(Mokashi
P A)
B.A.II
SEMESTER - 4
PAPER NO - 2
(H.S.R.M)
प्रकरण -
3 सामाजिक सुधारक
ड -
अण्णाभाऊ साठे
साहित्यातील आशय
विद्वत्ता, गुणवत्ता नि प्रतिभा यावर असलेल्या अभिजन वर्गाच्या
एकाधिकारशाहीला छेद देत अण्णाभाऊ साठे यांनी साहित्याच्या क्षेत्रात पदार्पण केले. औपचारिक
शिक्षणाची कास न
धरता अण्णाभाऊंनी आयुष्यभर समाजरूपी शाळेत आलेल्या विविध अनुभवांचे पाठ गिरविले. बालपणापासून त्यांना जे जगणं वाट्याला आलं, तशाच प्रकारचे जीवन जगणाऱ्या बहुसंख्याक बहुजन
वर्गातील लोकांच्या मनातील प्रातिनिधिक विचार त्यांनी साहित्यातून शब्दबद्ध केले. मनोहारी चित्रण, कल्पनारंजन, भोगवाद व विकृती याला फाटा देऊन त्यांनी आपल्या
साहित्याची नाळ सर्वसामान्य रंजल्या-गांजलेल्या जनतेशी जोडली.
या संदर्भात 'जो कलावंत जनतेची कदर करतो, जनता त्याचीच कदर करते' यावर
त्यांचा मनोमन विश्वास होता.
अण्णाभाऊ साठे यांनी
आपल्याच जातिकोषात न गुरफटता जो जो वर्ग अन्याय अत्याचारग्रस्त होता त्यांचे
मूर्तिमंत चित्रण आपल्या साहित्यकृतीतून समाजासमोर मांडले. त्यामुळेच त्यांचे साहित्य सर्व भारतीय भाषांत प्रकाशित तर
झालेच, शिवाय फ्रेंच, रशिया आदी सत्तावीस देशांत भाषांतरित झाले. असे उत्तुंग यश मिळवणारा हा आगळावेगळा अवलिया होता.
अण्णाभाऊ साठे यांचे लेखन
विविधांगी आहे. 'आवडी' या कादंबरीत उच्चवर्णीय आवडी
चौगुले आणि मागासवर्गीय धनाजी रामोशी यांच्या आंतरजातीय प्रेमविवाहाची कथा रेखाटून
त्याद्वारे जातिअंताचा
संदेश दिला आहे.
पोटाची आग
शमविण्यासाठी माणूस कोणत्या भयावह थराला जातो याचे वर्णन 'स्मशानातील सोनं' कथेत आलेले आहे. या कथेद्वारे भारतीय
समाजव्यवस्थेतील श्रमजीवी वर्गातील लोकांची विदारक स्थिती रेखाटून भारतातील जातीय
व वर्गीय लढ्यावर भाष्य केले आहे.
'बरबादया कंजारी' या कथासंग्रहात सर्वसामान्य जीवन जगणाऱ्या लोकांची दुःखे, अंधश्रद्धा, अगतिकता नि व्यसनाधीनता याचे चित्रण रेखाटले आहे. त्याद्वारे श्रमजीवी, कष्टकरी विरुद्ध अभिजन वर्ग असा वर्गलढा अण्णाभाऊंनी रेखाटला आहे. 'खुळंवाडी' या कथानकात मंजुळेच्या अब्रूला केसभर धक्का लागताच पाटलाचा हात तोडणारा सखुबा खुबा, बंडवाला तात्या मांग, यदू रामोशी, लखू माने यांसारख्या अन्याय व अत्याचाराला प्रत्युत्तर देणाऱ्या जिगरबाज
व्यक्तिरेखा चितारलेल्या आहेत.
