(Mokashi P A)
B.A.II SEMESTER - 4
पेपर क्रमांक - 6
आरोग्याचे समाजशास्त्र
प्रकरण - 3
जीवनशैली आणि आरोग्य
(Life style and Health)
पारंपारिक जीवनपद्धतीचे तोटे
पारंपरिक जीवन पद्धतीनुसार जसे आरोग्यावर उपयुक्त परिणाम होतात त्याचप्रमाणे
आरोग्याला हानिकारक असे वाईट परिणामदेखील होत असतात.
(अ) आरोग्याला हानिकारक घातक संस्कृती
१.
सामाजिक रूढी, परंपरा :
पारंपरिक जीवन पद्धतीमध्ये काही रूढी, परंपरा : अजूनही अस्तित्वात आहेत ज्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने त्या घातक स्वरूपाच्या ठरतात.. बालविवाह, साधारणतः मुलीचे लग्न १८ वर्षे पूर्ण होताच किंवा १६-१७ व्या वर्षीच करण्याचे प्रमाण
अधिक दिसते. मुलगी वयात आली की तिचे लग्न केले पाहिजे अशा मानसिकतेमुळे शिवाय शारीरिकदृष्ट्या ती परिपक्व नसल्यामुळे तिचे आरोग्य धोक्यात घातले जाते. हुंडा प्रथेवर कायद्याने बंदी आणली असली तरी ती प्रथा बंद केली नाही. हुंड्यासाठी मानहानी, छळ, दबाव, संघर्ष अशा गोष्टी अस्तित्वात येतात. स्त्री-पुरुष भेदभाव
ही तर परंपरागत चालत आलेली विचारसरणी आहे. मुलगी म्हणून तिला कमी लेखणे, मोजून खायला देणे, कमी शिकविणे, हौसमौज न करणे, केवळ मुलगी म्हणजे परक्याचे धन अशी वागणूक देणे यातून मुलीच्या शरीराची निकोप वाढ होत नाही. याचा परिणाम लग्नानंतरही तिच्या आरोग्यावर होतो. दुर्दैवाने एखाद्या स्त्रीला मुलगा हे अपत्य होत नसेल तर तिची मानसिक
कुचंबणा केली जाते. पारंपरिक समाजात स्त्रीला अत्यंत गौण स्थान दिले जाते. याचा परिणाम तिच्या आरोग्यावर होतो. रक्तदाब, मधुमेह, मानसिक आघात अशा आजारांना तिला सामोरे जावे लागते.
२. लैंगिक शिक्षण :
मासिक पाळीच्या वेळी स्त्रियांना स्पर्श करावयाचा नाही. गरोदरपणात तिचे बाळंतपण सुरळीत व्हावे म्हणून तिला अधिकची कामे करायला लावणे, मुलगी जन्माला येते म्हणून पत्नीलाच दोष देणे, जे की मुलगी वा मुलगा होणे हे पूर्णतः पतीवर (पुरुषावर) अवलंबून असते. परंतु दोषी स्त्रीच समजली
जाते. पौगंडावस्थेत मुला-मुलींशी प्रजोत्पादन व लैंगिक समस्येबाबत खुली
चर्चा न करणे, काही वेळेस अर्धवट
ज्ञानामुळे वाईट प्रसंगाला सामोरे जावे लागते. लैंगिक शिक्षण ही
काळाच्या ओघात आवश्यक बाब मानली जाते;
परंतु परंपरागत
समाजात यावर चर्चा करणे पाप मानले जाते.
३. अंधश्रद्धा व गैरसमजुती :
खाण्यापिण्याविषयी परंपरागत समाजात बऱ्याच अंधश्रद्धा दिसून येतात. गरोदर स्त्रीने पपया खाल्ल्यास तिचा गर्भपात होतो
किंवा अकाली प्रसूती होते. आरोग्यास घातक आणखी काही गैरसमजुती आहेत. उदा. थंडीमध्ये दही, ताक, दूध,
केळी खाऊ नयेत. गर्भवतीने माती, खडूची पावडर खाल्ल्याने बाळाची बाढ होते. मानसिक संतुलन बिघडले असल्यास, ताणतणाव, दबाव येत असल्यास त्या
व्यक्तीवर कोणीतरी करणी केली आहे. मग त्यासाठी जादूटोणा
करणे, मांत्रिक वा महाराज, बुवाबाजी असे उपचार केले जातात. पत्नीवर मुलगी होते म्हणून पती तिला सोडून दुसरे
लग्न करतो. गरोदर स्त्रीला आयर्नच्या
गोळ्या दिल्यास बाळंतपण अवघड जाईल. प्रसूतीनंतर स्त्रीला संपूर्ण जेवण देणे टाळले जाते. केवळ तूप-भात दिला जातो. भाजी-भाकरी, चपाती, फळे दिले जात नाहीत. काही ठिकाणी पडदा पद्धतीमुळे
स्त्रीच्या शरीराला पुरेशी हवा,
ऊन मिळत नाही. त्यामुळे तिला 'ड' जीवनसत्त्व मिळत नाही.
