Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: विठ्ठल रामजी शिंदे यांचे कार्य - शेतकरी चळवळ

Sunday, 27 June 2021

विठ्ठल रामजी शिंदे यांचे कार्य - शेतकरी चळवळ

 

(P. A. Mokashi)

B.A.PART II SEMESTER - 4

I.D.S.(H.S.R.M.) PAPER - 2

प्रकरण - 3 सामाजिक सुधारक:

लहुजी साळवे - विठ्ठल रामजी शिंदे - संत गाडगे महाराज - अण्णाभाऊ साठे

*विठ्ठल रामजी शिंदे यांचे कार्य *

*शेतकरी चळवळ*

महर्षी शिंदे आणि शेतकरी चळवळ

महर्षी म्हणतात, 'शेतकरी चळवळीचे कार्य धार्मिक समजूनच मी पार पाडतो आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली फेब्रुवारी, १९२८ ते जानेवारी, १९२९ या काळात बाडलीचा सत्याग्रह ८० हजार शेतकऱ्यांच्या सहभागाने पार पडला. ब्रिटिश सरकारला माघार घ्यावी लागली. त्यांनी सारा वाढ मागे घेतली. बार्डोली सत्याग्रहाने शेतकऱ्यांना आपल्या सामर्थ्याचा अनुभव आला. पिढ्यानपिढ्या निश्चेष्ट पडलेला समाज ब्रिटिश साम्राज्य सत्तेला आव्हान देत होता. आपल्यात एकजूट होऊ शकते हे तो दाखवून देत होता. या पार्श्वभूमीवर महर्षी शिंदे यांनी शेतकरी चळवळ सुरू केली. पुणे, सातारा, चांदवड, बोरगाव, तेरदाळ इत्यादी ठिकाणी शेतकरी परिषदा घेतल्या.

महर्षी शिंदेंनी शेतकरी चळवळीला महत्त्वाचे स्थान दिले. शेतकरी हा राष्ट्राचा पोशिंदा आहे. शेतीची अर्थव्यवस्था हा राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे अशी महर्षीींची भूमिका होती. ते म्हणतात,काँग्रेस ही साच्या देशाची आहे. तिच्यातील सर्व वर्गांच्या कल्याणासाठी विचार आचार करणारी ती सर्वसमावेशक संस्था आहे. तेव्हा अशी व्यापक संस्था कोणत्याही एका घटकाच्या हितसंबंधावर आपले लक्ष केंद्रित करू शकत नाही म्हणून शेतकरी असो अगर कामगार असो. त्यांनी आपापल्या हितसंबंधाच्या रक्षणाच्या बाबतीत सदैव जागरूक राहावे आणि त्यासाठी संघटनात्मक प्रयत्न करावेत. "

सन १९२८-२९ मध्ये मुंबई प्रांतात शेतसाच्यात वाढ करण्यात आली. या काळात सरकारने तुकडेबंदीचा कायदा पास केला. यामुळे सुमारे ४० टक्के शेतकरी आपल्याच शेतावर शेतमजूर बनणार होते. शेतकरी वर्गाला मारक असणाऱ्या या बिलाला महर्षी शिंदे यांनी विरोध केला.

अस्पृश्यांची शेतकी परिषद (१९२६, पुणे) :

 सरकारने भरविलेल्या कृषी प्रदर्शनाच्या जोडीनेच दि. ३० ऑक्टोबर, १९२६ रोजी पुणे येथे अस्पृश्यांची शेतकरी परिषद भरविण्यात आली. महर्षी वि. रा. शिंदे या परिषदेचे अध्यक्ष होते. सरकारने या परिषदेच्या हेतूबद्दल साशंकता व्यक्त केली. सरकारच्या मते, अस्पृश्य हे जमिनीचे मालक अथवा शेती कसणारे यापैकी नाहीत. महर्षी शिंदे यांनी याबाबत सांगितले की, महाराष्ट्रात अस्पृश्यांची जमीन मालकीसंबंधी स्थिती किंचित बरी आहे. अस्पृश्य हे दंडकारण्याचे मूळ मालक आहेत. तेव्हा तुम्ही सर्वांनी एकी करून जमिनीवरील गेलेली सत्ता पुन्हा मिळविली पाहिजे.

