(P. A.
Mokashi)
B.A.PART II
SEMESTER - 4
I.D.S.(H.S.R.M.)
PAPER - 2
प्रकरण -
3 सामाजिक सुधारक
लहुजी साळवे -
विठ्ठल रामजी शिंदे
- संत गाडगे महाराज - अण्णाभाऊ साठे
*विठ्ठल रामजी शिंदे यांचे लेखन *
आत्मचरित्र : 'माझ्या आठवणी व अनुभव'
महर्षी विठ्ठल रामजी शिंदे
यांनी 'माझ्या आठवणी व अनुभव' या नावाने आपले आत्मचरित्र लिहिले आहे.
ग्रंथाच्या
सुरुवातीला त्यांनी आपली भूमिका विशद केली आहे. ते म्हणतात, 'माझे आत्मचरित्र इतरांना
उपदेश करण्याकरिता नाही. कच्च्या दिलाच्या, अर्धवट विचारांच्या व पक्षपाती वाचकांसाठी माझ्या
आठवणी नाहीत हे सर्वांनी ध्यानात घ्यावे. लोकमताचे परस्परविरोधी हेलकावे मी वाचकांपुढे ठेवले आहेत. वाचकांनी आपल्या मनाचा समतोलपणा राखून विचार करावा.'
महर्षी शिंदे यांनी तुरुंगात
असताना काही आठवणी लिहिल्या.
नंतर त्यांचा मुलगा
रवींद्र याला काही आठवणी कथन केल्या. रवींद्रने टिपणे तयार केली.
खूप परिश्रम घेऊन
माहिती गोळा केली. यामधून 'माझ्या आठवणी व अनुभव' हे आत्मचरित्र आकारास आले.
महर्षीींनी आपल्या
व्यक्तिमत्त्वाची जडणघडण कशी झाली,
आपल्या मनावर कोणते संस्कार झाले हे
सुरुवातीस लिहिले आहे.
लिखाणामध्ये
शास्त्रीय दृष्टिकोणाचा स्वीकार त्यांनी केला आहे. हायस्कूलमध्ये असतानाची आपली मनःस्थिती, महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाचे आपले विचार, मूर्तिपूजेविषयीची आपली मते, आपली धर्मभावना कशी बदलत गेली, आपले वाचन कसे होते,
अकाली वाचलेल्या
शृंगारिक वाङ्मयाचा मनावर अनिष्ट परिणाम झाल्याचेही त्यांनी लिहिले आहे.
स्त्री शिक्षण अस्पृश्यता
निवारण या बाबतीत अण्णासाहेबांचे लोकमान्य टिळकांशी मतभेद झाले. पंडिता रमाबाई, महर्षी धों. के. कर्वे यांच्याशी मतभेद झाले. कटू अनुभव आल्यानंतरही महर्षीींनी त्यांना दोष दिला नाही. त्यांनी सदैव सर्वात जिव्हाळ्याची भावना ठेवली. अहिल्याश्रम (पुणे) या संस्थेचे अधिकार
अण्णासाहेबांनी अस्पृश्यांना दिले. मुंबईच्या प्रमुख शाखेला हा निर्णय मान्य नव्हता. अण्णासाहेबांनी या वादाचा तपशील दिला नाही. म्हणतात, 'या विषयाची मी अत्यंत कष्टाने रजा ते घेत आहे आणि याचे कारण म्हणजे विवेक
ठेवावयास पाहिजे.' 'विवेकाधिष्ठित सत्यदर्शन'
ठेवण्यावर त्यांचा
भर होता.
अण्णासाहेबांनी अस्पृश्यता
निवारणावर जास्त भर दिल्यामुळे प्रार्थना समाजाच्या कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त
केली. प्रार्थना समाजाच्या
कार्यकत्र्त्यांमध्ये मतभेद झाल्यामुळे त्यांनी प्रार्थना समाजाच्या प्रचारकाचा व
आचार्यपदाचा राजीनामा दिला;
पण प्रार्थना
समाजाचे धार्मिक कार्य त्यांनी सोडले नाही. यामधून त्यांची संस्था,
समाज बांप्रति
असणारी आंतरिक तळमळ आपणास दिसून येते.
अण्णासाहेबांनी
कुणालाही दोष दिला नाही. अत्यंत तटस्थ वृत्तीने
त्यांनी समाजसेवेचे असिधाराव्रत निभावले.
