(J. D.
Ingawale)
बी.ए.
3 सेमी
6 पेपर
15 आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र
व्यापारतोल आणि व्यवहारतोल.
(Balance
of Trade and Balance of Payments)
प्रास्ताविक
आंतरराष्ट्रीय व्यापारात निरनिराळ्या देशांत वस्तू व सेवांची आयात-निर्यात चालू असते. अशा व्यवहारातून आंतरराष्ट्रीय स्वरूपाची येणी देणी निर्माण होत असतात. प्रत्येक देशाने आयात केलेल्या दृश्य वस्तू आणि सेवारूप वस्तूंबद्दल दुसऱ्या देशाला पैसे द्यावे लागतात आणि निर्यात केलेल्या वस्तू आणि सेवांबद्दल दुसऱ्या देशाकडून पैसे यावयाचे असतात.
आयात निर्यात वस्तूंचे दोन प्रकारांत वर्गीकरण केले जाते. (१) दृश्य वस्तू (Visible Goods) यामध्ये अन्नधान्य, कापड,
सोने, यंत्रसामग्री इत्यादी मूर्त वस्तूंचा समावेश होतो. (२) अदृश्य वस्तू (Invisible Goods) यामध्ये बँका, विमा कंपन्या, वाहतूक संस्था इत्यादींकडून केल्या जाणाऱ्या अमूर्त स्वरूपाच्या सेवांचा समावेश केला जातो
आंतरराष्ट्रीय व्यवहारातून जी येणी देणी निर्माण होतात त्यांचे हिशेब ठेवण्याच्या पद्धतीच्या संदर्भात आंतरराष्ट्रीय व्यापारतोल आणि आंतरराष्ट्रीय व्यवहारतोल या दोन संकल्पना अभ्यासणे महत्त्वाचे आहे.
व्यापारतोल वा व्यापारशेषाचा अर्थ
(Meaning of Balance of Trade - B.O.T.)
एखाद्या देशातील विशिष्ट कालखंडात फक्त जड वस्तूंच्या आयात-निर्यातीचे पैशातील मूल्य
'ज्यामध्ये दाखविले जाते असा ताळेबंद अगर जमा-खर्च म्हणजे व्यापारतोल होय. हा देशाच्या आयात-निर्यातीचा जमा-खर्च असतो. तथापि, या जमा खर्चात फक्त दृश्य वस्तूंच्या आयात-निर्यातीचा हिशेब मांडलेला असतो. अर्थात, या दृश्य वस्तू म्हणजे अन्नधान्य, कापड,
यंत्रसामग्री, कोळसा, लोखंड,
मसाल्याचे पदार्थ यांसारख्या जड वस्तू
(Material Goods) होत. सारांश,
'दृश्य वस्तूंच्या आयात-निर्यातीचे मूल्य दर्शविणारे पत्रक म्हणजे व्यापारशेष होय.'
यामध्ये अदृश्य वस्तूंचा समावेश होत नाही. सामान्यतः एक वर्षाचा कालावधी विचारात घेतला जातो.
व्यापारशेषाच्या संकल्पना व्यापारशेषाच्या प्रमुख तीन संकल्पना आहेत.
१. समतोल व्यापारशेष (Balanced Balance of
Trade) एखाद्या देशाचे एका • वर्षातील दृश्य वस्तूंच्या आयातीचे मूल्य आणि दृश्य वस्तूंच्या निर्यातीचे मूल्य समान झाले असेल तर त्या देशाचा व्यापारशेष समतोल आहे असे म्हणतात. समजा,
एका वर्षात भारताने १०,००० कोटी रुपयांच्या दृश्य वस्तू आयात केल्या व त्याच काळात १०,००० कोटी रुपयांच्या दृश्य वस्तु निर्यात केल्या तर भारताचा व्यापारतोल समतोल होईल. मात्र असा समतोल सहसा साधला जात नाही.
