(Parit V B)
Radhanagari Mahavidhyalay, Radhanagari
B.Com -1 Sem - II
Subject- Principles of Marketing
Topic - वस्तू : अर्थ व महत्त्व
**(ब) वस्तूची गर्भित वैशिष्ट्ये (Implicit Features)
कोणत्याही वस्तूमध्ये गर्भित किंवा अभौतिक स्वरूपाची वैशिष्ट्ये असतात. या गर्भित वैशिष्ट्याचे आकलन ग्राहकपरत्वे भिन्न-भिन्न असते. एखाद्या ग्राहकाला एका वस्तूमध्ये जे दिसेल, ते दुसऱ्या ग्राहकाला दिसेलच असे नाही. म्हणून या गर्भित वैशिष्ट्यांचे स्वरूप गुणात्मक असते. ही ग्राहकांच्या दृष्टीने गर्भित अथवा सूचित वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत.
१. प्रतीक भिन्नता (Product Symbolism) : वस्तू ही तिच्या अंगी असणाऱ्या विभिन्न प्रकारच्या उपयोगितांचे व लाभांचे प्रतीक असते. पण ग्राहकपरत्वे त्या प्रतीकांचे आकलन भिन्न-भिन्न असते. ही वस्तूमधील प्रतीक भिन्नता एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होय. एखाद्या ग्राहकाला एखाद्या वस्तूमध्ये जे प्रतीक दिसेल, ते प्रतीक दुसऱ्या ग्राहकाला आकलन होईलच असे नाही.
२. संदेशाचे प्रक्षेपण (Communication Media) : वस्तू ही आपल्याविषयी ग्राहकाला एक संदेश प्रक्षेपित करीत असते. या संदेशाचा प्रत्येक ग्राहक आपल्या कुवतीनुसार व आकलनानुसार अर्थ काढत असतो. वस्तू आपल्या अंगी अंतर्भूत असलेल्या गुण, लाभ, उपयोगिता, भौतिक घटक, अभौतिक घटक इत्यादींबाबत हा संदेश प्रक्षेपित करीत असते. म्हणून प्रत्येक वस्तू ही संदेश प्रक्षेपणाचे माध्यम होय.
३. स्वाद आकलन (Product Perception) : ग्राहकाला वस्तूचा उपभोग घेताना त्या वस्तूसंबंधी एक प्रकारे मानसिक आकलन होत असते. ग्राहक हा वस्तूबाबत जितका आसक्त असेल तितके हे आकलन तीव्र असते. तसे हे आकलन वस्तूबाबतची त्याची आसक्ती व्यक्त करीत असते. त्याच्या मनातील (ठेवणीत जपलेला) वस्तुस्वाद व त्याच्यासमोर असलेल्या वस्तूचा स्वाद याची तो मनातल्या मनात तुलनाही करीत असतो. हे स्वाद मिळतेजुळते. असल्यास तो खुश होतो. हे स्वाद जुळत नसल्यास त्याची नाराजी तो चेहऱ्यावर अथवा उघडपणे व्यक्त करतो. अर्थात, हे स्वाद आकलन एक मानसिक प्रक्रिया असून हे स्वाद आकलन ग्राहकापरत्वे भिन्न-भिन्न असते.
४. वस्तू मूल्यमापन (Product Evaluation) : प्रत्येक वस्तूचे एक मूल्यमापन असते व ग्राहक ते मनातल्या मनात करीत असतो. वस्तूतील लाभाचे प्रतीक, वस्तूपासून मिळालेला संदेश व वस्तुस्वादाचे आकलन या आधारे वस्तूचे मूल्यमापन केले जाते. वस्तूची किंमत व त्यापासून मिळणारे समाधान याची तुलना करून हे मूल्यमापन करण्यात येते. हीसुद्धा मानसिक क्रिया आहे व म्हणून ग्राहकपरत्वे हे मूल्यमापन भिन्न असू शकते.
अशा रीतीने वस्तूची उघड व गर्भित वैशिष्ट्ये आहेत.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.