Skip to main content

संत गाडगेबाबांचे शैक्षणिक कार्य

 

ISSN 2278-9308

 

 संत गाडगेबाबांचे शैक्षणिक कार्य

प्रा. फयाज अमीर मोकाशी

समाजशास्त्र विभाग

राधानगरी महाविद्यालय, राधानगरी

                     

प्रस्तावना :

आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक व शैक्षणिक सुधारणेच्या दृष्टीने कार्य करणाऱ्या अनेक व्यक्ती, महात्मे, व संत होवुन गेले त्यात संत गाडगेमहाराजांचा क्रम वरचा आहे. कोणताही गाजावाजा, गुरु शिष्यांचा गोतावळा किंवा स्वतंत्र संस्थान निर्माण न करता, केवळ आपल्या आचरणाने, कीर्तन या सर्वमान्य माध्यमांद्वारे समाज-सुधारणा घडविण्याचा प्रयत्न गाडगे महाराजांनी केला. ईश्वर कशात आहे ही नेमकी जाणीव असलेले आणि गोरगरिब,दिनदलित यांचा ऐहिक व अध्यात्मिक विकास होण्यासाठी अज्ञान, अंधश्रध्दा, अस्वच्छता यांचे उच्चाटन करण्यासाठी तळमळीने कार्य करणारे होते. "तीची घौडापाणी देव रोकडा सज्जणी" असे सांगत दुबळे अपंगाची सेवा करणारे थोर संत म्हणजे गाडगेबाबा.

देवळात जाऊ नका, मुर्ती पूजा करु नका. सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी. पूराणे, मंत्र तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टीवर विश्वास ठेवू नका" अशी शिकवण त्यांनी लोकांना दिली. माणसांत देव शोधणाऱ्या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम विद्यालये सुरु केली. रंजले गांजले, दिन-दुबळे, अपंग अनाथ हेच त्यांचे देव या देवातच गाडगेबाबा अधिक रमत असत. डोळ्यावर झिज्या त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके असा त्यांचा वेश होता. सतत पन्नास वर्षे जनसामान्यांचे प्रबोधन जीवाच्या आकांताने करणारे ते लोकोत्तर महापुरुष होते.

अल्प परिचय :

अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील शेणगाव येथे २३ फेब्रुवारी १८७६ साली महाशिवरात्रीला गाडगेबाबांचा जन्म झाला. त्यांचे पूर्ण नाव डेबूजी (देवीदास) झिंगराजी जाणोरकर असे होते. त्यांच्या आईचे नाव: सखुबाई होते. ते परीट घराण्यात जन्माला आले होते. त्यांची घरची प toरिस्थिती चांगली होती. ेणगाव हे शहरापासून दूर असल्यामुळे सुधारणांचा अभाव होता. मात्र सर्वत्र दिसणान्या दारुच्या व्यसनाचा प्रसार झालेला होता. परीट समाज हा फार मोठ्या प्रमाणात सुधारलेला नव्हता. लोकांचे कपडे धुवावेत व त्याबद्दल मिळणाच्या मोबदल्यात आपला चरितार्थ चालवावा त्यातच कर्ज काढून सण साजरे करावेत, मुलाच्या जन्माच्या वेळी किंवा कोणाच्या मृत्यूच्या वेळी देवाला बकरे कापावे, दारू प्यावी आणि कर्ज फेडण्यात पुढील आयुष्य घालवावे हीच सर्वत्र परंपरा होती. झिंगराजीची आर्थिक स्थिती चांगली असल्यामुळे ते दारुच्या व्यसनाधीन झाले. सर्व जमीन, घर सावकाराच्या ताब्यात गेले. नवऱ्याच्या व्यसनामुळे सखुबाईला मोलमजुरी करावी लागली. मूलाला पोटभर अन्न देणे अशक्य झाले. त्यातच झिंगराजीचा मृत्यू झाला.

