(Mokashi P A)
B.A.II SEMESTER - 4
SOCIOLOGY PAPER - 6
आरोग्याचे समाजशास्त्र
प्रकरण - 3
जीवनशैली आणि आरोग्य
(क) आरोग्याच्या समस्येवरील उपाययोजना
(Remedies on Health Problems)
मनुष्याला प्राप्त होणारे ज्ञान त्याला मेंदू आणि इतर पंचेंद्रियांच्या
साहाय्याने होत असते.
मनुष्याला स्वत:च्या हालचालीसाठी हातापायाचा आणि पंचेंद्रियांचा
सतत उपयोग करावा लागतो. म्हणूनच शरीराचे काळजीपूर्वक
संरक्षण करणे आणि त्या शरीरात बिघाड होऊ न देणे हे मनुष्याचे कर्तव्य आहे. रोगांमुळे मनुष्याच्या जीवनात केवळ शारीरिक प्रश्न
उद्भवतात असे नाही तर मानसिक, कौटुंबिक आणि त्यामधून
सामाजिक प्रश्नही निर्माण होतात.
रोगावर उपचार करणे मनुष्यप्राण्याच्या हातात आहे हे कळायला लागल्यापासून
औषधशास्त्र उदयास आले.
सुरुवातीच्या
अवस्थेत रोग झाला ही घटनाच दैवी कोपामुळे किंवा निसर्गाच्या अवकृपेमुळे झाली असे
मानून माणूस निसर्ग शक्तीचीच पूजा करीत असावा.
असे करता करताच
त्याला नैसर्गिक वनस्पतीमुळे रोगावर उपचार होऊ शकतो या गोष्टीचा साक्षात्कार झाला. अवतीभोवती असलेल्या वनस्पती, फळे, झाडांच्या साली, समुद्रफेस आणि विशिष्ट
प्रकारची खनिज संपत्ती ही माणसाच्या शरीराला उपकारक आहे, याचे ज्ञान माणसाला होऊ लागले.
कोणत्याही रोगाने त्रस्त असलेला रोगी हा चोहोबाजूंनी अडचणीत सापडलेला असतो. अडचणीतून मुक्त होण्यासाठी औषध, शस्त्रक्रिया वा अन्य काही उपचार करून घेणे नितांत
गरजेचे असते. उपचारात दोन घटकांचा समावेश
झालेला असतो. एक उपचार सांगणारा घटक तर दुसरा उपचाराची
अंमलबजावणी करणारा घटक असतो.
व्यक्ती जेव्हा आजारी पडते म्हणजे तिच्या शरीरात जेव्हा बिघाड होतो तो दुरुस्
करण्याच्या पद्धतीला किंवा सेवेला उपचार म्हटले जाते. तसेच रोग होणार तथा तो पसरणार नाही अशी आगाऊ सूचना मिळाल्यामुळे व्यक्तींना
होणाऱ्या रोगापासून
वाचविण्याच्या उपचार पद्धतीला प्रतिबंधात्मक उपाय असे म्हटले जाते. याशिवाय उपचारामध्ये आणखी एक घटना वा बाबदेखील
समाविष्ट झालेली असते ती म्हणजे पुनर्वसनात्मक उपाय होय. पुनर्वसनात्मक उपायामध्ये रोग्याचा रोग जरी संपलेला असला
तरी सर्वसामान्य व्यवहार करण्यासाठी त्याला मदतीची आवश्यकता असते. ही मदत काही शारीरिक यंत्रे,
आर्थिक व औषधांच्या
संबंधित असते. तात्पर्य, उपचार दोन ठिकाणी केला जातो. एक कुटुंबात तथा घरात आणि दुसरा दवाखान्यात तथा
इस्पितळात केला जातो.
भारताच्या राष्ट्रीय आरोग्य धोरणात आरोग्याच्या समस्येवर पुढील तीन उपाय
सांगितले आहेत. (अ) प्रतिबंधात्मक उपाय (ब) संवर्धनात्मक उपाय (क) पुनर्वसनात्मक उपाय, यावर भाष्य करताना भारत
सरकारच्या आरोग्य खात्याचे अधिकारी असे म्हणतात की हे तीन उपाय म्हणजे भारताच्या
राष्ट्रीय आरोग्य रक्षणाचे तीन पैलू आहेत. याचे सविस्तर स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे:-
१. प्रतिबंधात्मक उपाय :
यालाच प्रतिकारात्मक उपचार असेही म्हणतात. यात जनतेला कोणत्याही रोगाने ग्रासू नये यासाठी जे उपचार केले जातात ते या
अंतर्गत येतात. रोग का होतात याची दोन कारणे
लोक समजत असतात. एक म्हणजे शारीरिक विकृती
किंवा बिघाड तर दुसरे म्हणजे
भूतबाधा, करणी नि दैवी कोप होय. या दोन
समजुतीचे लोक समाजात
असतात. शिक्षित माणूससुद्धा या
करणीधरणीवर विश्वास ठेवतो.