या आत्मचरित्रात महर्षीच्या
मनाचा मोठेपणा, इतरांचे दोष विसरण्याची
क्षमाशील अंतःकरण यांचे दर्शन घडते. महर्षीींना आयुष्यभरात अनेक कडू-गोड अनुभव आले. त्यांनी या सर्वांवर अत्यंत
संयमाने, विचारपूर्वक मार्ग काढला. त्याचे आत्मचरित्र निरागसता, प्रसन्नता यांनी भारलेले आहे. आपल्या यशाचे श्रेय ते आई वडिलांना व इतरांना देतात. यात त्यांचा प्रांजळपणा दिसून येतो. आपल्या आईबद्दल ते म्हणतात, 'या सर्व करुणरसाने भरलेल्या नाटकात मुख्य नायिकेचे पात्र माझी आई साध्वी
यमुनाबाई यांनी पार पाडले.
'
'माझ्या आठवणी व अनुभव' हे आत्मचरित्र निर्मळ
व सत्याधिष्ठित आहे. त्यामध्ये आत्मप्रौढी नाही, वस्तुनिष्ठता आहे. अण्णासाहेबांनी महर्षी व कर्मवीर या पदवीबद्दल काहीही भाष्य केलेले नाही. यशापयशाची चिकित्सा करण्याचे कार्य त्यांनी वाचकांकडे सोपविले आहे. अण्णासाहेबांचे आत्मचरित्र हा पुरुषोत्तमाचा आविष्कार आहे. महाराष्ट्राच्या समाजसुधारणा चळवळीत त्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे.
महर्षी वि. रा. शिंदे यांची रोजनिशी
रोजनिशी हा दुर्मीळ
साहित्यप्रकार जिवंत व वास्तवदर्शी दस्तऐवज असतो. रोजनिशीमधून व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय येतो. महर्षीींचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते. त्यांची जीवनवृत्ती उत्कट व चिंतनशील होती. महर्षीींचा स्वतःकडे व इतरांकडे पाहण्याचा दृष्टिकोण प्रामाणिक होता. रोजनिशीतून व्यक्त होणारी आत्मनिष्ठा व आत्मभाव स्वतःचा, इतरांचा व समकालीन जीवनाचा अर्थपूर्ण वेध घेणारा
होता.
महर्षीींच्या रोजनिशीचे प्रा. डॉ. गो. मा. पवार यांनी साक्षेपी संपादन केले आहे. या रोजनिशीतून महर्षीचे व्यक्तिमत्त्व, कर्तृत्व, त्यांची व्यापक जीवनदृष्टी आणि त्यांच्या काळाचा यामधून उलगडा होतो. महर्षीची निरीक्षणशक्ती संवेदनशीलता, समंजस भूमिका, नेमकी व नेटकी वर्णनशैली आणि
व्यक्ती, प्रसंग व घटना यांना शब्दरूप
देण्याचे त्यांचे सामर्थ्य यामधून दिसून येते.
अण्णासाहेबांच्या
आयुष्याच्या तीन वेगवेगळ्या कालखंडात लिहिलेल्या रोजनिशी एकत्र केल्या आहेत. या समग्र रोजनिशीमधून त्यांच्या आध्यात्मिक बैठकीचा, मानवतावादी विचारांचा व सर्वांगीण सुधारणेच्या
तळमळीचा प्रत्यय येतो. अण्णासाहेबांच्या भावजीवनात
अखेरच्या कालखंडात एक अंतस्थ खळबळ माजली होती. हाती घेतलेले कार्य मनाप्रमाणे तडीस जात नाही याविषयी ते चिंतित होते. समाजकार्याला चांगले, स्वार्थत्यागी, आदर्श कार्यकर्ते मिळत नाहीत याचे त्यांना दुःख होते. या साऱ्यांचा परिणाम म्हणून महर्षीनी आत्मप्रकटीकरणासाठी
रोजनिशी लिहिण्याचा अवलंब केला असावा असे दिसून येते.
१. फर्ग्युसन कॉलेजमधील रोजनिशी
:
महर्षी वि. रा. शिंदे १८९८-९९ मध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते.
त्या वेळची त्यांची
ही रोजनिशी आहे.
यामध्ये पुण्याचे
शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक जीवन विशद केले आहे.
वसंत व्याख्यानमाला
व शिवजयंती उत्सवातील भाषणांवर त्यांनी मार्मिक अभिप्राय दिले आहेत.