सखुबाईचे बंधू चंद्रभानजी यांनी तिचा मुलगा डेबू याला दापूरे या गावी आणले. मामाची मोठी शेतजमीन असल्याने घरी शेती व्यवसायच होता. बंधुच्या आश्रयाने राहावयाचे असल्याने मोठ्या प्रमाणावर कष्ट करावे. हा आपला एकच आधार आहे. यांची सखूबाईना जाणीव झाली. हीच जाणीव लहानशा डेबूच्या मनात मातेने रुजविली. लहानपणी डेबूला मामाची गुरे चारण्याचे काम करावे लागत होते. अशा स्थितीत शाळेत जाण्याचा किंवा शिक्षण घेण्याचा प्रश्नच निर्माण झाला नाही. मामाच्या घरी शिळ्या भाकरीवर राहून त्यांना गुरे सांभाळावी लागत. आपल्या सवंगड्यांबरोबर जातीपातीचा विचार न करता ते एकत्र जेवत. बालमित्रांच्या बरोबर पोहणे, हुतूतु, आट्यापाट्या, सुरपारंब्या, कुस्ती इत्यादी खेळ ते खेळत असत. थोड्याच दिवसांत त्यांच्यावर मामाच्या शेतीचा भार पडला. नांगरणी, पेरणी, मळणी या कामात त्यांनी प्राविण्य मिळविले. शेतीचे काम संपताच ते रात्रीच्या भजनात रममाण होत असत. भजन म्हणण्याच्या त्यांच्या पध्दतीमुळे त्यांची भजनी मंडळात लोकप्रियता वाढत गेली. मामा कर्जाच्या जाळ्यात अडकला होता. याची जाणीव होताच त्यांनी सावकाराचे कर्ज फेडले. मामाच्या अज्ञानाचा फायदा घेतान जमीन बळकविणान्या सावकाराचा हेतु त्यांनी सफल होऊ दिला नाही. आपल्या कर्तृत्वाचा पंचक्रोशीत धाक निर्माण केला. लोक त्यांना देवसिंग म्हणू लागले. डेबूजींचे वय १५-१६ वर्षाचे असताना धनाजी परीटाची कन्या कुंताबाई हिच्याबरोबर १८९२ मध्ये विवाह झाला. घरातील सर्व मंडळी चिकाटीने शेतावर काम करू लागली. त्यामुळे घरची परिस्थिती सुधारु लागली. दरम्यान त्यांना अलका (१८९९), कलावती (१९००) या दोन मुली व मुद्गल (९०२)व गोपाळ (१९०५) अशी दोन मुले झाली. त्यावेळी परीट समाजात मुल जन्माला आले की मोठे जेवण देण्याची पध्दत होतो. बोकडाची तंदूरी व दारु असावेत असे, मात्र डेबूजीनी अशी जेवणावळ देण्यास नकार दिला. त्यांनी स्पष्ट सांगितले.

