(J.D.Ingawale)
बी.कॉम भाग - २ अर्थशास्त्र सेमी.४.
समग्र / स्थूल अर्थशास्त्र १ चलनवाढ
अर्थ व व्याख्या (Meaning and Definition of Inflation)
१. प्रा. क्राऊथर : “पैशाचे मूल्य कमी होऊन किंमतपातळी वाढते अशी अवस्था म्हणजे चलनवाढ होय.
२. प्रा. पिगू : "जेव्हा पैशाच्या स्वरूपातील उत्पन्न प्रत्यक्ष अर्जित उत्पन्नापेक्षा जास्त वेगाने वाढते तेव्हा त्यास चलनवाढ म्हणतात."
3. जे. एम. केन्स : "पूर्ण रोजगाराच्या पातळीनंतरच्या किंमतवाढीस पूर्ण चलनवाढ असे म्हणतात.'
वरील सर्व अर्थशास्त्रज्ञांच्या व्याख्यांवरून चलनवाढीचा अर्थ स्पष्ट होतो. सर्व व्याख्यांमध्ये वस्तू व सेवा यांच्या किमती व पैशाची संख्या यांचा कार्यकारणसंबंध दर्शविण्यात आला आहे. थोडक्यात, “अर्थव्यवस्थेत वस्तू व सेवांच्या उत्पादनाच्या तुलनेने चलनाचा पुरवठा अधिक प्रमाणात वाढतो. तेव्हा त्याला चलनवाढ म्हणतात. चलनवाढ ही चलनविषयक घटना समजली जाते."
चलनवाढीचे आधुनिक अर्थशास्त्रज्ञांचे स्पष्टीकरण
आधुनिक काळात प्रत्येक देशाला चलनवाढीला तोंड द्यावे लागत असल्याने त्यांचे अधिक स्पष्टीकरण पाहणे आवश्यक आहे. जागतिक दोन महायुद्धानंतर जगातील बहुतांशी राष्ट्रांना भाववाढीने त्रस्त केले होते. जागतिक महामंदीच्या काळात चलनवाढ करूनही किंमतपातळीत वाढ झाली नाही. चलनवाढीचे मुख्य लक्षण जरी वाढत्या किमती असल्या तरी मूल्यवाढ म्हणजे चलनवाढ नव्हे. यासाठी वेगळा दृष्टिकोण मांडणे आवश्यक आहे. आधुनिक अर्थशास्त्रज्ञ जे. एम. केन्स, बेनहॅम, क्रौऊथर इत्यादींच्या मते अर्थव्यवस्थेत जेव्हा चैतन्याचे, उत्साहाचे वातावरण असते, तेव्हा सर्व उत्पादन घटकांना अधिक कामे करावीशी वाटतात. हे उत्साहपूर्ण वातावरण चलनवाढीचा आत्मा असतो. अशा वेळी किमती वाढल्या तरी नफा, रोजगार, व्यापार, उत्पादन वाढत असल्याने भाववाढीचा त्रास जाणवत नाही.
प्रा. जे. एम. केन्सने चलनवाढीचे केलेले स्पष्टीकरण व व्याख्या महत्त्वाची आहे. त्यांच्या मते, सर्वच परिस्थितीमध्ये चलनाच्या वाढत्या पुरवठ्यामुळे चलनवाढीची परिस्थिती निर्माण होत नाही. अपूर्ण रोजगाराच्या अवस्थेत होणारीकिंमतवाढ म्हणजे वास्तव भाववाढ नव्हे. कारण अपूर्ण रोजगारीच्या परिस्थितीमध्ये किमती वाढल्या तरी संयोजकांना मिळणारा नफा वाढतो. त्यामुळे गुंतवणूक वाढविली जाते. अर्थव्यवस्थेतील बेकार उत्पादक घटकांना काम मिळते, त्याचे उत्पन्न वाढते व रोजगारात वाढ होते. किमतीमधील ही वाढ पूर्ण रोजगार निर्माण करण्यास उपयुक्त ठरते. ही चलनवाढ अपूर्ण चलनवाढ किंवा सौम्य चलनवाढ असते. पण पूर्ण रोजगार अवस्था निर्माण झाल्यानंतर जर पैशाचा पुरवठा वाढला तर वास्तव चलनवाढ निर्माण होते. कारण पूर्ण रोजगाराची पातळी गाठल्यानंतर उत्पादन वाढविण्यास उत्पादन साधन उपलब्ध होत नाहीत. उत्पादन साधने मिळविण्यासाठी त्यांना अधिक वेतन द्यावे लागते. त्यामुळे उत्पादन खर्च वाढतो, अशा वेळी होणाऱ्या किंमतवाढीस वास्तव चलनवाढ असे म्हटले जाते.
