(J D Ingawale)
बी.ए.भाग ३. सेमी ६ पेपर 13 अर्थशास्त्रातील संशोधन पध्दतीशास्र
अहवाल लेखन. (Report Writing)
अहवाल लेखन म्हणजे काय? (Meaning)
संशोधकाने एखादी समस्या निश्चित केल्यानंतर त्या संदर्भात तथ्य संकलन करून, त्याची मांडणी व विश्लेषण करून अर्थशोधन केले जाते. ही सर्व प्रक्रिया करून मिळविलेली सामग्री प्रचंड आणि विस्कळीत असते. हे सर्व साहित्य ठरावीक हेतूने मॅकॅनोसारखे जुळवून त्याची सुसूत्र मांडणी करण्याच्या क्रियेला अहवाल लेखन असे म्हणतात.
गुड व हॅट (Goode & Hatt) यांनी अहवाल लेखनाची व्याख्या विस्तृतपणे दिली आहे. ती अशी, “प्रत्येक वाचकास व विशेषतः संबंधित विषयात रस किंवा आवड असणाऱ्यांना संशोधनाची तथ्ये समजू शकतील व त्यातील निष्कर्षांची सत्यासत्यता पडताळून पाहता येईल, अशा
रीतीने पुरेशा सविस्तरपणे व व्यवस्थाबद्ध पद्धतीने संशोधनाचे फलित लोकांसमोर लिखित स्वरूपात मांडणे म्हणजे 'अहवाल लेखन' होय.
संशोधनामधील आपले उद्दिष्ट कोणते, आपण
उपयोगात आणलेल्या संकल्पना कोणत्या, तथ्य
संकलनाची कोणती पद्धती वापरली तसेच त्यावरून कोणते आणि कसे निष्कर्ष काढले, 'ते कितपत खात्रीशीर आहेत. या सर्व गोष्टी अहवालात मांडाव्या लागतात. संशोधनाचा हेतू केवळ ज्ञान संपादन एवढाच मर्यादित असत नाही तर संपादित ज्ञान वाचकांपर्यंत पोहोचविणे हा असतो आणि त्यासाठी संशोधन अहवाल आवश्यक ठरतो. अहवाल लेखन हे एक शास्त्र आहे. त्याचप्रमाणे ती एक कला आहे. आपला
संशोधन अहवाल मुद्देसूदपणे व इतरांना चांगल्या प्रकारे समजेल अशा ओघवत्या भाषेत मांडणे हे कौशल्याचे काम आहे. आपल्यासंशोधनाची मांडणी कशी करावी, त्याची सुरुवात कशी करावी, त्याचे टप्पे कोणते असावेत, शेवट
कसा असावा याबाबत बरेच विचारमंथन झालेले आहे. त्याची एक विशिष्ट घाटणी ठरून गेलेली आहे. संशोधनामधील आपले उद्दिष्ट कोणते आणि आपण उपयोगात आणलेल्या संज्ञा कोणत्या, तथ्य
संकलनासाठी कोणती पद्धती वापरलेली आहे, आलेख
व आकृत्यांवरून त्याचे विश्लेषण कसे केले आहे व त्यावरून निष्कर्ष कसे व कोणते काढले, त्या
निष्कर्षांची विश्वसनीयता किती या सर्व गोष्टी अहवालात व्यवस्थितरित्या मांडाव्या लागतात. थोडक्यात, संशोधकाने उद्देशपूर्ण व परिणामकारक पद्धतीने समाजाशी संपर्क साधण्यासाठी आपल्या संशोधन प्रकल्पासंबंधी व संशोधनाच्या फलितासंबंधी लेखन करणे म्हणजे अहवाल लेखन होय.
अहवाल लेखनाची मांडणी व भाषा ही तो कोणासाठी लिहिला आहे यावर अवलंबून राहील. तो जर संबंधित विषयातील तज्ज्ञांसाठी लिहिला असेल तर त्याची भाषा शास्त्रशुद्ध व बोजड राहील. परंतु तो जर सामान्य वाचकांसाठी लिहिला असेल तर त्याची भाषा व मांडणी ही त्वेगळी राहील.
अहवाल लेखनाचे उद्देश (Objectives)
१. समस्येचा परिचय करून घेणे : काही समस्या अचानक उद्भवतात. त्याबद्दल आपणास काहीच माहिती नसते. उदा. विदर्भ-मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांत आत्महत्येचे प्रमाण एकदम वाढले. मुंबईत जातीय दंगली एकदम वाढल्या. अशा
घटना पूर्वी कधी घडलेल्या नसल्याने आपल्याला त्यासंबंधी काहीच माहिती नसते. अगदी
समस्येचा परिचय करून घेण्याच्या हेतूने काही अहवाल उपयोगी पडतात. विशेषतः परिचयात्मक अथवा अन्वेषणात्मक संशोधनाचे अहवाल अशा प्रकारचे असतात. अशा
अहवालातून एखाद्या गृहीतकाबद्दल काही दिशा मिळते. पुढील संशोधनासाठी मार्गदर्शक होते.