" आपण ज्या इच्छेने घरी आला आहात ती इच्छा पूरी करण्यास मी समर्थ नाही पानावर चांगले गोडधोड आहे, पोटभर खा. आनंद करा. दारु, मटनाने आजपर्यंत समाजाचे वाटोळे झाले तेवढे पुरे झाले. आता जरा माणसात येऊन माणुसकीने वागू या सगळे." डेबुजी सुखी होता. घर धनधान्यांनी भरले होते. ते इतरांच्या सुखदुःखात रमत असत अडचणीत सापडला असेल तर ते मदत करत. डेबूजींचा संसार हळूहळू मार्गी लागला. सखुबाई घर सांभाळावयाच्या डेबूजी शेती अखंड लोकसेवा यात गढलेले असावयाचे. त्यांचे मन संसारात रमण्याऐवजी ते विरक्तीच्या मार्गाकडे झुकू लागले. मानवी जीवनातील दुःख, दैन्य, अनिश्चितता इत्यादि गोष्टींच्या अनुभवाने ते अंतर्मुख बनले. जीवनातील निरनिराळ्या प्रश्नांचा शोध घेण्याचा प्रयत्न ते करु लागले. स्वतःच्या संसारातील त्यांचे लक्ष उडाले. फेब्रुवारी १९०५ या दिवशी जगाचा संसार सुखी करण्यासाठी ते घराबाहेर पडले. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र या प्रदेशात ते भटकले. अंगावर फाटक्या चिध्याचे कपडे, अन्न व पाणी घेण्यासाठी गाडगे असा वेश त्यांनी धारण केला या काळात त्यांनी कठोर तपश्चर्या केली. काम केल्याशिवाय भाकरीचा तुकडा तोडला नाही. विचित्र वेशभूषेमुळे लोकाकडुन शिव्याशाप, उपहास, छळवणूक व निंदा त्यांनी शांतपणे सहन केली. या काळात दिन दुबळ्या समाजामध्ये राहताना दैन्य व दुःखाचे त्यांनी जवळून निरिक्षण केले. मरेपर्यंत कष्ट करणान्या आई वडिलांना आपल्या पोरांना अन्न देवू शकत नाही. पुरुष दारुच्या व्यसनापायी बायकोला मारहाण करतो. बायको घर सोडुन जाते, वान्यावर पडलेली पोरे आपापला मार्ग शोधतात. शिक्षणाचा गंध नसलेला हा समाज अज्ञानाच्या चिखलात रुतलेला असतो. तो वेळोवळी नाडला जातो. गावोगावी फिरत असताना सावकाराच्या कर्जापोटी चिरडली गेलेली कुटुंबे पाहिली. आयुष्यभर शेतीत राबणाऱ्या बैलाची म्हातारपणी कसायास विक्री करणारे शेतकरी पाहिले, त्यांना या लोकांची चीड आली. अनेक देवदेवता, त्यांच्या पूजा पध्दती, त्यांना बळी अर्पण करण्यासाठी होणाऱ्या बकरी व कोंबड्याची प्रचंड हत्या पाहून त्यांना उबग आली. भगत, मांत्रिके, गंडेदोरे ताईत देणारे देवऋषी