वारणा, कृष्णा नदीखोऱ्यात वास्तव्य करणाऱ्या परिसरातील
माणसांचे प्रतिनिधी बर्डे
गुरुजींवर 'मास्तर' कादंबरी आधारित आहे. 'धुंद रानफुलांचा' या कादंबरीत स्वातंत्र्यलढ्याचे वर्णन करताना
म्हणतात,
"बंदूक ठासून उठे शेतकरी तेली तांबोळी ।
गुलामगिरीची होळी पेटवून मारी गोळी || '
'आबी' कथासंग्रहातील सुंदर, बांधेसूद नायिका
स्वतःच्या शीलरक्षणार्थ
खलनायकाच्या डोक्यात पायरी
घालून त्यास ठार मारते तर 'डोळ' या कथेत सुंदर डोळे, सौंदर्याने होणाऱ्या घातापायी, बापाला कलंक लागू नये,
घराण्याची इज्जत, अब्रू जाऊ नये म्हणून स्वतःचे डोळे फोडून घेते असे
कथानक आले आहे. गरिबांचा तारणहार व श्रीमंतांचा
कर्दनकाळ ठरलेला सत्तू परिस्थितीमुळे कसा दरोडेखोर बनतो याचे चित्रण 'वारणेचा वाघ' या कादंबरीचा विषय आहे,
'अलगूज' व 'वैजयंता' या सुंदर प्रेमकथेवर
आधारलेल्या कादंबऱ्या आहेत.
'चिरागनगराची भूतं' या कादंबरीतून मुंबईच्या झोपडपट्टीतील भयावह वास्तव,
बकालपण चित्रित केले
आहे. 'माकडीचा माळ'मध्ये भटक्या लोकांचे जीवन
तर 'चंदन'मध्ये स्त्रिया व भटक्यांच्या व्यथा मांडलेल्या
आहेत तर 'चित्रा' कादंबरीतून कामगार लढ्यावर प्रकाश टाकलेला आहे.
तमाशासाठी अण्णाभाऊ साठे
यांनी 'लोकनाट्य' हा शब्द प्रथम त्यांनीच वापरला.
देशभक्तीचा पोकळ आव
आणून आपलाच टेंभा मिरवणाऱ्या एका देशभक्ताच्या घोटाळ्यावर आधारित 'देशभक्त घोटाळे' या लोकनाट्यातून. भ्रष्टाचारविरोधात लोकांच्या
मनाची मशागत केली. लोकनाट्यात पारंपरिकतेला
भेदून तमाशाची सुरुवात गणेशस्तवनाने करण्याऐवजी 'प्रथम मायभूच्या चरणा । छत्रपती शिवबा चरणा,
स्मरोनी गातो कवना' अशी प्रथा सुरू केली. गणानंतरच्या गवळणीतही कृष्णलीलेऐवजी शेतकरी, कामगार अशी पात्रे त्यांनी नव्याने उभारली.
समाजातील सर्व वर्गांनी
आपल्यावर होत असलेल्या अन्यायाच्या परिमार्जनासाठी एकीच्या भावनेने विद्रोहात
सामील होणे का महत्त्वाचे आहे हे त्यांनी आपल्या 'शिवारी चला' या पोवाड्यात विशद केले आहे. भारतीय समाजातील जात व वर्ग • जाणिवांचे पडसाद त्यांच्या साहित्यात उमटतात. 'महाराष्ट्राची परंपरा' या पोवाड्यात महात्मा फुले यांच्याबद्दल लिहिताना
ते म्हणतात,
'महात्मा फुले लाभले महाराष्ट्राला ।
अन्याय निवारूनी न्याय द्याया दलिताला II'
भारतातील जातिव्यवस्था व
धर्मांधता यामुळे बहुजनांच्या,
दलितांच्या वाट्याला
आलेल्या हालअपेष्टांचा निषेध करून यात बदलाची ते अपेक्षा करताना म्हणतात, 'जग बदल घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव ।' भारतातील वर्गीय व्यवस्था,
गुलामगिरी, सामाजिक भेदभाव याच्या निवारणार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारखे घाव घालून सामाजिक
बदलासाठी डॉ. आंबेडकरांनी केलेल्या
कार्याची महती सांगताना ते म्हणतात,
'धनवंतांनी अखंड पिळले । धर्मांधांनी तसेच छळले।
मगराने जणू माणिक गिळले । चोर जाहले साव।।
ठरवून आम्हा हीन कलंकित । जन्मोजन्मी करून अंकित ।
जिणे लादूनी वर अवमानित । निर्मून हा भेदभाव ।
जग बदल घालूनी घाव । सांगून गेले मला भीमराव ।।'
राजकीय कार्य
सन १९३६ पासूनच ते कॉम्रेड
श्रीपाद अमृत डांगे यांच्या विचाराने प्रभावित झाले होते. यातूनच त्यांनी कम्युनिस्ट पार्टीत प्रवेश केला. डफ व गायनाच्या साहाय्याने शाहिरीच्या माध्यमातून काही काळ
पार्टीच्या प्रचाराची धुरा सांभाळली. .१९४० च्या दशकाच्या
उत्तरार्धात त्यांनी गोवा मुक्ती संग्रामातही सहभाग घेतला.