२. वर्णन करणे : परिचयात्मक संशोधनाच्या वरच्या पातळीवरील संशोधनात एखाद्या समस्येशी संबंधित असलेल्या सर्व बाबींचे वर्णन करणे हा अहवाल लेखनाचा हेतू असू शकतो. उदा. कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केलेल्या 'कमवा आणि शिका' योजनेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या आर्थिक परिस्थितीचे वर्णनात्मक संशोधन करावयाचे झाल्यास योजनेतील प्रत्येक विद्यार्थ्याकडून काही माहिती मिळवावी लागेल. उदा. त्यांच्या कुटुंबात माणसे किती, मिळवती किती, अवलंबून असणारी किती, कुटुंबाची मिळकत किती, खर्च
किती, विद्यार्थ्यांना पालकाकडून खर्चासाठी किती पैसे मिळतात, त्यांच्या गरजा कोणत्या, त्यांना अभ्यासाला प्रवृत्त करणाऱ्या प्रेरणा कोणत्या इत्यादी बाबींबद्दल खुलासेवार माहिती जमा करून अहवालातत्याचे वर्णन केलेले असते. संख्याशास्त्रीय पद्धतीने सामग्रीची मांडणी करून काही निष्कर्ष काढलेले असतात. अशा
अहवाल लेखनात संशोधनकर्त्याच्या मतांचा, दृष्टिकोणाचा व प्रवृत्तीचा प्रभाव संशोधनावर पडणार नाही, ते एकांगी होणार नाही याबद्दल काळजी घेतलेली असते. संशोधकाने अहवालात तटस्थ वृत्तीने समस्येचे वर्णन केलेले असते.
३. निदान करणे : अहवालाचा हेतू एखाद्या समस्येचे निदान करणे हा असतो. एखादा डॉक्टर रोगाचे निदान करण्यापूर्वी रोग्याची तपासणी करतो. त्याचे रक्त, रक्तदाब, रक्तातील वेगवेगळे घटक, मल-मूत्र, तापमान, श्वसन इत्यादींचे निरीक्षण करून त्यात आढळणारे बदल, एखाद्या रोगाची लक्षणे इत्यादी विचारात घेऊन रोगाचा अंदाज (पूर्वानुमान)
करतो. त्याचप्रमाणे निदानात्मक संशोधन अहवालात संशोधनकर्ता समस्येतील निरनिराळ्या घटकांबाबत तथ्य संकलन करून निदान करीत असतो. उदा. एखाद्या उद्योगात सरकारने अनेक सवलती देऊनही त्याची वाढ झाली नाही. तो अडचणीत आला तर संबंधित उद्योगाला कोणत्या सवलती दिल्या, त्यांचा लाभ किती व्यावसायिकांना झाला, त्या
उद्योगात किती भांडवल गुंतले आहे, कामगार किती आहेत, कच्च्या मालाचा पुरवठा कोठून व कसा होतो ? मालाची मागणी किती आहे, पर्याय कोणते आहेत, अन्य
देशांत अशा प्रकारचे उत्पादन किती होते, ते किती किमतीला उपलब्ध होते इत्यादींची संख्याशास्त्रीय माहिती जमा करून एखाद्या मॅकॅनिकप्रमाणे नक्की बिघाड कोठे झाला आहे हे शोधून काढले जाते व अहवालामध्ये त्याचे वर्णन केले जाते. त्यावर काही उपायही सुचविले जातात.
४. प्रयोग करणे: प्रयोगाबाबत संशोधन अहवालात कार्यकारण संबंध स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. एखादे विधान तपासून पाहण्यासाठी पुनःपुन्हा प्रयोग करणे व त्यासाठी प्रोत्साहन देणे हा अहवाल लेखनाचा हेतू असू शकतो.
५. ज्ञानात भर घालणे : संशोधनामुळे ज्ञानात भर घातली जाते. प्रत्येक वेळी उपलब्ध असणाऱ्या ज्ञानामधून प्रेरणा घेऊन संशोधक आपली वाटचाल करीत असतो. आपल्यापुढील समस्येचे उत्तर शोधण्यासाठी केलेल्या संशोधनामुळे काही वेळा आपणाला इच्छित उत्तर मिळते. पण काही नवीन समस्या निर्माण होतात त्या सोडविण्यासाठी पुन्हा संशोधन केले जाते. संशोधनामुळे ज्ञानात झालेली वाढ ही वेगवेगळ्या प्रकारची असते. निरनिराळे सुटे सुटे वाटणारे निष्कर्ष निराळ्याच दृष्टिकोणातून एकत्रित केले जातात. तर काही वेळा प्रस्थापित निष्कर्ष चुकीचे आहेत असे सिद्ध होते व नवीन निष्कर्ष शोधण्यासाठी संशोधनाची आवश्यकता भासते.
काही वेळा नवीन परिस्थितीत संशोधन करताना जुनी संशोधनाची तंत्रे अपुरी आहेत हे स्पष्ट होते आणि प्रथम नवीन संशोधन तंत्राचे संशोधन करावे लागते. संशोधनाद्वारे ज्ञात असलेले ज्ञान इतर जिज्ञासू संशोधकांना अहवालाद्वारे देऊन त्याद्वारे त्यांना पुढे जाण्यास प्रेरणा देणे हा अहवालाचा मुख्य उद्देश असतो. एखाद्या संशोधनाचा अहवाल आंतरराष्ट्रीय प्रख्यात नियतकालिकात प्रसिद्ध झाल्यास त्या संदर्भात त्या विषयाचे संशोधन करीत असलेल्या दुसऱ्या संशोधकास मदत होते. आधुनिक काळात ज्ञानाचा विस्फोट होतो आहे. त्यामुळे दर सेकंदाला ज्ञानात भर पडते.