यांचा दांभिकपणा त्यांच्या लक्षात आला. हे बदलले पाहिजे याची जाणीव त्यांना झाली. यासाठी आपल्या अंगी असलेले सर्व बळ पणाला लावून प्रयत्नाची पराकाष्ठा करण्याचा त्यांनी निश्चय केला. समाजातील शिक्षणाचा अभाव, कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरिती व अंधश्रध्दा पाहून त्यांनी निरपेक्ष लोकसेवेचे व लोकशिक्षणाचे व्रत स्वीकारले. वयाच्या ८० वर्षापर्यत गाडगेबाबांनी अखंड सेवाकार्य केले. अशा या थोर संताची प्राणज्योत २० डिसेंबर १९५६ रोजी मालवली. शैक्षणिक कार्य : गाडगेबाबा स्वतः निरक्षर होते. तरीही ते हाडाचे शिक्षक व शिक्षण प्रसारक होते, ज्ञान प्रसारक होते. शिक्षणाशिवाय शहाणपणा येत नाही. हाणपणाशिवाय माणूस घडत नाही. लोकांना आपल्या मुलाबाळांना शिकवायला प्रवृत्त केले. त्यांनी अनेक शाळा काढल्या. शिक्षण हे गरीबापर्यंत पोहचले पाहिजे. असा त्यांचा दृष्टीकोन होता. व्यवहारात यशस्वी होण्यासाठी काटकसर व हिशोबीपणा आवश्यक आहे. गरीब माणूस या दोन्ही गोष्टी करु शकत नाही त्यामुळे तो गरीब राहतो. त्यासाठी शिक्षणाची गरज आहे. म्हणूनच पालकांना मुलांना शिक्षण देण्याचा उपदेश केला. शिक्षणामुळे आर्थिक फायदा होतो. शहाणपण येते. समाजात अधिकार प्राप्त होतो. समाजाचे नियमन करणे धार्मिक व सांस्कृतिक नियंत्रण करणे यात विशिष्ट वर्गाची मिरासदारी होती ती तोडून काढावयाची असेल तर समाजातील लोकांनी शिकले पाहीजे. शास्त्रे शिकावीत आणि धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्रात ही अधिकार प्राप्त करून घ्यावा असे त्यांचे आवाहन होते. अध्यात्म्याच्या जंजाळात न शिरता त्यांनी समाजाला साधी राहणी, मानवता, भूतदया व स्वच्छता यांची शिकवण दिली. तुकाराम महाराज माझे गुरु आहेत. पण माझा कोणी शिष्य नाही असे ते म्हणत. गाडगेबाबांनी लोकशिक्षणाची चळवळ महाराष्ट्रात उभी केली त्यांनी लहानपासून भजनाची आवड होती. अभंग त्यांना पाठ होते. बाबांनी कीर्तनाच्या माध्यमातुन लोकांना जागृत केले. मुळातच त्यांनी लोकशिक्षणाचा आणि समाज सुधारणा याचा ध्यास घेतला होता. त्यासाठी त्यांनी कीर्तनाचा माध्यम म्हणून वापर केला त्यांनी आपल्या

