Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: अनाथांची माता : सावित्रीबाई फुले /BA II/ HSRM

Tuesday, 27 April 2021

अनाथांची माता : सावित्रीबाई फुले /BA II/ HSRM


अनाथांची माता : सावित्रीबाई फुले

 


प्रा. फयाज अमीर मोकाशी

राधानगरी महाविद्यालय, राधानगरी,

समाजशास्त्र विभाग,


 

महाराष्ट्राच्या पुरोगामी इतिहासात सावित्रीबाई फुले यांनी केलेले शैक्षणिक, सामाजिक व वाङ्मयीन कार्य अंत्यत महत्वपूर्ण आहे. समाजातील अज्ञान, अंधकार, बुरसटलेले विचार, दारिद्र्य, गुलामगिरी, विषमता दूर करण्यासाठी शिक्षण हाच उत्तम उपाय असल्याचे ओळखून सावित्रीबाई आयुष्यभर सामाजिक कार्य करीत राहिल्या. सावित्रीबाईंनी केवळ शाळेमध्ये शिकवण्याचे धडे देवून थांबल्या नाहीत तर त्यांनी पुरोगामी धोरण स्विका अस्पृष्यतेवर हल्ला चढविला, सती जाणे व केशवपणाला विरोध केला त्यांच्याच पुढाकाराने पुण्यामध्ये न्हाव्यांचा पहिला ऐतिहासिक संप घडून आला. त्यांनी विधवा पुनविर्वाहाचा पुरस्कार केला. वाकडे पाऊल पडलेल्या विधवांच्या पुनर्विवाहाचा पुरस्कार केला. वाकडे पाऊल पडलेल्या विधवांच्या बालकांसाठी बालहत्या प्रतिबंधकगृहाची स्थापना केली. ब्राम्हण विधवा स्त्रीचा मुलगा दत्तक घेतला. पुण्यामध्ये प्लेगची साथ जेंव्हा आली तेंव्हा त्यांनी शेकडो रुग्णांची सेवा, शुश्रूषा केली. रुग्णांची सेवा करत असतानाच त्यांचा मृत्यू १० मार्च १८९७ रोजी वयाच्या ६६ व्या वर्षी झाला.

भारतातील पहिली भारतीय शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री, शुद्र व अनाथांची माता आणि स्त्री-मुक्ती आंदोलनाच्या प्रणेत्या म्हणून सावित्रीबाई फुले यांचे जीवन अमर झाले आहे. महात्मा फुले यांनी आपल्या दिव्य ज्योतीने प्रज्वलित केलेली ही एक दिव्य ज्योत आहे. जोतिरावाप्रमाणेच सत्य, समता आणि मानवता यासाठी त्यांनी सर्व हयातभर प्रखर लढा दिला. स्त्री ही एक मानव आहे आणि पुरुषा इतकीच कर्तबगारी ती करु शकते हैं सावित्रीबाईंनी स्वतःच्या कृतीने सिध्द करुन दाखविले आणि म्हणूनच स्त्री-पुरुष समानता प्रतिपादणाऱ्या आद्य महिला आणि स्त्री प्रतिष्ठा प्रतिपादन करणारी पहिली भारतीय स्त्री सावित्रीबाईच ठरते.

जन्म :