६. धोरण ठरविणे व उपाय योजणे : संशोधनाचे निष्कर्ष त्यांच्या उपयोगासाठी संबंधितांसमोर अहवालरूपाने ठेवणे आवश्यक असते. समाजशास्त्रात तसेच अर्थशास्त्रातही आपल्या समोरच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी माहिती जमा करून निष्कर्ष काढले जातात.ते संबंधितांसमोर अहवाल म्हणून ठेवणे गरजेचे असते. सरकारला विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यास, परिणामकारक उपाय योजण्यास व पुढील धोरण आखण्यास अहवाल उपयोगी पडतात.म्हणूनच सरकार वेळोवेळी वेगवेगळ्या समित्यांची नियुक्ती करून संबंधितांकडून अहवाल घेत असते. त्यावरून सरकारला धोरण आखण्यास मदत होते. सामग्री समजावून घेता येईल व निष्कर्ष पडताळून पाहता येतील एवढ्या पुरेशा खुलाशासह आपल्या अभ्यासाचे संपूर्ण फलित जिज्ञासू वाचकांसमोर व्यवस्थितरीतीने मांडणे हा अहवाल लेखनाचा मुख्य उद्देश असतो.
अहवाल लेखनातील विविध पायऱ्या (Various Steps in Report Writing)
१. विषय-वस्तूचे विश्लेषण : ही पहिली पायरी असते जी विषयाच्या विकासाशी संबंधित असते. विश्लेषणाच्या साधनाने एक वस्तू व इतर यांमधील मानसिक संबंध व साहचर्य यांच्या आधारावर तर्कशुद्ध विकासाचे विश्लेषण करणे. तर्कशुद्ध पद्धतीत विषय विकासाचा साध्य शक्यतेकडून अधिक जटिल रचनेकडील वाटचालीचा समावेश असतो.
२. अंतिम रूपरेषेची तयारी रूपरेषा ही चौकट असते जीमध्ये मोठे लेखन काम रचलेले असते (बांधलेले असते). ही विषयाच्या तार्किक संघटनेला मदत असते व अहवालातील जोर दिलेल्या मुद्द्यांचे स्मरण असते. ही पायरी अत्यंत महत्त्वाची असते. संशोधकाकरिता त्याने त्याच्या संशोधन अभ्यासाच्या संदर्भात काय लिहिले आहे ? तो त्याच्या अभ्यासाच्या विषयातील माहिती गोळा करण्यासाठी स्वीकारलेली पद्धत याविषयी लिहितो. त्याला तोंड द्याव्या लागणाऱ्या विविध मर्यादा, स्वीकारलेल्या विश्लेषणाचे तंत्र विस्तृत निर्णय, सामान्यीकरण आणि प्रश्नाची संबंधित सूचना आदींचे लिखाण या टप्प्यात असते.
३. कच्चा मसुदा तयार करणे : प्राथमिक व दुय्यम सामग्री तयार केल्यानंतर संशोधक मनामध्ये असे उद्दिष्ट ठेवतो की, आता कच्चा मसुदा तयार करावयाचा जसा तो अहवाल लिहितो तसे घटना शोध प्रक्रिया देतो. यासाठी त्याच्या अभ्यासाचा हेतू त्याच्या महत्त्वासह पूर्णपणे लिहितो. त्याचा दृष्टिकोण हा अतिशय पद्धतशीर व विश्लेषणात्मक असतो.
४. पुनर्लिखाण आणि उजळणी : कच्च्या मसुद्यापेक्षा या पायरीला अधिक वेळ लागती . जेव्हा तो पुनर्लिखाण व उजळणी करतो तेव्हा कोणीतरी त्याच्या अहवालातील तर्कशुद्ध विकास अगर सादरीकरण यामधील दोष तपासले पाहिजेत. त्याने हेही पाहिले पाहिजे की, त्याच्या विषयात एकात्मकता व आकर्षकता आहे की नाही ? हा अहवाल योग्य व स्थिर पायावर राहिला आहे का ? त्याने निश्चित पद्धत व्यक्त केली आहे का? याचे स्पष्टीकरण दिले पाहिजे याशिवाय संशोधकाने योग्य लक्ष दिले पाहिजे की, त्याच्या कच्च्या मसुद्यातील सर्व घटनांचा समावेश केला आहे की नाही ?
५. अंतिम संदर्भ ग्रंथांची यादी तयार करणे : संशोधन अहवालात संदर्भ ग्रंथांची यादी ही सामान्यतः पुरवणी असते. ही पुस्तकांची यादी असते जीमध्ये सर्व कामांचा समावेश असतो ज्याच्याशी संशोधकाने सल्लामसलत केलेली असते. ही यादी वर्णानुक्रमाने तयार केली जाते. हिचे
विभाजन दोन भागांत केले जाते. पहिल्या भागात पुस्तिका आणि दुसऱ्या भागात मासिके, वर्तमानपत्रातील लेख यांचा समावेश असतो. या संदर्भ ग्रंथातील नोंदणी पुढीलप्रमाणे असते.