कीर्तनातून भूकेलेल्यांना अन्न

 

तहानलेल्यास पाणी नागड्यांना वस्त्र

 

शिक्षणासाठी गोरगरिब मुला-मुलींना मदत

 

बेघरांना आसरा अंध-पंगू रोगी पिडीतांना औषधे

 

बेकारांना काम

 

पशुपक्षावर दया

 

गरीब तरुण तरुणींच्या संसारासाठी मदत दयावी असे सांगीतले.

 

ज्ञानानेच व्यक्तीचा, समाजाचा आणि राष्ट्राचा विकास होतो. त्यासाठी आपल्या पोराबाळांना शिक्षण दयावे हे बाबा आपल्या कीर्तनातून सांगत, कीर्तनातून बाबांनी समाजाच्या अज्ञान आणि दुर्गुणावर प्रहार के. बाबांची भाषा साधी, सोपी आणि श्रोत्यांच्या हृदयाला जाऊन पोहचणारी होती. त्यांची डोळसवृत्ती आणि निरीक्षण शक्ती अफाट होती. त्यांचे बोलणे सॉक्रेटिस प्रमाणे संभाषणरूप असे. त्यांनी महाराष्ट्र, र्नाटक, आंध्रप्रदेश आणि गुजरातमध्ये लोकशिक्षणासाठी पायपीट केली. त्याचबरोबर धनिकांनाही आवाहन करताना शिक्षणाकडे पाहण्याचौ दृष्टी बदला, एकवेळ भंडारासप्ताह याचे जेवण देऊ नका, देवळे, मंदिरे, घाट, धर्मशाळा बांधणे थांबवा व गरिबाच्या शिक्षणासाठी खर्च करा. बापहो, ुम्ही गरिबाले शिक्षणासाठी मदत करा, गरिबाच्या पोराला पाटी दया, पेन्शिल दया, टोपी दया, चट्टी दया, तुमचा दानधर्म गरिबाच्या मुलासाठीच असू दया, सामान्य माणसाने का शिकावे हे सांगताना बाबा म्हणत माणसाने कर्तृत्व संपन्न होण्यासाठी शिकावे, गुण, शक्ती, दृष्टी, कौशल्य आणि कर्तव्य यांचा विकास शिक्षणानेच होतो.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर त्यांना भेटण्यासाठी आले तेव्हा बाबा किर्तनात म्हणतात. आंबेडकर साहेबांच्या वडिलांना बाबासाहेबांना शिक्षण देण्याची सुबुध्दी झाली. त्यांनी शाळेत घातले. आंबेडकर शिकले सवरले बॅरीस्टर झाले. ज्या आंबेडकरांनी रस्त्यावरच्या दिव्याखाली बसून अभ्यास केला, त्यांनी भारताची घटना लिहून आपले नाव अजरामर केले. मग आपले हे लोक का गरिबीत ज्याला विद्या नसेल त्याला खटायाचा बैल म्हटला तरी चालेल. मायबापहो आता तरी सुधारा, आता तरी मुलांना शिक्षण दया. विद्या नसणे हा कलंक आहे. हा कलंक धुवून काढायचा असेल तर मुलांना शिक्षण दया. गोरगरिबांना शिक्षण देवून पुण्य मिळवा तुम्ही जर गरिबाला शिक्षणासाठी मदत केली नसेल तर तुमचे वैभव काय कामाचं तुम्ही स्वतः जितके सुख भोगले पैकी एका टक्का तरी गरिबाच्या सुखात सहभागी व्हा. मगच तुम्ही माणूस व्हाल. हाच खरा माणुसकीचा विचार आहे. गाडगेबाबाच्या शिक्षण विषयक दृष्टीकोनात शैक्षणिक साक्षरता हा एक घटक दिसून येतो त्याहीपेक्षा आरोग्यविषयक जाणीव, अंधश्रध्दा निर्मूलन, लोक कल्याणाची जाणीव, गरिबी हरविण्यासाठी कार्यात्मकतेचा विकास हा गाडगेबाबांना शिक्षणातून अपेक्षित होता. शिक्षणातून माणसांच्या अंधश्रध्दा दूर होतील अशी अपेक्षा गाडगेबाबांनी बाळगलेली आढळते.

