Print Friendly and PDF e-contents Radhanagari College: प्रार्थना समाज

Monday, 21 June 2021

प्रार्थना समाज

 (Mokashi P. A.)

B.A.II SEMESTER-4

PAPER - II H.S.R.M.(I.D.S.)

       प्रार्थना समाज

हिंदू धर्मात शिरलेल्या अनेक वाईट गोष्टी आणि चालीरीती दूर करून धर्माचे शुद्धीकरण करण्यासाठी राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना बंगालमध्ये केली. या समाजाच्या कार्यामुळे तेथे सामाजिक व धार्मिक क्षेत्रात मोठे परिवर्तन घडून आले. या चळवळीने महाराष्ट्रातील सुशिक्षित तरुणांना भारावून सोडले होते. त्यांच्यातील वैचारिक जागृतीतूनच महाराष्ट्रात प्रार्थना समाजाची स्थापना झाली. इंग्रजी राजवट, पाश्चात्त्य शिक्षण पद्धती व तत्त्वज्ञान या गोष्टींचाही प्रभाव पडून सामाजिक सुधारणेच्या चळवळीला चालना मिळाली. महाराष्ट्रात वैचारिक क्रांतीचे व प्रबोधनाचे कार्य बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, महात्मा फुले इत्यादी सुधारक करत होते. त्यांच्या कार्यामुळेच धर्मसुधारणेची पार्श्वभूमी तयार झाली. धार्मिक क्षेत्रात बुद्धिनिष्ठ विचारसरणी स्वीकारणारी काही मंडळी निर्माण झाली.

महाराष्ट्रात धर्मसुधारणेच्या चळवळीचा अग्रमान परमहंस सभेला द्यावा लागतो. . . १८४९ मध्ये 'परमहंस सभेची' स्थापना दादोबा पांडुरंग, रामकृष्ण परमहंस, बाबा पद्मजी, भाऊ महाजन इत्यादींनी मुंबई येथे केली. या संघटनेचे कार्य गोपनीय होते. या सभेच्या ध्येयधोरणावर ख्रिश्चन धर्माच्या तत्त्वांचा प्रभाव होता. जातिभेद निर्मूलन, मूर्तिपूजेस विरोध, सर्व जाती-धर्माचे एकीकरण इत्यादी उद्देश या सभेने स्वीकारले होते. या सभेमध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक सामावलेले होते. ा सभेचे लोक विचाराने परिपक्व असले तरी सामाजिक रोषाला तोंड देण्याइतपत धैर्यशील नव्हते. त्यामुळे त्यांनी या संघटनेचे कामकाज गुप्तपणे चालविले होते. . . १८६० मध्ये या संघटनेच्या सदस्यांची यादी चोरीस गेली. लोकक्षोभाच्या भीतीने अनेकांनी या सभेतून काढता पाय घेतला. सभेचे कामकाज जरी ठप्प झाले असले तरी समाजात तिची प्रतिमा होती. लोकसभेविषयी आदर बाळगून होते.

 प्रार्थना समाजाची स्थापना:

सन १८५७ च्या उठावानंतर सामाजिक, राजकीय व आर्थिक जीवनात अनेक स्थित्यंतरे घडून आली. परमहंस सभेतील काही विचारवंतांना व इतरांनाही हिंदू धर्मातील वाईट प्रथा गेल्या पाहिजेत असे वाटत होते. धर्मसुधारणेच्या चळवळीला गती दिली पाहिजे असे त्यांचे स्पष्ट मत होते. अशा वातावरणातच इ. . १८६४ मध्ये ब्राह्मो समाजाचे प्रवर्तक केशवचंद्र सेन मुंबईत आले. त्यांनी धर्मसुधारणेविषयी तेथे व्याख्याने दिली. त्यांच्या व्याख्यानाचा व कार्याचा प्रभाव नवविचारवाद्यांवर पडला. धर्मसुधारणेला चालना मिळाली.

दादोबा पांडुरंग व त्यांचे बंधू डॉ. आत्माराम पांडुरंग यांच्या पुढाकाराने इ. . १८६७ मध्ये 'प्रार्थना समाजा'ची स्थापना मुंबईत झाली. त्यात प्रारंभी रामलाल कृष्ण, परमानंद, भाऊ महाजन इत्यादी सदस्य होते. डॉ. भांडारकर, न्या. रानडे ही मातब्बर मंडळी नंतर त्यात दाखल झाली. या समाजाच्या प्रचारासाठी 'सुबोध पत्रिका' हे वृत्तपत्र सुरू करण्यात आले. गिरगाव येथे या समाजाने स्वतःची इमारत बांधली.