(अ) लेखकाचे नाव
(ब) शीर्षक अधोरेखित असते अगर तिरपा टाइप (in italics)
(क) प्रसिद्धीचे स्थान प्रकाशक व तारीख
(ड) ग्रंथांची संख्या
६. अंतिम मसुदा (आराखडा) लिहिणे हा संक्षिप्त, वस्तुनिष्ठ व साध्या भाषेत, संदिग्ध स्पष्टीकरण टाळून जसा आहे तसा दिसतो असा असावा. संशोधकाने तांत्रिक परिभाषा टाळावी आणि अंतिम आराखड्यात सामान्य अनुभवावर आधारित उदाहरणे व स्पष्टीकरणे यांचा समावेश करावा. ते संशोधन निर्णय व इतर निर्णय अधिक परिणामकारकपणे सादर करावेत. त्याने हे लक्षात ठेवावे की, प्रत्येक अहवाल काही बौद्धिक समस्या (प्रश्न) सोडविण्याचा प्रयत्न असतो आणि समस्येच्या निराकरणात हातभार लावावा व संशोधक व वाचक दोघांच्या ज्ञानात भर घालावी. ही शेवटची पायरी असते.
अशा विविध पायऱ्यांच्या अवलंबाने अहवालाचे लिखाण केल्यास तो निर्दोष बनण्याची अधिक शक्यता असते.
अहवाल लेखनातील दक्षता (Precautions in Report Writing)
१. गृहीतकाच्या उद्देशाची स्पष्टता ज्या गृहीतकाच्या आधारावर संशोधन झालेले असते ते अतिशय निःसंदिग्ध व स्पष्ट शब्दात मांडलेले असावे. त्यामुळे संशोधकाचा दृष्टिकोण आणि संशोधनाचा विषय याबद्दल गोंधळ निर्माण होत नाही.
२. गृहीतकाची पार्श्वभूमी आपण जे गृहीत कृत्य सिद्ध करणार आहोत ते सुचण्यासाठी त्याचा कोणता भाग किंवा घटक उपयुक्त ठरला याची नोंद करणे आवश्यक ठरते. एखाद्या संशोधनावरून ढोबळ स्वरूपाच्या निरीक्षणामधून या गृहीतकाची उभारणी झालेली असेल तर ती पार्श्वभूमी नमूद करणे अगत्याचे असते. कारण
त्याच्यावरून संशोधनाचा तपशील समजण्यास मदत होते.
३. गृहीताची शास्त्रीय भाषेत मांडणी उपलब्ध अशा पारिभाषिक शब्दांची योजना करून गृहीत मांडावे. नवीन
पारिभाषिक शब्दांचे योग्य ते स्पष्टीकरण द्यावे. तसेच
शास्त्रीय परिभाषा सोपी व सुबोध असावी.
४. अहवालाची सोपी भाषा अहवालाची भाषा संशोधनकर्त्याच्या भाषाशैलीवर अवलंबून असते. तथापि, अहवालाची भाषा सहज समजेल अशा प्रकारची असावी. सामान्य वाचकांसाठी असणाऱ्या अहवालामध्ये कमीतकमी शास्त्रीय संज्ञा आणि साधी परिभाषा वापरावी. तज्ज्ञ वाचकांसाठी असणाऱ्या अहवालात अधिकाधिक शास्त्रीय संज्ञा आणि बिनचूकपणा असावा. म्हणजे त्यातून योग्य त्या निष्कर्षांचे ज्ञान वाचकांना होईल अशी अहवालाची भाषा असावी. वाचकांच्या ज्ञानात भर पडेल अशी असावी.
५. अहवालाची स्पष्ट मांडणी अहवालामध्ये स्पष्टपणा येण्यासाठी तळटीपा, शीर्षके, उपशीर्षके, आकृत्या, नकाशे यांचा योग्य प्रकारे, योग्य ठिकाणी उपयोग करावा. संबंधित मजकुराबाबतची अधिक माहिती तळटीपांद्वारे देणे शक्य होते. शीर्षक आणि उपशीर्षकामुळे संपूर्ण अहवाल एकसंध झाला आहे की नाही हे समजते. शीर्षक आणि उपशीर्षकामुळे मांडणीत कोठे फेरफार करणे गरजेचे आहे समजून येते. तसेच
ज्या ज्या ठिकाणी शक्य आणि योग्य आहे त्या त्या ठिकाणी आकृत्या, आलेख, नकाशे इत्यादींचा उपयोग करावा. त्याद्वारे संशोधन समजणे सोपे जाते. त्याचप्रमाणे निष्कर्ष आणि आकडेवारी यांचा सहजपणे पडताळा पाहता येतो. तसेच
भिन्न तक्त्यांची तुलना करता येते.