     गाडगेबाबा सारख्या एकट्या निरक्षर माणसाने शिक्षण प्रसारासाठी भगीरथ प्रयत्न केले. समाजातला शोषित माणुसं' आपल्या शिक्षण विषयक कार्याचा केंद्रबिंदू मानला. शिक्षणातून सामान्यांचे सामर्थ्य वाढविण्याचा बाबांनी समर्थ प्रयत्न केला. कोट्यावधी भूमिपुत्रांशी मातीवर उभा राहून बाबांनी शिक्षण विषयक सुसंवाद साधला हेच बाबांचे खरेखुरे समाज प्रबोधन होते. यासाठी गाडगेबाबांनी सान्या महाराष्ट्राची शाळा केली. बाबा एक थोर समाज शिक्षकच होते. शोषित माणसाला शोषणमुक्त करून त्याला सुखाचा मार्ग दाखवत होते. ज्ञान हा तिसरा डोळा आहे ज्ञानाशिवाय शहाणपण येत नाही. शहाणपणाशिवाय सुख मिळत नाही म्हणूनच सर्वप्रथम "सर्वासाठी शिक्षणाची नितांत गरज आहे. असे गाडगे बाबा सांगत असत.' प्रसिध्द शिक्षण शास्त्रज्ञ पावलो फ्रिअरी याने शिक्षणाची जी साक्षरता, जाणीव जागृती (Literacy,Concentization, Functionality )ही त्रिसूत्री सांगितली ती गाडगेबाबांच्या शिक्षण विषयक विचारात ही दिसून येते. नोबेल पारितोषिक विजेत्या, ज्यांना जगाने समाजसेविका म्हणून मान्यता दिली आहे त्य पद्मश्री मदर तेरेसा श्री. संत गाडगेबाबांच्या जन्म शताब्दी सोहळ्यात समारोप प्रसंगी म्हणाल्या, "परमेश्वराने संत गाडगे महाराजासारख्या थोर विभूतीना जन्माला घालून मानवतेवर फार मोठे उपकार केलेले आहेत. विद्येचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी बाबांनी फक्त उपदेश केलेला नाही तर शिक्षणाची लाट खेडोपाडी पोहचविण्यास सरकारला फार मोठा हातभार लावला आहे. जनतेच्या ज्ञान संवर्धनासाठी विविध नि विपुल संस्था निर्माण केल्या आहेत. "चीन्याऐंशी रोगावर शिक्षण हा एकच रामबाण उपाय आहे." अशिक्षित माणसात आणि जनावरांत काही एक फरक नाही. अशिक्षित माणसाला सावकार बुडवितो, सरकारी नोकर दरडावितो, लबाड लोक बुडवतात तुम्हाला स्वाभीमानाने जिणे जगावयाचे असेल तर माझ्या मायबापांना शिक्षण घ्या असे सांगितले समारोप गाडगे महाराजांनी गोरगरीब मुलांच्या शिक्षणात विशेष रस घेतलेला होता. बहुजन समाजात शिक्षणाचा प्रसार झाल्याखेरीज त्यांच्या परिस्थितीत सुधारणा होणार नाही. असे त्यांचे मत होते त्यामुळे त्यांनी समाजातील अनेक धार्मिक व्यक्तींना निरनिराळ्या शिक्षणसंस्थांना आर्थिक सहाय्य देण्यास प्रवृत्त केले होते आपल्या प्रभावाचा उपयोग करुन त्यांनी साताज्याच्या श्री. भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत जावून तेथील वस्तीगृहातील विद्याथ्र्यांच्या अंगावरुन कितीदा तरी हात फिरविला. रयतशिक्षण संस्थेच्या कमी केलेला सरकारी निधी परत मिळवून दिलेला दिसून येतो. तसेच विदर्भातील डॉ. पंजाबराव देशमुख यांनी चालविलेल्या श्री. शिवाजी संस्थेच्या शाळा मध्ये बाबा अनेक वेळा गेलेत त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या पिपल्स एज्युकेशन सोसायटीला मदत केली. मुर्तिजापूरला आले असता नानासाहेब तिडके यांनी सुरु केलेली शाळा बंद पडली होती ती निर्माण झालेली जागेची अडचण जागा देवून सोडविली अर्धवट शिक्षण सोडून दिलेला कोणी मुलगा बाबांना भेटला की स्वतः त्याला वस्तीगृहात घेऊन जात. अशा शिकणाऱ्या मुलांसाठी बाबा आपल्या माणसाकडून वह्या, पुस्तके, कपडे पाठवित, हुशार विद्यार्थ्याचे कौतुक करीत आनंदाने कवटाळीत आणि कर्तनातुन त्याचे जाहीर कौतुक केले जात असे.