प्रार्थना समाजाचे स्वरूप:

ब्राह्मो समाज व प्रार्थना समाज यांच्या विचारसरणीत मूलभूत फरक असल्याचे पाहावयास मिळते. हिंदू धर्मातील एक सुधारक पंथ म्हणून प्रार्थना समाजाने कार्य सुरू केले. ब्राह्मो समाज परमेश्वर निर्गुण, निराकार आणि आत्मा व परमात्मा यांचे अद्वैत मानतो. प्रार्थना समाजाला मूर्तिपूजा मान्य नसली तरी परमेश्वराला सगुण मानत होता. हे या दोन पंथांतील महत्त्वाचे फरक होते. हे लक्षात घेतल्यानंतर प्रार्थना समाजाचे तत्त्वज्ञान समजणे सुलभ होते. प्रार्थना समाज हिंदू धर्माभिमानी होता. महाराष्ट्रातील भक्तिसंप्रदायास त्याची मान्यता होती. त्यामुळेच या समाजाच्या सभेमध्ये महाराष्ट्रीय संतांचे अभंग म्हटले जात.

प्रार्थना समाजाचे तत्त्वज्ञान:

प्रार्थना समाजाचे तत्त्वज्ञान विशद करताना असे म्हणता येईल की, 'परमेश्वर एक आहे. या जगनियंत्रक, अनंतरूपी, सर्वशक्तिमान, पापनाशन, पालनकर्त्या परमेश्वरास शरण गेल्यास इहलोकी सुख मिळत. त्याचे गुणगान करणे व त्याला आवडणारी सक्रिया करणे हीच त्याची खरी पूजा होय. मूर्ती किंवा अन्य सृष्ट पदार्थांची पूजा त्यास पोहोचत नाही.. तो अवतार घेत नाही. त्याने कोणताही धर्मग्रंथ निर्माण केलेला नाही. सर्व माणसे ईश्वराची लेकरे आहेत. आपापसात बंधुभावाने वागणे हे प्रत्येक मनुष्यमात्राचे कर्तव्य आहे. या कर्तव्याने परमेश्वर प्रसन्न होतो.'

केशवचंद्र सेन इ. . १८६८ मध्ये मुंबई भेटीस आले. १८६८ मध्ये न्या. रानडे व १८६९ मध्ये डॉ. भांडारकर प्रार्थना समाजाचे सदस्य झाले. न्या. रानडे प्रार्थना समाजास जुन्या भागवत धर्माची शाखा मानतात. भागवत धर्म हा प्रोटेस्टंट पंथाप्रमाणे आहे. मध्य युगापासून महाराष्ट्रीयन संतांनी सुरू केलेली आध्यात्मिक व सामाजिक प्रगती, बहुजनांचा उद्धार आज प्रार्थना समाज चालवत आहे असे ते म्हणतात. 'Love of God in the service of man' हे न्या. रानडेंनी प्रार्थना समाजासाठी घोषवाक्य ठरविले.

न्या. रानडे प्रार्थना समाजाची उद्दिष्टे सांगताना म्हणतात, 'समाजाची नैतिक प्रगती साधून, ईश्वरपूजेची वर्तमान चौकट काढून तेथे अध्यात्मनिष्ठ दुसरी व्यवस्था देणे ही आपली उद्दिष्टे असली पाहिजेत. '

प्रार्थना समाजाची तत्त्वे पुढीलप्रमाणे

. परमेश्वर एक असून तो विश्वाचा निर्माता आहे. तो निराकार आहे. तो दयाळू आहे. तो सर्वांवर प्रेम करतो. . सत्य, सदाचार व भक्ती हे परमेश्वराच्या उपासनेचे खरे मार्ग आहेत. या मार्गानेच गेल्यानंतर तो प्रसन्न होतो. . प्रार्थनेमुळे भौतिक फलप्राप्ती होत नाही. मात्र प्रार्थनेमुळे आध्यात्मिक उन्नती होते.

. परमेश्वर अवतार घेत नाही. त्याने कोणताही धर्मग्रंथ लिहिला नाही.

