Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: मराठ्यांचे मुलकी प्रशासन

Tuesday, 22 June 2021

मराठ्यांचे मुलकी प्रशासन

 (Dr. Dhere V. D.)

मराठ्यांचे मुलकी प्रशासन

B .A .I History Sem.II Paper II (भाग 1)


रयतेच्या कल्याणासाठी उभारलेल्या स्वराज्याचे प्रशासन हे रयताभिमुख असले पाहिजे या उद्देशाने शिवाजी महाराजांनी हे प्रशासन अधिकाधिक जनतेच्या कल्याणाचा विचार करेल अशा पद्धतीने त्याची रचना केली. आपण जर स्वराज्याच्या निर्मितीचा त्यामागील हेतू चा उद्देश यांचा विचार केला तर आपणास असे लक्षात येते की,

            स्वराज्य निर्मिती ही-स्वतंत्र सार्वभौम राज्य निर्माण करणे,हिंदवी स्वराज्याची स्थापना करणे, स्वराज्य संकल्पनेत धर्मनिरपेक्ष राज्य ही भूमिका राबविणे,प्रजेच्या हितार्थ रक्षणार्थ दक्ष कारभार करणे, स्वराज्यातील रयत व वित्ताचे रक्षण करणे. शत्रूपासून रयतेचे व स्वराज्यातील प्रदेशाचे रक्षण करणे,जात-पात धर्म व गरीब-श्रीमंत असा भेदभाव न करता प्रजेचे पालन,पोषण,रक्षण करणे ही दिसून येतात. ही उद्दिष्टे जर साध्य करावयाची असतील तर कार्यक्षम व दक्ष प्रशासन गरजेचे होते. त्यासाठी राज्य सामर्थ्यशाली बनवणे,राजाबद्दल राज्याबद्दल लोकांच्या मनात निष्ठा निर्माण करणे व प्रजाहितदक्ष कारभार करणे यासाठी शिवरायांनी प्रशासकीय रचना मजबूत करण्याकडे अधिक लक्ष दिले.

            शिवकालीन मुलकी प्रशासकीय रचना.....

शिवकाळातील मुलगी प्रशासनाची वैशिष्ट्ये पाहत असताना त्याची दोन भागात विभागणी करता येते.

१). केंद्रीय प्रशासन २). प्रांतिक प्रशासन.

१). केंद्रीय प्रशासन..... 

अ). छत्रपती.. स्वराज्याच्या प्रशासनातील छत्रपती हे सर्वोच्च पद होते राज्याचा प्रमुख छत्रपती हा कारभार यंत्रणेच्या केंद्रस्थानी होता प्रशासन योग्य पद्धतीने चालावे यासाठी मंत्रिमंडळ छत्रपतींच्या आधिपत्याखाली होते राज्याचे लहान-मोठे अनेक विभाग,उपविभाग,सुभे,कारखाने या सर्वांवर छत्रपतींकडून अंमल केला जात होता. छत्रपती हे पद सार्वभौम होते. प्रशासनातील नियुक्‍त्या,युद्ध,तह रयतेच्या कल्याणासाठी चे निर्णय,निवाडे हे सर्व त्यांच्या अधिकारात येत असत. स्वराज्यातील अंती मिळण्याचा अधिकार छत्रपतींच्या हाती होता. 

ब). अष्टप्रधान मंडळ... स्वराज्याच्या मुलकी कारभारातील जनतेच्या सोयीसाठी,राजाला योग्य सल्ला देण्यासाठी व राजाचे निर्णय योग्य पद्धतीने राबवून जनकल्याण करण्यासाठी छत्रपतींनी अष्टप्रधान मंडळाची नियुक्ती केली होती.१. मुख्य प्रधान २.अमात्य.३. सेनापती ४. सचिव ५. मंत्री ६. पंडितराव ७. सुमंत ८. न्यायाधीश. असे अष्टप्रधान राजाला सल्ला देण्याचे व राज्याचे निर्णय अमलात आणण्याचे कार्य करीत असत.