नामदार गोपाळ कृष्ण गोखले
यांचे 'इंग्लंडमधील व
हिंदुस्थानातील शिक्षण' या विषयावरचे व्याख्यान
आवडल्याचे महर्षीनी नोंदविले आहे. अशा चांगल्या भाषणाबद्दल ते म्हणतात, 'मी जे भाषण ऐकले त्यासाठी दहा मैलही चालत गेलो असतो.' भाषेवरचे प्रभुत्व व
बौद्धिकता यामुळे महर्षीींचे वाचन वैविध्यपूर्ण होते. वाचलेल्या पुस्तकावरील अभिप्राय ते नोंदवून ठेवत असत. कादंबरीला फारसे महत्त्व त्यांनी दिलेले नाही. मात्र थोर लोकांची चरित्रे वाचावीत याबद्दल ते
आग्रही होते.
'काळ' आणि 'केसरी' या तपत्राबद्दल त्यांनी अभिप्राय दिले आहेत. 'काळ'बद्दल महर्षी म्हणतात, 'तात्त्विकतेपेक्षा कवित्व
अधिक दिसते.' वर्तमानपत्राबद्दल आपल्या अपेक्षा व्यक्त
करताना ते म्हणतात, 'वर्तमानपत्रात विचारांचा खोलपणा, भाषेचा
नेमकेपणा व साधेपणा असला पाहिजे. वृत्तपत्रे पक्षपाती असू नये, खरी स्थिती
समजून घेऊन नंतर ती प्रकट करावी.'
या रोजनिशीत अण्णासाहेबांनी
मित्राप्रति असणारा जिव्हाळा व्यक्त केला आहे. आपले सामाजिक, धार्मिक व अंतःस्थ
भावजीवनांचे चित्रण त्यांनी केले आहे. या रोजनिशीत पत्नीच्या भेटीची ओढ लागल्याचे त्यांनी नोंदविले आहे. महर्षीींना. निसर्गाची व ऐतिहासिक स्थळे पाहण्याची आवड होती.
पन्हाळा, पावनगड, वाडी रत्नागिरी, पांडवदरी, विशाळगड इत्यादी स्थळांना त्यांनी भेटी दिल्या. गडांचे विराट स्वरूप, निसर्गाची विलोभनीय रूपे पाहून आपण आनंदित झाल्याचे
महर्षीींनी नोंदविले आहे.
२. इंग्लंडमधील रोजनिशी (१९०१-१९०३) : धर्मशास्त्राच्या तौलनिक अभ्यासासाठी महर्षी इंग्लंडमधील
ऑक्सफर्डमधील मँचेस्टर कॉलेज येथे गेले होते. येथील दोन वर्षांच्या काळात त्यांनी धर्मशास्त्राचा अभ्यास केला. इंग्लंड, जर्मनी, स्वित्झर्लंड, इटली या देशांना भेटी दिल्या. अनेक ठिकाणे पाहिली. याबाबतच्या नोंदी त्यांनी या रोजनिशीमध्ये केल्या आहेत.
महर्षीींनी मँचेस्टर
कॉलेजमध्ये अनेक व्याख्याने ऐकली,
व्याख्याने दिली, लेखन केले. युरोपमधील धर्मसंस्था,
शिक्षणपद्धती, सार्वजनिक व कौटुंबिक जीवन, लोककल्याणकारी संस्था, तेथील निसर्ग अशा सर्व बाबींविषयी त्यांनी लेखन केले आहे. इंग्लंडमधील वास्तव्यात काही काळ ते 'पेईंग गेस्ट' म्हणून राहिले. पिअर्सन हे मध्यमवर्गातील
कुटुंब होते. त्यांच्याशी महर्षीचे
जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले.
मँचेस्टरच्या वास्तव्यात
असताना महर्षीनी मुंबईहून प्रसिद्ध होणाऱ्या 'सुबोध पत्रिकेसाठी' वीस लेख पाठविले. इंग्लिश आणि स्कॉच सरोवर येथील परिसराचे वर्णन जनातून वनात आणि
परत' या लेखामध्ये केले. यातून त्यांच्या निरीक्षण शक्ती व ओघवत्या भाषेचा
प्रत्यय येतो. 'गुड फ्रायडे'चे वर्णन ते तपशीलवार करतात. या
रोजनिशीतून
महर्षीच्या आध्यात्मिक चिंतनाचाही प्रत्यय येतो. ते म्हणतात, “१२.३० वाजलेले. रस्त्यात स्वच्छ चांदणे
पडलेले होते. अगदी सामसूम होती, देखावा सौम्य गंभीर होता. थोडेसे फिरून येऊन निजलो. माझी परमेश्वरावर श्रद्धा कायम राहिली. पण जीविताचे गूढ काय आहे ते कळेना. संशयाच्या यातना दुःसह्य झाल्या. परमेश्वर, गूढ कधीतरी उकलेल काय ?"
