Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: सामाजिक चळवळीचे प्रकार

Saturday, 3 July 2021

सामाजिक चळवळीचे प्रकार

 

(Mokashi P. A.)

B.A.I SEMESTER - 2

PAPER NO - 2

प्रकरण - 3

आधुनिक समाजातील सामाजिक परिवर्तन

सामाजिक चळवळीचे प्रकार / Types of Social Movements)

सामाजिक चळवळींचे वर्गीकरण करणे सोपे नाही. समाजात अनेक प्रकारच्या चळवळी सुरू असतात. त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारानुसार सामाजिक चळवळींचे वर्गीकरण केले जाते. परिवर्तनासंबंधीच्या चळवळींचे, समूहाच्या सदस्यांमध्ये आणि समाजामध्ये परिवर्तन घडवून आणणाऱ्या चळवळी असे वर्गीकरण केले जाते. विशिष्ट क्षेत्राशी संबंधित असणाऱ्या चळवळीचे धार्मिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक असे प्रकार पाडले जातात. चळवळीच्या उद्देशानुसारदेखील चळवळींचे वर्गीकरण केले जाते. म्हणूनच सामाजिक चळवळींचे प्रकार स्पष्ट करणे कठीण जाते. हॉर्टन आणि हंट यांनी सामाजिक चळवळींचे उद्दिष्ट लक्षात घेऊन पुढीलप्रमाणे सामाजिक चळवळींचे प्रकार स्पष्ट केले आहेत.

. स्थलांतर चळवळ (Migratary Movement) :

 जेव्हा एखाद्या देशातील लोकांना आपल्याच देशात किंवा समाजात आता आपण इथे राहणे सुरक्षित वाटत नाही, येथे आपल्यावर अन्याय होत आहे असे वाटते. इतरत्र जाऊन तेथे स्थिर होण्यात उज्ज्वल भवितव्य आहे अशी भावना प्रबळ होते तेव्हा ते लोक मोठ्या प्रमाणात आपला देश किंवा समाज सोडून दुसऱ्या देशात किंवा समाजात स्थलांतर करतात तेव्हा त्यांना स्थलांतरी चळवळ असे म्हणतात. परंतु केवळ शिक्षण, नोकरी, व्यापार अशा प्रकारच्या गोष्टींसाठी काही व्यक्ती स्थलांतर करतात त्याला सामाजिक चळवळ म्हणता येणार नाही. म्हणजेच स्वतःच्या समाजात असुरक्षितता वाटते म्हणून दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी सामूहि केलेल्या स्थलांतरासच स्थलांतरी चळवळ म्हणता येईल. उदा. १९४७ च्या स्वातंत्र्यप्राप्तीवेळी

फाळणी झाली आणि भारत व पाकिस्तान दोन स्वतंत्र देश निर्माण झाले तेव्हा असंख्य लोकांनी भारतातून पाकिस्तानात व पाकिस्ताना तून भारतात सामूहिकपणे केलेले स्थलांतर किंवा दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनी असे दोन भाग केले. पण रशियाच्या नियंत्रणाखाली असलेल्या पूर्व जर्मनीतून १९६१ पर्यंत जवळजवळ ४० लाख जर्मनांनी पश्चिम जर्मनीत स्थलांतर केले. या चळवळीला रशियाची हुकूमशाही शासनपद्धती कारणीभूत होती, ज्यात जर्मनींना आपले जीवन, गुदमत आहे असे वाटत होते आणि म्हणून हे स्थलांतर थांबविण्यासाठी इ. . १९६१ मध्ये प्रसिद्ध बर्लिन भिंत बांधण्यात आली.