४. पर्यावरणाबाबत गैरसमजुती :
पुण्य मिळविण्याकरिता काही नद्यातील अशुद्ध पाणी पिणे, उघड्यावर शौचाला
जाणे, घराच्या खिडक्या न उघडणे, काही बाबतीत अज्ञान असते. उदा.
लसीकरणाला विरोध
करणे, सर्पदंश झाल्यास डॉक्टरकडे
नेण्याऐवजी देवळात घेऊन जाणे,
मांत्रिक बोलावणे
धार्मिक बाबतीत काही अपशब्द काढले तर देवाचा प्रकोप होईल अशी भीती व दडपण घातले
जाते. त्यामुळे प्रसंगी व्यक्तीला मृत्यूलाही
कवटाळावे लागते.
५. आरोग्याला हानी पोहोचवणारी संस्कृती :
काही संस्कृती या व्यक्तीच्या आरोग्याला हानी
पोहोचवतात. उदा. बाळ-बाळंतिणीस अंधाऱ्या खोलीत
ठेवणे, सुरुवातीचे काही दिवस बाळाला
स्तनपान न करणे, पाणी न पाजणे, बाळाला कडकडीत पाण्याने चोळून अंघोळ घालणे. थोडक्यात, पारंपरिक जीवनपद्धती ही काही
प्रमाणात आरोग्याच्या दृष्टीने हितकारक
वाटते; पण त्याचबरोबर काही बाबतीत आरोग्याला घातकही ठरते. पारंपरिक, मूळची संस्कृती पाहता म्हणजे सकाळी
लवकर उठणे, सूर्योदयापूर्वी अंघोळ करणे, सूर्यनमस्कार घालणे, नाष्टा, जेवण वेळेवर करणे, रात्री लवकर झोपणे, किरकोळ आजारासाठी घरगुती
औषधोपचार करणे, वैयक्तिक, घरातील व परिसराची स्वच्छता राखणे, पोषक व सात्त्विक आहार घेणे, जीवनसत्त्वयुक्त आहार - पालेभाज्या, दूध, अंडी, मांस, फळे, दही, तूप,
ताक, धान्य, कडधान्य, मोड आलेले कडधान्य अशांचा समावेश
आहारात असतो. शुद्ध व प्रदूषणमुक्त हवा, कष्टाची कामे करतात; पण त्या प्रमाणात पुरेशी विश्रांती व झोप घेतात. ताणतणाव कमी राहतो. व्यायाम, योगा यामुळे शरीर तंदुरुस्त
राहण्यास मदत होते. रक्तदाब, मधुमेह, ताणतणाव यासारख्या आजारापासून दूर राहतात.
परंतु त्याचबरोबर काही बाबतीत पारंपरिक जीवन आरोग्याला घातकही ठरते. जसे की मुलगा-मुलगी भेद करणे, स्त्रियांना कमी लेखणे, हुंड्यासाठी मानहानी, छळ करणे,
मुलगाच हवा असा
अट्टाहास करणे, मुलगी होण्याला पत्नीला
जबाबदार धरणे, जादूटोणा, मंत्र-तंत्र, अंगारे- धुपारे अशा गोष्टींचा वापर करून सुख-शांती शोधण्याचा प्रयत्न
करणे. वैद्यकीय उपचार घेण्यास
दिरंगाई करणे, आजारपण अंगावर काढणे अशा
अनेक गोष्टींमुळे आरोग्य विघातक परिस्थिती निर्माण होते. स्वच्छतेचा अभाव, सांडपाण्याचा योग्य निचरा न होणे, यामुळे मलेरिया, हिवताप, डेंग्यू यासारख्या रोगाला सामोरे जावे लागते.
Comments
Post a Comment