२. अनुकूल व्यापारशेष (Favourable Balance of Trade) एखाद्या वर्षी देशातील दृश्य वस्तूंच्या आयात मूल्यापेक्षा निर्यात मूल्य जास्त असते तेव्हा निर्यात जास्त झाल्याने इतर देशांकडून येणे असेल तर त्या देशाचा व्यापारशेष अनुकूल आहे असे म्हटले जाते. समजा, एका वर्षात भारताने १०,००० कोटी रुपये किमतीच्या दृश्य वस्तूंची निर्यात केली आणि त्या कालावधीत ८,००० कोटी रुपयांच्या दृश्य वस्तूंची आयात केली असेल तर इतर देशांकडून भारताला २,००० कोटी रुपये येणे निर्माण होईल. व्यापारतोल अनुकूल होईल.
३. प्रतिकूल व्यापारशेष (Unfavourable Balance
of Trade) एखाद्या वर्षी देशातील दृश्य वस्तूंच्या निर्यात मूल्यापेक्षा आयात मूल्य जास्त असेल तर संबंधित देशाचे देणे निर्माण होऊन व्यापारशेषात तूट निर्माण होईल.
यालाच प्रतिकूल व्यापारशेष असे म्हणतात.
समजा, भारताने एका वर्षात १०,००० कोटी रुपये किमतीच्या दृश्य वस्तूंची निर्यात केली आणि याच काळात १२,००० कोटी रुपये वस्तूंची आयात केली तर भारताच्या व्यापारशेषात २,००० कोटी रुपयांची तूट निर्माण होईल.
व्यापारतोलात जेवढी तूट निर्माण होत असे तेवढ्या किमतीच्या सोन्याच्या संबंधित देशाला निर्यात करावी लागे. म्हणूनच त्यांनी देश आर्थिकदृष्ट्या समृद्ध करण्यासाठी देशाचा व्यापारतोल नेहमी अनुकूल ठेवण्याच्या धोरणाचा पुरस्कार केला. सध्या एकूण आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दृश्य वस्तूंच्या आयात-निर्यातीबरोबरच अदृश्य किंवा सेवारूप वस्तू, यांची आयात-निर्यात वाढल्याने अनुकूल व्यापारशेष किंवा प्रतिकूल व्यापारशेष याला विशेष महत्त्व राहिलेले नाही.
एखाद्या देशाच्या व्यापारतोलात निर्माण झालेली व्यवसाय तूट विमा, बँकिंग व्यवसाय,
वाहतूक व्यवसाय यांसारख्या सेवांचा पुरवठा अन्य देशांना करून भरून काढता येते. म्हणूनच आंतरराष्ट्रीय व्यापारतोलापेक्षा आंतरराष्ट्रीय व्यवहारतोलाची संकल्पना अधिक व्यापक आणि महत्त्वपूर्ण ठरते.
पूर्वी व्यापारतोलातील तूट सोन्याच्या निर्यातीने भरून काढली जाई. पण सध्या आर्थिक व्यवहारात खूपच वाढ झाली आहे. दृश्य वस्तूंच्या आयात-निर्यातीबरोबर अदृश्य वा सेवारूप वस्तूंची आयात-निर्यात प्रचंड वाढल्याने व्यापारतोलाच्या संकल्पनेला महत्व राहिले नाही. एखाद्या देशाला व्यापारतोलातील तूट भरून काढणे शक्य आहे. म्हणूनच आंतरराष्ट्रीय व्यापारतोलापेक्षा व्यवहारतोलाची कल्पना अधिक व्यापक व महत्त्वपूर्ण आहे.
व्यवहारशेष अथवा व्यवहारतोलाचा अर्थ व व्याख्या
१. प्रो. किंडलबर्जर:
“एखाद्या देशातील नागरिकांनी इतर देशांच्या नागरिकांबरोबर केलेल्या विशिष्ट काळातील सर्व आर्थिक व्यवहारांच्या पद्धतशीर हिशेबाला व्यवहारतोल म्हणतात."