चलनवाढीचे प्रकार (Types of Inflation)
चलनवाढ विविध कारणांनी होते म्हणून तिचे विविध प्रकारांत वर्गीकरण केले जाते. तिचे विविध प्रकार पाडले जातात. चलनवाढीचा वेग, सरकारी नियंत्रण, कालमान, व्याप्ती, चलनवाढीच्या प्रक्रिया इत्यादी घटकांवरून चलनवाढीचे पुढील प्रकार केले जातात.
(अ) चलनवाढीच्या वेगावरून चलनवाढीचे पुढील चार प्रकार केले जातात
. १. रांगती चलनवाढ (Creeping Inflation) : चलनवाढीमुळे हळूहळू सौम्य गतीने जेव्हा भाववाढ घडून येते तेव्हा तिला रांगती वा सरपटणारी चलनवाढ म्हटले जाते. या प्रकारची भाववाढ आर्थिक विकासाला पोषक असते.
२. चालती चलनवाढ (Walking Inflation) : रांगत्या चलनवाढीपेक्षा जेव्हा भाववाढ अधिक वेगाने होते तेव्हा त्यास चालती चलनवाढ असे म्हटले जाते. या प्रकारच्या चलनवाढीमधून जलद भाववाढ घडून येण्याची शक्यता असते
३.धावती चलनवाढ (Running Inflation) : चालत्या चलनवाढीपेक्षा किंमतवाढ जेव्हा अधिक वेगाने होते तेव्हा तिला धावती चलनवाढ म्हणतात. या प्रकारात भाववाढ वेगाने होते. साधारणतः वर्षभरात किमती दुपटीने वाढतात.
४. वेगवान वा अति तीव्र चलनवाढ (IHyper or Galloping Inflation) : या वेगवान चलनवाढीला घोडदौडी चलनवाढ असेही म्हणतात. सामान्यतः अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगार गाठल्यानंतर ही चलनवाढ अनुभवास येते. या चलनवाढीच्या काळात दर तासाला वस्तूंच्या किमती वाढतात. त्यावर सरकारचे नियंत्रण नसते. पहिल्या महायुद्धानंतर १९२३ मध्ये जर्मनीत वेगवान चलनवाढ घडून आली होती. जर्मन चलन मार्कची किंमत दर तासाला निम्म्याहून कमी होत होती, ऑस्ट्रिया, रशिया, पोलंड या देशांनाही असा अनुभव आला होता. हंगेरीमध्ये १९४६-४७ व चीनमध्ये १९४९ मध्ये असाच अनुभव आला होता. या प्रकारात चलनाचा पुरवठा अतिरिक्त झाल्याने चलनाचे मूल्य नाहीसे होते. ही चलनवाढ अत्यंत धोकादायक आहे. लोकांचा चलनावरील विश्वास नाहीसा होतो.
(ब) सरकारी नियंत्रणाच्या दृष्टीने चलनवाढीचे दोन प्रकार होतात.
१. दबलेली चलनवाढ (Supressed Inflation) : काही वेळा देशात चलनवाढ होते पण भाववाढ होत नाही. कारण सरकार वाढत्या किमतीवर, मागणी-पुरवठ्यावर नियंत्रणे घालते व भाववाढ दडपण्याचा प्रयत्न करते. नियंत्रित वाटप पद्धतीचा अवलंब केला जातो. सरकारी प्रयत्नाने ही चलनवाढ दबलेली असते. म्हणून तिला दबलेली चलनवाढ म्हणतात.
२. उघड चलनवाढ (Open Inflation) : चलनाचा पुरवठा मोठ्या प्रमाणात वाढल्यास उघडपणे घडून येणाऱ्या भाववाढीस उघड चलनवाढ म्हटले जाते. अशा वेळी सरकारकडून किमती अगर मागणी-पुरवठा यावर कोणतेही बंधन घातले जात नाही. किमतीमध्ये अनिर्बंधपणे वाढ होते.
(क) चलनवाढीने अर्थव्यवस्थेला कितपत व्यापले यावरून म्हणजे व्याप्तीवरून चलनवाढीचे पुढील दोन प्रकार पाडले जातात.
१. व्यापक चलनवाढ (Comprehensive Inflation) : अर्थव्यवस्थेच्या सर्वच क्षेत्रात आणि बहुसंख्य वस्तूंच्या किमतीमध्ये जेव्हा भाववाढ घडून येते तेव्हा तिला व्यापक चलनवाढ असे म्हणतात.
२. तुरळक किंवा क्षेत्रीय चलनवाढ (Sporadic Inflation) : अर्थव्यवस्थेत भाववाढ काही क्षेत्रांपुरतीच मर्यादित असते. कारण काही वस्तूंचा पुरवठा मर्यादितअसतो आणि तो सहजपणे वाढविणे शक्य नसते. उदा. मक्तेदारीमुळे काही वस्तूची रचाई अगर शेतीसारख्या क्षेत्रात निसर्गानि योग्य साथ न दिल्यास शेती वस्तूंची होणारी भाववाढ इत्यादी. अशा भाववाढीला तुरळक किंवा क्षेत्रीय चलनवाढ म्हटले जाते.