. मूर्तिपूजा परमेश्वरास मान्य नाही.

. सर्व मानव एकाच परमेश्वराची लेकरे आहेत. म्हणूनच सर्वांनी बंधुत्वाच्या भावनेने एकमेकांशी व्यवहार करावा.

षडंगाची उपासना पद्धती:

प्रार्थना मंदिरात साप्ताहिक उपासना केली जात असून तिची सहा अंगे मानली जात होती.

. उद्बोधन : त्याज्य विचार मनातून काढून टाकून स्वतः व इतर उपासकांना उपासनोन्मुख बनविणे.

. स्तवन : ईश्वराचे सामर्थ्य, तेज, पावित्र्य, प्रेम इत्यादी गुणांचे स्तवन करणे.

. कृतज्ञता दर्शन : ईश्वराविषयी कृतज्ञता व्यक्त करावी.

. प्रार्थना: अभंग, ओव्या व प्रार्थना करणे. . निरुपण उपदेशात्मक प्रवचनाचा लाभ घेणे.

. आरती : उपासनेसाठी समाजाने अनेक प्रार्थना मंदिरे उभारली. प्रार्थना समाजाचे कार्य

प्रार्थना समाजाने धर्मप्रसारापेक्षाही सामाजिक सुधारणेच्या चळवळीकडे विशेष लक्ष पुरविले. अस्पृश्यता निवारण, विधवा विवाह, मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन, बालविवाहास विरोध इत्यादी क्षेत्रांत या समाजाने भरीव कार्य केले. या समाजाच्या वतीने अनेक लोकोपयोगी कामे झाली. ना. . जोशी यांनी 'सोशल सर्व्हिस लीग' स्थापून मजुरांची स्थिती सुधारण्याचे प्रयत्न केले. देशसेवेसाठी चांगले कार्यकर्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने नामदार गोखले यांनी 'सव्हॅटस ऑफ इंडिया सोसायटी' ही संस्था स्थापन केली. अस्पृश्यांच्या उन्नतीसाठी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी 'डिप्रेस्ड क्लासेस मिशन' ही संस्था स्थापन केली. या संघटनेने अस्पृश्यता निवारणाच्या क्षेत्रात मोलाचे कार्य केले आहे. प्रार्थना समाजाच्या वतीने पंढरपूर येथे 'अनाथ बालकाश्रम' काढण्यात आला. समाजाच्या गरजेच्या दृष्टीने ही भरीव कामगिरी होती. महात्मा जोतिबा फुले यांच्या अनाथाश्रमापासून या समाजाने प्रेरणा घेतली होती. मुलींसाठी स्वतंत्र शाळा सुरू केल्या. 'आर्य महिला समाज' ही स्त्रियांसाठी कार्य करणारी संस्था सुरू करण्यात आली. मजुरांसाठी रात्रशाळा सुरू केल्या. प्रार्थना समाजाची तत्त्वे पटवून देण्यासाठी, या समाजाबद्दल लोकांना असलेल्या निरनिराळ्या शंकांचे निरसन करण्यात आले. याबाबत न्या. रानडे यांनी 'Theist’s Confesion of Faith' हा विचारप्रवर्तक निबंध लिहिला.

प्रार्थना समाजाला वैचारिक व निःस्वार्थी नेतृत्व लाभूनही ठरावीक शहरापुरतेच त्यांचे कार्य पोहोचू शकले. त्याचे प्रमुख कारण म्हणजे, त्यातील सुधारक मिशनऱ्यांचे अनुकरण करीत होते. त्यामुळे हिंदूंना त्यांच्या कार्याविषयी फारशी आपुलकी वाटली नाही. त्याचबरोबर प्रार्थना समाजाच्या प्रवर्तकांत विचारात आणि कृतीत बऱ्याच वेळा विसंगती दिसून येई. हा समाज ब्रिटिश सत्तेचे समर्थन करी. त्यामुळे त्याची व्याप्ती वाढली नाही. मात्र त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्रात धर्मपरिवर्तन चळवळ हळूहळू वाढू लागली, हे नाकारून चालणार नाही.