२. प्रो. डब्ल्यू.
सी. पीटरसन
: “राष्ट्राच्या आंतरराष्ट्रीय आर्थिक समतोलात सर्व आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांचा समावेश होतो. ज्यामध्ये काही विशिष्ट काळातील एका देशाच्या नागरिकांनी जगातील इतर देशांतील नागरिकांबरोबर केलेल्या व्यवहारांचा समावेश असतो."
यामध्ये पुढील महत्त्वाचे घटक असतात. (१) व्यवहारतोल म्हणजे एखाद्या देशाचा जगातील इतर देशांशी असलेला आर्थिक व्यवहाराचा पद्धतशीर हिशेब असतो. (२) यामध्ये सामान्यतः एक वर्षाचा
(विशिष्ट) कालावधी गृहीत धरला जातो. यामध्ये दृश्य व अदृश्य वस्तू तसेच चालू व खात्यांचा समावेश असतो. • एखाद्या देशाच्या व्यवहारतोलावरून त्या देशाच्या आर्थिक परिस्थितीची कल्पना येते.
चालू आणि भांडवली खाते (Current and Capital Account) हिशेबाच्या सोईसाठी व्यवहारतोलाचे पुढील दोन भाग केले जातात.
(अ) चालू खाते (Current Account) : यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारातून निर्माण होणाऱ्या वास्तव आर्थिक व्यवहारांचा समावेश केला जातो. दृश्य वस्तूंच्या व्यवहाराने निर्माण होणारी येणी देणी यांची नोंद केली जाते. तसेच अदृश्य स्वरूपाच्या व्यवहाराने निर्माण होणारी येणी देणी यांचीही नोंद केली जाते. यामध्ये सामान्यतः पुढील बाबींचा समावेश होतो. (१) आयात-निर्यात व्यापारी माल ज्यामध्ये खाजगी व सरकारी आयात निर्यातीचा समावेश असतो. (२) अचलनजन्य सोन्याची हालचाल (३)
परदेशी लोकांचा प्रवास (४)
वाहतूक (५) गुंतवणूक उत्पन्न (६)
किरकोळ (७) अधिकृत व खाजगी रकमेचे हस्तांतर (८) सरकारी व्यवहार ज्यांचा इतरत्र समावेश नाही. (९) विमा इत्यादी.
(ब) भांडवली खाते (Capital Account) : यामध्ये कर्जाच्या देण्याघेण्याचे व्यवहार आणि मालमत्तेच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारांचा समावेश होतो. बँकांची कर्जे, सरकारची कर्जे, परकीय मदत, विविध प्रकारचे निधी,
आंतरराष्ट्रीय वित्तपुरवठा संस्थांचे व्यवहार यांचाही समावेश होतो. हे घटक सामान्यतः पुढीलप्रमाणे असतात. (१) खाजगी अल्पकालीन व दीर्घकालीन कर्जे (बँकेतर)
(२) बँकांची (मध्यवर्ती बँक सोडून) कर्जे (३)
अधिकृत कर्जे, संकीर्ण कर्जे,
इतर राखीव निधी इत्यादी.
व्यवहारतोलातील घटक
1. दृश्य वस्तूंचे मूल्य : देशाने आयात केलेल्या व निर्यात केलेल्या धान्य, कापड, यंत्रसामग्री मसाल्याचे पदार्थ यांसारख्या वस्तूंच्या (Merchandise) किमती हिशेबात परल्या जातात. एकूण हिशेबात अशा वस्तुमूल्यांचे प्रमाण जास्त असते.