क). कारखाने व महाल : स्वराज्याच्या प्रशासनाचे विभागणी आठ प्रधानामध्ये केल्यानंतर त्यांच्या हाताखाली अनेक अधिकाराची खाती निर्माण करण्यात आली या खात्यांना 'कारखाने' किंवा 'महाल' असे संबोधले जात असे. शिवाजी महाराजांनी १८ कारखाने व १२ महाल निर्माण केले होते. या कारखाने व महालांमध्ये कामकाज करण्यासाठी अनेक अधिकारी कारकून व मदतनीसांची नेमणूक केली होती.

ड). स्वराज्याचे विभाग व उपविभाग... प्रशासनाच्या सोयीसाठी शिवरायांनी स्वराज्याचे चार विभाग केले होते. त्यांना 'सरसुभा' असे म्हटले जाई.

१. उत्तर कोकण ते साल्हेर-मुल्हेर व पुणे.

२.  कर्नाटकातील धारवाड ते कारवार.

३. दक्षिण कोकण व कारवार पर्यंतचा किनारपट्टीचा भाग

४. म्हैसूर व मद्रास राज्यातील प्रदेश.

यावर या चार सरसुभ्यांवर 'सरसुभेदारांच्या'  नियुकत्या केलेल्या होत्या. 

त्यांच्या हाताखाली सुभेदार, महालदार, महाजन, दिवाण, मुजुमदार,फडणीस,सबनीस, कारखानीस, चिटणीस, जमादार,पोतनीस इ. अधिकारी असत.

        सरसुभ्याचा  उपविभाग म्हणजे 'सुभा' त्यावर 'सुभेदार' हा अधिकारी नेमलेला असे.

         सुभ्याचे अनेक 'परगण्यात' विभाजन केले होते. परगण्यावर 'सरहवालदार' या अधिकाऱ्याची नेमणूक केली होती.

          परगण्याचे विभाजन 'महालात ' केले होते. महालाचा अधिकारी म्हणून 'हवलदार' यांची नेमणूक केली होती. काही ठिकाणी त्याला 'महालदार' असेही म्हणत.

           'खेडे' हा सगळ्यात शेवटचा विभाग होता. बाजारपेठेच्या गावांना 'कसबे' आणि लहान खेड्यांना 'मौजे' असे म्हणत होते त्यावर 'पाटील' हा अधिकारी कारभार पाहत असे. त्याच्या मदतीला कुलकर्णी हा अधिकारी होता.

     २). प्रांतिक प्रशासन ....

 अ. प्रशासनाचा शेवटचा भाग म्हणजे खेडे किंवा गावपातळीवरील प्रशासन... खेडी स्वयंपूर्ण होती शेती हाच उपजीविकेचा मुख्य व्यवसाय होता ज्यांची गावात जमीन आहे आणि नाही ते सर्व गावात राहत असत उदरनिर्वाह करत असत त्याची विभागणी पुढील प्रमाणे

 १) मिरासदार.. जे परंपरागत गावचे रहिवाशी आहेत ज्यांच्या मालकीची जमीन आहे व ज्यांना नागरिकत्वाचे हक्क आहेत तोच सभेत भाग घेता येतो ते सर्व मिरासदार होय.

 २). उपरे....ज्यांना गावात जमीन नाही. कोणत्याही प्रकारचे सामाजिक अथवा नागरिकत्वाचे हक्क नाहीत. अशांना उपरे असे म्हणतात. जे गावात मोलमजुरी अथवा ठराविक मुदतीने जमीन कसण्याच्या करारावर गावात येऊन राहतात.

 ३). अलुतेदार बलुतेदार...यानंतरचा महत्त्वाचा रहिवाशांचा वर्ग म्हणजे बलुतेदारांच्या वर्ग होय. गावची विविध प्रकारची सेवा हे बलुतेदार अथवा ग्रामसेवक करत असत. या श्रमाचा मोबदला म्हणून गावच्या जमीनधारकांकडून त्यांना सुगीच्या काळात धान्य उत्पादनाचा काही भाग दिला जात असे त्याला 'बलूते' असे म्हणत.  सामान्यतः बलुतेदार बारा होते. हे गावचे प्रतिष्ठित नागरिक होते. गोतसत्तेच्या निवडा पत्रात त्यांची नावे व्यवसाय चिन्हासह अथवा निशाणी सह नोंदवली जात.अलुतेदार.......शेती व इतर कार्यासाठी वरील बलुतेदारांची शेतकऱ्यांना/गावकऱ्यांना जशी गरज होती तसे इतर सेवा देणाऱ्यांची गरज होती. इतर सेवा देणाऱ्यांना आलुतेदार असे म्हटले जात असे. त्यांना दिल्या जाणाऱ्या मोबदल्याला "अलुते "असे म्हटले जाई.