ज्या काळात स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळत नव्हते. शिक्षणापासून आणि स्वातंत्र्यापासून दूर ठेवून स्त्रीला परावलंबी आणि पारतंत्र्यात ठेवले जात होते, त्याकाळात सावित्रीबाईंचा जन्म झाला. पुढे मात्र सावित्रीबाईना, ज्योतिबा फुले यांचा उदारदृष्टीकोन असल्यामुळे स्वतःचे व्यक्तीमत्व घडविण्याची संधी प्राप्त झाली. महाराष्ट्रातील महान समाज सुधारक व दलितांचे उध्दारकर्ते महात्मा फुले यांच्या संघर्षमय समाजसुधारण्याच्या कार्यात त्यांच्या खांद्याला खांदा लावन स्त्री शिक्षण व दलितोद्धारक कार्य करणाऱ्या त्यांच्या सौभाग्यवती सावित्रीबाई या सातारा जिल्ह्यातील शिरवळ पासून जवळच असलेल्या नायगावच्या खंडोजी नेवासे पाटील यांच्या घरी ३ जानेवारी १८३१ रोजी सावित्री ही कन्या जन्मली. त्यांची ही एकूलती एक लाडकी कन्या होती. त्यांच्या आईचे नांव लक्ष्मीबाई होते. खंडोजी यांना एकूण चार अपत्ये मुले व एक मुलगी. मुलांची नावे सिदूजी, सावित्री, सखाराम व श्रीपती. नेवासे पाटील यांचे मूळ घराणे हे पेशवे काळातील एक इनामदार घराणे होय. सन १८०० च्या सुमारास नेवासे-टिळेकर-फुले या आडनावाची माळी समाजाची घराणी मोठी मानाची समजली जात होती. सावित्रीबाई आई सारखी गोरीपान नाजूक व सुंदर होती तशी ती बापासारखी अंगापिंडाने भक्कम, हाडामासाने चिवट आणि प्रकृतीने निरोगी त्यामुळे तिच्या प्रकृतीची काळजी तिच्या आईबापांना कधीच वाटली नाही. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात याप्रमाणे सावित्रीबाईने भावी आयुष्यातील समाजसेवेचे व पुढारीपणाचे धडे आपल्या माहेरीच गिरविले होते. पित्याबरोबर शेतावर जाणे, जनावरांची देखभाल करणे, मुला बरोबर खेळणे, किंवा मुलांची भांडणे सोडविणे, आईला स्वयंपाकात मदत करणे, स्वस्थ बसणे माहित नव्हते. तसेच भय किंवा भिती याचा तिचा लवलेशही नव्हता. त्याकाळात बालविवाहाची पध्दत होती त्यामुळे सावित्री सात वर्षाची होताच तिच्यासाठी नवरा मुलगा शोधण्याची मोहिम सुरु झाली. शिवाय सावित्री हाडापेराने मजबूत आणि थोराड असल्याने सावित्रीच्या आई-वडिलांनी नवरदेव शोध मोहीम जोरात सुरु केली. नेवासे पाटील आणि धनकवडीचे पाटील यांचा घरोबा होता. त्यातून जोतिबा व सावित्रीबाई यांचा विवाह घडून आला.

        सावित्रीबाईंना बालपणी घरच्याकडून शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळणे त्या काळात शक्यच नव्हते. सावित्रीबाईंना मात्र बालपणापासूनच शिकावे असे मनातून वाटत होते.जोतिबाबरोबर सावित्रींचा विवाह झाल्यावर त्यांना त्यांच्या मनातील इच्छा पूर्ण करण्याची संधी चालून आली. जोतिबांच्याच मनाने स्त्रियांनी शिकावे असा विचार केलेला असल्यामुळे त्यांनी आपल्या पत्नीपासून स्त्रीशिक्षणाला आरंभ केला होता. सावित्रीबाईच्या शिक्षणाला खऱ्या अर्थाने येथूनच सुरुवात झाली होती. शिक्षण घेण्यासाठी सगुणाबाई ही जोतीबांची मावस बहिण सुध्दा बरोबर होती. . जोतिबा फुलेंनी स्त्री शिक्षणाचा भारतात पहिला प्रयोग आपल्या शेतावरील आंब्याच्या झाडाखाली केला. ावित्रीबाई आणि सगुणाबाई क्षीरसागर ह्या या प्रयोगशाळेतील पहिल्या विद्याथीनी होत. शेतातील माती ही पाटी, शेतातील मातीचा पाटीप्रमाणे उपयोग करून झाडाच्या फांदीच्या काटकीने अक्षरे गिरविण्यास आरंभ झाला. शेतातील वनस्पती, फुलझाडे इत्यादींची नावे लिहिण्यापासून दैनंदिन जीवनातील प्रसंगावर वाक्यरचना करण्यास सुरुवात झाली. सकाळपासून जेवणाच्या वेळेपर्यंत शेतातील काम करावे आणि जेवणानंतर विश्रांतीच्या वेळी जोतिबांनी या दोघींना परिचित वस्तू व प्रसंग यांच्या आधारे शब्दांची व वाक्य रचनेची ओळख करून देऊन भाषा, गणित व सामान्यज्ञान यांचे धडे द्यावेत अशी पध्दत अवलंबण्यात आली. सावित्री आणि सगुणाबाई ह्या हुशार व जिज्ञासू असल्याने त्यांनी एकामागोमाग एक धडे चांगल्या प्रकारे अवगत केले. त्यांची ज्ञानलालसा उच्चप्रतिची असल्याने जोतीबाही आनंदाने त्यांच्याशी मानवांचे हक्क, कर्तव्ये, जातिभेद व उच्चनीच या विषयावर तासनतास चर्चा करत असत. या वैचारिक देवाणघेवाणीमुळे सावित्रीबाईंच्या जाणिवा प्रगल्भ झाल्या.