२. वाहतूक कंपन्या, विमा कंपन्या आणि बँका यांच्या सेवा
: आपल्या देशात .मालाची आयात करताना अर्मन बोटीने सागरी वाहतूक केली असेल, तेथील विमा कंपनीने मालाचा विमा उतरविला असेल, तेथील बँकांनी चेक वटविणे, हुंड्या वटविणे, हमीपत्र देणे, यांसारख्या सेवा उपलब्ध करून दिल्या असतील तर या विविध सेवांबद्दल आणि कामगिरीबद्दल आपल्या देशाने जर्मनीला वाहतूक आणि विम्याचे पैसे आणि इतर सेवांबद्दल कमिशन द्यावे लागेल. या देण्याचा उल्लेख आपल्या व्यवहारतोलाच्या देणे बाजूला करावा लागेल. याउलट आपल्या देशाने वरील प्रकारच्या सेवा इतर देशांना उपलब्ध करून दिल्या असतील तर त्याबद्दल येणे असलेली रक्कम आपल्या व्यवहारतोलात येणे बाजूला दाखवावी लागेल.
३. विद्यार्थी व प्रवासी यांचा खर्च : आपल्या देशातील काही विद्यार्थी परदेशात शिक्षणासाठी जातात, विविध संस्थांमधील काही मान्यवर व्यक्ती परदेशातील माहिती मिळविण्यासाठी जातात तर काही हौशी प्रवासी म्हणून परदेशात जातात.
त्यांनी परदेशात केलेला खर्च आपल्या व्यवहारतोलात देणे बाजूला दाखवावा लागेल तसेच परकीय विद्यार्थी, प्रतिनिधी, परकीय प्रवासी यांनी आपल्या देशात केलेला खर्च आपल्या येणे बाजूला दाखवितात.
४. नोकरी व व्यवसायापासून मिळणारे उत्पन्न : आपल्या देशातील काही लोक नोकरी किंवा व्यवसायानिमित्त परदेशात जातात.
तेथे ते व्यापार, उद्योग किंवा नोकरी करतात आणि मिळविलेला पैसा मायदेशी पाठवतात. त्याचा समावेश आपल्या व्यवहारतोलात जमा बाजूस करावा लागेल. उलट, परकीय लोक आपल्या देशात येऊन नोकरी, व्यापार किंवा उद्योगव्यवसाय करून आपल्या देशात पैसे पाठवीत असतील तर ती रक्कम आपल्या हिशेबात देणे बाजूला लिहावी लागेल.
५. गुंतवणुकीचा नफा व लाभांश देशातील नागरिकांनी परदेशात काही भांडवली गुंतवणूक केलेली असेल तर यावरील नफा किंवा लाभांश या स्वरूपात मिळणारे उत्पन्न, आपल्या व्यवहारशेषात येणे बाजूला दाखवावे लागेल.
याउलट, परकीय नागरिकांनी किंवा संस्थांनी आपल्या देशात केलेल्या गुंतवणुकीवर द्यावा लागणारा लाभांश किंवा नफा आपल्या व्यवहारशेषात देणे बाजूला दाखावावा लागेल.
६. खंडणी व्याज या स्वरूपातील उत्पन्न: आपल्या देशाच्या सरकारला परकीयांकडून युद्धखंडणी या स्वरूपात मिळणारे उत्पन्न, परकीयांकडून भांडवलाची परतफेड,
व्याज या स्वरूपात मिळणारे उत्पन्न आपल्या व्यवहारतोलात येणे बाजूला मांडले जाईल. उलट अशाच स्वरूपात आपल्या देशाकडून द्यावी लागणारी रक्कम देणे बाजूला लिहावी लागेल.