      पाटील आणि कुलकर्णी यांनी खेड्यातून जमा केलेला महसूल वसूल देशमुख, देशपांडे यांच्याकडे पाठवायचा होता.

      गोळा झालेला शेतसरा देशमुखाकडे त्याचा हिशोब देशपांडे कडे होता.

      देशमुख देशपांडे यांच्याकडे मदतीसाठी वरिष्ठ प्रतीचे नोकर होते. हिशोब तपासणीस म्हणून मुजुमदार, दस्तऐवज नोंदणीसाठी फडणवीस,जाबजबाब लिहिण्यासाठी सचिव अशी मंडळी कचेरीत कामाला होती. मामलेदार हा वरिष्ठ मुलकी अधिकारी होता त्याच्या हाताखाली शिबंदी (सैन्य)होती,कचेरीत दिवाण हा अधिकारी होता. शिवाय कमाविसदार,तरफदार, शेखदार हे मामलेदार कचेरीत होते.

      अशाप्रकारे सरसुभेदार ते पाटील अशी  अधिकाऱ्यांची एक साखळी शिवकाळात तयार करण्यात आलेली होती. प्रत्येकाच्या जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आलेल्या होत्या रयतेची काळजी घेणे हे त्यांचे प्रथम कर्तव्य होते.

      

शिवरायांच्या मुलकी प्रशासनाची वैशिष्ट्ये...

१). राज्यकारभाराच्या केंद्रस्थानी छत्रपती : मुलकी लष्करी व न्याय प्रशासनावर अंतीम अधिकार छत्रपतींकडेच होता. ते सार्वभौम पद होते.

२). अष्टप्रधान मंडळाची निर्मिती व नियुक्ती : शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ व प्रशासनाच्या सोयीसाठी नेमले त्यांची निवड ते स्वतःला करीत असत. अष्टप्रधान मंडळ हे राजाला जबाबदार होते.

३). मुलकी कारभाराची अनेक खात्यांमध्ये विभागणी :  प्रशासनाच्या सोयीसाठी बारा महाल आणि अठरा कारखाने इत्यादी उपविभागात मध्ये मुलगी खात्याची विभाग केली त्यावर अनेक अधिकारी व प्रशासकीय कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली.

४). छत्रपतींचा वैयक्तिक व राज्याचा पत्रव्यवहार पाहण्यासाठी चिटणीस ची नेमणूक केली गेली त्याच्या हाताखाली अनेक अधिकारी होते.

५). मुलकी व लष्करी कामाचा समान दर्जा : लष्करी काम आहे इतकाच महत्वपूर्ण दर्जा हा मुलकी कामकाजात कार्य करणाऱ्यांना देण्यात आला.

६). प्रजा हितरक्षणार्थ कारभार : रायतेचे कल्याण हेच स्वराज्याचे संपूर्ण कारभाराचे उद्दिष्ट होते.वतनदारा कडून किंवा अधिकाऱ्यांकडून रयतेचा छळ होऊ नये यासाठी सर्वजण दक्ष होते.

७). इतर सत्ता पेक्षा करामध्ये कपात : तत्कालीन आदिलशाही, कुतुबशाही मुगल इतर सत्ताधीशांच्या राज्यात आकारल्या जाणाऱ्या करण्यापेक्षा स्वराज्यातील करांचे प्रमाण अल्प होते.

८). सारा निश्चिती व वसुली : स्वराज्याचे तीन वेळा जमीन मोजणी झाली ज्याद्वारे उत्पादनावर आधारित सारा ठरवण्यात आला त्याची वसुली वेतन अधारी अधिकाऱ्यांकडून करण्यात आली ज्यामुळे कुठल्याही प्रकारचा त्रास रयतेला होणार नाही याची काळजी घेतली गेली.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...