६. संशोधनाच्या तंत्राबद्दल स्पष्टीकरण: अर्थशास्त्रीय संशोधनात अनेक ठिकाणी आपण वापरलेल्या तंत्राचा खुलासा करणे जरूर असते. आकडेवारी जर नमुना पद्धतीने मिळविलेली असेल तर तो नमुना कसा निवडला, तसेच
कोणत्या आधारावर त्याचे स्वरूप यादृच्छिक आहे याबद्दल माहिती मिळते. तसेच
आकडेवारी प्रश्नावली अगर निरीक्षण पद्धतीने निवडली असेल तर त्याची काही वैशिष्ट्ये असतील तर ती जरूर स्पष्ट करावीत.
७. अहवाल विषयाची तर्कशुद्ध मांडणी एखाद्या विषयावरील निष्कर्ष आणि अनुमाने त्याच सामग्रीच्या साहाय्याने वाचकाला तपासून पाहणे शक्य होणे म्हणजे तर्कशुद्धता होय. याचा
अर्थ मांडणीमध्ये पोकळी अथवा संदिग्धता असू नये. तसेच
केलेले वर्गीकरण, सारणी करण व त्यावरून केलेले विश्लेषण शब्दरूपाने मांडावे.
८. अभ्यास विषयाची व्याप्ती अहवाल लेखनामधील अभ्यासासाठी निवडलेले क्षेत्र नमुन्याची निवड कोणत्या आधारावर केली इत्यादींचा स्पष्ट उल्लेख करावा. म्हणजे निष्कर्ष किती प्रमाणात व्यापक आहेत याची वाचकाला कल्पना येते. आपल्या संशोधन निष्कर्षाची व्याप्ती व मर्यादा स्पष्ट करण्याचा प्रामाणिक प्रयत्न अहवाल लेखनात केला पाहिजे.
९. संख्याशास्त्रीय पद्धतींचा काळजीपूर्वक वापर संशोधनासाठी संख्याशास्त्रीय पद्धती वापरणे जरी योग्य असले तरी त्यांचा उपयोग योग्य पद्धतीने करणे गरजेचे असते. म्हणजेच नमुना निवडताना तो योग्य त्या प्रमाणात प्रातिनिधिक आहे की नाही हे पाहावे लागते. सहसंबंध आढळल्यास ते सदोष नाहीत. यासाठी संबंधित चलांतील कार्यकारणभाव तपासून घेतले पाहिजेत. आपण
काढलेले निष्कर्ष बरोबर येण्याची संभाव्यता किती आहे, त्याची विश्वसनीयता किती प्रमाणात आहे इत्यादी माहिती गणिती पद्धतीने मांडली पाहिजे. संख्याशास्त्रीय पद्धतीचा योग्य तेथे व योग्य त्या प्रमाणात वापर झाला पाहिजे.
१०. तटस्थता अहवाल लेखकाने आपल्या संशोधनाबाबत तटस्थ वृत्ती बाळगली पाहिजे. म्हणजे त्याच्या निरीक्षणावर, विवेचनावर व निष्कर्षावर आपल्या मतांचा, विचारांचा व विकारांचा प्रभाव पडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. आपल्या निरीक्षणातून व विवेचनातून जे निष्कर्ष निघतील ते स्वीकारण्याची त्याची तयारी असली पाहिजे. सामाजिक शास्त्रातील संशोधकाला तटस्थता बाळगणे वाटते तितके सोपे असत नाही.
अहवाल लेखन करणारा संशोधक आग्रही जरूर हवा पण तो आग्रह अनुभवाचा, निरीक्षणाचा, तर्कशुद्ध विचारपद्धतीचा हवा, आपल्या मनाचा पूर्वग्रह नसावा. संशोधनातील निष्कर्षाकडे पाहण्याची त्याची वृत्ती, दृष्टी पाण्यासारखी स्वच्छ असावी. संशोधनाअंती जो रंग येईल तो स्वीकारण्याची त्याची वृत्ती हवी आणि त्याचेच प्रतिबिंब अहवालात उमटले पाहिजे.
अहवालाचा आराखडा अगर मुद्दे (Contents)
संशोधनासाठी एखाद्या समस्येची निवड केल्यानंतर त्याला अनुसरून तथ्य संकलन, सारणीकरण, आलेख लेखन, विश्लेषण व अर्थशोधन करेपर्यंत आपल्या गृहीतकाला काही आधार मिळतो किंवा नाही, आपण
काही कार्यकारण संबंध स्पष्ट करणारे निष्कर्ष मांडू शकतो. त्यामुळे त्यांना काही आधार मिळतो किंवा गृहीतक चुकीचे ठरवू शकतो. याबाबतचे अंतिम निष्कर्ष शब्दरूपाने अहवालात मांडले जातात. हा जो अहवाल लिहिला जातो त्यातील महत्त्वाचे मुद्दे म्हणजेच अहवालाचे भाग पुढीलप्रमाणे सांगता येतील.
१. अहवालाचा दर्शनी भाग किंवा प्रास्ताविक भाग अहवालाचा दर्शनी भाग म्हणजे रंगीबेरंगी मुखपृष्ठ किंवा आकर्षक शीर्षक नव्हे, तर अहवालाची तोंडओळख करून देण्यासाठी संशोधनाबाबतची प्राथमिक माहिती यामध्ये दिलेली असते. मुख्य तपशिलापूर्वीचा भाग यामध्ये समाविष्ट असतो. त्यातील प्रमुख घटक पुढीलप्रमाणे सांगता येतील.