. आविष्कृत किंवा अभिव्यक्ती चळवळ (Expressive Movements) :

जेव्हा लोकांना प्रचलित समाजव्यवस्था जाचव, अन्यायकारक, त्रासदायक वाटत असते पण त्या समाजव्यवस्थेत बदल घडवून आणू शकत नाहीत आणि त्या समाजव्यवस्थेपासून दूरही जाऊ शकत नाहीत. त्या समाजव्यवस्थेशी त्यांना जखडून राहावे लागते तेव्हा आविष्कृत चळवळ घडून येते. अशा चळवळीत व्यक्ती स्वत:च्या जीवनशैलीत बदल करण्याचा प्रयत्न करते. जसे नृत्य, संगीत, खेळ, जुगार, मद्यपान किंवा धार्मिक पूजापाठ इत्यादी गोष्टी करण्याच्या आहारी जातात. त्रासदायक समाजव्यवस्थेतील लोकांची जी अभिव्यक्ती असते तिलाच अभिव्यक्ती चळवळ महणतात. या चळवळीत सहभागी होणारे लोक नृत्य, संगीत यांसारख्या गोष्टींमध्ये सतत रममाण होतात. उदा. पाश्चिमात्य समाजातील हिप्पी चळवळ किंवा हरे राम हरे कृष्ण चळवळ वगैरे.

. स्वप्नाळू किंवा आदर्शवादी चळवळ (Utopian Movements) :

प्रचलित समाजव्यवस्था ही दोषपूर्ण आहे. तिच्यात अन्याय, विषमता, शोषण आहे. त्यामुळे ही व्यवस्था त्रासदायक आहे असे मानून तिच्या जागी नवीन, निर्दोष, परिपूर्ण अशी आदर्श समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी केल्या जाणाऱ्या चळवळीस आदर्शवादी चळवळ म्हणतात. म्हणजेच पूर्ण समाजाची कल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी लहानशा समुदायात अशी आदर्श समाजव्यवस्था निर्माण करण्याच्या दृष्टीने काही विचारवंतांनी व त्यांच्या अनुयायांनी केलेले प्रयत्न म्हणजे स्वप्नाळू, आदर्शवादी चळवळ, काल्पनिक चळवळ असे म्हणता येईल. लहानशा समुदायात ही चळवळ यशस्वी ठरली की, ती सर्व समाजास लागू करता येईल, असे त्यांना वाटत असते. प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटो यांनी 'रिपब्लिक' ग्रंथात आदर्श राज्याची कल्पना मांडलेली आढळते. सर थॉमस मूर यांनी 'युटोपिया' ग्रंथात आदर्श राज्याचे चित्रण केलेले आहे. अर्थात, या आदर्श व्यवस्था मात्र प्रत्यक्षात व्यवहारात निर्माण होऊ शकल्या नाहीत. भारतातील महात्मा गांधींची 'सर्वोदय चळवळ' तसेच विनोबा भावे यांची 'भूदान चळवळ' या चळवळीदेखील आदर्श चळवळीच ठरतात.

. सुधारणावादी चळवळी (Reform Movements) :

समाजाच्या मूलभूत समाजरचनेत फारसे परिवर्तन न करता केवळ समाजातील अनिष्ट रीतिरिवाज, प्रथा, परंपरा, मूल्ये, श्रद्धा तसेच सामाजिक संस्थां तील दोष इत्यादींचे निर्मूलन करून समाजात सुधारणा घडवून आणण्यासाठी केलेल्या चळवळींना सुधारणा चळवळी असे म्हणतात. अशा चळवळी करणाऱ्या व्यक्तींना समाजसुधारक असे म्हणतात. ब्रिटिशांच्या राजवटीत एकोणिसाव्या शतकात भारतात सुधारणा चळवळींचे एक पर्वच सुरू झाले. आधुनिक भारताचा जनक गणल्या गेलेल्या राजा राममोहन रॉयपासून अनेक समाजसुधारकांनी भारतीय समाजाला अज्ञान, अंधश्रद्धा, सामाजिक विषमता, अस्पृश्यता अशा विविध अनिष्ट परंपरांतून अडकलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी कार्य केले. समाजसुधारणा चळवळी ह्या सनदशीर व अहिंसक स्वरूपाच्या असतात. आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी समाजसुधारक हिंसक मार्गाचा अवलंब करीत नाहीत. सभा, संमेलने, लेख, व्याख्याने इत्यादी मार्गाने ते समाजजागृती घडवून आणतात. साधारणतः लोकशाही समाजात अशा चळवळी मोठ्या प्रमाणात घडताना दिसतात. कारण तेथे लोकांना आचार-विचारांचे स्वातंत्र्य असते. भारतात ब्रिटिश राजवटीत उदयास आलेल्या ब्राह्मो समाज, आर्य समाज, प्रार्थना समाज, सत्यशोधक चळवळ या सुधारणा चळवळी होत्या. तसेच डॉ. आंबेडकरांची अस्पृश्योद्धाराची चळवळ, महर्षी कर्वेंची स्त्री-उद्धाराची चळवळ कर्मवीर भाऊराव पाटील यांची शिक्षण प्रसाराची चळवळ किंवा बाबा आढाव यांची एक गाव एक पाणवठा चळवळ या सर्व सुधारणा च चळवळी आहेत.