तर अडाणी मनुष्य या
कल्पनेला विरोध करतोच असे नाही.
उलट, तो अधिक अंधविश्वासू असतो. तेव्हा रोग होणार नाही याची पूर्वदक्षता घेणे म्हणजे प्रतिबंधात्मक
उपाययोजना होय. प्रतिबंधात्मक उपायासाठी
औषधांच्या उपयोगावर जास्तीतजास्त भर दिला जातो. रोग झाला तर त्याच्यावर उपचार म्हणजे शास्त्रशुद्ध उपचार होय. रोग झाल्यानंतर तो पुन्हा होऊ नये म्हणून औषधोपचार
व अंधश्रद्धात्मक उपचार असे दोन प्रकार पडतात.
(अ) औषधोपचार :
औषधोपचार या उपचार पद्धतीत जर रोग आजूबाजूला निर्माण झाला असेल नि तो अधिक प्रमाणात फैलावू द्यायचा नसेल तर त्यासाठी प्रतिबंधात्मक औषधोपचार करणे नितांत आवश्यक असते. रोग ज्या जंतूंमुळे झाला असेल त्या जंतूंचे समूळ उच्चाटन करण्यासाठी किंवा त्यांच्या प्रतिकारासाठी रोग होण्यापूर्वीच्या औषधी गोळ्या देणे, डोस पाजणे, इंजेक्शन देणे तसेच सभोवतालच्या परिसरात जंतुनाशक फवारे मारणे, सार्वजनिक स्वच्छता व आरोग्यदायक सवयी लोकांना कशा लागतील ते पाहणे, स्वच्छ पाणी, स्वच्छ गटारी, पसरलेल्या घाणीचा नाश करणे. इतकेच नव्हे तर आहाराच्या बाबतीत लक्ष देणे, कोणते पदार्थ खावेत आणि कोणते खाऊ नयेत यासाठी योग्य ते उपाय सुचविले जातात. परंतु लोकांनीसुद्धा स्वतः होऊन या सर्व नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे जरुरीचे असते.
शिक्षित, स्वतःला सुशिक्षित म्हणून
घेणारे लोक अडाणी लोकांप्रमाणेच रोग होण्यापूर्वीच दक्षता घेत नाहीत. शिकलेल्या लोकांना माहीत असते की दारू व सिगारेटचे अति सेवन करण्यानेदेखील रोग
पसरतात. डॉक्टर स्वतः दारू पिऊ नये, बिडी, सिगारेट ओढू नये, तंबाखू चघळू नये असे
रुग्णाला सांगत असले तरी त्यांच्यापैकी कित्येक जण अशा फालतू व्यसनांच्या अधीन गेलेली असतात. हेच लोक कमालीचे जागरण करून अति कष्ट करतात. त्यामुळे हृदय, रक्तदाब यांसारखे रोग ओढवून
घेतात. शिकलेल्या लोकांचे असे हाल
असतील तर न शिकलेल्या लोकांसमोर न बोललेलेच बरे. त्यामुळे शिकलेल्या व न शिकलेल्या लोकांनी जर रोग निर्माण होण्यापूर्वीच उपचार पद्धतीचा अवलंब केला तर
त्यांना रोग होण्याचा प्रश्न निर्माण होत नाही.
(ब) अंधश्रद्धात्मकतेवर प्रतिबंधात्मक उपचार :
रोग बरा होण्यासाठी जा औषधांद्वारे उपचार करून घेतला जातो व तो होणार म्हणून केला जातो तसाच तो परंपरेने जपत आलेला दुसरा अशास्त्रीय, निव्वळ अंधश्रद्धेवर आधारित असलेला उपचार म्हणजे अंधश्रद्धात्मक उपचार होय. रोग का होतात हे आपण पाहिलेच आहे. नैसर्गिक अपघात किंवा अन्य अनपेक्षित कारणे सोडली तर रोग हे
केवळ प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात व्यक्तीच्या विकृत वागण्यामुळे होतात. रोग झालेल्या व्यक्तीजवळ गेल्यामुळे होतात असे जर असेल तर 'रोग होणे ही सामाजिक मानवी घटना आहे' हे प्रत्येकाला समजणे आवश्यक आहे. रोग होणे दैवी कोप आहे, वाईट व्यक्तीने केलेली करणी आहे, देव-देवतांचा शाप आहे, मागच्या जन्मीचे पाप आहे, भूताळी चाळे आहेत, कोणीतरी सूड उगविलेला असेल, कोणाची सावली पडली, कोणाला तरी नाराज केले इत्यादी अनेक प्रकारच्या
समजुती लोकांमध्ये रूढ आहेत.