प्रार्थना समाज आणि महर्षी वि. रा. शिंदे

 प्रार्थना समाजात प्रवेश : प्रोफेसर एफ. मॅक्स मुल्लर यांच्या विचारांचा अण्णासाहेबांवर प्रभाव पडला. तशातच श्री. प्रतापचंद्र मुजुमदार यांनी केशवचंद्र सेन यांचे इंग्रजी भाषेत लिहिलेले चरित्र वाचले. या चरित्रातील 'बॅप्टिझम ऑफ फायर' म्हणजेच 'अग्निस्नान' हे प्रकरण वाचून ते झपाटून गेले. दि. २९ मे, १८९८ रोजी अण्णासाहेब बहीण जनाक्कासह पुण्याच्या प्रार्थना समाजात गेले. तेथील पवित्र व श्रद्धामय वातावरणाचा अण्णासाहेबांच्या संवेदनशील मनावर सखोल परिणाम घडून आला. अण्णासाहेब म्हणतात, "येथे माझे मन श्रद्धेने मृदू व पवित्र झाले. प्रार्थनेची पदे मी सगळ्यांबरोबर अनन्यभावाने गायली. तेथे हिंदू धर्माचे निर्मळ व उज्ज्वल स्वरूप दिसले." अण्णासाहेबांनी ब्राह्मो समाजाच्या वाङ्मयाचा अभ्यास केला. समविचारी मित्रांच्या गाठीभेटी झाल्या. चर्चा होऊ लागल्या आणि याचे रूपांतर सर्वांनी प्रार्थना समाजाची दीक्षा घेण्यात झाले. 'प्रार्थना ही साक्षात धर्माचा प्राण व मनुष्याचा जिव्हाळा होय.'

धर्मशास्त्राच्या अभ्यासासाठी महर्षी विलायतेस

महर्षी वि. रा. शिंदे हे प्रार्थना समाजासाठी कार्य करू लागले. मँचेस्टर कॉलेजमध्ये (ऑक्सफर्ड) धर्मशास्त्राच्या तौलनिक अभ्यासासाठी जाण्याकरिता ते श्री. मोती बुलासा यांची ब्राह्मो समाजाने निवड केली होती. परंतु दुर्दैवाने त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला. त्यांच्या जागी महर्षी शिंदेंना परदेशी पाठविण्याची डॉ. भांडारकरांनी शिफारस केली. दरम्यान महर्षी एल. एल. बी च्या शिक्षणासाठी मुंबईला आले होते. त्यांनी धर्मशास्त्राच्या तौलनिक अभ्यासासाठी कायद्याच्या शिक्षणाला रामराम ठोकला. प्रवासखर्चाची अडचण होती. अण्णासाहेब बडोद्याला जाऊन श्रीमंत सयाजीराव महाराजांना भेटले. यापूर्वी महाराजांनी शिक्षणासाठी दीड हजार स्कॉलरशिप दिली होती. अण्णासाहेबांनी त्या ऋणाची परतफेड केलेली नव्हती. कराराप्रमाणे त्यांना बडोदा संस्थानात नोकरी करणे भाग होते. तरीही अण्णासाहेब महाराजांकडे गेले त्यांना नम्रपणे म्हणाले, "महाराजा, मी पत्करलेले कार्य ईश्वराचे आहे. आणि ते आपणास पसंत पडण्यासारखे आहे. धर्मसुधारणा, समाजसुधारणा इत्यादी प्रागतिक गोष्टींचे बाळकडू आपण आजपर्यंत पुष्कळच पाजीत आलेले आहात... मला प्रवासास लागणारे सुमारे दीड हजार रुपये जर आपण कृपाळूपणे द्याल तर अर्थातच माझे मागचे दीड हजार रुपयांचे ऋण फिटले असेच मी समजेन."

अण्णासाहेबांचा ऋण फेडण्याचा हा अजब प्रकार पाहून श्रीमंत सयाजीराव महाराज हसले व दिलदार मनाने प्रवासखर्चास व परतीच्या प्रवासासाठीही मदत देऊ केली. शिक्षणासाठी दिलेल्या रकमेचा परतफेडीचा करार असूनही महाराजांनी अण्णासाहेबांना मोठ्या मनाने मुभा दिली.