१. शीर्षक पृष्ठ: अहवालाच्या पहिल्या पानावर अहवालाचे शीर्षक (विषयाचे नाव) देणे जरुरीचे असते. त्याच पानावर अहवाल लेखक किंवा प्रमुख संशोधकाचे दिनांक, संशोधन संस्थेचे नाव इत्यादी तांत्रिक माहिती दिलेली असते. अहवालाचे शीर्षकछोटेसे पण आकर्षक असावे. त्यातील शब्दरचनेवरून विषयाचे आकलन व्हावे. काही
वेळा शीर्षक व उपमुख्य शीर्षक दिले जाते
२. पुरस्कार ज्या व्यक्तीने अथवा संस्थेने संशोधनास चालना दिली असेल त्या व्यक्तीच्या स्वाक्षरीसह नावाने पुरस्कार लिहिला जातो पुरस्कारात मुख्यत: अहवाल विषयाची थोडक्यात तोंडओळख, संशोधनाची उद्दिष्टे अहवाल पुरस्कर्ती संस्था इत्यादींचा समावेश असतो. उदा. टाटा सामाजिक संस्था मुंबई, यांनी पुरस्कार दिला असेल तर त्यांच्या नावे त्या संस्थेचे संचालक पुरस्कार लिहिताना पुरस्कारात अभ्यासाची उपयुक्तता स्पष्ट करण्याचा प्रयत्न असतो.
३. प्रस्तावना प्रस्तावनेत अहवाल लेखक आपल्या अहवालाबाबत प्राथमिक माहिती देतो. त्यात संशोधनाचे उद्देश, स्वरूप, व्याप्ती, विश्लेषण इ. माहिती असते. प्रस्तावना ही संशोधनकर्ता स्वतःच्या सहीने लिहीत असतो.
४. ऋणनिर्देश : संशोधनासाठी अनेक व्यक्ती आणि संस्थांचे अथवा संघटनांचे प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे साहाय्य होत असते. या सर्वांचा निर्देश नावानिशी व केलेल्या साहाय्यासह येथे केला जातो. संबंधितांबद्दल कृतज्ञता व्यक्त करणे हा त्याचा हेतू असतो.
५. सारांश : अलीकडे बऱ्याच संशोधन अहवालात थोडक्यात सारांश मांडणे हा अहवालाचा दर्शनी भाग समजला जातो. संपूर्ण संशोधनाचे व निष्कर्षाचे सार येथे थोडक्यात लिहिलेले असते. संबंधित संशोधनाचे वाचकास सम्यक् दर्शन व्हावे अशी अपेक्षा असते. सारांश, हा अहवालाचा अत्यंत वाचनीय असा गाभा असतो.
६. अनुक्रमणिका पुस्तकाप्रमाणेच अहवालासही अनुक्रमणिका असते. अनुक्रमणिकेत अहवालातील सर्व भागांची तपशिलासह मांडणी केलेली असते. कोणता भाग किती पृष्ठ क्रमांकावर आहे याची माहिती दिलेली असते. प्रस्तावना,
सारांश व अनुक्रमणिका वाचल्यानंतर 'वाचकास संशोधनाबद्दलची बहुतेक माहिती त्रोटक स्वरूपात होते.
२. अहवालाचा अंतर्भाग किंवा मुख्य तपशील
१. विषयप्रवेश व उद्देश : प्रत्येक अभ्यासविषयास काही पार्श्वभूमी असते. काही
ना काही उद्देशाने संशोधक संशोधन कार्यास प्रवृत्त झालेला असतो. काही
वेळा इतरांनी केलेल्या संशोधनाचा एखादा धागा पकडून संशोधनास सुरुवात केलेली असते. ती ऐतिहासिक पार्श्वभूमी अथवा संशोधनाचा आरंभबिंदू स्पष्ट करावा लागतो. त्यामुळे वाचकांच्या विचाराला एक प्रकारची दिशा मिळते. २. भाग शीर्षक: मजकुरातील मुद्द्यांच्या विश्लेषणातील तर्कसंगतीचा विचार करून प्रत्येक मुख्य मुद्द्यांस असे शीर्षक व उपशीर्षक देण्यात येते.
३. वापरलेल्या संकल्पना : संशोधक आपल्या संशोधन कार्यात संबंधित विषयात या पूर्वी वापरण्यात आलेल्या संज्ञाचा वापर करीत असतो. तर काही संज्ञा नवीन वापरल्या जातात. उदा. सापेक्ष दारिद्र्य, निरपेक्ष दारिद्र्य इ. रूढ नसणाऱ्या संज्ञा वापरल्यास त्यांचा अर्थ देणे आवश्यक ठरते. काही
वेळा तळटीपा देऊन सज्ञांची तर्कसंगती स्पष्ट करावी लागते.
