(Mokashi P. A.)
B.A.II SEMESTER - 4
(I.D.S.) PAPER NO.-II
महाराष्ट्रातील समाजसुधारणेचा इतिहास
(HISTORY OF SOCIAL REFORMS IN MAHARASHTRA)
(अ) १९ व्या शतकाच्या प्रारंभीची भारतातील सामाजिक परिस्थिती:
(अ)
धर्म, अंधश्रद्धा, व्रतवैकल्ये व लोकभ्रम :
१९ व्या शतकाच्या प्रारंभी भारतीय समाजात वर्णव्यवस्था, या वर्णव्यवस्थेतील प्रत्येक
वर्णात जाती, उपजाती, पोटजाती होत्या. भारतात हजारोंच्या संख्येने जाती-पोटजाती होत्या. या जातिव्यवस्थेतील कडक निर्बंधांना विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. या काळात समाजजीवनातील अनिष्ट चालीरीती, रूढी, परंपरा व पोथीनिष्ठता यांना विशेष महत्व प्राप्त झाले होते. धार्मिक आचार व पोथीनिष्ठ धार्मिक विचारांचा प्रचंड प्रभाव येथील समाजजीवनावर
पडला होता. पुरोहित असणाऱ्या ब्राह्मण वर्गाचे येथील समाजात सर्वच क्षेत्रांत प्राबल्य
होते. मूळ वैदिक धर्माची तत्त्वे व नीतिमत्ता बाजूला पडली होती. समाजात अज्ञान, निरक्षरता व धर्मभोळेपणा होता. त्यामुळे धर्ममार्तंड सांगतील तोच खरा धर्म मानला जात होता. कर्मकांड व व्रतवैकल्ये यांना महत्त्व प्राप्त झाले होते. यज्ञ-याग, सोवळे-ओवळे, ब्राह्मण भोजने, दानधर्म, ज्योतिष, मुहूर्त, जप, तप, पायगुण, शकुन अपशकुन, मांजर आडवे जाणे, भांडणे, भालू भुंकणे, घुबड घुमणे, विधवा स्त्री आडवी येणे इत्यादींविषयीचे शकुन-अपशकुन मानण्याचे लोकभ्रम समाजात अस्तित्वात होते. उदा. शिंकणे चांगले-वाईट, पाल चुकचुकणे, अंगावर पडणे, कुत्रे रडणे यावर लोकांचा विश्वास होता. तंत्र-मंत्र, जादूटोणा, भूत, चेटूक, पिशाच्च यांना महत्त्व प्राप्त झाले होते. तंत्र व मंत्राने संकटे दूर होतात, अरिष्ट टळते अशी समजूत होती. त्यामुळे अंधश्रद्धा व बुवाबाजी यांची बजबजपुरी समाजात माजली होती. असे तांत्रिक, मांत्रिक बुवा भोळ्याभाबड्या अडाणी लोकांची
पिळवणूक करत होते.
(ब) जातिव्यवस्था :
या काळात जातिव्यवस्थेचा, जातिसंस्थेचा समाजावर मोठा प्रभाव होता. जातिव्यवस्था ही भारतीय
समाजाला लागलेली भयंकर मोठी कीड होती. या देशात हजारो
जाती होत्या व आहेत. याशिवाय शूद्र
अति शूद्र, अस्पृश्य, आदिवासी, भटके-विमुक्त, बारा बलुतेदार, अठरा अलुतेदार या जातिव्यवस्थेला धर्मशास्त्रे व पुराणे
यांचा आधार होता. या जातिसंस्थेची समाजावर पोलादी पकड होती. मनुष्य ज्या जातीत
जन्मला ती त्याची
जात ठरत असे.
जातीला परंपरेने ठरवून दिलेला
धंदा त्यास करावा
लागे. जातीवरून व्यक्तीची उच्च-नीचता, श्रेष्ठत्व कनिष्ठत्व ठरत असे.
अति शूद्र जातीच्या लोकांना मूलभूत
मानवी हक्कांपासून वंचित ठेवले
होते. जातीबाहेर रोटी-बेटी व्यवहार होत नसत. जातीबाहेर विवाह केल्यास तो गंभीर स्वरूपाचा सामाजिक गुन्हा
मानला जात असे.