मुंबई इलाखा शेतकरी परिषद (१९२८, पुणे) :

मुंबई इलाख्यात पास झालेल्या तुकडेबंदी सारावाढीच्या बिलाच्या पार्श्वभूमीवर दि. २५ २६ जुलै, १९२८ रोजी पुणे येथील रे मार्केटमध्ये ही परिषद पार पडली. अध्यक्षस्थानी महर्षी शिंदे होते तर स्वागताध्यक्ष श्री. बाबुराव जेधे होते. या परिषदेला महाराष्ट्र कर्नाटकमधून सुमारे पाच हजार शेतकरी आले होते. परिषदेसाठी मंडईतील भाजीवाल्या लोकांनी आपापली दुकाने बंद ठेवली होती. या परिषदेसाठी देशभक्त गंगाधरराव देशपांडे, मुंबईचे श्री. सिलम, पालघरचे छोटालाल श्रॉफ, विरारचे गोविंदराव वर्तक, पुण्यातील श्रीपतराव शिंदे, दिनकरराव जवळकर इत्यादी मंडळी हजर होती. स्वागताध्यक्ष बाबुराव जेधे यांनी शेतकऱ्यांना कळकळीचे मार्गदर्शन केले. ते म्हणतात,परकीय सत्तेचा विध्वंस . शिवाजी महाराजांनी केला. वर्णवर्चस्वाचा विध्वंस शाहू महाराजांनी केला अस्पृश्यतेच्या विध्वंसाचे कार्य करण्याकरिता तितक्याच धडाडीने अण्णासाहेबांनी आपले आयुष्य वेचले." भाषणाच्या अखेरीस ते म्हणतात, "वेळ पडली तर सत्याग्रहाला तयार झाले पाहिजे. सरकार फार झाले तर तुम्हाला तुरुंगात घालील. परंतु तेथील लोकांची तुमच्यापेक्षा चांगली स्थितीअसल्यामुळे तुम्हाला भिण्याचे कारण नाही असे उपरोधिकपणे सुनावले. अध्यक्षपदावरून भाषण करताना महर्षी वि. रा. शिंदे म्हणाले, "जगातील एका अत्यंत बुद्धिवान, संपत्तिवान आणि पराक्रमी जातीच्या लोकांचे ह्या देशावर शंभर वर्षं राज्य असूनही नऊ दशांश जनतेची केविलवाणी स्थिती असावी आणि इकडे या राज्यकर्त्यांच्या टेकडीवरील हवेशीर राजवाड्यात नाचरंग, तमाशे यांची झोड उठावी." याबद्दल त्यांनी ब्रिटिशांच्या राजनीतीचा धिक्कार केला.

परिषदेचे कामकाज पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांची प्रचंड मिरवणूक निघाली. मिरवणुकीत महर्षी शिंदे, स्वागताध्यक्ष बाबुराव जेधे, केशवराव जेधे, शंकरराव देव, तात्यासाहेब शिराळकर इत्यादी मंडळी होती. कौन्सिल हॉल येथे मिरवणूक आल्यानंतर एक लक्ष शेतकऱ्यांच्या सह्यांचा अर्ज लोकनियुक्त प्रतिनिधीकडे सुपूर्त करण्यात आला. समारोप प्रसंगी शंकरराव देव, दिनकरराव जवळकर कर्मवीर भाऊराव पाटील यांची भाषणे झाली. या परिषदेच्या कामकाजाचा धसका सरकारने घेऊन सारावाढ तुकडेबंदी विधेयक मागे घेतले.

वाळवे तालुका शेतकरी परिषद (१९३९, बोरगाव) : स्वातंत्र्यपूर्व सातारा जिल्ह्यातील बोरगाव येथे वाळवे तालुका शेतकरी परिषद दि. जून, १९३१ रोजी संपन्न झाली. स्वागताध्यक्ष होते माधवराव बागल तर अध्यक्ष होते महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. महर्षी शिंदे म्हणाले, माझ्या मते, शेतकरी म्हणजे तोच की जो आपल्या कुटुंबाच्या आश्रितांच्या पोषणाला, शिक्षणाला आणि योग्य त्यां सुखसोईंना आवश्यक तितकीच आणि आपल्या आप्तांकडून आश्रितांकडून बाहवेल इतकी जमीन बाळगतो आणि ती आपण स्वतः वा आपल्या आप्तांच्या आश्रितांच्या श्रमाने योग्य रीतीने खरोखर वाहतो असे करता इतर जे जे म्हणून जमीन धारण करतात किंवा तिच्यावर हक्क सांगतात ते ते सर्व केवळ भांडवलदार आणि म्हणून ते खऱ्या अर्थाने शेती करणारे शेतकरी नसून त्या शेतकऱ्यांचे अगदी शत्रू नसले तरी त्यांचे दावेदार आणि प्रतिस्पर्धी समजण्यास हरकत नाही."

चांदवड तालुका शेतकरी परिषद (१९३१, वडणेर) :

१९ सप्टेंबर, १९३१ रोजी महर्षी वि. रा. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली वडणेर परिषद संपन्न झाली. शेतकऱ्यांनी आपली संघटना स्थापन करावी यावर महर्षींनी भर दिला. शेतकऱ्यांना उद्देशून ते म्हणाले, "शेतकऱ्यांनो, तुम्ही नेहमी काबाडकष्ट करणारे नांगरे म्हणून काळ कंठता तुम्ही आपला एक हात अर्थउत्पादनात गुंतवून दुसरा हात त्या उत्पन्न केलेल्या अर्थची विल्हेवारी कशी चालली आहे हे पाहून या अर्थगाड्यांच्या बैलाची शिंगदोरी खेचण्याकरिता नेहमी मोकळा ठेवणे जरूर आहे."