(ड) कालमानावर आधारित चलनवाढीचे पुढील तीन प्रकार पडतात.
१. युद्धकालीन चलनवाढ (War-time Inflation) : युद्धकाळात सरकारचा खर्च प्रचंड प्रमाणात वाढतो. कारण युद्ध जिंकणे व राष्ट्राच्या स्वातंत्र्याचे रक्षण करणे महत्त्वाचे असते. सरकारी खर्च म्हणजे लोकांचे उत्पन्न होय. त्यामुळे लोकांचे उत्पन्न बाढून त्यांची विविध वस्तूंची माणगी वाढते. तथापि युद्धकाळात उत्पादन साधनांचा वापर युद्धसाहित्याच्या निर्मितीसाठी केला जात असल्याने उपभोग्य वस्तूंचे उत्पादन घटते. अशा वेळी इतर देशांतून आयात करणे शक्य नसते. वस्तूंचा पुरवठा कमी होऊन भाववाढ होते. याला युद्धकालीन चलनवाढ म्हटले जाते.
२. युद्धोत्तर चलनवाढ (Post-war Inflation) : युद्धकाळात राष्ट्रातील व्यापार वाहतूक विस्कळीत झालेली असते. उद्योगधंदे उद्ध्वस्त झालेले असतात. अर्थव्यवस्थेची पुनर्रचना करण्यास प्रचंड खर्च लागतो व त्यासाठी वेळही लागतो. परंतु युद्धकालीन चलनवाढीने लोकांचे उत्पन्न वाढलेले असते. युद्धसमाप्तीने कराचे प्रमाण कमी होते, सार्वजनिक कर्ज परत केले जाते. त्यामुळे लोकांचे उत्पन्न वाढते. युद्धकाळात दाबून ठेवलेली मागणी जोरदारपणे वाढते. पण उत्पादनात ताबडतोब वाढ करणे शक्य नसल्याने भाववाढ होते. यासच युद्धोत्तर चलनवाढ म्हणतात.
३. शांतताकालीन चलनवाढ (Peace-time Inflation) : आधुनिक काळात कल्याणकारी राज्याच्या कल्पनेमुळे प्रत्येक देशातील सरकार समाजाच्या हितासाठी अनेक गोष्टींवर प्रचंड पैसा खर्च करते. विशेषतः अप्रगत देशात आर्थिक विकासासाठी नियोजनाचा अवलंब केला जातो. योजनांवर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च केलो जातो. योजनाकाळातील भांडवली वस्तूंच्या उत्पादनापासून उत्पादनात भर पडण्यासाठी बराच कालावधी जावा लागतो. दरम्यानच्या काळातील लोकांच्या हातातील पैसा वाढतो. त्यांची विविध वस्तू व सेवांची मागणी वाढते. पण उत्पादन वाढत नाही. त्यामुळे निर्माण होणाऱ्या भाववाढीला शांतताकालीन चलनवाढ असे म्हणतात.
(इ) चलनवाढीला प्रेरक कोणता घटक आहे, या प्रक्रियेवरून तीन प्रकार पाडले जातात.
१. वेतनप्रेरित चलनवाढ (Wage Induced Inflation) आधुनिक काळात कामगार संघटना बळकट असतात. संघटनेच्या बळावर त्या वेतनवाढ घडवून आणतात. प्रसंगी अधिक वेतन देण्यास भाग पाडतात. त्यामुळे वस्तूंच्या किमती वाढवाव्या लागतात. या भाववाढीला वेतनप्रेरित चलनवाढ म्हणतात.
२. नफाप्रेरित चलनवाढ (Profit Induced Inflation) : नवीन शोध वा तांत्रिक प्रगतीमुळे वस्तूंचा उत्पादन खर्च कमी होतो पण किमती पूर्वीइतक्या ठेवल्या जातात. त्यामुळे नफ्यात वाढ होते. वास्तविक उत्पादन खर्च कमी झाल्याने जरी किंमती कमी झाल्या नाहीत तरी त्या वाढल्यासारख्या असतात. काही वेळा उत्पादक आपल्या नफ्यात वाढ घडवून आणण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे होणाऱ्या भाववाढीला नफानिर्मित चलनवाढ म्हणतात.
३. तूटप्रेरित चलनवाढ (Deficit Induced Inflation) : देशातील सरकार जेव्हा उत्पन्नापेक्षा अधिक खर्च करते तेव्हा येणारी तूट भरून काढण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या पाठबळाशिवाय चलननिर्मिती करते. हा तुटीचा अर्थभरणा सरकार खर्च करते तेव्हा लोकांच्या हातातील पैसा वाढतो. तसेच बँकांची पतनिर्मिती क्षमताही वाढते. विकसनशील देशात विकासासाठी लागणारा पैसा सरकार तुटीच्या अर्थभरण्याने निर्माण करते.परंतु वस्तू व सेवांचे उत्पादन वाढत नाही. अशा भाववाढीला तूटप्रेरित चलनवाढ असे म्हणतात.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.