शाहिरी वाङ्मयाच्या
माध्यमातून समाजात जाणीवजागृती करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला. १९४२ च्या आंदोलनात बर्डे गुरुजींसोबत त्यांनीही सहभाग नोंदवला. मात्र ब्रिटिश सरकारने अटक वॉरंट काढल्याने पुन्हा मुंबईला प्रयाण केले. सन १९४४ मध्ये शाहीर अमर शेख व शाहीर गव्हाणकर यांच्या साहाय्याने 'लाल बावटा कलापथक' स्थापन केले. या कलापथकाच्या माध्यमातून, पोवाड्यातून अण्णाभाऊंच्या कविमनाने अन्यायाविरुद्ध प्रखर
प्रतिक्रिया नोंदवल्या. १९४० च्या दशकात कार्यरत असताना अनेक सरकारी
निर्णयांना आव्हान दिले. फाळणीच्या पार्श्वभूमीवर
दिल्ली, पंजाब येथे उसळलेल्या जातीय दंग्यांवर पोवाड्यातून
मतप्रदर्शन करताना म्हणतात,
माणूसकी पळाली पार होऊनी बेजार ।
पंजाबातून II
सूडाची नशा चढून । लोक पशूहून । बनले
हैवान ||
दोन धर्मांतील लोकांमध्ये
झालेल्या हत्यांमुळे खिन्न झालेले अण्णाभाऊ सर्वांना कळकळीची विनवणी करताना
म्हणतात.
द्या फेकून
जातीयतेला । करा बंद रक्तपाताला ।
आवरोनी हात आपुला I
भारतीयांना
इभ्रत तुमची इर्षेला पडली ।
काढा बाहेर
नौका वादळात शिरली।
धरा सावरून एकजुटीने दुभंगली दिल्ली ।
काढा बाहेर
राष्ट्रनीका ही वादळात गेली।।
सन १९५६ मध्ये डॉ. आंबेडकरांच्या महानिर्वाणानिमित्त 'जग बदल घालून घाव सांगून गेले मज भीमराव ॥' या गीताद्वारे त्यांच्याप्रति निष्ठा व्यक्त केली. १९५७ पासून संयुक्त महाराष्ट्र लढ्याने वेगवेगळी वळणे घेतली तेव्हा त्याला अधिक उग्र रूप देण्यासाठी अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, शाहीर गव्हाणकरांनी जीवाचे रान केले. या सर्वांनी भूमिगत राहूनही हा लढा कसा तेवत राहील याची काळजी घेतली. साम्यवादी उपासक अण्णाभाऊ साठे यांनी कामगार, कष्टकरी, दलित, पीडित,
शोषित यांच्या
उद्धाराबरोबरच आपले जाज्वल्य राष्ट्रप्रेम तेवत ठेवले. हे त्यांच्या 'उठला मराठी देश', 'महाराष्ट्रावरून टाक ओवाळून
काया' यांसारख्या आदी साहित्यातून
होते. संयुक्त महाराष्ट्राची
निर्मिती होत असताना काही भाग आपल्यापासून वेगळा होणार, कदाचित मुंबईलाही आपल्याला मुकावे लागणार या नुसत्या विवंचनेने व्याकूळ झालेल्या
कविमनाच्या अण्णांमार्फत एका अप्रतिम लावणीचा जन्म झाला. 'माझी मैना गावावर राहिली ।
माझ्या जीवाची होतेय काहिली।।'
या लावणीतील
मुंबईतील गिरणी कामगार आणि गावाकडे राहिलेली त्याची पत्नी यांच्यातील विरह म्हणजे प्रत्यक्षात
मुंबईला, सीमाभागाला दुरावणारा
प्रत्येक महाराष्ट्रीयन होता.