संस्थानी शेतकरी परिषद (१९३२, तेरदाळ)

संस्थानी मुलखातील शेतकरी परिषदेस दिनांक जानेवारी, १९३२ रोजी तेरदाळ येथे प्रारंभ झाला. या परिषदेसाठी मुधोळ, जत, कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी, बनहट्टी इत्यादी संस्थानी हद्दीतील प्रतिनिधी उपस्थित होते. महर्षी शिंदे यांचे बालपण जमखंडी या गावी संस्थानी अमलातच गेले असल्याने संस्थानिकांच्या लहरीपणाचे चटके कसे बसतात हे त्यांनी अनुभवले होते.

या शेतकरी परिषदेचे स्वागताध्यक्ष होते श्री. विष्णुपंत देशपांडे तर अध्यक्षस्थानी होते महर्षी वि. रा. शिंदे. त्यांनी आपल्या भाषणाच्या मराठीतील छापील प्रती सभागृहात वाटल्या सुमारे दीड तास अस्खलित कानडीमध्ये भाषण केले. ते म्हणाले, "शेतकऱ्यांची सर्वत्र हीन स्थिती आहे आणि संस्थानी अमलात तर शेतकरी जास्तच दुःखी आहेत. राजा आणि त्यांची प्रभावळ स्वतःच्या धर्माची, जातीची, हितसंबंधाची असूनसुद्धा येथे परकीय राज्यकर्त्यांपेक्षा जास्त जुलूम होतो ही विदारक परिस्थिती आहे.'

महर्षी म्हणतात, शेतकऱ्यांची स्थिती ही अस्पृश्यांहून अधिक हलाखीची झाली आहे. कारण ब्रिटिश मुलखातील अस्पृश्यव थोडीफार जागृती झाली आहे. पण संस्थानातील शेतकरी वर्गात तेवढीही जागृती नाही, ही वस्तुस्थिती त्यांनी लक्षात आणून दिली. शेतकऱ्यांत जागृती व्हावी यासाठी पुण्यातील म्युनिसिपालटीचे चीफ ऑफिसर आप्पासाहेब भागवत, बाळूकाका कानिटकर, सातारा येथील शाहू छत्रपती बोर्डिंगचे चालक भाऊराव पाटील यांचे कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगितले.

भाषणाच्या अखेरीस महर्षी शिंदे म्हणाले, "शेतकऱ्यांजवळ द्रव्य कोठून येणार? ते तर सर्व तुम्हाजवळ येऊन चुकले आहे. फूल नाही फुलाची पाकळी तरी परत करू. शेतकऱ्याला पुन्हा त्याच्या पायावर उभे करू. बळीराजा उभा राहील तरच स्वराज्याची आशा. शेतकऱ्यांची संघटना जरी तुमच्या फावल्या वेळेचे काम आहे तरी त्या घटनेवरच शेतकऱ्यांचे पर्यायाने तुम्हा-आम्हा सर्वांचे जीवित अवलंबून आहे. एरवी आम्ही सर्व मृतप्रायच आहोत."

या परिषदेमध्ये संस्थानी प्रदेशातील शेतकऱ्यांच्या स्थितीची मीमांसा करण्यात आली. त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी रास्त मागण्या करण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या संघटनेची आवश्यकता पटवून देण्यात आली. या अधिवेशनात पुढील ठराव संमत करण्यात आले.

. जमिनीच्या मालकाने कुळांना खंडात एकतृतीयांश सूट द्यावी.

. शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य होण्यासाठी सरकारने, लोकल बोर्डाने हातरहाट हातमाग यासारख्या दुय्यम धंद्याची जोड देऊन साहाय्य करावे.

. प्राथमिक शिक्षणाप्रमाणेच कृषी शिक्षण देणाऱ्या शाळा संस्थानात सुरू कराव्यात.

. कमी पाण्यावर अधिक पीक घेण्याच्या प्रयोगाचा प्रसार करण्यात

. शेतसारा कमी करण्यात यावा.

. संस्थानी मुलखात फिरते आयुर्वेदिक दवाखाने सुरू करण्यात यावेत.

. लोकांनी घरी सूत काढून हातमागावर विणून खादी तयार करावी वापरावी. . अधिवेशनात पास झालेल्या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी विष्णुपंत देशपांडे, दामूअण्णा हुल्याळकर यांच्या नेतृत्वाखाली कमिटी नेमण्यात यावी.

महर्षी वि. रा. शिंदे यांनी शेतकऱ्यांमध्ये जागृती होण्यासाठी, त्यांना संघटित करण्यासाठी पुणे, बोरगाव, वडणेर, तेरदाळ या ठिकाणी परिषदा घेतल्या. अनेक ठराव पास केले. सरकार संस्थानिकांना शेतकऱ्यांच्या अडचणी सांगितल्या. महर्षीच्या कार्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या हक्क कर्तव्याची जाणीव झाली.

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...