(क) अस्पृश्यता :
भारतीय समाजातील जातिव्यवस्थेच्या विषवृक्षास लागलेले महाविषारी फळ म्हणजे 'अस्पृश्यता' होय. या देशातील हिंदू धर्मशास्त्रे व पुराणे यांनी
शूद्र, अति शूद्र, अस्पृश्य, चांडाळ
व समाजातील सर्व हीन मानलेल्या जातींना जन्म दिला. या अति कनिष्ठ
जातींना अस्पृश्य मानले. अस्पृश्य म्हणून त्यांना गावकुसाबाहेर ठेवले. त्यांना अत्यंत
हीन व घाणेरडी कामे दिली. महार, मांग, ढोर,
चांभार यांना
अस्पृश्य म्हणून
वागवत. अस्पृश्यता काटेकोरपणे पाळली
जात असे. त्यांना मंदिरात प्रवेश
दिला जात नसे.
अस्पृश्यांचे पाणवठे
वेगळे, मसनवटे
वेगळे होते. यावरून मनुष्य
मेल्यानंतरसुद्धा त्याची
जात जात नसे हे स्पष्ट
होते.
(ड) वेठबिगार, दास दासी :
अति शूद्र
जातीतील लोकांना वेठबिगार म्हणून
विविध स्वरूपाची कामे करावी लागत असत.
गावातील व परगण्यातील वतनदार म्हणजे
पाटील, देशमुख, जहागीरदार इत्यादी लोकांकडे वेठबिगारी करावी लागे. वेठबिगारांना सरकारी
बांधकाम करणे, रस्ते दुरुस्ती करणे, सरकारी
कुरणातील गवत कापणे
इत्यादी कामे करावी
लागत. भारतीय
समाजव्यवस्थेत दास दासींची पद्धत अस्तित्वात होती. जहागीरदार, सरदार, राजे-रजवाडे यांच्याकडे दास दासी ठेवल्या जात असत. महाराष्ट्रातः दासांना 'पोरगे' म्हणत तर दासींना कुणबीण म्हणत, विशेषतः श्रीमंत लोक घरगुती कामासाठी दास-दासी ठेवत असत.
या दास दासींना मोबदला देऊन किंवा
पर्यायी व्यक्ती देऊन मुक्तता करून घेता येत असे.
दास दासी वृद्ध
झाल्यावर त्यांची मुक्तता मालकाकडून केली जात असे.
(इ) स्त्रीजीवन : १९ व्या शतकातील समाजव्यवस्था ही पुरुषप्रधान होती. मालमत्तेचे अधिकार फक्त पुरुष वर्गासच होते. कुटुंबप्रमुख पुरुष असे. त्याची सत्ता कुटुंबावर चालत असे. येथील समाजात स्त्रीची स्थिती मात्र अत्यंत वाईट होती. स्त्रीला धर्मशास्त्रे, रूढी व परंपरा, चालीरीती यांच्या बंधनात सर्व बाजूंनी जखडले गेले होते. तिच्याकडे फक्त भोगवस्तू
म्हणूनच पाहिले जाई. चूल व मूल एवढेच तिचे काम होते. या काळात स्त्रीला गुलामाप्रमाणे वागविले जाई. या काळातील स्त्रियांविषयीच्या चालीरीती, रिवाज व परंपरा पुढीलप्रमाणे होत्या.
१. सती पद्धती : भारतीय समाजातील सती पद्धती
स्त्री जातीला मिळालेला मोठा शाप होता. सतीची चाल म्हणजे माणुसकीला काळिमा फासणारी पद्धत होती. बहुतेक वेळा पतीच्या निधनानंतर स्त्रीला जबरदस्तीने सती जाण्यास भाग पाडले जात
असे. बालविवाह पद्धत रूढ
असल्यामुळे १०-१२ वर्षांच्या मुलीला सती जाणे भाग पाडले जात असे.
२. बालविवाह व विधवा विवाहास
बंदी : भारतीय समाजात मुलीचे ८ ते ९ वर्षाच्या वयातच लग्न करीत असत. मुलीचे वय १२ वर्षांच्या पुढे गेल्यास तो अधर्म मानत असत. मुलाच्या लग्नाचे वय १२ ते १४ वर्षाचे असे. एखाद्या साथीच्या रोगात पतीचे निधन
झाल्यास त्या मुलीस सती जावे लागत असे. सती न गेल्यास आयुष्यभर विधवा म्हणून राहावे लागे. ब्राह्मण समाज व ९६ कुळी क्षत्रिय मराठा समाजात विधवांच्या विवाहास बंदी होती. शूद्र व अति शूद्र समाजात विधवांच्या विवाहास परवानगी होती.
