Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: लहुजी साळवे

Friday, 25 June 2021

लहुजी साळवे

 

B.A.PART II SEMESTER - 4

I.D.S.(H.S.R.M.) PAPER - 2

प्रकरण - 3 सामाजिक सुधारक

लहुजी साळवे - विठ्ठल रामजी शिंदे - संत गाडगे महाराज - अण्णाभाऊ साठे

लहुजी साळवे

इतिहास विषयाचा अभ्यास करताना, इतिहासाचा सर्वांगाने मागोवा घेताना एक बाब निदर्शनास येते, ती म्हणजे इतिहासरूपी घटनांच्या साखळीतील, मालिकेतील एक-एक दुवा निखळलेला आहे. म्हणजेच परंपरागत चालत आलेल्या इतिहासलेखन पद्धतीनुसार राजा, त्याचे सरदार, जहागीरदार, वतनदार, राजाचा राजपरिवार, त्याने केलेल्या लढाया यांनाच इतिहासात अग्रक्रम देण्याची मानसिकता अगदी अर्वाचीन काळापर्यंत चालू राहिलेली दिसते. त्यातूनच कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसणाऱ्या ज्ञानार्जनाशी दुरान्वयानेही संबंध नसणाऱ्या मात्र समाजाच्या प्रगतीच्या वाटचालीत आपले मौलिक योगदान देणाऱ्या अनेक सर्वसामान्य व्यक्तींचे कार्य, महत्त्वपूर्ण घटना या काळाच्या पडद्याआडच राहिल्या. कारण इतिहासात कोणाला अग्रपूजेचे स्थान, दर्जा द्यायचा आणि कोणत्या व्यक्ती, संस्था, विचार आणि प्रसंग किंवा घटना यांना विस्मृतीत ढकलायचे या निवडीचे सर्वस्वी अधिकार हे समाजातील उच्चवर्णीय, प्रभुत्वशाली गटांकडे होते. त्यातून उपरोक्त दोष संभवतो. असाच काहीसा प्रकार ज्यांनी आपले सर्व आयुष्य इतरांसाठी, समाजासाठी खर्ची घातले त्यांच्याही वाट्याला आला. या दीर्घकालीन परंपरेमधीलच एक असलेले नाव म्हणजे लहुजी साळवे होय. ज्या लहुजी साळवे यांनी सामाजिक बदलासाठी, कनिष्ठ व वरिष्ठांमध्ये समतेच्या प्रस्थापनेसाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले, त्यांच्याही कार्यावर आवश्यक तेवढा प्रकाश टाकला गेलेला नाही. अशाच अज्ञात अलिखित व्यक्तींच्या कार्याची, त्यांच्या चारित्र्याची, आचार-विचारांची नि नीतिमूल्यांची विद्यार्थ्यांना ओळख व्हावी यासाठी आपण येथे समाजसुधारक लहुजी साळवे यांचा जीवनपरिचय व त्यांचे कार्य याचा आढावा घेणार आहोत.

पूर्वपरिचय

लहुजी साळवे यांच्या कार्यकर्तृत्वाचा मागोवा घेत असताना त्यांच्या साळवे घराण्याची पार्श्वभूमी पाहणे आवश्यक ठरते. सतराव्या शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या एतद्देशीयांच्या स्वराज्याशी एकनिष्ठ असलेल्या अनेक घराण्यांपैकी हे एक घराणे होते. या घराण्यातील सर्वच व्यक्तींनी आपल्या निष्ठा स्वराज्याप्रति, छत्रपतीचरणी वाहिलेल्या दिसतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडापासून ते पेशवाईपर्यंत त्यामध्ये तसूभरही फरक पडल्याचे आढळत नाही. स्वराज्याच्या वृद्धीसाठी आपण ज्यांच्या पदरी सेवा बजावत आहोत त्यांच्याशी या घराण्याने कधीही बेईमानी केली नाही. आपला राजा, आपले स्वराज्य आलेल्या कोणत्याही संकटाचे निवारण करण्यासाठी अत्यंत प्रामाणिकपणे सदैव तत्परता दाखवली. या घराण्यातील व्यक्तींमध्ये असलेल्या स्वराज्यनिष्ठेमुळे, इमानदारपणामुळे आणि झुंजारवृत्तीमुळे शिवाजी महाराजांनी आपल्या जहागिरीमध्ये पुण्यानजीक असलेल्या पुरंदर किल्ल्याच्या रक्षणाची जबाबदारी या घराण्याकडे सोपविली होती. कारण अत्यंत घनदाट अरण्याने वेढलेला, हिंस्र पशूंचा वावर असलेल्या किल्ल्याची जबाबदारी समर्थपणे सांभाळू शकण्याची क्षमता या घराण्याकडे आहे असा शिवछत्रपतींचा विश्वास होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या घराण्यावर दाखवलेल्या विश्वासाला तडा न जाऊ देता तो सार्थ ठरविला.