दि. २१ सप्टेंबर, १९०१ रोजी अण्णासाहेब परदेश वारीस निघाले. मुंबई, एडन, सुवेझ, पोर्टसैद, मार्सेस, पॅरिस, लंडन असा प्रवास करीत दि. १० ऑक्टोबर, १९०१ रोजी ते ऑक्सफर्डला पोहोचले. सन १९०१ ते १९०३ या काळात अण्णासाहेबांनी मँचेस्टर येथे उदारमतवादी धर्मशिक्षणाचा अभ्यास केला. अर्धा युरोप त्यांनी डोळ्यांनी अनुभवला. पाश्चात्त्य समाज आणि संस्कृतीचा अभ्यास केला. या काळात त्यांनी आपली 'रोजनिशी' लिहिली. मुंबईच्या 'सुबोध पत्रिके'साठी काही प्रवास लेख पाठविले. सप्टेंबर, १९०३ मध्ये हॉलंडची राजधानी अॅमस्टरडॅम येथे 'इंटरनॅशनल लिबरल रिलिजस' या परिषदेकरिता भारताचे ब्राह्मो समाजाचे प्रतिनिधी म्हणून ते उपस्थित राहिले. या परिषदेमध्ये त्यांनी 'लिबरल रिलिजन इन इंडिया' (हिंदुस्थानातील उदारमतवादी धर्म) हा शोधनिबंध वाचला. अण्णासाहेब आपला अभ्यास दौरा आटोपून दि. ऑक्टोबर, १९०३ रोजी मायदेशी परतले.

ब्राह्मो समाजाच्या ठरलेल्या अटीप्रमाणे त्यांनी आजन्म ब्राह्मधर्म प्रचारासाठी वाहून घेतले. अण्णासाहेबांचा हा निर्णय त्यांच्या आई-वडिलांना अत्यंत आवडला. वडील वारकरी होते. आई-वडिलांची आत्मसंतुष्ट वृत्ती अण्णासाहेबांना आयुष्यभर प्रेरणा देणारी दिव्यशक्ती ठरली. अण्णासाहेब म्हणतात, "माझ्या पुढील आयुष्याचं तारू अनेक तुफानातून सुरक्षितपणे चालले, त्याला आधार काय ती माझ्या आई-वडिलांची आत्मसंतुष्ट वृत्ती होय. माझी आई तर आत्मसंतोषाचं दिव्य आगरच होय.

विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म ।

भेदाभेद भ्रम अमंगळ ।

कोणाही जीवाचा न घडो मत्सर

वर्म सर्वेश्वर पूजनाचे ||

या विचारांवर अण्णासाहेबांची अढळ श्रद्धा होती. त्यांच्या वडिलांनी रामजी बाबांनी आपल्या मुलांची नावेदेखील कृष्णा, विठ्ठल, जनाबाई, मुक्ताबाई, एकनाथ अशी वारकरी संप्रदायातील ठेवली होती. अण्णासाहेबांना आई-वडिलांकडून भागवत धर्माचे (वारकरी) बाळकडू मिळाले होते. आता तर त्यांनी समाजसेवेचे असिधारा व्रत स्वीकारले होते. प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी दौरे अण्णासाहेबांनी सन १९०१ ते १९०३ या काळात मँचेस्टरला धर्मशास्त्राचा अभ्यास करून मायदेशी परत आल्यानंतर 'मी नोकरी करणार नाही. मात्र अल्पशा मानधनावर प्रार्थना समाजाचा तहहयात प्रचारक म्हणूनच आयुष्य कंठणार' अशी कर्तव्यकठोर भूमिका स्वीकारली आणि ती प्रत्यक्षात निभावली. ोव्हेंबर, १९०३ साली मुंबईच्या प्रार्थना समाजाने एकमताने ठराव करून त्यांना प्रचारक नेमले. सन १९०३ ते १९०६ या काळात अण्णासाहेबांनी ब्राह्मो समाजाच्या प्रचारासाठी भारतभर प्रवास केला. बडोद्याला जाऊन श्रीमंत, सयाजीराव महाराजांची भेट घेतली. त्यांनी चालविलेल्या अस्पृश्योद्धाराच्या कार्यक्रमाबाबत विचारविनिमय केला. महाराज चालवत असणाऱ्या अस्पृश्यांच्या शाळांची त्यांनी तपासणी केली व अस्पृश्य विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देऊन त्यांच्या उच्च शिक्षणाच्या सोई-सुविधेबाबत शिफारशी केल्या. अण्णासाहेबांनी केलेल्या शिफारशी श्रीमंत सयाजीराव महाराजांनी स्वीकारून त्यांची अंमलबजावणी केली.