इतिहासपूर्व
कालापासून सर्वच समाजात रोगांबाबत काही समजुती, काही भ्रम आणि त्या अनुषंगाने काही परंपरा आणि उपचार पद्धती रूढ आहेत. आजही बरेच लोक अशा पारंपरिक श्रद्धांवर अवलंबून आहेत. भगत, मांत्रिक, ताईत, गंडेदोरे, अंगारे-धुपारे अशा प्रथांना बळी
पडतात. काही वेळा तर शेंदूर, कुंकू, रक्त त्याचबरोबर कोंबडी,
बोकड, मेंढा इत्यादींचे बळीही देतात. असे अघोरी व कठोर उपाय करायला लोक तयार होतात आणि
समजा त्यातून रोगी बरा झाला नाही तर देवाचा कोप झाला आहे म्हणून बरा होत नाही असा विचार करतात व पुन्हा इतर
कृत्ये करायला तयार होतात.
अशा कृतीतून काही
वेळा रोग्याचा मृत्यूही होतो.
तेव्हा भगताला दोषी
धरत नाहीत. उलट, स्वतःच्या कर्माला दोष देत राहतात.
इथे आपण रोग बरा करण्याचा उपाय म्हणून विचार करणार नाही आहोत. उलट, अशा अंधश्रद्धांची माहिती घेऊन या अंधश्रद्धा दूर करण्यासाठीचा एक
प्रतिबंधात्मक उपाय म्हणून अभ्यासणार आहोत व अशा अंधश्रद्धा दूर झाल्या नाहीत तर
त्याचे दुष्परिणाम रोग होण्यात व रोग पसरविण्यात होतात. खरूज,
क्षयरोग, त्वचेचे रोग हे केवळ अस्वच्छ राहण्यामुळे होतात हे लक्षात घेतले पाहिजे. लहान मुलांना चांगले खाऊपिऊ घातले नाही, त्यांच्या वाढीकडे दुर्लक्ष केले तर मोठेपणी ती
निकृष्ट प्रकृतीची राहतात.
पिढ्यान्पिढ्या काही
रोग केवळ अंधसमजुतीमुळेच टिकून राहतात. केवळ स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य सांभाळून चालणार नाही तर वैचारिक स्वच्छता, वैज्ञानिक दृष्टिकोण, सत्यनिष्ठ उपायांवर विश्वास ठेवणे या गोष्टी जोपासल्या
पाहिजेत. त्या दृष्टीने आवश्यक ती
शैक्षणिक व सामाजिक जागृती निर्माण करून असे कृत्य करणाऱ्या भगत व मांत्रिकांचे
भांडे फोड केली पाहिजे.
अशा अंधश्रद्धेतून बाहेर पडण्यासाठी आणि रोग निवारणासाठी स्वतःचा आहार चांगला
असावा, रोज स्नान करावे, स्वच्छ कपडे घालावे, कोणतेही व्यसन करू नये, स्वच्छता राखावी असे कार्य केले तर रोग नष्ट होतील. शिवाय रोग होऊ नये यासाठी जर पूर्वदक्षता म्हणून औषधोपचार
केला तर अंधश्रद्धेचे उच्चाटन होऊन लोकांचे जीवन सुखी होईल.
२. संवर्धनात्मक उपाय :
यामध्ये राष्ट्रातील सर्व जनतेच्या आरोग्याचे रक्षण करणे अथवा आरोग्याची जपणूक
करणे यावर भर दिला जातो.