पुरंदर किल्ल्याच्या उतरणीवर एक छोटेसे गाव होते. किल्ल्यावर वास्तव्याला असलेल्या लोकांच्या दैनंदिन गरजांची पूर्तता करणाऱ्या वस्तूंची या ठिकाणी खरेदी-विक्री होत होती. हेच गाव पुढे 'पेठ' या नावानेच प्रसिद्ध पावले. याच छोट्याशा गावातील अत्यंत पराक्रमी घराणे म्हणजेच साळवे घराणे होय. पूर्वापार परंपरेने चालत आलेल्या शस्त्रविद्येत निष्णात असलेले हे घराणे होते. दांडपट्टा, कट्यार, तलवार, खंजिर, भाला, वाघनखे इत्यादी शस्त्रास्त्रे अत्यंत सफाईदारपणे चालवण्यात हे घराणे माहीर होते. सर्वदूर त्यांचा बोलबाला होता. इतर घराण्यातील चालीरीतीप्रमाणे या घराण्यातसुद्धा होऊन गेलेल्या पूर्वजांची नावे नातू किंवा पणतूला देण्याचा रिवाज होता. उदा. लहुजी साळवे यांच्या पणजोबांचे नावसुद्धा लहुजी असेच होते. त्यांच्या ठायी असलेल्या शौर्यामुळे, विविध गुणांमुळे शिवाजी महाराजांनी त्यांना 'राऊत' अशी पदवी देऊन त्यांच्यावर पुरंदर किल्ल्याच्या रक्षणाची जबाबदारी सोपविली. पुढे या घराण्यातील अनेकांनी किल्ल्याच्या रक्षणापायी आपल्या प्राणाचे आत्मसमर्पण केले. बलदंड देहयष्टी आणि कमावलेल्या ताकदीचा त्यांनी स्वराज्याकामी सुयोग्य वापर केला. जेजुरीचा खंडोबा हे साळवे घराण्याचे कुलदैवत होते. घोड्यावरून जेजुरीला जाऊन खंडोबाचे दर्शन घेण्याची प्रथा या घराण्यातील लोकांनी अव्याहतपणे सांभाळली होती. अशा या पराक्रमी साळवे घराण्यात लहुजींचा जन्म झाला.

जन्म व बालपण

शौर्य आणि पराक्रमांचा खूप मोठा वारसा लाभलेल्या साळवे घराण्यामध्ये १४ नोव्हेंबर, १७९४ रोजी लहुजी साळवे यांचा जन्म झाला. विठाबाई हे त्यांच्या आईचे नाव तर राघोजी साळवे हे त्यांचे वडील. वडील राघोजी साळवे यांनी आपले आजोबा लहुजी यांचेच नाव आपल्या मुलाला दिले. लहुजींच्या बालपणी घरातील शस्त्रे हीच त्यांची खेळणी बनल्याने बालमनावर शस्त्रविद्येचे संस्कार कोरले गेले. बालपणापासूनच लहुजींना धष्टपुष्ट शरीरयष्टी लाभलेली होती. त्यातच लहानपणापासूनच शस्त्रांशी झालेला संग, पुरंदरसारख्या किल्ल्याच्या परिसरात गेलेले बालपण यामुळे कोणत्याही कारणाने घाबरणे किंवा भित्रेपणा कधी त्यांच्या मनालाही शिवला नाही.