सावित्रीबाईचे सामाजिक व शैक्षणिक कार्य :

      सावित्रीबाई आणि सगुणाबाई (जोतिबांच्या मावस बहीण) यांना जोतिबांनी प्राथमिक शिक्षण दिले होतेच. यानंतर पुण्यातील नॉर्मल स्कूलमध्ये या दोघींना दाखल करण्यात आले. नॉर्मल स्कूलच्या प्रमुख मिसेस मिचेलबाई यांनी या दोघींचीही काटेकोरपणे परिक्षा घेतली आणि त्यांनी नॉर्मल स्कूलच्या तिसऱ्या वर्षात प्रवेश दिला. मिसेस मिचेलबाईंनी नॉर्मल स्कूल हे १८४० साली छबीलदास यांच्या वाड्यात स्थापन केले होते. त्या फार दयाळू होत्या आणि स्त्री शिक्षणाची त्यांना फार आवड होती म्हणून त्यांनी त्याग आपली संस्था चालविली होती. सावित्री व सगुणाबाई या दोघींनी ही सन १८४७ मध्ये बुध्दीने शिक्षण पूर्ण केले व उत्तम शिक्षिका बनविले. यानंतर सावित्रीबाईंनी सन १८४९ मध्ये अहमदनगरला मिस फॅरारबाईच्या शाळेत शिक्षिकेचे प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रवेश घेतला। व अवघ्या सहा महिन्यात सावित्रीबाई ट्रेंड शिक्षिका झाल्या. सावित्रीबाईचे शिक्षण पूर्ण इ ले. जोतिबा फुलेंनीही आपले इंग्रजी शिक्षण पूर्ण केले. जोतिबांचे वडिल गोविंदराव यांना ..खुप आनंद झाला आपल्या मुलास आता मोठ्या मानाची नोकरी मिळणार असे त्यांना वाटले. परंतू होणार होते वेगळेच! सगुणाबाईंना तर जोतिबा फुले ख्रिस्ती फादरासारखे व्हावे, गोरगरिब व महार-मांग यांची सेवा त्यांच्या हातून व्हावी असे त्यांना वाटत होते. ोतिबांनाही हवा तो सल्ला मिळाला. सावित्रीबाईंनी या सेवा कार्यास आनंदाने अनुमती दिली. दोघींनीही फुल्यांना सेवा कार्याची उत्तम प्रभावी प्रेरणा देऊन आपणही सहभागी होण्याचे मान्य केले.निनोंची गुलामगिरी नष्ट करणारा टॉमस क्लार्कसन यांचे चरित्र सावित्रीबाईंनी नुकतेच वाचले होते. शुद्र, अतिशुद्र आणि गुलाम यांच्या केविलवाण्या जीवनाची व गुलामगिरीची त्यांना चांगली माहिती मिळाली होती. तसेच ख्रिस्ती मिशन यांनी शाळा चालविणे, दवाखाने स्थापन करणे, दुष्काळग्रस्तांना अन्न, वस्त्र देणे, पतित स्त्रियांचा परिहार करणे, अनाथांचा सांभाळ करणे यांचा परिणाम व प्रभाव सावित्रीबाईंच्या मनावर झाला मिशनन्यांच्या या सेवा कार्यामुळे महात्मा फुलेंही प्रभावित झाले होते. याउलट देशातील भट-भिक्षुकांनी गोरगरिब, शुद्र अतिशुद्र आणि स्त्री शिक्षणाला कडाडून विरोध केला होता. त्यांना जनावरासारखे जीवन जगावे लागे यातून त्यांची सुटका करायची असेल तर शिक्षणाशिवाय दूसरा मार्ग नाही असे त्यांना वाटत होते.

