बी.ए. भाग ३
मराठी अभ्यासक्रमपञिका७
सञ पाचवे
साहित्यविचार घटक १
विषय प्राध्यापक प्रा. बी. के. पाटील
ललित साहित्य म्हणजे काय ?
प्रस्तावना :
साहित्याचा अभ्यास करतांना एक गोष्ट लक्षात येते की,सर्व सामान्य माणसाच्या व्यावाहारिक जीवनात साहित्य हा शब्द अनेकदा वापरला जातो. हा शब्द साधन या अर्थी वापरला जातो. जसे चिञकलेचे साहित्य म्हणजे ब्रश,पेन्सिल, रंग, कागद इ,होय. तर बांधकाम साहित्य म्हणजे वाळू, सिमेंट पाणी, घमेली इ. होय.
तर कथा, कविता, इतिहास, भूगोल रसायनशास्ञ हे सर्व साहित्य आहे.पण कथा, कविता, कादंबरी नाटक इ. उल्लेख केला तर ते ललित साहित्य आहे असे म्हणता येईल आणि इतिहास, भूगोल, गणित, भूमिती हे सर्व ललितेतर अगर शास्ञीय वाड्मय म्हणता येईल.
काही साहित्य हे समूहनिर्मित असते, त्याला लोकसाहित्य म्हणतात तर काही साहित्य हे व्यक्तिनिर्मित असते त्याला ललित साहित्य म्हणतात.
ललित साहित्याचा अभ्यास करत असतांना वाड्मयाच्या परंपरेकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. भारतीय साहित्यशास्ञात सर्वप्रकारच्या वाड्मयालाकाव्य या एका शब्दात बांधले होते. कथा, कविता, कादंबरी, नाटक इ. वाड्मयाचे सर्व प्रकार या एका शब्दाने व्यक्त होत होते.
पण काळाच्या ओघात कितीतरी बदल घडत जातात. तसेच बदल वाड्मयीन शेञात झाले आहेत.वाड्मय, सारस्वत, ललित साहित्य अशी नवनवी नावे काव्याला मिळाली या बाबत डाॅ यशवंत मनोहर म्हणतात,"संस्कृत साहित्य विचारात साहित्याला उद्देशून काव्य ही संज्ञा वापरली जात असे. वाड्मयाचा केवळ पद्य भाग म्हणजेच काव्य नव्हते. कथा,कविता,नाटक अशा सर्व साहित्याला उद्देशून काव्य ही संज्ञा वापरली जात होती.
थोडक्यात म्हणजे आजचे वाड्मय किंवा साहित्य आणि पूर्वीचे काव्य यात मूलभूत फरक नाही तर काळानुरूप झालेला तो एक शब्दबदल आहे. रसिकांना आनंद देण्याचे काम पूर्वीही काव्य करत होते आणि आजही ललित साहित्य करत आहे.
ललित साहित्याची व्याख्या :
१) "जे लालित्यपूर्ण असते ते ललित साहित्य होय " अशी ललित साहित्याची एक व्याख्या करता येते
२) प्रतिभाशक्तीने प्रेरित केलेले व आनंद देणारे लेखन म्हणजे ललित साहित्य -रा.ग. जाधव.
थोडक्यात "ललित म्हणजे सुंदर. ललित म्हणजे काव्यपूर्ण.
ललित म्हणजे विदग्ध. ललित म्हणजे Beautful ,Fine.
ललित साहित्य हे लालित्यपूर्ण असणारे,भावनांचा आविष्कार करणारे तसेच कल्पनेचा विलास दाखविणारे ते ललित साहित्य होय.
Comments
Post a Comment