. क्रांतिकारी चळवळ (Revolutionary Movements) :

 जेव्हा समाजव्यवस्थेत आकस्मिकपणे आणि तुलनात्मकदृष्ट्या परिपूर्ण बदल घडून येतात तेव्हा त्यास क्रांती म्हटले जाते. असे बदल जादा तर हिंसात्मक मार्गाने होतात. साधारणपणे प्रचलित समाजव्यवस्थे ऐवजी तेथे नवीन समाजव्यवस्था निर्माण करण्यासाठी केलेल्या चळवळींना क्रांतिकारक चळवळ असे म्हटले जाते. उदा. अमेरिकन राज्यक्रांतीने अमेरिकन वसाहतीवरील ब्रिटिशांची राजवट संपली व स्वतंत्र अमेरिका जन्मास आली. फ्रेंच राज्यक्रांतीने जुनाट अनियंत्रित राजवट, पराकोटीची विषमता संपवली व तेथे समता, स्वातंत्र्य व बंधुता यांचा उद्घोष करत तेथे लोकशाही आली आणि रशियन राज्यक्रांतीने तर झारच्या राजवटीचे नामोनिशाण न ठेवता साम्यवादी समाजव्यवस्था प्रस्थापित केली. सुधारणा चळवळ व क्रांतिकारक चळवळ यांच्यात महत्त्वाचा फरक असा की सुधारणा चळवळीत केवळ समाजव्यवस्थेतील काही अनिष्ट गोष्टी नष्ट करण्याचा उद्देश असत. याउलट क्रांतिकारक चळवळीत संपूर्ण समाजव्यवस्था नष्ट करून तिच्या जागी नवीन व्यवस्था आणण्याचा उद्देश असतो. मानव समाजाचा इतिहास पाहता असे दिसून येते की, लोकशाही समाजव्यवस्थेत सुधारणा चळवळींना मोठा वाव असतो. परंतु क्रांतिकारक चळवळींना फारसा वाव नसतो. क्रांतिकारक चळवळीमुळे समाजव्यवस्थेत प्रचंड उलथापालथ होते. विस्कळीतपणा येतो. सामान्य जनतेचे प्रचंड हाल होतात. त्यामुळे अशा चळवळी अवांछनीय मानल्या जातात.

. प्रतिकार चळवळ (Resistance Movements) :

विशिष्ट सामाजिक परिवर्तन घडून येऊ नये किंवा झालेल्या सामाजिक परिवर्तनाचे निर्मूलन व्हावे यासाठी जे सामूहिक प्रयत्न केले जातात त्यास प्रतिकार चळवळ असे म्हटले जाते. घडून येणारे वा घडून आलेले परिवर्तन खूपच वेगवान आहे, ते नको आहे यामुळे समाजाचे भले होण्यापेक्षा नुकसानच अधिक होईल अशी त्यांची तीव्र भावना असते. समाजात जेव्हा सामाजिक परिवर्तनाची गती वाढते तेव्हा जुनी व्यवस्था नष्ट होते किंवा विस्कळीत होते. तिच्या जागी नवी व्यवस्था येते. या नव्या व्यवस्थेत काही व्यक्तींचे किंवा समूहाचे हित धोक्यात येते. परिणामी अशा व्यक्ती किंवा समूह हे नव्या व्यवस्थेत प्रतिकार करण्यासाठी किंवा जुनी व्यवस्था पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी चळवळ सुरू करतात.

अशा प्रकारे समाजात विविध प्रकारच्या सामाजिक चळवळी होत असतात.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...