इंग्लंडमधील खेड्यामध्ये
दिले जाणारे शिक्षण कसे असते याची माहिती देताना बर्टन येथील शाळेचे त्यांनी
तपशीलवार वर्णन केले आहे.
महर्षीनी धर्मसंस्था, चर्चेस, प्रार्थनामंदिरे, धर्मपंडित, प्रवचने, चर्चासत्रे अशा अनेक स्थळांच्या व्यक्तींच्या व प्रसंगाच्या नोंदी आपल्या रोजनिशीत केल्या आहेत. महर्षीनी प्रसन्न, निर्मळ व उमद्या मनाने लेखन आविष्कार घडविला आहे. ही रोजनिशी म्हणजे उत्कृष्ट प्रवासवर्णन होय.
डॉ. गो. मा. पवार म्हणतात, “अण्णासाहेबांच्या इंग्लंडमधील रोजनिशीत त्यांच्या
मनाच्या आध्यात्मिक ठेवणीचा,
धर्मप्रवण
मनोवृत्तीचा, लोकहिताच्या कळकळीचा तसेच
त्यांच्या स्वाभाविक रसिकतेचा व सौंदर्यदृष्टीचा प्रत्यय येतो.'
३. येरवड्याच्या तुरुंगातील (पुणे) रोजनिशी (१९३०) रोजनिशीचा हा तिसरा भाग महर्षीनी तुरुंगात लिहिला आहे. एप्रिल-मे, १९३० मध्ये त्यांनी सविनय कायदेभंग चळवळीत
सहभाग घेतला. त्यांना १८ मे रोजी अटक झाली. सहा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. १८ मे, १९३० ते १४ ऑक्टोबर,
१९३० या कालावधीत ते येरवडा येथील तुरुंगात
होते. येथील वास्तव्यात शेवटच्या अडीच महिन्यांच्या
कालावधीत त्यांनी ही रोजनिशी लिहिली.
अण्णासाहेब म्हणतात, “येथे मी केवळ खाजगी अनुभव व
स्मरणार्थ टिपणे लिहिणार.
विशेषतः धार्मिक
विचार लिहीन असा बेत आहे. राजकारण, समाजकारण अगर कोणतेही सार्वजनिक विचार करण्याचे हे
स्थळच नव्हे.'
या वेळी अण्णासाहेबांचे वय
सत्तावन्न वर्षांचे होते.
आयुष्यभर त्यांनी समाजासाठी कार्य केले. संस्थात्मक कार्य केले. त्यांच्या जीवनात अनेक
मानापमानाचे प्रसंग आले. अनेक कटू-गोड अनुभव आले पण महर्षी या मानापमानाच्या पलीकडे जाणारी प्रौढ, शांत, स्थिर अशी मनोवृत्ती झाली होती. महात्मा गांधीजींनी आरंभलेल्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी मनोभावे भाग घेतला
होता.
महर्षीच्या भाषेला
काव्यात्मतेचा व निवेदनाला कल्पनाविलासाचा फुलोरा आल्याचे दिसते. महर्षी छोट्या-छोट्या घटनांकडे प्रसन्नतेने व विनोदबुद्धीने पाहतात. उदा.
उंदराच्या कानाएवढी
दौत मिळाल्याचा प्रसंग, कांदा मिळाल्याचा आनंद
इत्यादी. तुरुंगात महर्षीच्या जवळच
तीन लिंबाची झाडे होती. त्या झाडांना त्यांनी आपले कुटुंब केले. मोठे झाड रुक्मिणीबाई (पत्नी), दुसरे माई (सून), तिसरे जनाक्का (बहीण) अशी कल्पना करून त्या झाडांवर प्रेमाचा वर्षाव केला.
प्रा. डॉ.भा.ल.भोळे अण्णासाहेबांच्या
रोजनिशीबद्दल म्हणतात, “मराठी भाषेत लिहिणाऱ्यांपैकी फारच थोडे लोक आज विठ्ठल रामजी शिंदे यांच्याइतकी
अभिजात भाषा लिहितात.