४. तथ्य संकलन : सामाजिक संशोधनात तथ्य संकलनाला फारच महत्त्व असते. कारण
संशोधनाचा डोलारा त्यावरच उभा असतो. तथ्य
संकलन कोणत्या पद्धतीने केले ? पत्राद्वारे तथ्य संकलन केले असेल तर त्यासाठी कोणती खबरदारी घेतली; मुलाखती घेतल्या असतील, नमुना निवड पद्धतीचा अवलंब केला असेल तर नमुन्याचा आकार केवढा होता, तसा
नमुना का निवडला इत्यादींबाबतची माहिती अहवालाच्या या भागात द्यावी लागते.
५. तथ्यांचे विश्लेषण : तथ्य संकलन केल्यानंतर त्यावर कशी प्रक्रिया केली, कोणकोणते तक्ते तयार केले. या विविध सारणींवरून काढलेले आलेख व आकृत्या, निर्देशांक,
गुणांक, प्रमाण, विचलन इत्यादींची माहिती क्रमवार द्यावी लागते. सारणी, आकृत्या इत्यादींची मांडणी समयोचित व तर्कशुद्ध असावी लागते.
३. अहवालाचे फलित
अहवालाच्या मुख्य तपशिलानंतर विश्लेषण करून काढलेले निष्कर्ष या भागात लिहिले जातात. अहवालाच्या मुख्य भागात वेगवेगळे निष्कर्ष विखुरलेल्या स्वरूपात असतात ते या भागात एकत्र गठित केले जातात. त्यांचे परस्परसंबंध स्पष्ट करणे, त्यावरून काही अनुमा काढणे, अनुमानांचे सामान्यीकरण करणे व त्यावरून एखादा नियम अथवा सिद्धांत मांडणे, किंवा पूर्वीच्या सिद्धांताला पुष्टी देणे अथवा त्यातील काही त्रुटी दाखवून देणे यांसारख्या बाबी या भागात मोडतात. अर्थशास्त्र हे केवळ ज्ञानदायी शास्त्र नसून ते फलदायीही आहे. म्हणून संशोधनाचे अंतिम फलित या भागात असते. संशोधकाने अतिशय तटस्थ वृत्तीने व वस्तुनिष्ठ पद्धतीने निष्कर्ष लिहिले पाहिजेत. स्वतःला वाटतात म्हणून एकांगी लिखाण करण्याचा मोह संशोधकाने टाळला पाहिजे.
अहवालाचा पूरक भाग अहवाल परिपूर्ण होण्यासाठी या भागाचा उपयोग होतो. त्यात पुढील बाबींचा समावेश करता येईल.
परिशिष्टे (Appendix) : बऱ्याच वेळा तांत्रिक विषयावरील मूळ अहवालात आपणास उपयुक्त ठरलेल्या सिद्धांतांना स्थान देता येत नाही. अशा
वेळी संबंधित माहिती परिशिष्टात जोडली जाते. आपल्या मुद्द्याच्या समर्थनासाठी पूरक असणारा मजकूर परिशिष्टात असतो.
अहवालाचे उपयोग
१. तत्काळ वापर : काही
संशोधनाच्या निष्कर्षांचा तत्काळ वापर करावा लागतो. या बाबतीत उदाहरण म्हणून आज वैद्यकीय क्षेत्रातील अनेक वैद्यकीय अहवालांचा उल्लेख करता येईल.
२. धोरणासाठी आधार : बऱ्याच वेळा सरकारचे प्रशासकीय निर्णय हे संशोधन अहवालाद्वारे घेतले जातात. उदा. १९९१ मधील राजा चेलय्या समितीच्या कर सुधारणा अहवालात सध्याच्या कर व्यवस्थेचा आढावा घेऊन कररचनेते योग्य त्या सुधारणा करण्याविषयी शिफारशी केल्या आहेत. त्यांचा वापर करून त्याआधारे काउत्पन्न कार्यक्षमरित्या वाढविण्यासाठी सरकारने प्रयत्न केला आहे.
३. शोधावर हक्क सांगणे : सैद्धांतिक संशोधन व उपयोजित संशोधन अशा दोनही प्रकारच्या संशोधनांत काही वेळेला अपेक्षित तर काही वेळेला अनपेक्षितपणे नवीन माहितीचा, कारण परंपरेचा किंवा सिद्धांतांचा शोध लागतो. अशा
वेळी संबंधित संशोधक अहवाल प्रसिद्ध करतो व प्रकाशित करतो आणि त्याआधारे त्याने इतरांच्या अगोदर हा शोध लावलेला आहे याचा पुरावा निर्माण करतो. तो शोध त्याच्या नावावर नोंदला जातो. या संदर्भात गिफेनचा हलक्या प्रतीच्या वस्तूंबाबतचा विरोधाभास लक्षात घेण्यासारखा आहे.
४. संशोधनाला चालना देणे : प्रत्येक संशोधन अहवालामुळे संबंधित विषयात आवड निर्माण करण्याची व अधिक प्रगत संशोधन करण्याची प्रेरणा मिळते. संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ त्या अहवालाचे वाचन करतात. त्याच्या निष्कर्षांची सत्यता पडताळून पाहतात व त्यासाठी नवीन तथ्य संकलन केले जाते. त्यामधून नवीन विश्लेषण पद्धती विकसित होतात व आपोआप ज्ञानाचा विस्तार होतो.