वडील राघोजींकडून लहुजींना बालपणापासूनच शस्त्रविद्या व मल्लविद्येचे बाळकडू मिळाले. वडिलांच्या सोबत घोड्यावर बसून पुरंदर परिसरात रपेट मारणे, निशाणेबाजी, तलवारबाजी, दांडपट्टा यांसारख्या विद्यांतही ते निपुण झाले. पोहणे, घोड्यावर बसून डोंगर चढणे हे त्यांचे छंद होते. आकर्षक शरीरयष्टी, मजबूत बांधा आणि जोडीला नाना प्रकारच्या विद्या यामुळे वयाच्या सोळाव्या वर्षीच पेशवे दरबारात ते नाकेदार म्हणून रुजू झाले. तत्पूर्वीच राघोजी साळवे यांच्या पराक्रमाची वार्ता दुसऱ्या बाजीरावास कळताच त्यांनी राघोजीची शिकारखान्याच्या प्रमुखपदी नेमणूक केली. तेव्हापासून साळवे कुटुंब पुरंदर सोडून पुणे प्रांती जनाईचा मळा याठिकाणी वास्तव्य करू लागले. राघोजी साळवेंचा मोठा मुलगा शिवाजी हादेखील पेशव्यांच्या दरबारी नोकरीस होता. राघोजी आणि शिवाजी या दोघांनीही पेशवे दरबारी अत्यंत प्रामाणिकपणे सेवा केली. आसपासच्या परिस्थितीची जाण झालेल्या लहुजींचे मात्र नोकरीत मन रमत नव्हते. कारण पेशवे काळात अस्पृश्यतेच्या समस्येने जी हद्द ओलांडली होती त्यामुळे त्यांचे मन बेचैन झाले होते. सर्वसामान्य प्रजाही पेशवाईवरती रुष्ट होत. सर्वत्र अवहेलना, असमानता, अगतिकता पसरलेली होती. त्यातच दुसऱ्या बाजीरावाच्या जुलमी, अन्यायी, अत्याचारी व अकार्यक्षम कारभाराला जनता पुरती कंटाळलेली होती. अस्पृश्यांवर लादलेल्या विविध निर्बंधांमुळे त्यांचे जीवन पशुतुल्य बनलेले होते. विविध बंधनांनी त्यांना जीवन नकोसे झाले होते. अस्पृश्यांच्या ज्ञानार्जनावर लादलेली बंदी, गावकोसाबाहेर वास्तव्य करण्याची पदरी आलेली अवहेलना आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर लादलेले अनेक निर्बंध यामुळे हा समाज हवालदिल, हतबल झालेला होता. उपरोक्त अनन्वित अत्याचाराने लहुजींचे अंतर्मन पोखरले जात होते, आपल्यासमोर आपल्या समाजबांधवांवर होत असलेले अन्याय-अत्याचार त्यांच्याकडून पाहवले जात नव्हते. यातूनच त्यांच्या मनात समाजपरिवर्तनाचे विचार रुंजी घालू लागले.