अण्णासाहेबांनी ब्राह्मो समाजाच्या प्रचार व प्रसारासाठी मद्रास, बंगलोर, कलकत्ता येथे परिषदा आयोजित केल्या. भाषणे दिली. विस्कळीत झालेल्या भारतीय एकेश्वरी परिषदेचे सामाजिक संबंध दृढ होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले. कलकत्ता, जगन्नाथपुरी इत्याद ठिकाणी हिंदू धर्माची विटंबना होत असल्याचे त्यांनी पाहिले. यावरती त्यांनी मार्ग सुचविला, अस्पृश्यांच्या उन्नतीने देशविकास साधला जाईल असे त्यांनी प्रतिपादन केले. अण्णासाहेबांचे सर्व कुटुंब समाजसेवेसाठी गिरगावच्या राममोहन आश्रमात राहावयास आले.

जमखंडी प्रक्षुब्ध झाली :

गिरगावला राहावयास येण्याअगोदार अण्णासाहेबांनी ब्राह्मो समाजाच्या प्रचारासाठी जमखंडी दौरा केला. याच वेळी महारवाड्यातील १० वर्षांची मुलगी मुरळी म्हणून सोडल्याचे अण्णासाहेबांना समजले. त्यांनी मुलीच्या आई-वडिलांची भेट घेतली व सांगितले, 'मुलीला मुरळी म्हणून सोडू नका. तिच्या आयुष्याचे वाटोळे करू नका.' तिच्या शिक्षणाची व्यवस्था करण्याचे काम अण्णासाहेबांनी ठरविले. हिंदू धर्मातील दुष्ट रूढी व खुळचट धार्मिक कल्पना याविरुद्ध त्यांनी शस्त्र उचलले होते. खऱ्या मानवधर्माचे बीजारोपण त्यांना करावयाचे होते. पण तत्कालीन समाज अंधश्रद्धेच्या खोल गर्तेत बुडालेला होता. काही सनातन्यांनी, अण्णासाहेब ख्रिस्ती झाले आहेत, ते आपणास बाटवण्याचा प्रयत्न करताहेत असा प्रचार सुरू केला. आपल्या धर्मात ढवळाढवळ करणारा हा कोण ?" असे लोक प्रश्न करू लागले. लोकांनी जमाव केला व अण्णासाहेबांच्या घरावर दगडविटांचा मारा सुरू केला. रामजीबाबांना पोलिसांची मदत घ्यावी लागली. अण्णासाहेबांना या घटनेचे फार दुःख झाले. अशा स्थितीत गावात राहणे धोक्याचे म्हणून घरातील सर्वांनी जमखंडीचा त्याग केला व सर्व जण मुंबईत गिरगावच्या राममोहन आश्रमात राहायला आले.

अण्णासाहेबांनी प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी नाशिक, पंढरपूर, सातारा, अहमदनगर, इंदूर, मांडवगड, नवसारी, सोनगड, बडोदे, पनवेल, कोल्हापूर इत्यादी ठिकाणी दौरे केले.

पंढरपूर : अण्णासाहेब प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी पंढरपूरला आले. तेथे ते प्रार्थनासमाजाच्या बालहत्या प्रतिबंधक गृहात उतरले. व्याख्यानासाठी हॉलमध्ये आले. मात्र श्रोते कुणीच हजर नव्हते. संयोजकांनी जाणीवपूर्वक फसगत केल्याचे त्यांच्या ध्यानी आले. तथापि, अण्णासाहेब हे कच्च्या गुरूचे चेले नव्हते. त्यांच्याबरोबर त्यांचे सहकारी स्वामी स्वात्मानंदजी होते. अण्णासाहेबांना त्यांनी सांगितले, 'आज मी व्याख्यान देईन ते तुम्ही ऐकायचे, उद्या तुम्ही व्याख्यान द्यायचे आणि ते मी ऐकायचे.' अशा अजब रीतीने पंढरपूरचा दौरा पार पडला.

सातारा : सन १९०५ च्या उन्हाळ्यात अण्णासाहेब प्रचारासाठी सातारला आले. येथे सीतारामपंत जव्हेरे, मोरोपंत जोशी, गणपतराव शिंदे प्रार्थना समाजाचे कार्य करीत होते. अण्णासाहेबांनी अस्पृश्य सैनिकांकरिता येथे व्याख्याने दिली.