          सावित्रीबाईंच्या कार्यास आरंभ झाला. यापूर्वी महाराष्ट्रात किंवा अन्य राज्यांत एकही भारतीय स्त्री शिक्षिका म्हणून काम केल्याचे इतिहासात उदाहरण नाही. सावित्रीबाई ह्याच भारतातल्या आद्य भारतीय स्त्री शिक्षिका ठरतात. त्याकाळात ज्या काही स्त्री शिक्षिका होत्या त्या मिशनरीच होत्या. सन १८४० पासून जोतिबांच्या ज्योतीवर ज्ञानाची ज्योत पेटली. अंधाराला संपविण्यासाठी आणि इथल्या वर्ग व्यवस्थेला संपविण्यासाठी महात्मा फुलेंनी जे समतेचे महायुध्द पुकारले होते. त्यात सावित्रीने उडी घेतली. या देशाचे सर्व अनर्थ एका अविद्येने केले आहे हे कटुसत्य महात्मा फुले यांनी ओळखून सन १८४८ मध्ये पुणे येथे भिंडेच्या वाड्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली व सावित्री जानेवारी १८४८ रोजी तिथल्या पहिल्या शिक्षिका झाल्या. देशातून पहिली शिक्षिका बनण्याचा मान पटकविला. मनुवादाने बरबटलेल्या नराधमांनी सावित्रीच्या अंगावर शेण, विष्ठा टाकून त्यांना विचलित करण्याचा प्रयत्न केला. पण सावित्रीबाईनी हे तर माझ्या कार्याबद्दल केला जात असलेल्या फुलांचा वर्षावच आहे असे सांगून समतेचा ज्वालामुखी आपल्या हृदयामध्ये सतत धगधगत ठेवून कार्याला गतिमान केले. जेव्हा जोतिबांनी मे १८४९ पुणे येथील उस्मान शेखच्या वाड्यात प्रौढांच्या शाळेची स्थापना केली तेथेही सावित्रीबाईंनी अध्यापनाची महत्वपूर्ण भूमिका बजावली पुढे पुणे, सातारा, गर जिल्ह्यात समाज जागृतीसाठी स्थापन केलेल्या काही शाळांमधूनही सावित्रीबाईंनी शिक्षिकेची भूमिका पार पाडलेली दिसून येते. एवढेच नाही तर सन १८४९ मध्ये शुद्र अतिशुद्रांच्या शिक्षणासाठी आपल्या पतीबरोबर गृहत्याग करून हजारों वर्षापासून उपेक्षित असणाऱ्यांना शिक्षणाचा कानमंत्र दिला. हे करत असताना जोतिबा व सावित्रीचे जीवन विषमतेच्या चटक्याने होरपळून निघत पण त्यांनी आपले लक्ष जरासुध्दा ढळू दिले नाही व आपला लढा सतत तेवत ठेवला. सन १८५२ मध्ये जेव्हा शाळांची तपासणी झाली तेंव्हा सावित्रीबाईंना आदर्श शिक्षीका म्हणून अभिप्राय मिळाला. म्हणूनच १२ जानेवारी १८५३ रोजी मेजर कँडी यांच्या हस्ते फुले दापत्यांचा विश्रामबाग वाड्यात त्याच्या कार्याबद्दल गौरव करणेत आला.

       या प्रेरणेनंतर सावित्री जोतिबा पेटूनच उठले. विषमतेला जाळून खाक करण्यासाठी म्हणूनच त्यांनी हिंदू धर्माच्या सुधारणेसाठी आपले उभे आयुष्य खर्ची घातले. सुधारणेचा भाग पुढे नेत असताना त्यांनी बालविवाह, सतीप्रथा, जातिभेद, कर्मकांड यांचा धिक्कार करुन विधवा पुनर्विवाह एकेश्वरवाद यांचा पुरस्कार केला. तसेच समतेची शिकवण सुध्दा दिली.निष्पाप अर्भकांची हत्या होवू नये म्हणून महात्मा फुलेंनी सुरु केलेल्या बालहत्या प्रतिबंधक गृहाचा सावित्रीबाईने आनंदाने स्विकार केला. या पवित्र कार्याने कित्येक मुलांना जीवनदान मिळाले. सावित्री जोतिबा दांपत्यांना मुलबाळ नव्हते. त्यांनी या गृहातील काशीबाई नावाच्या ब्राम्हण स्त्रीचा मुलगा यशवंत यास दत्तक घेतले डॉक्टर बनविले. अस्पृश्य समाजासाठी सन १८६८ साली जोतिबा सावित्रीने आपल्या घरचा पाचा हौद खुला करुन समतेची क्रांतीच केली. इवला बहुजन समाज अंधश्रध्देच्या खाईत चाचपडत होता. अंधश्रध्देनेच देशाची प्रगती झाली नाही. माणूस माणसापासून दूर गेला आहे म्हणून ते आपल्या साहित्यातून म्हणतात.