खडकीचे युद्ध :-

याच दरम्यान पेशवे आणि होळकर यांच्यात निर्माण झालेल्या वितुष्टातून होळकरांनी पुण्यावर आक्रमण केले. त्यात पेशव्यांचा पराभव झाला. पेशवा दुसरा बाजीराव याने सारासार विचार न करता १८०२ मध्ये इंग्रजांशी तह करून त्यांच्या साहाय्याने पेशवेपदाची पुनःप्राप्ती केली मात्र सर्वाधिकार इंग्रजांच्या हाती राहिले. पेशवा केवळ नामधारी प्रमुख उरला. इंग्रजांच्या जाळ्यात अडकलेला पेशवा इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळविण्यासाठी स्वतःची सुटका करून घेण्यासाठी गुप्तपणे इंग्रजांशी दोन हात करण्याच्या तयारीला लागला. या वेळी पेशव्यांच्या सैन्याचे नेतृत्व बापू गोखले करत होते. लढाईसाठी शस्त्रास्त्रांची नितांत आवश्यकता होती. पेशवे शस्त्रागारात पुष्कळ शस्त्रास्त्रे धूळ खात पडलेली होती. त्यास परजले तर युद्धकामी येतील यास्तव त्यांची दुरुस्ती होणे अगत्याचे होते. हे काम चोखपणे पार पाडण्यासाठी सर्वांच्या समोर एक नाव आले ते म्हणजे राघोजी साळवे. त्यांनी मोठ्या कष्टाने, रात्रीचा दिवस करून हे काम पूर्ण केले. या कामात राघोजींना लहुजींचे विशेष साहाय्य लाभले. शस्त्रे परजून तयार झाली मात्र चालवणारे सैनिक अपुरे पडू लागले. म्हणून राघोजींनी पुरंदर परिसरातून मातंग, रामोशी, भिल्ल, कोळी आदी जातीतील सैनिकांची जमवाजमव केली. याच सैन्यात लहुजी साळवेसुद्धा सैनिक म्हणून सहभागी होते. अगोदरच लहुजींना परक्या इंग्रजांविषयी खूप राग होता. इंग्रजांचा बदला घेण्याची हीच योग्य वेळ आहे असे मनाशी पक्के ठरवून इंग्रजांना या देशातून बाहेर काढल्याशिवाय स्वस्थ बसायचे नाही अशी लहुजींनी जणू प्रतिज्ञाच केली होती. ५ नोव्हेंबर, १८१७ रोजी खडकी युद्धाला सुरुवात झाली. मराठी सैन्य आपल्या पराक्रमाची शर्थ करत होते. मात्र इंग्रजांच्या अत्याधुनिक शस्त्रांपुढे व प्रशिक्षित सैन्यापुढे त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. वडील राघोजींबरोबर लहुजीही निकराने इंग्रजांशी लढा देत होते. मात्र अचानकपणे बापू गोखलेंच्या घोड्याला गोळी लागली. परिणामी त्यांनी युद्धातून माघार घेतली. त्याच वेळी इंग्रजांच्या एका गोळीने राघोजी साळवेंचा वेध घेतला नि ते गतप्राण झाले. स्वतःच्या डोळ्यादेखत वडिलांच्या झालेल्या मृत्यूमुळे लहुर्जीवरती दुःखाचा डोंगर कोसळला. खडकीच्या युद्धात मराठी सैन्याचा पराभव झाला. दुसऱ्या बाजीरावाने पुण्याहून पलायन केले. इंग्रजांनी पुण्यावर वर्चस्व निर्माण केले. मराठ्यांचा भगवा ध्वज उतरवून शनिवार वाड्यावर युनियन जॅक फडकू लागला. या दारुण, भयावह वास्तवाने लहुजींची तळपायाची आग मस्तकापर्यंत पोहोचल. त्याचसमयी लहुजींनी प्रतिज्ञा केली की, 'मी ही इंग्रजी राजवट उलथवून टाकल्याशिवाय गप्प बसणार नाही.' तेव्हापासून त्यांनी स्वतःला स्वातंत्र्यकार्यासाठी झोकून दिले. खडकीच्या लढाईत जेथे राघोजी मरण पावले, शहीद झाले तेथेच आज मांगीरबाबा नावाचे छोटेसे मंदिर आहे. े म्हणजेच राघोजी साळवेची समाधी होय.