अण्णाभाऊंना मुंबई
जशी प्रत्यक्षात दिसली तशीच ती त्यांनी आपल्या मुंबईची
लावणी यात नोंदवली. ते म्हणतात,
मुंबईत
उंचावरी । मलबार हिल इंद्रपूरी
कुबेरांची
वस्ती तेथे सुख भोगती ।।
परळात
राहणारे। रात्रंदिवस राबणारे
मिळेल ते
खाऊनी घाम गाळती।।
सन १९४७ साली देशाला
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाची सर्व सत्तासूत्रे उच्चश्रूंच्या हाती एकवटली. हे त्यांना मान्य नव्हते. म्हणून त्यांनी मुंबई येथे वीस हजार लोकांचा मोर्चा काढला. त्या मोर्चातील घोषणा होती, 'ये आझादी झूठी है, देश की जनता भूखी है।' भारतीय कम्युनिस्ट पक्षाची एक सांस्कृतिक शाखा
असलेल्या इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशनमध्येही ते महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्त्व होते.
पुरस्कार
अण्णाभाऊंनी अनेक कथा, कादंबऱ्यांची रचना केली तरी ते 'लोकशाहीर म्हणूनच सर्वांना परिचित आहेत. त्यांच्या 'फकिरा' या कादंबरीला १९६१ साली उत्कृष्ट कादंबरी म्हणून महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार प्राप्त झाला. 'वैजयंता' या चित्रपटास १९६१-६२ साली उत्कृष्ट मराठी चित्रपटाचे राष्ट्रीय
पारितोषिक मिळाले.
तर 'वारणेचा वाघ' या चित्रपटास महाराष्ट्र
राज्य उत्कृष्ट चित्रपटाचा द्वितीय तर 'अशी साताऱ्याची तऱ्हा' या चित्रपटास तृतीय पारितोषिक प्राप्त झाले होते.
अशा रीतीने अत्यंत प्रतिकूल
परिस्थितीवर मात करत अण्णाभाऊंनी साहित्याच्या क्षेत्रात अनेकानेक कलाकृती निर्माण
केल्या. त्याद्वारे कष्टकरी, कामगार, दलितांच्या व्यथा,
त्यांचे भावविश्व, शेतकरी, मजूर, हमाल, वेश्या, दरोडेखोर या व्यक्तिरेखांची पराकाष्टा व लढाऊ बाणा चित्रित केला. अशा या साहित्यसम्राटाला मात्र साहित्यविश्वात
उपेक्षेचंच जीणं वाट्याला आलं.
काही सन्माननीय
अपवाद वगळता त्यांच्या साहित्याची तत्कालीन समाजाने फारशी दखल घेतली नाही. तरीसुद्धा २ मार्च, १९५८ रोजी महाराष्ट्र दलित साहित्य संघाच्या वतीने आयोजित केलेल्या पहिल्या
साहित्य संमेलनामध्ये उद्घाटनपर भाषणात व्यक्त होताना,
'हे जग, ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती
कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या
तळहातावर तरलेली आहे'
असा वास्तववादी
मंत्र देणाऱ्या अण्णाभाऊंना जनतेने 'लोकशाहीर' ही उपाधी दिली. त्यांनी आपल्या साहित्यात देव, धर्म, कल्पनारंजन नाकारून भौतिकवादी, विज्ञानवादी व परिवर्तनवादी विचारांची मांडणी केली. त्यांच्या साहित्याचे मराठी, हिंदी,
इंग्रजी, गुजराथी, पंजाबी, कन्नड आदी भारतीय भाषांबरोबर
फ्रेंच, रशियन, पोलिश आदी भाषांत भाषांतरे झाली. त्यांच्या कथा, कादंबऱ्या रशियन विद्यापीठात अभ्यासक्रमात शिकवल्या गेल्या. त्यांचे व्यक्तिमत्त्व सर्व दुःखितांच्या हृदयाला
स्पर्श करणारे होते. त्यामुळेच त्यांचे पुतळे भारत देशाशिवाय ब्राझील व
रशियासारख्या देशांत उभे राहिले.
भारतीय समाजातील
वर्गीय विषमतेच्या अंताची प्रेरणा घेऊन, साहित्याच्या माध्यमातून संघर्षासाठी प्रेरणादायी ठरणारे, मानवमुक्तीचे उद्गाते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना
'साहित्यरत्न' ही उपाधी सार्थ ठरते.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.