धोंडे मुले देती नवसापावती, लग्न का करती । नारी नर ॥

सावित्री वदते । करुन विचार, जीवन साकार करुनि घ्या ।।

     दगडाचे देव जर मुलांना जन्माला घालत असतील तर महिलांना पुरुषांशी लग्न करण्याची गरज काय? असा जळजळीत प्रश्न निर्माण करुन इथल्या व्यवस्थेवर असूड ओढून समाजाला अंधश्रध्देतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला. सावित्रीबाई या मनुवादाने ग्रासलेल्या बोलक्या असणाऱ्या महिला सुधारकाप्रमाणे नव्हत्या तर त्या कठोर राष्ट्रभक्त कर्त्या सुधारक होत्या. पूण्यामध्ये ज्यावेळी सन १८७५ ते १८७७ सतत दोन वर्षे दुष्काळ पडला तेंव्हा अनेक मुले अन्न अन्न म्हणून तडफडून मरु लागली होती. त्यावेळी जोतिबांनी ५२ अन्नछत्रे उभारुन अंध, अपंग लहान मुलांना जेवन घातले. धनकवडी येथेही अन्नछत्र सुरु केले, त्यांची सर्व जबाबदारी सावित्रीबाईंनी स्वतःवर घेतली तेथे स्वतः भाकरी करुन खाऊ घालत होत्या. दररोज दोन हजार भाकरी अन्नछत्रामध्ये तयार करुन वाढल्या जात होत्या त्या कधीही थकल्या नाहीत. त्या तर समतेच्या उर्जा स्त्रोत्र होत्या. सावित्रीबाईंनी जोतिबा फुले घरी नसतानाही अनेक गरजू लोकांच्या गरजा भागवून त्यांना न्याय दिला.

जोतिबा ज्यावेळी आजारी पडले त्यावेळी सावित्रीबाई थोड्या खचल्या. त्यांनी जोतिबांची भरपूर सेवा केली, परंतू यातून जोतिबा सावरु शकले नाहीत. तरीही ते सावित्रीबाईंना प्रेरणा देत होते त्यामुळे सावित्रीबाई खचून जाता सतत कार्यरत राहिल्या. २८ नोव्हेंबर १८९० रोजी जोतिबांचे निधन झाले. सावित्रीबाईवर दुःखाचा डोंगर कोसळला पण मोठ्या धैर्याने त्यांनी हे दुःख झेलले. यशवंतरवांच्या वंशाबद्दल भाऊबंदकीत वाद होऊ लागल्याने स्वतः गाडगे हातात धरुन पतिच्या चितेला अग्नीही दिला. हिंदू धर्मातील जुन्या रुढी परंपरेला मुठमाती देऊन नविन विचार रुजविण्याचा प्रयत्न केला.

सन १८९७ मध्ये पुणे येथे प्लेगची साथ पसरली तेंव्हा सावित्रीबाईंनी मुलगा यशवंत याला पूण्यात प्लेग ग्रस्तांना मोफत सेवा देणेस सांगितले स्वतः प्लेगग्रस्तांना दवाखान्यात घेवून येवू लागल्या. प्लेग ग्रस्तांची सेवा करु लागल्या. ही सेवा सुरु असतानाच त्याही प्लेगच्या शिकार झाल्या. रात्रंदिवस चंदनासम झिजणाऱ्या सावित्रीबाईवर १० मार्च १८९७ रोजी काळाने झडप घातली.

सावित्रीबाई फुले त्यांच्या कृतीयुक्त कार्यामुळे त्या जगातल्या सर्व स्त्री-पुरुषांना दिपस्तंभ ठरतात. त्याच या देशातल्या विद्येच्या खऱ्या देवता आहेत. सावित्रीबाई फुले या लेखिका कवियत्री म्हणूनही प्रसिध्द होत्या. काव्यफुले, बावनकशी, सुबोध रत्नाकर, मातोश्री, सावित्रीबाईंची भाषणे व गाणी इत्यादी साहित्य रचना त्यांच्या नावावर जमा आहे.

 

संदर्भ ग्रंथ :

 

) ओळख थोर नेत्यांची सुरेश तुप्तेवार \ विनयकुमार बालाजी तुप्तेवार.

 ) क्रांतिज्योती सावित्रीबाई जोतीराव फुले : मा. गो. माळी.

) महाराष्ट्रातील समाज सुधारक एन. डी. पाटील.

) महात्मा जोतीराव फुले : धनंजय कीर.

) सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय मा. गो. माळी.


स्वाध्याय: सरावासाठी सोबत दिलेली प्रश्नपत्रिका सोडवा. त्यासाठी खाली दिलेली लिंक कॉपी करून गुगल मध्ये पेस्ट करा.

https://forms.gle/jV2dVLvo9cFxPtct8

 

 

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...