लहुजी साळवेंचे कार्य :-

खडकीच्या लढाईनंतर मराठी प्रांतात इंग्रजांचा कारभार सुरू झाला. पूर्वी मातंग, रामोशी गस्त घालत, पहारा देत. मात्र आता त्या जागी इंग्रज पोलीस गस्त घालू लागले. त्यामुळे अनेकांचे उपजीविकेचे साधन हिसकावले गेले, बेकार झालेले अनेक जण हुजींकडे आपल्या व्यथा मांडू लागले. तेव्हा लहुजींनी या सर्वांना आवाहन केले की, जर यातून मार्ग काढायचा असेल तर इंग्रजांना नेस्तनाबूत करून पुन्हा आपले स्वराज्य निर्माण करावे लागेल. त्यासाठी इंग्रजांना शह देण्यासाठी एकेकट्याने नव्हे तर संघटित प्रतिकार केला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज हे लहुजींचे प्रेरणास्रोत होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे मावळ खोऱ्यातील सर्व जातीधर्मांतील लोकांना एकत्र करून बलाढ्य इस्लामी सत्तांशी संघर्ष केला, त्याच निर्धाराने लहुजींनी उपेक्षित समाजातील तरुणांना संघटित करून दांडपट्टा, तलवारबाजी, भालाफेक, नेमबाजी, बंदूक चालवणे यांसारखे लष्करी शिक्षण देऊ लागले. स्वतः लहुजी तरुणांना कुस्तीच्या डावपेचाचे धडे देऊ लागले. यास्तव ते लहुजी वस्ताद या नावाने सर्वपरिचित झाले.

भारतमातेच्या मुक्ततेसाठी तत्पर असलेल्या तरुणांना विनामोबदला शस्त्रपारंगत करण्याचा उद्योग आरंभिला व सर्वांना राष्ट्र उभारणीच्या कार्यात सहभागी होण्यास प्रेरित केले. लहूजी साळवे तरुणांना शस्त्रविद्या, मल्लविद्या याचे धडे देण्याबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणा प्रताप यांच्या रोमांचक शौर्यकथांचा पट उलगडून प्रेरित करीत. त्यांचा हा आखाडा म्हणजे जणू क्रांतिशाळाच होती. तरुणांमध्ये राष्ट्रप्रेम निर्माण करून स्वराज्यप्राप्तीसाठी त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले. केवळ मातृभूमीच्याच विचाराने ते भारावलेले होते. संवेदनशील मनाच्या लहुजींना आपल्या अस्पृश्य बांधवांवर सवर्णांकडून होणाऱ्या अन्यायाची आत्यंतिक चीड होती. घोटभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागणाऱ्या आपल्या बांधवांसाठी विहीर खोदून सर्वांसाठी खुली केली. लहुर्जीचे हे कार्य म्हणजे एक सामाजिक क्रांतीच होती. लहुजी साळवेंच्या विचारांचा वसा घेतलेल्या त्यांच्या असंख्य शिष्यांनी आपापल्या परीने मातृभूमीची सेवा केली. समाजात ऐक्य, समता निर्माण होण्यास हातभार लावला. लहुजी साळवे आणि क्रांतिवीर उमाजी नाईक यांचेही फार जिव्हाळ्याचे संबंध होते. उमाजी नाईकांचे आत्मबलिदान भारतीयांच्या मनात स्वातंत्र्याचे ज्योत तेवत ठेवून गेले. उमाजींना दिलेल्या फाशीमुळे लहुजींचे मन फार दुःखी झाले. उमाजीबद्दलच्या भावना व्यक्त करताना लहुजी साळवे म्हणतात, "माझा उमाजी हा नरवीर होता. डोंगराचा राजा होता. आद्य क्रांतिवीर ठरला. इंग्रजांशी लढता लढता, हसत-हसत फासावर गेला. आम्ही त्याचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही." उमाजींच्या कार्यापासून स्फूर्ती घेऊन लहुजींनी आपले क्रांतिकार्य पुन्हा जोमाने सुरू केले. लहुजी साळवेंच्या विचारपीठाचा वारसा पुढे महात्मा जोतिबा फुले यांनी प्रभावीपणे चालवला. सामाजिक उत्थानासाठी त्यांनी शिक्षणक्षेत्रात अत्यंत क्रांतिकारी कार्य केले. शिक्षण हेच बहुजनांच्या आत्मोन्नतीचे प्रभावी साधन आहे याची जाण असलेल्या महात्मा फुलेंसमवेत स्वतः लहुजी साळवेदेखील अस्पृश्यांच्या वस्तीवस्तीत जाऊन मुला मुलींच्या शिक्षणाचा आग्रह त्यांच्या पालकांकडे धरायचे. मुलींच्या शिक्षणाला पाठबळ मिळावे यासाठी लहुजींनी आपले बंधू शिवाजीची मुलगी मुक्ता साळवे हिला जोतिबांनी स्थापन केलेल्या शाळेत दाखल कले. हीच मुक्ता साळवे महात्मा फुलेंच्या शाळेतील पहिली अस्पृश्य विद्यार्थिनी होय. चौदा वर्षे वयाच्या मुक्ता साळवे हिने लिहिलेल्या अस्पृश्यांच्या दुःखाविषयीच्या निबंधात जातीयता, धर्मांधता यावर व्यक्त केलेल्या परखड मतांमुळे संपूर्ण समाजमन ढवळून निघाले.

