूचे लग्न.. मे, १८८२ च्या
सुमारास झाले. या वेळी त्याचा थोरला भाऊ परशुराम १४ वर्षांचा, विठू ९ वर्षांचा, धाकटी बहीण जनाक्का अवघी ४ वर्षांची होती.
या तिघांची लग्ने एकाच वेळी झाली. विठूची नवरी अवघ्या सहा महिन्यांची होती. लहानगी रुक्मिणी शिंदे घराण्यात आल्याने साक्षात 'विठ्ठल रुक्मिणी'चा जोडा निर्माण झाला.
यामुळे लग्नकार्य, वाढलेला खर्च, घरी दारिद्र्य आले. रामजी शिंदे बाबांनी आपला
वाडा गहाण ठेवून कर्ज काढले. शेते गेली. गुरेढोरे गेली, राहते घरदेखील गेले. दोन वेळेची चूल पेटण्याची मारामार झाली. अशा अडचणीच्या प्रसंगी बालूबाई नावाची एक स्त्री जी
अण्णासाहेबांच्या घरामध्ये पूर्वी मोलकरीण म्हणून काम करत होती ती संध्याकाळच्या
वेळी कोणी पाहणार नाही अशी दक्षता घेऊन आपल्या पदराआडून शिळ्या भाकरीचे तुकडे घेऊन येत असे. ती आल्यानंतर यमुनाबाई आपल्या मुलांना ते शिळ्या
भाकरीचे तुकडे ताकात, वरणात अगर सरळसरळ पाण्यात
भिजवून देत असे आणि ही लहान मुले ते तुकडे पंचपक्वान्न समजून खात असत. हृदय पिळवटणारे दारिद्र्य या कुटुंबीयांच्या वाट्याला आले
असले तरीही त्यांच्या घरातील शांती,
तृप्ती आणि प्रीती
या तिन्हीही गोष्टी कधीही ढळल्या नाहीत.
सन १८८५ ते १८९१ हा विठूचा
हायस्कूलमधील शिक्षणाचा कालखंड होय.
या काळात त्यांनी
इंग्रजी वाङ्मयावर प्रभुत्व निर्माण केले. संत वाङ्मयाचा अभ्यास केला. संस्कृत भाषेचा अभ्यास केला. शाळेमध्ये त्यांचा सातत्याने पहिला नंबर येत
असल्याने त्यांना दोन ते तीन रुपयांची स्कॉलरशिप मिळत होती. अण्णासाहेब लिहितात, “घरी तर भयंकर दारिद्र्य असे. माझ्या चिमुकल्या स्कॉलरशिपचीच मोठी मदत होत असे. त्या वेळी जमखंडीत एक रुपयाला १६ पायली धान्य आलेले मला आठवते.'
सन १८९१ मध्ये अण्णासाहेब
मॅट्रिकची परीक्षा जमखंडी हायस्कूलमधून पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यानंतर त्यांनी जमखंडी हायस्कूलमध्येच तीन महिने
शिक्षकाची नोकरी केली. दरम्यानच्या काळात आगरकरांचे
'सुधारक' वाचनात आल्याने त्यांचा कल सुधारणावादाकडे झुकू लागला. एक दिवस जमखंडीच्या श्रीमंत पटवर्धन सरकारांनी त्यांना बोलावून सांगितले, “तुम्हाला मुंबईस व्हेटरनरी
कॉ स्कॉलरशिप देऊन पाठवितो.
यावर अण्णासाहेबांनी
श्रीमंत पटवर्धन सरकारांना बाणेदारपणे उत्तर दिले की, "मला जनावरांचा डॉक्टर
व्हावयाचे नाही.
आर्टस् कॉलेजसाठी
स्कॉलरशिप दिल्यास मी जाण्यास तयार आहे" यामुळे अण्णासाहेबांची नोकरी सुटली. पुढील शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला.
सन १८९३ ते १८९८ या सहा
वर्षांच्या कालखंडात अण्णासाहेबांनी फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. आर्थिक अडचणीबाबत त्यांनी कॉलेजचे तत्कालीन प्राचार्य गो.
ग. आगरकर यांची भेट घेतली. पण फी माफी मिळाली नाही. कॉलेजचा राहणे व जेवणाचा खर्च भागेना. शेवटी डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व सेक्रेटरी श्री. गंगाराम भाऊ म्हसके यांना भेटून सर्व परिस्थिती कथन
केली. श्री. म्हसके यांनी संस्थेच्या माध्यमातून अण्णासाहेबांना
महिना दहा रुपये स्कॉलरशिप देऊ केली. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना अण्णासाहेब जॉन स्टुअर्ट मिल, हर्बर्ट स्पेन्सर यांच्या ग्रंथवाचनाने प्रभावित
झाले.
सन १८९५ च्या सुमारास
अण्णासाहेबांच्या बहिणीचा-शिकलेल्या जनाक्काचा सासरी छळ होत
असल्याने त्यांनी तिला माहेरी आणले व पुढे तिचा माहेरी आयुष्यभर सांभाळ केला. जनाक्काच्या शिक्षणाच्या अडचणी सोडविण्याच्या
संदर्भात अण्णासाहे महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या हिंगणे येथील शिक्षण संस्थेत
आले व जनाक्काचा शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागावा याबद्दल महर्षी कर्वेंना बोलले. यावर महर्षी कर्वे म्हणाले,
'अब्राह्मण मुलींना
आमच्या आश्रमात ठेवून घेण्याचे दिवस अजून आलेले नाहीत.' हे ऐकून अण्णासाहेब निराश
झाले. पण महर्षी कर्वेविषयी असणारे
प्रेम, जिव्हाळा जराही कमी झाला
नाही. अशा अडचणींवर मात करत अण्णासाहेबांनी पत्नी
रुक्मिणी व बहीण जनाक्का यांच्या शिक्षणाची व्यवस्था केली.
सन १८९५ मध्ये पुण्यात
संपन्न झालेल्या अखिल भारतीय राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात अण्णासाहेबांनी
स्वयंसेवक म्हणून काम केले.
अधिवेशनाच्या
एकंदरीत कार्यक्रमाने ते प्रभावित झाले. दरम्यानच्या काळात
अण्णासाहेबांचा आर्थिक ताण बाढलेला होता. कारण डेक्कन मराठा एज्युकेशन सोसायटीची स्कॉलरशिप बंद झाली. मात्र १८९६ मध्ये श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड (बडोदा) यांची दरमहा पंचवीस रुपये
स्कॉलरशिप मिळाली. अशा अत्यंत प्रतिकूल
परिस्थितीशी तोंड देत अण्णासाहेब सन १८९८ च्या बी. ए. परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्या वेळच्या विद्यापीठाच्या नियमाप्रमाणे ते पदवी
परीक्षेच्या कायद्याच्या पेपरमध्ये प्रथम क्रमांकाचे गुण मिळवून फर्स्ट एलएल.बी. ची परीक्षासुद्धा उत्तीर्ण झाले.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.