७. अधिकार शुल्क, एकाधिकार शुल्क : आपल्या देशाने परदेशात दाखविलेल्या चित्रपटांवरील रॉयल्टी, पुस्तकांची रॉयल्टी, करमणूक कार्यक्रमांद्वारे मिळणारे उत्पन्न, उपलब्ध करून दिलेल्या तांत्रिक सेवांचे उत्पन्न आपल्या व्यवहारशेषात येणे बाजूला दाखविले जाईल. उलट अशा बार्बीसाठी परकीयांना देणे असणारी रक्कम देणे बाजूला लिहिली जाते. तसेच आंतरराष्ट्रीय व्यवहारातील तार व टेलिफोन सेवेचा मोबदला, कालव्यांच्यामार्गे होणाऱ्या वाहतुकीचा मोबदला,
दलाली यांचाही समावेश व्यवहारशेषात केला जातो.
८. अनुदान / अर्थसाहाय्य
: परदेशाकडून देशाला मिळणारी मदत आणि देणग्या व्यवहारशेषाच्या येणे बाजूला लिहितात. तर परदेशाला आपण दिलेली मदत किंवा देणग्या व्यवहारशेषात देणे बाजूला मांडतात.
९. विदेशातील अभिकर्त्यांना द्यावयाची रक्कम आपल्या देशातील वस्तूंची माहिती परदेशी लोकांना व्हावी म्हणून परदेशात अभिकर्ते / एजंट नेमावे लागतात. त्यांचे वेतन,
त्यांनी जाहिरातीसाठी केलेला खर्च व इतर खर्च याकरिता आपणाला परदेशाला काही देणे द्यावे लागते. ते आपल्या व्यवहारशेषाच्या देणे बाजूला मांडाले जाते. याउलट, आपल्या देशात परकीय व्यापाऱ्यांनी काही एजंट नेमले असतील तर त्यांचा खर्च त्या देशातील सरकार करते. ही रक्कम आपल्या व्यवहारतोलाच्या जमा बाजूला दाखविली जाते.
१०. सरकारी व्यवहार प्रत्येक देशात सरकारचे राजदूत दुसऱ्या देशात असतात. प्रत्येक देशाची काही शिष्टमंडळे दुसऱ्या देशात पाठविली जातात.
यावर होणाऱ्या खर्चाचा समावेश त्या देशाच्या व्यवहारशेषात देणे बाजूला केला जातो. उलट इतर देशांकडून प्रत्येक देशाला याबाबतचे येणे असते. त्याचा उल्लेख येणे बाजूला केला जातो.
११. आंतरराष्ट्रीय संस्थांच्या व्यवहारातील येणी-देणी:
नाणेनिधी किंवा जागतिक बँक यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांकडून देशाला मिळणारी मदत किंवा कर्जपुरवठ्याच रक्कम त्या देशाच्या व्यवहारशेषात येणे बाजूला दाखवितात तर अशा संस्थांच्या कर्जफेडीचे हप्ते, त्यावरील व्याज, अशा संस्थांची द्यावी लागणारी सदस्य वर्गणी यांचा समावेश देने बाजूला केला जातो.
१२. बँकिंग सेवा व सोन्याची आयात-निर्यात आपल्या देशातील बँकांनी परदेशात स्थापन केलेल्या शाखांचे भांडवल,
परदेशाकडून घेतलेली कर्जे व्यवहारशेषात येणे बाजूला दाखवितात. उलट, परकीय बँकांनी आपल्या देशात स्थापन केलेल्या शाखांचे भांडवल किंवा परदेशाच्या कर्जाची परतफेड आपल्या व्यवहारशेषात देणे बाजूला लिहितात. सोने आणि आंतरराष्ट्रीय चलनाची होणारी आयात-निर्यात व्यवहारशेष हिशेबात विचारात घेतली जाते.
एखाद्या देशाच्या एका विशिष्ट कालखंडातील (सर्वसाधारणपणे एक वर्ष) दृश्य व अदृश्य आयातींच्या सर्व बाबींचे एकूण मूल्य आणि त्या देशाच्या दृश्य व अदृश्य निर्यातीच्या सर्व बाबींचे एकूण मूल्य, त्या देशाचा आंतरराष्ट्रीय व्यवहारतोल दर्शवितात.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.