आयुष्याच्या उतारवयातही लहुजी इंग्रजांना भारतातून बाहेर घालवण्यासाठी कार्यरत राहिले. पुणे परिसरातून स्वातंत्र्यप्राप्तीच्या कार्यात सशस्त्र क्रांतीस पाठबळ मिळत असल्याचा सुगावा इंग्रजांना लागताच त्यांच्या नजरा लहुजींकडे वळल्या. याचा सुगावा लागताच लहुजींनी आपले कार्य सह्याद्रीच्या दयाखोऱ्यात अविरतपणे सुरूच ठेवले. भारतमातेची इंग्रजांच्या जोखडातून मुक्तता करणे हीच त्यांची इच्छा होती. १८५७ नंतर परिस्थितीचे फासे उलटे फिरले. भारतात इंग्रजांची सत्ता अधिकाधिक दृढच होत गेली. त्यामुळे लहुजी अधिकच उद्विग्न, अस्वस्थ झाले आणि केवळ स्वातंत्र्याच्या विचाराने भटकंती करीत राहिले. अशाच अवस्थेत १७ फेब्रुवारी, १८८१ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ८६ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या लहुजी साळवेंनी निःस्वार्थी भावनेतून देशसेवेसाठी आपले सर्वस्व पणाला लावले. लहुजींच्या पश्चात सुमारे साठ-पासष्ट वर्षांनी या देशात स्वातंत्र्याची पहाट उगवली. ज्या घराण्यातील व्यक्ती स्वराज्याशी एकनिष्ठ राहिल्या, ज्यांनी आपल्या अलौकिक पराक्रमाने इतिहासाच्या पानोपानी सुवर्णाक्षरे कोरली जावीत असे कर्तृत्व केले त्या लहुजी साळवेंचे कार्यही स्वातंत्र्यानंतर काळाच्या पडद्याआडच राहिले. आज आधुनिक युगात भौतिक सुखाच्या मागे धावणाऱ्या समाजाला अशा व्यक्तिमत्त्वाची, त्यांच्या कार्याची ओळख व्हावी, त्यापासून प्रेरणा मिळावी आणि भावी पिढीत नैतिक नीतिमूल्यांची जोपासना व्हावी या उद्देशाने या ठिकाणी त्यांच्या जीवनकार्याचा घेतलेला आढावा निश्चितच उद्बोधक ठरेल असा आशावाद वाटतो.


स्वाध्याय: सरावासाठी सोबत दिलेली प्रश्नपत्रिका सोडवा. त्यासाठी प्रथम खाली दिलेली लिंक कॉपी करून गुगलमध्ये पेस्ट करून घ्या.

https://forms.gle/HGoimtJ97JYRf8Ao6 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...