अहमदनगर : सन १९०६ मध्ये महर्षी शिंदे प्रार्थना समाजाच्या प्रचारासाठी अहमदनगरला आले. येथे सहदेवराव बागडे प्रार्थना समाजाचे कार्य चालवत होते. येथे प्रार्थना समाजाच्या माध्यमातून स्पृश्यांसाठी एक व अस्पृश्यांसाठी एक अशा रात्रशाळा चालविल्या जात होत्या.

इंदूर : सन १९०७ मध्ये इंदूरला गेले. तेथे प्रार्थना समाजाचे कार्य चांगल्या प्रकारे चालले होते. श्रीमंत तुकोजीराव महाराज व त्यांची पत्नी सीताबाई होळकर यांच्या मदतीमुळे येथे प्रार्थना समाज व्यापक स्वरूपाचे कार्य करू शकला.

नवसारी : येथे १८९८ मध्येच प्रार्थना समाजाची स्थापना झाली होती. अॅड. मोतीलाल मुन्शी येथे समाजाचे काम पाहात होते. महर्षी वि. रा. शिंदे यांनी नवसारीला भेट दिली. येथे प्रार्थना समाजासाठी एक ग्रंथालय असावे अशी सूचना त्यांनी केली. मुंबईहून काही पुस्तकेही पाठवून दिली. नवसारीजवळच सोनगड म्हणून एक गाव आहे. येथे प्रार्थना समाजाने आदिवासी लोकांच्या शिक्षणासाठी सोय केली व त्यांच्यासाठी वसतिगृह चालविले होत.

मंगळूर : सन १९०७ च्या ऑक्टोबर महिन्यात मंगळूरच्या ब्राह्मो समाजाने महर्षीींना आमंत्रित केले. मंगळूरला बिल्लव जातीचे हजारो लोक ब्राह्मो समाजाचे सभासद होते. बिल्लवांना अस्पृश्य मानले जाई. या समाजाचे पुढारी के. रंगराव यांनी अस्पृश्यांच्या उद्धारासाठी १८९७ सालीच सुरुवात केली होती. केशवचंद्र सेन बिल्लवांच्या कार्यानि प्रभावित झाले होते. महर्षी शिंदे यांनी मंगळूरचा दौरा केला. ब्राह्मो व प्रार्थना समाजाची उदात्त तत्त्वे लोकांना सांगितली व बिल्लव समाजाचे अभिनंदन केले.

महर्षीनी प्रार्थना समाजाच्या प्रसारासाठी पनवेल, कोल्हापूर इत्यादी ठिकाणीही दौरे केले. कोल्हापूरला खंडेराव बागल व गोविंदराव सासने यांनी समाजाचे कार्य चांगल्या प्रकारे चालविले होते. महर्षीनी प्रचार व प्रसार दीन्यांमधून समाजाला खऱ्या धर्माची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला. त्यांनी राजा राममोहन रॉय यांना गुरू मानले. केशवचंद्र सेन यांना ते "प्रेरणांचा ज्वालामुखी' म्हणतात. महर्षी शिंदे म्हणतात, ज्या सहज आनंदाने मूल खेळते, तरुण रमतो आणि वृद्ध सात्त्विक चिंतेने व्याकूळ होतो, तोच आनंद ईश्वराच्या उत्तमोत्तम भक्तीत आहे." धर्म ही बाब अंतःकरणांची व भावनांची आहे. म्हणून धर्माचा उदय आणि प्रसार कुटुंबाद्वारे होणे आवश्यक आहे. सहृदयतेत बुद्धिवादाची भर पडावी असे ते सांगतात. महर्षी शिंदे यांच्या घरातूनच भागवत धर्माचे संस्कार झाले होते. यामुळे ते उदारमतवादी ब्राह्मो समाजाकडे आकर्षित झाले. महर्षी म्हणतात, मी प्रार्थना समाजात जाऊन सुधारक झालो नाही तर मी सुधारक होतोच म्हणून प्रार्थना समाजात गेलो."

No comments:

Post a Comment

Note: only a member of this blog may post a comment.

Woamn on a Roof

 (e-content developed by Prof. (Dr) N A Jaranadikar ‘अ वूमन ऑन अ रुफ ’ ही कथा डोरिस लेसिंग या लेखिकेने लिहिली आहे. स्त्रीकडे पाहण्याचा पुरु...