३. केशवपन : ब्राह्मण समाजातील स्त्री विधवा झाल्यास त्या विधवा
स्त्रीचे केशवपन व मुंडन करण्याची प्रथा रूढ होती. केशवपनामुळे ती विद्रूप व कुरूप दिसावी हा हेतू होता. अशा विधवांना आयुष्यभर अपमानित व परावलंबी जीणे जगावे लागत असे.
४. बहुपत्नीकत्व : १९ व्या शतकात भारतीय समाजात बहुपत्नीकत्वाची चाल मोठ्या प्रमाणात अस्तित्वात होती. समाजातील श्रीमंत वर्ग व वतनदार वर्ग यांच्यात ही प्रथा सर्रास सुरू होती. पुरुष कोणत्याही वयात कितीही लग्ने करीत असत. याशिवाय अंगवस्त्र ठेवण्यास पुरुषाला समाजाची मान्यता होती.
अशा प्रकारे १९ व्या शतकाच्या प्रारंभी भारतीय समाजाची सामाजिक स्थिती होती. या शतकातच इंग्रजांचे राज्य भारतात स्थिर झाले होते. अशा या मागासलेल्या भारताने इंग्रजांच्या राजवटीत आधुनिक युगात प्रवेश करण्यास प्रारंभ केला. इंग्रजांनी शिक्षण पद्धती सुरू केली. इंग्रजांनी सर्व क्षेत्रांत प्रगत झालेले पाश्चिमात्य ज्ञानाचे भांडार भारतीयांसाठी खुले केले. इंग्रजी शिक्षणामुळे पाश्चात्त्य आधुनिक विचार व ज्ञान भारतात आले. नवशिक्षित भारतीय तरुण बुद्धिप्रामाण्यवादी बनला. प्रगल्भ विचार, विज्ञान, तंत्रज्ञान, व्यक्तिस्वातंत्र्य, समता, उदारमतवादी विचार यांसारख्या मूलभूत तत्त्वांचे ज्ञान येथील समाजाला होऊ लागले. इंग्रज राज्यकर्ते व प्रशासकीय अधिकारी यांनी भारतातील सर्व क्षेत्रांत परिवर्तनास सुरुवात केली. येथील समाजाला त्यांनी सर्वांत प्रथम शांतता व सुव्यवस्था प्रदान केली. येथील समाजाने इंग्रजी राजवटीचे स्वागत केले. कारण इंग्रजपूर्व राजवटीतील अन्याय, जुलूम, जबरदस्तीमुळे जनता त्रासून गेली होती. गावगुंड, ठग व पेंढारी लोकांच्या लूटमार, उपद्रव व दहशतीने ते त्रासले होते. त्यामुळे इंग्रज व इंग्रजांचे प्रशासन चांगले असे त्यांना वाटू लागले. नवशिक्षित तरुण वर्ग आत्मपरीक्षण करू लागला. अंधश्रद्धेऐवजी त्यांची दृष्टी डोळस बनली. आपल्या चालीरीती, रूढी व परंपरा तसेच धर्मशास्त्रे यांचा विचार बुद्धी प्रमाण मानून करू लागले. यातून आपल्या समाजातील दोष त्यांच्या लक्षात आले. हे दोष दूर केल्याशिवाय आपली प्रगती होणार नाही याची जाणीव त्यांना झाली. आपण अभ्यासलेल्या विविध सामाजिक दोषांवर त्यांनी बारकाईने विचार केला व यातून मुक्त होण्यासाठी या विचारवंतांनी अनेक समाजसुधारणा करण्यास सुरुवात केली. यातूनच समाजसुधारणा चळवळी व धर्मसुधारणा चळवळी सुरू झाल्या. ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज, रामकृष्ण मिशन, सत्यशोधक समाज, परमहंस सभा इत्यादी चळवळी सुरू झाल्या. या परिवर्तनवाद्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या शासनास सामाजिक सुधारणांसाठी सर्वतोपरी साहाय्य केले. कंपनी सरकारनेसुद्धा अनेक हेतूंनी येथे काही सुधारणा घडवून आणल्या
स्वाध्याय: सरावासाठी सोबत दिलेली प्रश्नपत्रिका सोडवा. त्यासाठी खाली दिलेली लिंक कॉपी करून गुगलमध्ये पेस्ट करा.
https://forms.gle/yS3G9e8sVJCzC8aL9
No comments:
Post a Comment
Note: only a member of this blog may post a comment.