     अशा प्रकारे गाडगे महाराजांनी लोकजागृती वर भर देऊन आणि समाजसेवेचे व्रत स्विकारुन महाराष्ट्रातील बहुजन समाजाची स्थिती सुधारण्यासाठी अविरत कष्ट उपसले होते. सामाजिक, शैक्षणिक आणि धार्मिक क्षेत्रात समाजवाद स्थापन करणाऱ्या, खरा लोकशाही मंत्र खेडोपाडी पोहचविण्यास ज्ञानाचा पिंपळ दारोदारी फुलविणाऱ्या गाडगेबाबांचे विस्मरण महाराष्ट्राला अशक्य आहे.

 

संदर्भ :

. संत गाडगे महाराज स्मारक ग्रंथ

. कर्मयोगी गाडगेबाबा

. दीपस्तंभ

 

संपादक, प्रा. रा. तु. भगत

- मनोज तायडे

-प्राचार्य शिवाजीराव भोसले

. श्री. संत गाडगे महाराज

. मानवतेचे पुजारी श्री संत गाडगेबाबा

मधुकर केचे

- डॉ. उध्दव रसाळे

. महाराष्ट्रातील समाज सुधारणेचे इतिहास प्रा. भिडे, पाटील, थोरात

Comments

Popular posts from this blog

Internal Evaluation_Winter Semester_2024-25

  Winter Semester Internal Evaluation 2024-25 Dept. of English सूचना : १.         सर्व विद्यार्थ्यांनी आपले अंतर्गत मूल्यमापनाचे काम दि. ०४ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर २०२४ यादरम्यान पूर्ण करायचे आहे. यानंतर कोणाचेही होम असाइनमेंट/सेमिनार/ग्रुप अॅक्टिव्हिटी स्वीकारली/घेतली जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी. २.         होम असाइनमेंट/सेमिनार यासाठी महाविद्यालयाने उपलब्ध करून दिलेल्या वह्यांचाच वापर करावा. सदर वह्या महाविद्यालयाच्या कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत. ३.           बीए/बीकॉम भाग दोनच्या विद्यार्थ्यांनी ग्रुप अॅक्टिव्हिटीसाठी खालील नंबरवर संपर्क साधावा. बीए भाग दोन :  English (Compulsory): 9975669140 बीए भाग दोन :  English (Optional): 9890355376 बी कॉम भाग दोन :  English: 9766188306 Class: BA I                            1.   Subject: English (AEC)    ...

Serpent Lover

  (e-content developed by Prof. (Dr) N A Jarandikar) The Serpent Lover                                               -     A. K. Ramanujan ए. के. रामानुजन हे इंग्रजीतून लेखन करणारे एक महत्त्वाचे भारतीय लेखक आहेत. त्यांची ओळख ही मुख्यत्वे एक कवी म्हणून आहे. भारतीय लोककथांमध्ये त्यांना विशेष रुची होती. आयुष्यातील कित्येक वर्षे त्यांनी भारतीय , विशेषतः कन्नड लोककथा गोळा करण्यामध्ये व्यतीत केली आहेत. प्रस्तुतची कथा ‘ The Serpent Lover ’ ही अशीच एक कन्नड लोककथा आहे. ही कथा त्यांच्या ‘ A Flowering Tree’ या पुस्तकातून घेण्यात आलेली आहे. कामाक्षी नावाची एक तरुण स्त्री या कथेची नायिका आहे. कामाक्षीचे एका तरूणाबरोबर लग्न झाले आहे. पण हा तरुण बाहेरख्याली असून त्याचे अन्य एका स्त्रीसोबत (concubine— विवाहबाह्य संबंध असणारी स्त्री) ) संबंध आहेत. कामाक्षीला याची कल्पना आहे. एक दिवस आपला नवरा आपल्याकडे परत येईल , या आशेवर ती जगत आहे. अशीच २-३ वर्षे गेल्यानंतर , ...

Model Millionaire

  (e-content developed by Prof (Dr) N A Jarandikar) ‘ The Model Millionaire’ ‘द मॉडेल मिलियनेअर’ (‘ The Model Millionaire’ /आदर्श लखपती) ही कथा ऑस्कर वाइल्ड (Oscar Wilde) या लेखकाने लिहिलेली आहे. कोणताही हेतू न बाळगता चांगल्या मनाने केलेली मदत ही अनमोल कशी असते, याविषयीची ही गोष्ट आहे. या गोष्टीमध्ये पुढील पात्रे आहेत : १.        ह्युई अर्सकाईन ( Hughie Erskine): हा या कथेचा नायक आहे. २.        अॅलन ट्रेव्हर ( Alan Trevor ) : हा एक चित्रकार आणि ह्युईचा मित्र आहे. ३.        बॅरन हाऊजबर्ग ( Baron Hausberg ) : हा अॅलन ट्रेव्हरसाठी मॉडेल म्हणून काम करतो आहे. ४.        लॉरा मेर्टन ( Laura Merton ): ही ह्युईची प्रेयसी आहे. ही कथा लंडन शहरामध्ये घडते. ह्युई अर्सकाईन हा एक तरुण आणि रुबाबदार युवक आहे. त्याचे वर्णन पुढीलप्रमाणे केलेले आहे : 1. wonderfully good looking; 2. crisp brown hair; 3. clear-cut profile; 4. grey eyes. त्याच्या वडलांनी त्यांच्या पश्चात आ...