५. भविष्यकालीन उपयोगासाठी नोंद : एखाद्या विषयावरील अहवाल काळजीपूर्वक लिहिणे व तो जतन करून ठेवणे भविष्यकालीन उपयोगासाठी अत्यंत श्रेयस्कर असते. प्रत्येक क्षेत्रात संशोधनाचे कार्य अविरतपणे चालू असते. अशा
संशोधनासाठी पूर्वी नोंद झालेल्या संशोधन अहवालांचा मागोवा घेणे आवश्यक ठरते. एखाद्या सिद्धांताची उत्क्रांती कशी झाली, एखादे तंत्र कसकसे विकसित होत गेले याबद्दल पूर्वीच्या संशोधन अहवालातून माहिती मिळते. त्यासाठी योग्य पद्धतीने अहवालाचे लिखाण करणे व तो योग्य स्वरूपात प्रकाशित करणे आवश्यक असते.आदर्श संशोधन अहवालाची लक्षणे प्रा. हंसराज यांनी चांगल्या (आदर्श) अहवालाचे गुण पुढीलप्रमाणे सांगितले आहेत.
१. विचारांची स्पष्टता अहवालात विचार व भाषेची स्पष्टता असेल तर संशोधनाचे स्वरूप व निष्कर्ष वाचकांना समजणे सहज शक्य होते. त्यामुळे विचारांचे (संदेशाचे) वहन होऊन ज्ञान संपादनाचा हेतू साध्य होतो.
२. योग्य संकल्पनांचा वापर : संशोधनासाठी संशोधकाला काही प्रचलित तर काही नवीन संकल्पनांचा वापर करावा लागतो. अशा
संकल्पना बिनचूक व स्पष्ट होण्यासाठी त्यांच्या व्याख्या देणे आवश्यक ठरते.
३. तांत्रिक परिभाषेचा वापर प्रत्येक शास्त्राची स्वत:ची अशी एक तांत्रिक परिभाषा असते. ती पूर्णपणे समजून घेऊन अहवाल वाचकांचा गोंधळ होणार नाही अशा पद्धतीने परिभाषेचा काळजीपूर्वक वापर करावा लागतो.
४. समस्येचे स्पष्ट विधान: आपण
ज्या समस्येसंबंधी संशोधन करीत आहोत ती सर्वकष पद्धतीने स्पष्ट करणे आवश्यक असते. त्यामुळे संशोधन अहवालाचा हेतू साध्य होतो. ५. मांडणीची पद्धत शास्त्रीय संशोधनाचा अहवाल योग्य पद्धतीने मांडल्याशिवाय तो उपयुक्त व आकर्षक ठरत नाही. सामान्यतः अहवालाची भाषा प्रासादिक, स्पष्ट व ओघवती असली पाहिजे. त्यामध्ये पर्याप्तता असली पाहिजे. उप-विषयाशी संबंधित पुरेशी प्रकरणे असली पाहिजेत. संख्याशास्त्रीय व इतर तथ्ये पुरेशी दिलेली असली पाहिजेत. आवश्यक ते संदर्भ भरपूर दिले पाहिजेत. अहवाल पर्याप्त आकाराचा असला पाहिजे. असा
अहवाल आदर्श समजला जातो.
६. विश्वसनीयता : विश्वसनीयता ही आदर्श अहवालाची महत्त्वाची अट व आवश्यक लक्षण आहे. अहवालात विश्वसनीयता प्राप्त होण्यासाठी संदर्भ, विश्लेषण पद्धती, संख्याशास्त्रीय व सैद्धांतिक आधार यांबाबत आवश्यक ते पुरावे देणे आवश्यक ठरते.
७. मर्यादेची स्पष्टता प्रत्येक संशोधनात संशोधकाला काही मर्यादांमध्ये काम करावे : लागते. या मर्यादा स्पष्ट करणे हेसुद्धा आदर्श अहवालाचे लक्षण आहे. संशोधन अहवाल हा वाढत जाणाऱ्या व ज्याची खातरजमा करून घेता येते अशा ज्ञानाचा भाग असतो. त्याच्या आधाराने व्यक्तिगत, सामूहिक अथवा समाजाच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानवी .व्यवहारांची पुढील दिशा ठरत असते. म्हणूनच संशोधन अहवालाच्या मर्यादा अहवालात प्रतीत होणे आवश्यक असते.
८. श्रमाचे चीज : संशोधन प्रकल्पात योजनेची आखणी करणे, प्रश्नावलीच्या किंवा अन्य मार्गाने तथ्य संकलन करणे, त्यावरून टिपणे भरणे, वर्गीकरण करणे, सारणीकरण करणे, आलेख-आकृत्या काढणे, संदर्भ शोधणे, सामग्रीचे विश्लेषण करणे, कार्यकारणसंबंध शोधून काढणे इत्यादी प्रक्रियांमध्ये ज्याचे ज्याचे साहाय्य झाले असेल त्यांच्या कामाचा उल्लेख अहवाल लेखनात झाला पाहिजे. म्हणजे त्यांच्या जबाबदारी पार पाडण्याच्या श्रमाचे चीज-कौतुक झाले पाहिजे.
अहवाल लेखन करताना घ्यावयाची दक्षता यामध्येही आदर्श अहवालाची काही लक्षणे सामावलेली आहेत.
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.