नवलेखकांनी तर या
दृष्टीने या रोजनिशीची पारायणे करावीत इतक्या मोलाची ती आहे."
रोजनिशीचे संपादक डॉ. गो. मा. पवार महर्षीच्या संपूर्ण
रोजनिशीबद्दल म्हणतात, “महर्षीच्या रोजनिशीचे स्वरूप लक्षात घेता महर्षीच्या मनाची आध्यात्मिक ठेवण, व्यापकपणे विचार करणारी जीवनदृष्टी, तरल संवेदनशीलता, सूक्ष्म सौंदर्यदृष्टी,
भाषेच्या
सामर्थ्याची यथोचित जाण इत्यादी वैशिष्ट्यांनी युक्त असणारे महर्षी शिंदे
यांच्यासारखे व्यक्तिमत्त्व अपवादात्मकच म्हणावे लागेल. अशा एका असाधारण व प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाचा प्रत्यय देणारी ही रोजनिशी महाराष्ट्राच्या
सामाजिक, सांस्कृतिक जीवनाच्या
दृष्टीने जशी महत्त्वाची आहे,
तशीच वाङ्मय
गुणांच्या दृष्टीनेही मौल्यवान आहे."
बहिष्कृत भारत :-
महर्षी वि. रा. शिंदे यांनी १९०१ च्या जनगणना अहवालानुसार अस्पृश्य वर्गाच्या आकडेवारीची
माहिती साधार दिली.
त्यांनी मुंबई येथील
इंडियन सोशल रिफॉर्म असोसिएशनपुढे नोव्हेंबर, १९०५ मध्ये व्याख्यान
दिले. भारतीय अस्पृश्यतेबद्दल हा पहिला संशोधनपर लेख
म्हणावा लागेल. डी. सी.
मिशनच्या
स्थापनेनंतर श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या आज्ञेवरून बडोदा येथे अस्पृश्यतेच्या प्रश्नावर
सांगोपांग विचार करणारे व्याख्यान दिले.
हे व्याख्यान १९०८ मध्ये मासिक मनोरंजनात व नंतर स्वतंत्र
पुस्तिकेच्या रूपाने 'बहिष्कृत भारत' या शीर्षकाने प्रसिद्ध झाले.
भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न:-
महर्षी वि. रा. शिंदे यांनी
अस्पृश्यता प्रश्नाबाबत सखोल अभ्यास केला भारतीय अस्पृश्यतेचा सर्वांगीण परामर्श
घेणारा 'भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न' हा प्रबंध लिहिला. या प्रबंधात त्यांनी अस्पृश्यतेच्या उगमापासूनचा इतिहास व बुद्धपूर्व
काळापासून ते वर्तमाळकाळापर्यंत दिसून येणारी अस्पृश्यतेची रूपे यांचे साधार विवेचन केले आहे. अस्पृश्यता निवारणाच्या कार्याबद्दल महर्षीींना
कमालीची तळमळ होती. त्यानुसार त्यांनी आयुष्यभर
कार्य केले. 'भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न'
या ग्रंथात समाविष्ट
असलेले संशोधन करण्यात त्यांना विलक्षण आनंद मिळाला होता. महर्षी म्हणतात,
“अस्पृश्यतेचा छडा लावण्यात-निवारणाचा भाग तर राहू द्या.
मला स्वतःला जन्मभर
जो अनुभव आला आणि आनंद झाला तो लक्षात घेता, मला आणखी जन्म मिळाला तर याच संशोधनात आणि सेवाशुश्रूषेत खर्चीन.'
थोडक्यात, महर्षी वि. रा. शिंदे यांचे प्रार्थना
समाजासाठीचे कार्य, अस्पृश्यता निवारणाचे कार्य, शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य अत्यंत महत्त्वपूर्ण
आहे. समाजासाठी दीन-दलितांसाठी आपले आयुष्य वेचणारे अण्णासाहेब हे
खऱ्या अर्थाने महर्षी होते,
कर्मवीर होते असे
म्हणावे लागेल..
स्वाध्याय: सदर घटकावरील सरावासाठी सोबत दिलेली प्रश्नपत्रिका सोडवा. त्यासाठी सर्व प्रथम खाली दिलेली लिंक कॉपी करून गुगलमध्ये पेस्ट करा.
https://forms.gle/iruAMVfo1DFBQ4mB8
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.