(Parit V B)
B.Com -1 Sem - II
Subject- Principles of Marketing
Topic - वस्तू : अर्थ व महत्त्व
वस्तूचे आवेष्टन
(Product Packaging)
विपणनामध्ये वस्तूच्या अंतरंगाइतकेच तिच्या बाह्य स्वरूपालासुद्धा महत्त्व दिले जाते. त्या दृष्टीने वस्तूच्या बाह्यरूपामध्ये तिचे आवेष्टन (Packaging) सर्वांत महत्त्वाचे समजले जाते. कारण वस्तू ही बाजारपेठेत व संभाव्य ग्राहकांसाठी सादर करताना तिचे आवेष्टन आकर्षक व देखणे असावे लागते. तसेच वस्तूचे अंतरंग सुरक्षित ठेवण्यासाठीसुद्धा आवेष्टन उपयुक्त ठरते. किंबहुना वस्तूच्या गुणवत्तेचे व नवेपणाचे रक्षण करण्यासाठी आवेष्टन आवश्यक असते. म्हणून वस्तूसाठी योग्य असे आवेष्टन निवडणे अथवा तयार करणे हे विपणन विभागाचे महत्त्वाचे कार्य होय. त्याबाबत वस्तू नियोजन व विकासामध्ये विचार केला जातो.
व्याख्या:-
"वस्तूला गुंडाळण्यासाठी डबा अथवा पेटी तयार करण्यासाठी सर्वसाधारण स्वरूपाची क्रिया म्हणजे आवेष्टन होय."
***आवेष्टनाचे प्रकार (Types of Packagings)
वस्तूसाठी आवेष्टन तयार करणे ही विपणनामध्ये महत्त्वाची क्रिया आहे. म्हणून वस्तूचे आवेष्टन लक्षवेधी, वस्तू प्रतिमादर्शक, कल्पक व संरक्षक स्वरूपाचे असले पाहिजे. वस्तूच्या आवेष्टनाचे स्वरूप तीन प्रकारचे दिसून येते.
१. प्राथमिक आवेष्टन (Primary Package): वस्तूच्या अंतर्गत गुणघटकाचे व नवेपणाचे संरक्षण करण्यासाठी जे पहिले वेष्टन वापरण्यात येते, त्याला प्राथमिक आवेष्टन असे म्हणतात. उदा. औषधांसाठी काचेची बाटली, केसांच्या तेलासाठी प्लॅस्टिकची बरणी/ बाटली, बिस्किटांसाठी पारदर्शक कागदाची केलेली कागदी पेटी इ. वस्तूचा दर्जा, गुणघटक व नवेपणा यांचे संरक्षण करण्यासाठी व त्या वस्तूचा वापर करणे सोईचे होण्यासाठी हे प्राथमिक वेष्टन लावण्यात येते. वस्तूचा उपभोग अथवा उपयोग संपेपर्यंत हे वेष्टन वस्तूसोबतच राहते. उदा. बाटलीतून आवश्यक तेवढे (डोस) औषध घेण्यात येते व पुन्हा औषधासह बाटली जपून ठेवली जाते. औषध संपल्यानंतर काचेची बाटली कचरापेटीत टाकली जाईल अथवा फेकून दिली जाईल. म्हणजे प्राथमिक वेष्टन ग्राहकाच्या सतत हाताळणीत राहते. त्या दृष्टीने ते वेष्टन भक्कम असावे लागते.
२. दुय्यम आवेष्टन (Secondary Package) : वस्तू प्राथमिक वेष्टनासह ठेवण्यासाठी जे दुसरे वेष्टन वापरले जाते, त्यास दुय्यम आवेष्टन म्हणतात. उदा. औषधाने भरलेली काचेची बाटली ठेवण्यासाठी जो कार्ड बोर्ड/कार्डशीटचा तयार केलेला कागदी डबा किंवा पारदर्शक कागदाच्या पेटीत ठेवलेले बिस्कीट पुढे ठेवण्यासाठी केलेले कागदाचे दुसरे वेष्टन. काचेची बाटली सुरक्षित ठेवण्यासाठी हे दुसरे वेष्टन वापरण्यात येते. हे दुय्यम ग्राहकाला आकर्षित करण्यासाठीच्या हेतूने तयार करण्यात येते. यासाठी हे दुय्यम वेष्टन वेष्टन प्राथमिक वेष्टनापेक्षा अधिक आकर्षित व चांगले तयार करण्यावर भर दिला जातो. दुय्यम वेष्टनच ग्राहकांसमोर येत असते. जाहिरातीमध्येसुद्धा दुय्यम वेष्टनाचे प्रतिमाचित्र वापरले जाते. विपणनामध्येसुद्धा दुय्यम वेष्टन अधिक महत्त्वाचे समजले जाते.
३. वाहतूक आवेष्टन (Shipping Package) : प्राथमिक व दुय्यम वेष्टनांच्या वस्तूंची वाहतूक सुरक्षित व सोईची होण्यासाठी वेष्टित वस्तू ज्या पृष्ठाच्या अथवा लाकडी पेटीमध्ये ठेवण्यात येतात, ती पेटी म्हणजे वाहतूक आवेष्टन होय. या पेटीमध्ये ठरावीक वस्तू मावतील असा तिचा आकार ठेवण्यात येतो. उदा. दोन डझन अथवा चार डझन वेष्टित बाटल्या ठेवण्यासाठी तयार केलेली पेटी किंवा साबणाच्या शंभर वड्या ठेवण्यासाठी तयार केलेली पृष्ठाची पेटी.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.