काही आजार व्यक्तीला
असलेल्या व्यसनांमुळे होतात तर काही आजार व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे होतात. तर काही आजार स्वच्छतेकडे पाहिजे तेवढे लक्ष न दिल्यामुळे होतात आणि काही आजार
वातावरण प्रदूषित झाल्यामुळे होतात. दारू, तंबाखू यांचे सेवन तसेच
धूम्रपान, गुटखा सेवन इत्यादींमुळे
यकृताचा, आतड्याचा, तोंडाचा, घशाचा कर्करोग होण्याची शक्यता असते. वाहन चालविताना होणारे अपघात हे बऱ्याच वेळा व्यक्तीच्या निष्काळजी वृत्तीचा परिणाम होय
तर अस्वच्छता व प्रदूषित वातावरण यामुळे त्वचेचे रोग, फुप्फुसाचे रोग, श्वसनाचे रोग, हगवणीचे रोग होण्याची शक्यता असते. यासाठी सरकार व व्यक्ती या दोघांच्या सहकार्याची
गरज असते. जनतेच्या आरोग्याचे रक्षण करण्यासाठी
व त्यांचे आरोग्य सुधारावे म्हणून राष्ट्रीय पातळीवरून अनेक उपाय योजण्यात आले. त्यातील काही प्रमुख उपाय पुढीलप्रमाणे
१. स्वच्छता :
आरोग्याचे रक्षण करणारा आणि रोगाला प्रतिबंध करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे
स्वच्छता होय. मनुष्य जितके स्वच्छतेकडे लक्ष देईल तितके
त्याचे आरोग्य चांगले राहील.
पाच प्रकारच्या
स्वच्छतेकडे लक्ष दिले पाहिजे.
त्या म्हणजे
वैयक्तिक स्वच्छता, प्रामुख्याने स्वतःच्या
शरीराची स्वच्छता, खाण्यापिण्यातील स्वच्छता, स्वतःच्या घराची स्वच्छता, सभोवतालच्या परिसराची स्वच्छता आणि सांडपाण्याचा योग्य निचरा करून स्वच्छता राखणे. अशा प्रकारच्या स्वच्छतेमुळे मलेरिया, हिवताप, डेंग्यूसारख्या रोगांना आळा घालता येतो.
२. सर्व प्रकारच्या सांसर्गिक रोगांचे निर्मूलन करणे : सांसर्गिक रोग होऊ नयेत
म्हणून किंवा संसर्ग झाला तर आजार होऊ नये यासाठी स्वच्छता, सुरक्षित पाणी, पोषक आहार, रोगप्रतिकारक लसीकरण अशा गोष्टींची दक्षता घेणे
आवश्यक आहे.
३. पोषक आहार योजनेअंतर्गत राष्ट्रातील सर्व जनतेला सकस आहाराचा
पुरवठा करण्याची व्यवस्था करणे.
यात सरकारला
दुर्दैवाने अपेक्षित यश प्राप्त झाले नाही.आजही आदिवासी व ग्रामीण परिसरातील जनता एकतर अर्धपोटी आहे किंवा कुपोषित आहे.
४. पर्यावरण स्वच्छता करून त्यात सुधारणा घडवून आणणे. 'गाडगे महाराज नागरी व
ग्रामीण स्वच्छता अभियान'
हा या योजनेचा एक
भाग असून या अंतर्गत एक स्वच्छ नगर व स्वच्छ ग्राम यांना पारितोषिक देण्याची
व्यवस्था केली. त्यालाच 'संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान' म्हणतात.
५. लोकसंख्या वाढीला आळा घालण्यासाठी जनजागृती करून कुटुंब नियोजनासाठी लोकांना व
विशेषतः आदिवासी व ग्रामीण परिसरातील लोकांना उद्युक्त करते. ६. सर्व जनतेला स्वच्छ, शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे किंवा असा प्रयत्न करणे की ज्यामुळे लोकांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
७. माता-बाल आरोग्याचे रक्षण
करण्यासाठी विशेष व्यवस्था करणे,
बाळंतपणात होणाऱ्या
स्त्रियांच्या मृत्यूच्या प्रमाणात आणि बालमृत्यूच्या प्रमाणात घट करण्याचा प्रयत्न करणे.
८. आरोग्य शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचवणे.
९. आरोग्य संरक्षणासाठी आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची व अन्य साधनसामग्रीची
उपलब्धता करणे.
१०.
योगा, प्राणायाम, ध्यानधारणा यावर भर देणे.
११. ताणतणाव कमी करून सकारात्मक विचार रुजविणे, लोकांना चांगल्या सवयी लावणे.
१२. व्यायामावर भर देणे.
१३. वाईट सवयी कमी करणेस प्रोत्साहन देणे उदा. उत्तेजक पेय, धूम्रपान, तंबाखू
सेवन, नशापान टाळणे.
वरीलप्रमाणे आरोग्यावरील संवर्धनात्मक उपाययोजना राबविण्याचा प्रयत्न करणे.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.